
नैसर्गिक वैविध्यतेने भारत जितका नटला आहे, तितकाच भाषेच्या बाबतीतही नटलेला आहे. चाळीस मैलावर भाषा बदलते. पूर्वीच्या काळी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ग्रंथाशिवाय दुसरं माध्यम नव्हतं. सर्व भाषांमध्ये ग्रंथ निर्मिती होत असे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा उगम फार पूर्वी झालेला असला तरीही कोणताही पुरावा नसल्याने प्राचीनत्व सिद्ध करता येत नाही. अमृताते पैजा जिंकेन असे मराठी भाषेबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात. इ.स. आठव्या शतकात श्रवण बेळगोळ येथे उभारलेल्या गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आतापर्यंतचा पाहिला मराठी भाषेचा शिलालेख सापडला. बाहुबली हे जैन राजपुत्राला आपला आदर्श मानून एका मराठा सरदाराने ही मूर्ती उभी केली. या पूर्वीही मराठी भाषा लिहिली जात होती. त्या काळातील लिखाण ताडपत्रावर केले जात असे. ज्याच आयुष्य फार कमी असे. काही कारणास्तव तत्कालीन ग्रंथ उपलब्ध नसल्याने हा शिलालेख प्रथम पुरावा मानला जातो. ज्योतिषरत्नमाला ‘श्रीपति भट्ट’ याने १०३९ च्या सुमारास मूळ संस्कृतात हा ग्रंथ रचला व त्यावर संस्कृतात व मराठीत टीकाही लिहिली. मराठीत उपलब्ध असलेली ही टीका अपूर्ण आहे. मराठी वाङमयातील हा पहिला पुरावा असू शकतो. अंबेजोगाई येथे बाराव्या शतकात मुकुंदराज हे मराठीचे आद्यकवी होऊन गेले. अंबेजोगाई येथे त्यांची समाधी आहे. विवेकसिंधु हा त्यानी लिहिलेला मराठीतील पाहिला ग्रंथ मानला जातो. विवेकसिंधु या ग्रंथात शांकर अद्वैत मतावर टिका लिहिली गेली आहे. मुकुंदराज हे फक्त कवि नसून श्रेष्ठ साधकही होते. त्यांच्या समाधिनंतर ७५ वर्षानी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला अस मानलं जातं. परंतु मुकुंदराज यांच्या कालखंडाबाबत अभ्यासकांच दुमत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी गीतेवर टीकाभाष्य करून ज्ञानेश्वरानी मराठी भाषेची वाङमय पताका साहित्याच्या शिखरावर फडकवली. येथूनच खऱ्या अर्थाने भक्ति वाङमयाला सुरवात झाली. ज्ञानेश्वरानी केलेले टीकाभाष्य सचिदानंद बाबानी लिहून काढल. आणि आज आपण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, त्या महान ग्रंथचा जन्म झाला. या ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरानी गीतेचे लोकांपासुन अलिप्त राहिलेले ज्ञान उघड केल. मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला. म्हणूनच ज्ञानेश्वरांना माऊली म्हटले जाते. याच कालखंडात होऊन गेलेल्या चक्रधर स्वामी यांच्या लीला त्यांच्या शिष्याद्वारे संकलित केल्या गेल्या. या कथाच्या आधारावर लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती झाली. वाङमयीन साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल इतका हा सुंदर ग्रंथ आहे. महानुभाव पंथाचे सर्व ज्ञान या ग्रंथात सामावलेले आहे.

पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधर यांच्याकरवी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखन झाले व खऱ्या अर्थाने दत्तसंप्रदायाला सुरवात झाली. हा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे की त्याला पाचवा वेद म्हटले जाते. या ग्रंथात श्री नृसिंहसरस्वती यांचे जीवन चरित्र वर्णिलेले आहे. ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र हे दोन ग्रंथ अनुक्रमे वारकरी संप्रदाय व दत्त संप्रदायाचे खरे रूप आहे. ज्या प्रमाणे शीख धर्मामध्ये ग्रंथ साहेब या ग्रंथाला महत्व आहे, तितकेच महत्व या दोन ग्रंथांना महाराष्ट्रात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या नंतरही अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. या कालखंडात होऊन गेलेल्या प्रत्येक संतावर ग्रंथ निर्मिती झाली. या लेखनाच्या माध्यमातून भक्ति वांड्मय जोपासलं गेलं. मानावाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी हेच ग्रंथ तेजोसूर्य ठरले. परदेशात अनेक विषयांवर ग्रंथ निर्मिती झाली, तशी भारतात होऊ शकली नाही. परंतु भक्ती विषयावर हजारो ग्रांथांची निर्मिती झाली. परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांच्या कडून दत्त संप्रदायातील अनेक ग्रंथ, लघु ग्रंथ, पद, भजने, आरत्या रचल्या गेल्या. टेंबे स्वामींची काव्यव्युत्पत्ती कल्पनातीत होती. त्यांनी संस्कृत, प्राकृत भाषेत दत्तभक्तांसाठी विपुल साहित्य निर्मिती केली आहे. दाभोलकर यांनी लिहिलेला साईसतचरित्र हा ग्रंथ भाषाविद्वत्तेचा, वाङ्मयीन भाषालंकाराचा नमुना म्हणावा लागेल. सुबोध, बाळबोध, गोड भाषा ही दासगणूंची जणू ओळख ठरावी. या सर्व शब्दप्रभू साहित्यकर्मी विभूतींमुळे आज आपल्याकडे भक्ती वाङ्मय उपलब्ध आहे जे धृव ताऱ्यासारखे परमार्थाचे दिशा दर्शन करीत आहेत.