सहस्त्र नामावलि: / कवने

सदगुरू श्रीभानुदास सहस्त्र नामावलि:

Bhau-Sahastra-Namavali


भाऊंवर बसवलेली कवने

सौ.जान्हवी समीर चव्हाण


होई तुझ्यात मी विलीन ।।

शिव तूझे रूप पहाया । देई मजला सुबुद्धी।। मन चंचल हरीणा परी हे । घालाव तूच ती कुबुद्धी ।।

घाव किती सोसशी तू । पाप शिष्यांचे घेऊन ।। व्रण तुझ्या शरीरी उमटे । चाबूक आम्हावर ओढून ।।

भस्म लावूनी कपाळी । भाग्य आमचे बदलता ।। जन्म मरण्याच्या फेऱ्यातुन । मुक्त तुम्हीच आम्हा करता ।।

तूम्ही जाणता हे सर्व । योग्य, अयोग्य खेळ सारे।। पाप, पुण्याच्या राशित । मग बांधता आम्हा का रे।।

शरीर बाह्य रूप माझे । आत तूच समाधी स्थीत ।। ओळख माझी मज गमता। होई तुझ्यात मी विलीन।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


तुमच्या ह्रदयी द्या विसावा

कंठ दाटूनी आला भाऊ । परत या तुम्ही आता । थकलो,दमलो, श्वास कोंडला । ह्रदयी द्या विसावा । तुमच्या ह्रदयी द्या विसावा ।।

फसवी माणसे, फसवी नाती । क्षणात आपणा मोहू पहाती । सोनेरी त्या मृगजळाचा । मोह नको मज आता । ह्रदयी द्या विसावा । तुमच्या ह्रदयी द्या विसावा ।।

भूक लागता बाळ रडतो । मातेला का पान्हा फुटतो । प्रेम भुकेल्या बाळाची या । शमवा भूक हो आता । ह्रदयी द्या विसावा । तुमच्या ह्रदयी द्या विसावा ।।

नको तो मजला पैसा अडका । क्षणिक सुखाचा मार्ग तो तिरका । क्षणभंगुर या जीवनाचा । लोभ न व्हावा पुन्हा । ह्रदयी द्या विसावा । तुमच्या ह्रदयी द्या विसावा ।।

का बरं इतका उशीर जाहला । देव तो माझा मज वरी रुसला । शेवटच्या त्या हाकेला तरी । साथ द्यावी आता । ह्रदयी द्या विसावा । तुमच्या ह्रदयी द्या विसावा ।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


कृष्णा माय….

दुर देशीचा प्रवास करुनी । आली कृष्णा भेटीसाठी । पहुडली ती दत्त चरणाशी । थोडा विसावा घेण्यासाठी ।।

शांत मनोहर तिचा किनारा ।नेहमीच त्याचा थाट निराळा । दीप प्रजोलीत होता त्यावरी । भासतसे स्वर्गाहुनी प्यारा ।।

पहाट होता रूप वेगळे । सायंकाळी तेच साजिरे । अनेक तिची रूपे मोहिनी । वाटे मजला तीच योगिनीं ।।

जात, धर्म ती जाणत नाही । समान सर्वा स्नान ती देई । धुवुनी पापे जनलोकांची । मोक्षाच्या द्वारी ती नेई ।।

सुंदर रम्य अशी एक नगरी । रहस्ये अनेक तिथे दडलेली । योग, योगिनीं तेथे वसती । दत्त सेवेसाठी तत्पर असती ।।

गुपिते अनेक अशी लपलेली । उदरी तिच्या तिने सामावलेली । अशी धन्य ती आमची माय ।।

अशी ती आमची कृष्णा माय ।।

अशी ती आमची कृष्णा माय ।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


परतूनी ये घनश्यामा । राधा वाट पाहे तुझी । नको वेळ लावू आता । राहील ती एकटी । राधा वाट पाहे तुझी ।।

शरीराचा जड देह पसारा । मोह मायेने जखडूनी धरिला । फुंकर घालता तुम्ही त्यासी । घेई तो गगनी भरारी । राधा वाट पाहे तुझी ।।

रासलिलेचा खेळ तो रंगला । कुंण्डलिनी, इ़डा,सुषुम्ने मधला । सोडव तो तिढा आत्ता । होउ दे तीस मोकळी । राधा वाट पाहे तुझी ।।

असंख्य लक्ष योनी मधुनी । फिरूनी आला तो माघारी । वाट दाखवूनि त्यासी । वाजवु ब्रम्हा नंदी टाळी । राधा वाट पाहे तुझी ।।

उघड तुझ्या ह्रदयाची द्वारे । घे सामावूनी त्यात मजला रे । मुक्त करुणी या देहासी । घडू दे भेट शिवाशी । राधा वाट पाहे तुझी ।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


माझ्या गुरूची महती । काय काय सांगू तुम्हा । घेता नाम त्यांचे मुखी । मती स्थिर होई तेव्हा ।।

दृष्टी समोर ती मूर्ती । नीलवर्ण कृष्णा परी । हसू ओठावर येता । फुले मथुरा नगरी ।।

साधी सहज राहणी । माझ्या भोळ्या विठ्ठलाची । शिष्य जमा होता भोवती । वारी वाटे पंढरीची ।।

ह्रदयी प्रेमाचा तो झरा । भरभरून वाहतो । दुःखी शिष्यास पाहत । डोळयात अश्रू नाहतो ।।

माझ्या माऊलीची माया । तोड त्याची ना कुणाशी । शिष्यांच्या हाकेसाठी ।

होई जिंवत समाधी ।।

होई जिंवत समाधी ।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


सकाळ पासून अलगत असे । डोळयात पाणी तरळत होते । माझ्या माऊलीच्या आठवणींचे । विचारात जाळे विणत होते ।।

किती प्रेम, किती माय । माझ्या माऊलीच्या ह्रदयी होती । एकांत ह्या शब्दाची कधीच । आमच्या जीवनी जागा नव्हती ।।

कितीही संकटे आली समोरी । तिथेच तटस्थ उभी रहायची । कारण आम्हा दोघांन मध्ये । खंबीर उभी ती शक्ती असायची ।।

सहवासात त्यांचा नेहमीच । आनंदाचे वारे असायचे । दुःखाचा कधी लवलेशही । सावलीला आमच्या उभे नसायचे ।।

आज जाणले कोणीच नाही । सोबत आता आमच्या । परतुन या भाऊ माऊली ।

लेक साद घालते तुम्हा ।।

लेक साद घालते तुम्हा ।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


सदैव गुरुंचे ध्यान करावे । विस्मरणातुन ही नाम जपावे।। सदैव मुखी हेची काम धरावे ह्रदय अंतरातूनी।।

सदैव गुरू मुख ते न्याहळावे । मानस पुजेत त्यासी पकडावे।। सर्व सोपस्कार करून घ्यावे । शुद्धो मनोभावे।।

सदैव गुरू उपदेश आठवावे । आठवुनी ते कृतीत उतरवावे।। तोचि गुरुमंत्र म्हणून स्मरावे । संसारातही रमुनी।।

सदैव गुरुसेवेत तत्पर असावे । शब्द गुरुंचे अलगत झेलावे।। पुर्णत्वाला त्यासी न्यावे । अमूतवाणी समजूनी।।

सदैव गुरूंना शरण जावे । त्रिमूर्ती जणू तेच दिसावे।। मंदिर, देऊळ विसरुनी जावे । चरणी लोटांगण घालुनी।।

सौ.जान्हवी समीर चव्हाण


भू कोकण गोळ्वणी जन्मले। मोगरणेग्रामी मंत्रगुरु लाभले।विद्याविभूषित जाहले।मंत्र साधनास्तव।

गुरुकिल्ली साधनेची । पी.अण्णास्वामी दावीती।परमोच्च शिखरावरी। गुरू परंपरासत्व  ।

स्वयंदत्त साधना शिकविती ।लोक कल्याणा मूर्ति घडविती।भाऊं नामें प्रसिद्ध होती। भक्तिप्रासार करण्यास्तव।

झेंडा उभारीला भक्तिचा।रंजल्या गांजल्या सर्वांचा। प्रवास हा अनेक जन्मिचा। शिष्य घडण्यास्तव।

आयुष्य सारे झिजविले।अनेका मार्ग दाविलें। साधना मठ उभारिले।  भक्तमोक्षास्तव।

उलगडण्या आठवणींचे सुवर्णपर्ण। वेबसाईट हेचि ताम्र पर्ण। कळण्या दत्तभक्तीचे कार्य। सकळ जनास्तव।

श्री. समीर एकनाथ चव्हाण


भाऊ माझे पिता भाऊ माझी माय सर्वस्व माझे भाऊनाथ ।। धृ.।।

भाऊ नाम घेता घेता तरलो इथवर । सदा नाम ओठी असता चिंता नाही कुठ वर । नित्य घ्या प्रचीत हे नाम भाऊ नाम सर्वस्व माझे भाऊनाथ ।। १ ।।

जाणुनी घ्या हे गूढ भाऊ हेचि दत्तरूप । भाऊ हेचि पूर्ण राम भाऊ हेचि  मेघशाम । अवतरुनी आले विश्वंभर विश्‍वंभर सर्वस्व माझे भाऊनाथ ।। २ ।।

श्री विशाल प्रल्हाद खोत


कोकणातील गोळवणात जन्मले । नथ आजीच्या, गुरूंच्या सहवासात वाढले । सहज साधनेच्या जोरावर विद्याविभूषित झाले ।।

अध्यात्माच्या परमोच्च शिखरावरही निष्कांचणी जगले । श्री दत्त आदेशाने कार्य करता शिष्यांशी कृष्णरूपे घडवले ।।

एकमेवाद्वितीय वल्ली श्री भानुदास वामन गावडे, भाऊ नामे प्रसिद्ध झाले ।।

राहण्यायेथील ओळख संस्कृतीची आणि साधनेची । निमित्तमात्र करुनि शिष्यांशी ताम्रपट हे घडविले ।।

उलगडण्या आठवणींची सोनेरी पाने । प्रमाण मानून वेबसाईट हेच ताम्रपट, आधुनिक युगातील । आम्ही श्रोत्यांसमोर वाढले ।।

श्री. संजय जयराम धुरी


गुरुकृपेने तरलो तरलो । भाऊ कृपेने तरलो तरलो । मानवजन्मी धन्य जाहलो ।। धृ. ।।

संकटे हरली दुःखे ही सरली । मनी गुरूंची भक्ती उरली । सद्गुरु नामात रंगलो रंगलो । मानव जन्मी धन्य जाहलो ।। १ ।।

भानुदास सद्गुरु लाभले । या जीवनाचे सार्थक झाले । दत्त नामात दंगलो दंगलो । मानव जन्मी धन्य जाहलो ।। २ ।।

श्री अनिल खांडेकर


भानुदास श्रीसमर्थ पतितपावन करुणाघन ।। धृ.।।

शांती रूप सागरा । भेटी जीव तळमळला । धाव पाव जगदीशा । सद्गुरु श्री भानुदास ।। १ ।।

भानुदास भेटवीन । जीव होई बावरा । मन माझे मोगरा । अर्पितसे पद कमला । कर जोडुनी विनवी तुम्हा । सद्गुरू श्री भानुदासा ।। २ ।।

कै. महादेव वि.खवणेकर


भाऊ महाराजा चरणी लक्ष लागो रे । दत्तगुरु चरणी लक्ष लागो रे।।धृ।।

कलियुगी महाशक्तीशाली । परमात्मा हा जन्म घेई । दत्त स्वरूप होई रे ।।१।।

या हो या हो अवघे जन । करु भाऊ महाराजा नमन । नेती नेती ते आम्हा उद्धरून ।।२।।

त्या नाही कशाची हाव । त्या आवडे भक्ती भाव । गुप्त रूपे करीती कल्याण । धन्य धन्य हे भाऊ महाराज ।।३।।

कै. महादेव वि.खवणेकर


देखोनिया तुझे  रूप मनोहर । स्वामी दिगंबर महाराज।।धृ।।

बैसोनि एकांत भाक्राड वाडीत । नित्य वास त्यांचा गाणगापूरात ।।१।।

षड्रिपु सारे छळीती आम्हास । करीती विनाश भाऊराज त्यांचा ।।२।।

मागावे ते काय बोलावे ते काय । देती आपोआप भाऊराज स्वामी ।।३।।

म्हणे महादेव दया क्षमा शांती । आहे त्यांच्या अंगी ठेवा श्रद्धा भक्ती।।४।।

कै. महादेव वि.खवणेकर


का फिरसी तू इकडे तिकडे । का करी तीर्थाटन । घेई तू भाऊ महाराज दर्शन।।धृ।।

इथे पंढरी इथेच काशी । भेट होतसे सद्गुरूंची । तन मन सारे एकवटोनी । शरण जाई भाऊ चरणी।।१।।

सूक्ष्म रूप तू पाही त्याकडे । जन्मोजन्मीचे घाल साकडे । घडू दे सेवा तुझीच नाथा । भाऊंची सेवा करू आदरे।।२।।

नादब्रम्ह सोहम प्रगटला । अहंकार तो क्षणीच गाढीला । सत्याचा रे विजय करीती । भाऊ दत्त रूप प्रगटता।।३।।

नकोत पुष्पे नकोत माळा । हृदयी साठवा श्री भाऊंना । देव दिगंबर दत्तरूपे । ऐसा भाऊनाथ प्रगटला।।४।।

कै. महादेव वि.खवणेकर


दत्त दत्त गाऊ जय जय दत्त दत्त हरी । भाऊराज गजरी गजरी भाऊराज गजरी।।धृ।।

घेऊ टाळ वीणा आणि तीच चिपळी । सुस्वरे आळवी तू भाऊराज स्वामी । खंत कशाची तू करीसी । भाऊ उभे आमुच्या पाठी।।१।।

पूर्व पुण्य असेल त्याचे त्यासी सुख देती । मूर्तिमंत उभे जणू ते गाणगापूरी । चराणाची धूळ त्यांच्या रोज लावू भाळी । पावित्र्याची पुण्य गंगा भाऊराज स्वामी।।२।।

चला चला पाहूया हो त्यासी क्षणभरी । साक्षात्कार देती ऐसा भाव भक्ती पाहुनी । तन्मय होऊनिया भाऊराज चरणी । महादेव लीन होई दोन्ही कर जोडोनि।।३।।

कै. महादेव वि.खवणेकर


दत्त दत्त मन धुंद । लागो देवाचा छंद।।धृ।।

आम्हा भानुदास तारी । आम्हा भाऊनाथ उद्धरी ।।१।।

आमुचे भाऊराज जीवन । चुकविती आड मरण ।।२।।

आमुच्या जीविचा विसावा । शरण जाऊया भाऊंना ।।३।।

महादेव गाई लीला । भाऊनाथ चरणी जीव रमला ।।४।।

कै. महादेव वि.खवणेकर


भाव भक्तीने त्या आळवू । निशिदींनी हो अविरत । भाजा हो भाऊनाथ गुरुनाथ।।धृ।।

काखे झोळी श्वान पुढे ते । पाठी मागे गाय उभी ती । दर्शन देती दत्तगुरूंचे । आळविता भजनात ।।१।।

अनंतकोटी ब्रह्मांडनायक । स्वामी समर्थ जय भानुदास । स्वधर्म पारायण रूप । जय जय श्री भाऊनाथ ।।२।।

देव दिगंबर माझे दैवत । नाव तयांचे आदीनाथ । एकरूपी विनटले दैवत । अंतरी श्री भाऊनाथ ।।३।।

करा नित्य हो भक्ती तयांची । टळती पापे शत जन्माची । प्रेमे गाई महादेव हा । भानुदास भजनात ।।४।।

कै. महादेव वि.खवणेकर


आता माझी चिंता तुज भाऊनाथा । आलो काकुळती तुज भाऊनाथा ।।धृ।।

नवनाथ योगी तूच रे वैरागी । चौऱ्यांशी पुरणा शरण समचरणा ।।१।।

महा तू प्रतापी दत्तकृपा योगी । जन्म मरणाच्या बाधा चुकविसी ।।२।।

भक्तांच्या कारणे अवतार घेसी । गुप्त रूपे तू समर्था दुःख निवारीसी ।।३।।

तुझे नाम सोपे श्रीकृष्ण मुरारी । गोविंद गोपाळ भाऊनाथ हरी ।।४।।

तुझ्या पायी गंगा अविरत वाहे । नेत्री आनंदाश्रू झरती भाऊनाथ पहा हे ।।५।।

कै. महादेव वि.खवणेकर


मागणे हे भाऊराया आहे तुझ्यापाशी, । जन्मोजन्मी सेवा घडू दे तुझ्या चरणांची ।। धृ ।।

अनाथांचा नाथ स्वामी ऐसी तुझी ख्याती । इडा पीडा टळू दे अमुची हीच रे विनंती ।।१।।

भाऊ तुझे नाम घेता मन शांत होई । श्रीकृष्ण गजरी गजरी डुंबोनिया जाई ।।२।।

भाव भक्तीने पूजितो भानूदास स्वामी । भाऊराज श्री गुरुमुर्ती मायबाप आई ।।३।।

म्हणे महादेव आता दुजा देव नाही । भाऊनाथ राजा पुजुया दत्तराज स्वामी ।।४।।

कै. महादेव वि.खवणेकर


अभंग- गवळण

जय भाऊराज गोविंद गोपाळ  । धन्य मुरलीधर स्वामी हो ।।धृ।।

जय हरे कृष्ण हरी हो समर्थ । धन्य भक्त जण नाचती हो ।।१।।

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । जय स्वामी भाऊराज ।। २।।

पायामध्ये श्रीकृष्ण शोभे गिरीधर । वाजविती बासरी भानुदास ।।३।।

पाप पुण्याचा करिती विचार । पळविती कळीकाळ भाऊराज ।।४।।

भक्ती पाहुनिया गोप गोपिकांची । सुखविती भाऊराज भाविकांस ।।५।।

विनवी महादेव ऐसा नाही संत । जडो त्यांची मूर्ती नयनांत ।।६।।

भेदभाव नाही तयाचिये अंगी । भाऊराज चरणी घालू मिठी ।।७।।

कै. महादेव वि.खवणेकर


तू फिरुन जन्म घेई रे पुन्हा । श्री भाऊराय जनार्दना ।।धृ।।

जन्म मरण ही बाधा चुकवी । आम्हा दिनासी तूच तारी । शरण आलो भानुदासा ।।१।।

त्रय रूप ते दत्तगुरूंचे । प्रगटे कालियुगी भाऊ रूपे । नवनाथ ते थोर महामुनी । नमन करा भाऊ चरणा ।।२।।

फिरुन फिरुन जन्म घे पुन्हा । विनवणी अमुची पदकमला । शरण आलो घनश्यामा ।।३।।

पावन भूमी वाशिंद ग्रामी । समाधी तू शांतरुपी । सुखविसी तू विश्वाजना ।।४।।

कुणी वंदा कुणी नींदा । न पाहसी तू त्या कदा । योग्याहुनी योगी श्रेष्ठ हे । विनवी महादेव भक्तजना ।।५।।

कै. महादेव वि.खवणेकर


द्यावे दर्शन मज भाऊनाथा । हेच माझे ध्यान आता ।।धृ।।

भाऊ माझी माता भाऊ माझे पिता । भाऊ तुम्हीच हो सद्गुरूनाथा ।।१।।

वेडा मी पामर जाऊ नका दूर । व्हावा साक्षात्कार दाता ।।२।।

मनामध्ये भाऊनाथ ध्यानामध्ये भाऊनाथ । नाथांचे तुम्ही हो नाथ ।।३।।

तुमची किर्ती थोर तुम्ही दत्त दिगंबर । तुम्हा प्रिय औदुंबर ।।४।।

तुम्हा करूनी वंदन आलो मी शरण । दावावे मज चरण भाऊनाथा ।।५।।

श्री अनिल खांडेकर


गुरुनाथ माझे भाऊ । त्यांचे गुण किती वर्णू । भोळी भक्ती हृदयी । ठेऊ रूप नयनी साठवू ।।धृ।।

देती शिष्यांना शिकवण । मंत्र स्तोत्र पारायण । मनी नामघोष पठण । भजन आरती गाऊ ।।१।।

स्वप्नातच दुःख हरती । शब्दातूनी स्फूर्ती देती । शिष्य मोक्षपदा जाती । गुरुपदी लीन होऊ ।।२।।

श्री अनिल खांडेकर


त्रिगुणात्मका त्रिभुवननाथ । सद्गुरू समर्था भाऊनाथा ।।धृ.।।

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता । दीन दुबळ्यांचा पालन कर्ता । तूच कर्ता आणि करविता ।।१।।

दत्त दिगंबर त्रैमूर्ती अवतारा । निराधारा तूच देशी सहारा । स्वामी समर्था श्री साईनाथा ।।२।।

करुणाकर तू कृपासागरा । तूच ओमकारा दयासागरा । भानुदासा अनाथांच्या नाथा ।।३।।

श्री अनिल खांडेकर