संपूर्ण भारतात पूर्वी एक साधी सोपी गावाची रचना असायची. अजूनही ती तशीच आहे. फक्त काही गोष्टी कालबाह्य होत आहेत. निरीक्षण केल्यास अस लक्षात येईल की प्रत्येक गावात एक मंदिर असते, एक चावडी असते, एक स्मशानभूमी, एक शाळा, एक बाजार हा असतोच. याला सुदृढ ग्रामरचना म्हणता येईल. पूर्वी सर्व लोक शेतीची काम करून संध्याकाळी मंदिरात जमत असत. हरिभजनात सहभागी होत असत. त्याकाळी निरोगीपणाच प्रमाण खूप होत. सर्व लोक आनंदी असायचे. काय रहस्य होत या मागे? हरिभजन हे त्यांतील एक उत्तर आहे. दिवसभर अंगमेहनीतीने थकलेलं शरीर, भजनाने प्रफुल्लित होत असे. मन शांत, आंनदी आणि समाधानी होत असे. वाईट विचारांना थारा मिळत नसे. आपोआपच सामाजिक जीवन सुदृढ रहात असे. मानवी बुद्धीला स्थिती बदल हवा असतो. एकच काम सतत करून मेंदू थकून जातो. या थकव्याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊ लागतात. नको नको ते आजार होऊ लागतात. संत म्हणतात.. मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धीचे कारण। पण हे मन प्रसन्न कशाने होणार? उत्तर आहे, हरिभजन.
याच मार्गाने मन प्रसन्न होत. आजकालची पिढी सिनेमातील गाण्यात स्वतः ला रमवून घेते. त्यांनी मेंदूचा स्थिती बदल करण्याचा मार्ग शोधला आहे. परंतु त्याने चक्रजागृती होणार नाही, नाडी शुद्धी होणार नाही, बुद्धी प्रगल्भ होणार नाही. जे हरिभजनाने होते. भगवान श्रीकृष्ण हा संगीत साधनेचा प्रणेता आहे. स्त्रियांना घरात खूप काम असतात. त्यांना कोणाकडे मोकळं होता येत नाही. आनंदाने बिनधास्त वागता येत नाही. स्वैरपणे फिरता येत नाही. यामुळे त्यांच्या मनाला प्रसन्नता मिळत नाही. पर्यायी त्या असूया, मत्सर, दांभिकतेच्या आहारी जातात. श्रीकृष्णाने या सर्वातून बाहेर काढण्यासाठी त्यांना रासलीलेत रममाण केलं. मुक्तपणे बेभान होऊन नाचायला शिकवलं. मेंदूचा स्थितीबद्दल केला. निर्भय बनविले. हीच सहजोग साधना. हे आतापर्यंत कोणीच केलं नव्हत. म्हणूनच श्रीकृष्ण हा सर्वांपेक्षा वेगळा आहे.
भाऊ महाराजानी दत्तभक्तीला कृष्ण भक्तीची जोड दिली. दत्त महाराजाना गायन अतिप्रिय आहे. श्री शैल्याला जाताना श्रीगुरु भक्तांना म्हणाले. आणिक सांगेन एक खुण। गायनि करावे माझे स्मरण। त्यांचे घरी मी असे जाण। गायनी प्रीति बहु मज।नित्य जे जन गायन करीती। त्यांवरी माझी अतिप्रिति।त्यांच्या घरी अखंडीती।आपण असे अवधारा। हा महाराजांच्या गायन प्रीतीचा पुरावा आहे. देव हा भावाचा भुकेला आहे. सर्वच संतांनी श्रीकॄष्णावर अभंग, गवळणी, भारुड, जानपद गीत रचली. गायनातून निर्माण होणारा भक्तिचा उत्कट प्रेमाचा भाव परमेश्वराला प्रिय आहे. या भक्तिमध्ये देव भक्ताच्या आधीन होतो, असे अनेक अभंगातुन दिसून येते. दत्तभक्ति ही कठीण आहे, प्रापंचिकाला सहज पेलणारी नाही. कर्मठ व कठीण वाटणारी दत्तभक्ति सहज सोपी वाटावी यासाठी भाऊनी या भक्तिला हरिभजनाची जोड़ दिली. साधनेचा भाग सांगायचा तर या प्रवासात अनेक मंत्रानी विविध चक्रांची जागृती होते. त्याच प्रमाणे कंठाच्या ठिकाणी असलेल्या विशुद्ध चक्रांची जागृति ही हरिभजनाने होते. ज्या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी श्रीकृष्ण व राधेच स्थान आहे. खर तर म्हणूनच संतांनी या चक्रशुद्धि व जागृतिसाठी श्रीकृष्णाला अभंगामध्ये पकड़ल. भाऊनी हाच धागा पकड़ून सर्व शिष्याना भजनाची गोडी लावली. भजन हा साधनेचा अविभाज्य घटक बनविला. सर्व कार्यक्रमात भजन अंतर्भूत करुन घेतल. हरी भजनावीण काळ घालवु नको रे । अंतरीचा मालदिवा मालवु नको रे ।