श्रीक्षेत्र-स्थान महिमा

भाऊ मुखत्वे करून आपल्या शिष्याला तीर्थक्षेत्री जायला सांगत असत. तिथे कमीतकमी ३ दिवस राहून त्या देवतेचे ग्रंथपठण, स्तोत्र पठण किंवा सहस्त्र नामावली करायला सांगत. त्याचे कारण असे की, ही जी तीर्थक्षेत्रे आहेत, ती मुळात ऊर्जास्त्रोत आहेत. विज्ञानाने हे सिध्द केले आहे की, सर्वात जास्त चुंबकीय प्रभार, मूळ तीर्थक्षेत्री दिसून येतो. त्यामुळे त्या देवतेचे गुणगाणं केल्यास त्याच्या कृपेस आपण पात्र होऊ. त्या क्षेत्रातील सात्त्विक लहरी आपल्या शरीरावर मनावर सुयोग्य परिणाम करतील. अनायसे, आपल्यावर येणारी संकटे, व्याधी ह्यांचा नायनाट होईल.

संतचरित्र, किंवा वेद ग्रंथ वाचल्यावर हे लक्षात येते की, त्या त्या वेळेस ते दैवत / संत, त्यांचा कालखंड पूर्ण झाल्यावर आपली सूक्ष्म शक्ती त्या क्षेत्रात ठेऊन जात असत. जेणेकरून नंतर त्या क्षेत्रात येणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ होऊ शकेल. हेच ते चुंबकीय बल. ज्यामुळे भारतात अनेक तीर्थक्षेत्रे उदयास आली. ज्या ठिकाणी आजही असंख्य भाविकांना विज्ञानाला न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात. आणि श्रद्धा जन्मास येते. आणि म्हणूनच नृसिंहवाडी, गाणगापूर, गिरनार, शिर्डी, शेगाव, नागझरी, अक्कलकोट, औदुंबर, पंढरपूर, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे, अशा असंख्य तीर्थक्षेत्रात आजही तितकीच गर्दी जमते. खाली काही संतांची, देवतांची वाक्ये दिली आहेत. ज्यावरून हे लक्षात येते की, त्यांनी त्यांचा कालखंड संपवून जाताना कश्याप्रकारे भक्त रक्षणार्थ तेथेच उपस्थित आहोत, हे सांगितले आहे. आणि तसे अनुभव आजतागायत भक्त घेत आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज- नृसिंहवाडी

श्रीगुरु म्हणती तयासी (६४ योगिनींसी)। सदा असो औदुंबरापासी। प्रगट जाणे पूर्वेसी। स्थान आमुचे येथेची असे। तुम्हासहित औदुंबर। आमुच्या पादुका मनोहर। पूजा करिती जे तत्पर। मनकामना पुरती जाण। येथे असे अन्नपूर्णा। नित्य करीता आराधना। तेणे होय कामना। चतुर्वीध पुरुषार्थ।

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज – गाणगापूर

आम्ही असतो याच ग्रामी। नित्य स्नान अमरजा संगमी। वसो माध्यान्ही मठ धामि। गुप्तरूपे अवधारा। कल्पवृक्षते पुजोनि। मग यावे आमुचे स्थानी। पादुका ठेवितो निर्गुणी। पूजा करा मनोभावे।

शिर्डी साईबाबा

झालो जरी गतप्राण। वाक्य माझे माना प्रमाण। माझी हाडे तुर्वती मधून। देतील आश्वासन तुम्हास। मी काय पण माझी तुर्बती। राहील तुम्हांसवे बोलत। जो तीस अनन्य शरणागत। राहील डोलत तयासवे।

अक्कलकोट स्वामी समर्थ

अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

असा हा स्थान महिमा खूप अगाध आहे. आपल्या तेथिल केवळ वास्तव्याने आपणास दैवी कृपेचे दरवाजे उघडण्यास मदत होते. खाली काही प्रसिद्ध दत्तक्षेत्रांची माहिती देण्यात आली आहे.