श्री श्रीपाद वल्लभ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, आणि त्यांच्या नृसिंह स्वरूपाची आठवण म्हणून या भुमीस नृसिंहवाडी म्हटले जाते. येथे स्वामींनी एक तप वास्तव्य केले होते. कृष्णेच्या काठावर वसलेले हे गाव निसर्गरम्य आहे. त्यामूळेच याला महाराजांची राजधानी म्हटले जाते. दत्त संप्रदायातील बऱ्याच महान विभूती या ठिकाणी वास्तव्यास होत्या. येथील पादुकांना ‘मनोहर पादुका’ म्हटले जाते.

सुखासाठी करिसी तळमळ । तरी तू वाडीस जाई एक वेळ । मग तू अवघाची एकरूप होसी । जन्मोजन्मींचे दु:ख विसरसी ॥

श्री दत्तांची राजधानी नृसिंहवाडी

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.

नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.

पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चरवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नृसिंहजयंती, रामनवमी व इतर सणकादीक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात.
नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं.
वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही.

श्रीदत्तात्रेयावतार श्रीनरसिंहसरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा-पंचगंगा संगमानजिक आज असलेल्या स्थानात बारा वर्षे वास्तव्य करून होते. येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर (औरवाड) हे गाव होते. आजही आहे. तेथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांच्या सन्निध चौसष्ट योगिनींचा परिवार आहे. श्रीनृसिंहसरस्वतीमहाराजांची सेवा योगिनींनी ते असेपर्यंत केली. नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हातरी वसलेले आहे. तोपर्यंत शुक्लतीर्थापासून संगमापर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणूनच धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा.
६४ योगिनी पूजा करतांना

मत् चिता चिंती साची ही वाडी नरसोबाची हे वाक्यच ज्या महापुरुषाने आपल्या काव्यात ग्रंथीत केले आहे असे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सांगतात की ही वाडी म्हणजे श्री दत्तात्रेयांची राजधानी आहे. श्री महाराज काशीस संन्यास घेतल्यानंतर कारंज्यास आपल्या जन्मस्थानी आले. तेथून दक्षिणेस येत असता, भिलवडी म्हणजे औदुंबर या कृष्णेच्या काठी वसलेल्या ‘गावी’ येऊन एका औदुंबर वृक्षाखाली तपश्चर्या करू लागले. तेथे असता एका करवीरस्थ ब्राह्मण पुत्राला भगवती भुवनेश्वरी देवीनी आज्ञा केल्यानंतर कृष्णा प्रवाहात पोहत येऊन श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांना अनन्य भावाने शरण गेल्यानंतर श्री महाराजांनी कृपामृताने पावन करून त्या मंदमती ब्राह्मण पुत्राला ज्ञानी केले.
पुढील कार्यासाठी श्री नृसिंहवाडी येथे आगमन केल्यावेळी तेथे घनदाट वृक्षांनी व्याप्त झालेला प्रदेश होता. जवळच भगवती पुण्यपावन गंगा कृष्णामाता आपल्या पुण्यपावन जलाने दु:खितांचे ताप हरण करीत संथपणे वाहात होती. तेथे एका रम्य औदुंबर वृक्षाच्या खाली एका प्रस्तरावर श्री स्वामी महाराज ध्यान धारणा करीत होते. दोनप्रहरचे वेळी पैलतीरावर असलेल्या अमरापूर या ठिकाणी भिक्षेस जात असत व परत त्या ठिकाणी येऊन ध्यानयोग साधत असत. असे काही दिवस गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या अलास गावच्या श्रीपादभट जेरे हे वृद्ध गृहस्थ जवळ असलेल्या शिरोळ ग्रामी जोशीपणाची वृत्ती करीत असत. ते मार्गस्थ असता श्री स्वामी महाराजांना वंदन करून पुढे जात असत. असे काही दिवस गेल्यानंतर त्या ब्राह्मणाचा भाग्योदय झाला व त्याचेकडून भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपी श्री दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली व या वृद्ध ब्राह्मणास तेथे अर्चक म्हणून ठेवले. श्री स्वामीमहाराजांनी पुढील कार्यासाठी गमन करतेवेळी या ब्राह्मणास आशीर्वाद दिला की या औदुंबर वृक्षास जेवढी फुले, फळे आहेत. तेवढा तुझा वंशवृक्ष वाढेल. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दु:खे निवारण करण्यासाठी आहेत. काही दिवस ते श्रीपादभट आलासहून दररोज त्या ठिकाणी येऊन अर्चना करीत असत. काही काळानंतर तेथे हळुहळू वस्ती झाली व श्री नृसिंह सरस्वती तेथे तपश्चर्या करीत असल्याने त्या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नाव प्राप्त झाले. तेथे श्रीपादभटाचे पुत्राने वंशोवंशी राहून श्री महाराजांची अर्चना केली. अशा या ठिकाणी सिद्धगुरु, सिद्ध साधूयोगी यांनी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली. त्यामध्ये परमपावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपाळस्वामी महाराज, श्री मौनीस्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले. काही काळानंतर या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले.
नृसिहवाडी मंदिर

श्रीनृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकऱ्यांनीच आपल्या प्रेमाने गुरूमाऊलीला सतत जागृत ठेवले आहे. म्हणूनच आजही हजारो भक्तांनी या पुजाऱ्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीदत्तगुरूंनी दिलेल्या फळांचा रोकडा अनुभव घेतला आहे. दक्षिणद्वार पर्वणी, संततधार, नित्य पालखी, महाराजांचे विविध उत्सवही पुजारी मंडळी किती आपुलकीने करतात आणि म्हणून श्रीदत्तप्रभूंची प्रसन्नता या स्थानात किती प्रकर्षाने जाणवते
श्रींची पूजा, अर्चना व दिनक्रम

या ठिकाणी अनेक भक्तानी, त्यामध्ये आर्त, जिज्ञासू अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करीत असल्याने हे स्थान आसपासच्या गावांत प्रसिद्ध झाले. या ठिकाणी वास्तव्य करून सर्व ब्रह्मवृंद या मनोहर पादुकांची तीन त्रिकाळ अर्चना करीत असून, ही अर्चना चालूच आहे.
श्रींच्या मनोहर पादुका

प्रात: काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो. थोड्यावेळाने श्री सूर्यनारायण उदयाचलावर येण्यापूर्वी श्री महाराजांना कृष्णामातेच्या जलाने स्नान घातले जाते व पंचोपचार पूजा करुन महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते व त्यावर नागदेवतांची स्थापना करून प्रात: कालची पूजा संपूर्ण होते. नंतर ९ वाजणेचे सुमारास अनेक भक्तगण बाहेरगांवचे येऊन, स्नान करून, पंचामृत पूजेस सिद्ध असतात. अर्चक स्नान करून पादुकांवरील वस्त्र दूर करून श्री पादुका भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पंचामृत स्नानास सिद्ध करतात. हा उपक्रम साधारणपणे तीन तास चालू असतो.
पुढे माध्यान्हकाळी या पादुकांची महापूजेस सुरुवात होते. त्यावेळी पादुकांवर दूध, केळी, आंब्याच्या दिवसात आमरस, दही, दूध, तूप, मध यांचे लेपन करून गरम पाण्याने श्री महाराजांना मांगलिक स्नान घातले जाते. नंतर स्वच्छ अशा वस्त्राने पादुकांवरील जल शोषित केले जाते. नंतर सुगंधित, पण मंद सुवासिक अत्तराचे लेपन केले जाते. महाराज स्वत: शांत वृत्तीचे असल्याने अत्तर सुद्धा मोगरा, चमेली, गुलाब असे असते. नंतर पादुंकावर सुगंधित पुष्पांचे अच्छादन केले जाते. तुळशीपत्र, बिल्वपत्र यांचेही अर्पण केले जाते. नंतर श्री पादुकांवर दिव्य छाटीचे आवरण केले जाते. त्यावर रेशमी वस्त्र जरीकाठी अर्पण करतात. नंतर नागदेवांची वर स्थापना करून त्रिमूर्तीचे सुवर्णमुकुट त्या ठिकाणी ठेवतात. महाराजांना दोनप्रहरच्या वेळी तृष्णा भागवण्यासाठी थंडगार व सुगंधित पाण्याने भरलेल्या कमंडलूची व्यवस्था केली जाते. नंतर भक्तवृंद अनेक आरत्या म्हणून महाराजांची आराधना करतात. नंतर श्री महाराजांना रौप्य ताटामध्ये षड्रस अन्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो. नंतर प्रसाद तीर्थ घेऊन सर्व भक्तवृंद आपल्या घरी आपल्या घरी दोनप्रहरचे भोजन करण्यासाठी रवाना होतात. अशाप्रकारे श्री पादुकांची माध्यान्हपूजा पूर्णत्वास येते.

दुपारचे वेळी विद्वान ब्रह्मवृंद मंजुळ आवाजाने श्री महाराजांपुढे वेदमंत्राचे पठण केले जाते. सायंकाळी पुराणिकांकडून श्री महाराजांना दिव्य पुराणांचे श्रवण करविले जाते. सायंकाळी सात वाजल्यापासून महाराजांच्या सायंपूजनास प्रारंभ होतो. त्यावेळी अर्चक पंचोपचार पूजा करून धूप अर्पण करून मंगल आरती करतात. त्यावेळी चांदीच्या पात्रामधून केशरयुक्त दूध, काही फराळाचे जिन्नस व नाना प्रकारची फळे यांचा नैवेद्य श्री महाराजांना अर्पण केला जातो. नंतर श्री महाराजांची उत्सवमूर्ती दिव्य वस्त्र व दिव्य अलंकार यांनी सुशोभित करून, छत्र चामरासहित श्री नारायणस्वामींचे मंदिरातून मंगल वाद्य व नामघोषाच्या गजरात खाली महाराजांचे मंदिरात आणतात. तेथे पुष्पहार महाराजांना अर्पण केले जातात. त्यावेळी अर्चक ब्रह्मवृंद दिव्य आरत्या झांजांच्या गजरात म्हणतात. नंतर सुशोभित अशा महाराजांची उत्सवमूर्ती त्या शिबिकेमध्ये विराजमान होते आणि मंगल गजरामध्ये त्या शिबिकेच्या महाराजांभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यावेळी सर्व ब्रह्मवृंद उपासक व भक्तवृंद निरनिराळ्या मंगल पदांनी व भावपूर्ण अंत:करणाने श्री महाराजांना आनंदित करतात. नंतर तीर्थप्रसाद होतो व ब्रह्मवृंद मंत्रपठणाने महाराजांना संतोषित करतात. नंतर महाराज मंत्र गजरामध्ये दिव्य नामघोषात श्री नारायण स्वामींचे मंदिरात आपल्या ठिकाणी विराजमान होतात. रात्री शेजारती होते. श्री महाराज शयनगृहामध्ये प्रवेश करतात व ते द्वार बंद केले जाते. सर्व भक्तवृंद अर्चक आपल्या घरी गमन करतात.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त, महापूजे नंतरची प्रसन्न भावमुद्रा
खरोखरच श्रीदत्तमहाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. परमपावन दत्तकथा भवरोग्याला अमृतवल्ली सारख्या असतात आणि त्यांच्या श्रवणाने भवबंधन बाधीत नाही. सात्त्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्रीगुरूंची फार मोठी प्रीती असते; म्हणून अत्रि-अनसूया, राजा-सुमति, अंबा-माधव या सात्विक पतीपत्नींच्या श्रद्धा, निष्ठा, प्रेम या गुणांमुळे श्रीगुरूंनी गर्भव पत्करला. अवधूत, ब्रह्मचारी, संन्यासी अशा वेषांनी समाजाला प्रबोधन केले.

श्री दत्त महाराज उत्सवमूर्ती, नृसिहवाडी
नृसिंहवाडीत कृष्णामाई उत्सव कार्यक्रम अव्याहत चालू आहे. अनेक भक्त आपापल्या वाहनातून नित्य येथे येतात. गंगेचे स्नान करून श्री महाराजांच्या विविध पूजेत सहभागी होतात. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्तजयंती, श्री गुरु द्वादशी श्री नृसिंह जयंती. श्री गुरुप्रतिपदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव हे उत्सव साजरे केले जातात.

श्री क्षेत्र नृसिहवाडी– प्रवेशद्वार
दसऱ्याचे दिवशी श्री महाराज आपल्या वैभवाने युक्त असे नटलेले शिलंगणास जातात. दीपावलीस सर्व अर्चकांच्या स्त्रिया दिव्यवस्त्र परिधान करून श्री महाराजांना ओवाळतात. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत श्री महाराजांचे दर्शनास लांबलांबचे भक्त येत असतात. ते महाराज संन्यासी असल्यामुळे पवित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकांशिवाय कोणासही प्रवेश देत नाही. शिबिकेच्यावेळी श्रद्धा अर्चकाशिवाय शिबिकेला कोणीही स्पर्श करावयाचा नाही असा येथील नियम आहे. यासाठी धोतर, उपरणे घातलेले भक्तवृंद असतात व डाव्या बाजूला शर्ट व इतर वस्त्र घातलेले असतात. शिबिकेच्या मागे अब्दागिरी व छत्र असते. अशा राजवैभवात महाराज शिबिकेमध्ये आरोहण करतात. मंदिराचे बाहेर मिठाई, धार्मिक ग्रंथांची दुकाने सजलेली आहेत. सायंकाळचे वेळी सनई व चौघडा यांचे वादनाने श्री महाराजांना संतोषित केले जाते.

कन्यागत महापर्वकाळ एक आभिनव पर्वणी
कोल्हापूर जिल्ह्यातील, शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी अर्थात श्रीदत्तमहाराजांची लाडकी राजधानी श्रीनरसोबाची वाडी येथे आधीच १२ महिने २४ तास पुण्यकालच असतो. तेथे गुरु कन्या राशीत गेल्यावर वर्षभर महापुण्यकाल सुरू असतो. त्यालाच कन्यागत महापर्वकाल म्हणतात. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर १२ वर्षांतून एकदा कन्यागत सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की १२ वर्षांतून एकदा येथे गंगा अवतीर्ण (प्रकट) होते, आणि तेव्हा देव्हाऱ्यातील उत्सवमूर्तीला त्या गंगेत स्नान घातले जाते. याला शाही स्नान असेही म्हणतात. हे स्नान ‘शुक्ल तीर्थ’ नामक स्थळी संपन्न होते.
आता याच श्रीदत्तमहाराजांच्या राजधानीत श्रीनृसिंहवाडीला कन्यागताच्या पहिल्या दिवशी श्रीदत्तमहाराजांच्या उत्सवमूर्तींना देवद्विज पालखीत विराजमान करून मिरवणूकीने मंदिरापासून उत्तरेस असलेल्या शुक्लतीर्थस्थानी आणून पर्वस्थानाचा अपूर्व सोहळा संपन्न करतात. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, छत्र, चामर, चौघडा, वाजंत्री इतर अनेक प्रकारची वाद्ये यांचा जल्लोष असेल. आरत्या, पदे, इंदुकोटी, स्तोत्रे वगैरे धार्मिक कार्यक्रम सतत निनादत राहतात. प्रत्येक घरापुढे गुरूमूर्तीची आरती सुवासिनींकडून होते. हा नयनमनोहर सोहळा भाविकांनी चुकवू नये.
सात नद्यांचे मिलन झालेले हे तीर्थक्षेत्र, आसमंतात श्रीदत्तगुरूंचा संचार झाल्याने त्यांच्या रज:कणांनी पवित्र झालेली ही भूमी, कृष्णातीरावर शुक्लतीर्थ, पापविनाशी, काम्य, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती व प्रयागतीर्थ अशी अष्टतीर्थे अशा या परम दिव्यस्थानी कन्यागत कालात वर्षभर केव्हाही कृष्णानदीत स्नान करावे,

चंदन लेपन व दक्षिणद्वार पर्वणी
येथील पुजारी व सेवक वर्ग गुरुपादुकांस अत्यंत सश्रद्ध अंतकरणाने स्तवतात. उन्हाळ्यात पादुकांना उष्म्याचा त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण शीतल चंदन लेपन करतात. महाराजांना थंड गार पाणी ठेवतात. सुगंधी पुष्प ठेवतात. अत्यंत उष्णतेच्या काळात संततधार हि ठेवतात. सातत्याने अनुष्ठाने चालूच ठेवतात.

दक्षिणद्वार एक अनुपम पवित्र अनुभूती
कृष्णा पंचगंगेची पातळी वाढल्यावर मंदिरात पाणी प्रवेश करते. उत्तर द्वारातून पाणी पादुकांवरून दक्षिण द्वारातून बाहेर येते, पण येताना ते पादुकांवरून येते. हि एक महान पर्वणी असते. म्हणून भक्तजन या दक्षिण द्वारी स्नान करतात व आपले जीवन कृतार्थ झाल्याचे मानतात. वाडीवासीतर या परम पावन क्षणाला उत्सव स्वरूप साजरे करतात. बाहेरगावाचे अनेक भक्त यासाठी संस्थान व पूजाऱ्यांच्या संपर्कात असतात बाहेरगावाहून येऊन ते ही पर्वणी साधतात. धन्य ती दक्षिणद्वार पर्वणी!
या काळात देव वर उत्सव मूर्तीचे ठिकाणी असतात. भक्तांना या काळात मनोहर पादुकांचे दर्शन होत नाही. उत्सव मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. पाणी कमी झाल्यावर सर्व पुजारी जन व भक्तजन सेवा करून सर्व मंदिर परिसर धुऊन स्वच्छ करतात. अनेक जन्माचे पुण्य संचित असेल तरच दक्षिण द्वार व मंदिराची सेवा करण्याची संधी मिळते, सदर काळात महाराज पाण्यात असतात त्यांना त्यामुळे प्रकृतीस त्रास होऊ नये म्हणून एक काढा करण्याची येथे पद्धत आहे हा काढा महाराजांना दिला जातो. यात मुख्यत्वेकरून अनेक औषधी द्रव्य असतात. हाच काढा पुजारी जनांकडे व भक्तांना दिला जातो यातून अनेक रोगांपासून भक्तांना सरंक्षण मिळते असा भक्तांचा अनुभव व श्रद्धा आहे. अनेक पुजारी व सेवक या पूरसदृश्य परिस्थितीत महाराजांची सेवा करतात. असे सांगितले जाते की ५ वर्षांपूर्वी अशा काळात अनेक घरात पाणी घुसलेले असताना छतावरून पाण्यात उडी मारून महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचून तेथे पूजा सेवा अर्पण केली. हे सर्वच अदभूत आणि अचम्बीत करणारे आहे. थोडक्यात श्रद्धेची पराकाष्ठा!
कृष्णा पंचगंगा संगम माहात्म

श्री क्षेत्र नरसोबाची वाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमा वर वसले आहे. श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी व कर्मभूमी ह्या ठिकाणी स्वामींनी बारा वर्षे वास्तव्य केले, आणि अनेकांचा ऊध्दार केली आपल्या अगम्य लिला ह्या संगम क्षेत्री भक्तांना दाखविल्या .ह्याच संगम स्थळी अनेक सत्पूरूषांचे वास्तव्य होते. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी दीर्घकाळ साधना केली सदगुरु प. पु. श्री गुळवणी महाराजांनी याच क्षेत्री फार मोठे कार्य केले. अनेक योगी आणि तपस्वी यांनी ईथे वास केले आणि आज ही ह्या संगमी अदृश्य रूपाने वावरत आहे आणि अनेकांच्या मनोकामना पुर्ण करीत आहे.
पंचगंगा नदी मध्ये कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्यांचे पाणी आहे, पंचगंगेचा ईथे कृष्णे बरोबर संगम होतो. आणि पूढे ती कर्नाटकात वाहत जाते. येथिल कृष्णेत शुक्ल पापविनाशी, सिध्द, अमर, कोटी, शक्ती, प्रयाग, संगम अशी आठ पवित्र तिर्थे आहेत. याच ठिकाणी काशी विश्वेश्वराचे निवास आहे म्हणून या संगमाला विशेष महत्व आहे. पलिकडील किनार्यावर अमरापूर ईथे ६४ योगीनी ही राहतात. येथिल मनोहर पादुकांच्या दर्शनाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात नृसिंह वाडी पूर्वेस कृष्णानदी ही ऊत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते.त्यामूळे यास विशेष महत्व आहे. म्हणून यासंगमास विशेष महत्व प्राप्त झाले. ह्या संगम स्थळाची महती ही श्री गुरूचरित्राच्या अध्यायात आली आहे गंगानूज हा श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा भक्त होता. माघ महिन्यात त्रिस्थळीचे स्नान करण्याचे महत्व त्याने महाराजांना विचारले तेव्हा आपण बसलेल्या व्याघ्रांबरावर हात ठेऊन डोळे मिटण्यास सागिंतले. आणि योग बळाने त्याला काशी गया प्रयाग या तिर्थाचे दर्शन घडविले त्यानंतर त्यांनी त्यास कृष्णा पंचगंगा संगम म्हणजेच प्रयाग, जुगुळ हे गाव म्हणजे काशी व कोल्हापूर म्हणजे गया असे त्यास समजाऊन सांगितले ह्यासंगमाचे दर्शनाने काशी क्षेत्री दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते अन्नपूर्णेस व चौसष्ट योगिनींना ईथे वास्तव्य करून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्यास सांगितले.
या क्षेत्री कसे पोहोचायचे (गुगल नकाशा)
- नृसिंहवाडी (कोल्हापूर, महाराष्ट्र)
- हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षांपूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामीमहाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.
- श्रीनृसिंहसरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे राहिले.
- आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरुचरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे. (नृसिंह वाडी पैलतीरी) बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली.
- त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे. कृष्णानदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्रीनृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर, वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे.
- त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णानदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.
- हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० कि. मी. अंतरावर आहे.
- सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.
- सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे.
- सांगली-कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते. सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.
- इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.
- दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे. काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी “वेदभवन” या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी.
नरसोबाची वाडी व्हिडीओ
s