भजन.. संगीत..
संगीत ही परमेश्वराने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. संगीत म्हणजेच नाद. पूर्ण विश्व नादमय आहे, किंबहुना “नादब्रम्ह ” हा शब्द यामुळेच जन्माला आला असावा. हे विश्व एका गती मध्ये प्रवाहित आहे, या गतीला नाद असे म्हणू शकतो. ओंकार ध्वनीला सुद्धा ‘अनाहत नाद’ म्हटले गेले आहे .या नादातून संगीताची उत्पत्ती झाली. पक्षांच्या किलबिलाटातुन, झऱ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजातुन, गाईच्या हंबरण्यातुन, निसर्गदत्त ध्वनित मानवाला संगीत ऐकू येऊ लागल. या निसर्ग संगीताला मानवाने आपल्या जीवनात अंतर्भूत करून घेतल. जानपद गीत, भारूड, लोकसंगीत यातूनच जन्माला आल. संगीत हे मानवाच्या जीवनातल महत्वाच अंग होऊन गेल. गाणी म्हणतच माणूस प्रत्येक काम करु लागला. भगवत भजनाचा जन्म यातूनच झाला. भाविक भक्त देवाला गायनातून आळवू लागले.
श्रीकृष्ण या संगीत साधनेचा खरा उद्गाता आहे. श्रीकृष्ण आपल्या बासरीतुन असे काही सुमधुर सूर काढायचा की संपूर्ण गोकुळ मंत्रमुग्ध होऊन त्यात हरवून जात असे. प्रत्येकाला स्वत: चा विसर पडत असे. गाई, गुरे हरपुन जात असत. लता वेली डोलू लागत. संतांनी या वर फार सुंदर गवळणी रचल्या आहेत. संगीतात स्वत: स्वत्व विसरून जाण्यासाठी कृष्णाने गवळणींना रासलीलेत रंगवुन टाकल. साधनेत मोहुन टाकल. एका वेगळ्या जगाचा स्वर्गीय आनंद दिला. भागवत धर्माचा उदय झाला
कृष्णभक्तिच्या पायाभूत सिध्दांतावर वारकरी संप्रदायाचा उगम झाला. भगवान कॄष्णाला, त्याच्या मधुर भक्तिला, भक्तांच्या मनामनात रुजवण्यासाठी विविध संतांनी त्या त्या काळानुसार जनजागृतीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी विविध कवने, अभंग, गवळणी, आरत्या रचल्या. जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनात एक आनंद निर्माण होईल. त्या दयाघनाची तो स्तुती करू शकेल. आणि हळूहळू त्याची त्याला आवड निर्माण होईल व ह्या भवसागरातून तो सहज पार होईल.
आमचे भाऊ महाराज लहानपणापासूनच गावातल्या भजनामध्ये, दशावतारी नाटकात सामील होत असत. त्यांना संगीत खूप प्रिय होते.मराठे गुरुजींनी भाऊंना बालपणी मंत्राबरोबरच भजनाची गोडी लावली. भाऊंनी ती गोडी अखेरपर्यंत कायम ठेवली. मुंबईत असताना सुध्दा आपल्या व्यग्र कामातून वेळ काढून ते आवर्जून रागधारी संगीत कार्यक्रम, नाटक ऐकण्यासाठी जात असत. भाऊ आपल्या शिष्याना सतत सांगत असत, बाळांनो, त्या त्रिगुणात्मक भगवंताला पकडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भजन” त्या भगवंताला त्याची केलेली स्तुती खूप प्रिय असते. भाऊ म्हणायचे माझा आवाज घोड्यासारखा आहे. पण त्या श्रीहरीला तुमच्या आवाजापेक्षा तुम्ही ज्या भावनेने साद घालता, त्या ओढीने तो तुमच्याकडे धावत येत असतो. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर……..
“परमार्थाचा मार्ग सुखाचा। सोपा सापडला।। विठ्ठल विठ्ठल बोला। बोला विठ्ठल विठ्ठल बोला।।
भजनामध्ये बसले पाहिजे. जसे जमेल तसे त्याला आळवले पाहिजे. तुमची आणि त्याची नाळ जुळली पाहिजे. ती भजनातून सहज शक्य आहे.
गाणगापुरातील घटना. मठाच्या पूर्वीची गोष्ट. भाऊ एकदा संगमावर जात असताना नागनाल्या कड़े पोहचले असतील. रस्त्यात एका बाजूला एक उंचपुरी व्यक्ति बसली होती. रूप सामान्य माणसाच नव्हतं. वर्णन करता येणार नाही अस रूप. आवाजात जरब होती. भाऊंना त्यानी जवळ बोलावले. “इकडे ये”, भाऊ जवळ गेले. “तोंड उघड़”. भाऊनी तोंड उघडले. त्या व्यक्तिने भाऊंच्या जिभेवर भस्म चोळले. आणि म्हणाले “आता जा”. भाऊ थोड़े पुढे गेले, मागे वळून पाहतात तर कोणी नव्हतं. ते प्रत्यक्ष दत्तमहाराज होते. त्या नंतर भाऊंच्या मुखातून सरस्वतीच्या मुखाप्रमाणे संगीत स्त्रवू लागले. भाऊंनी प्रथम भजनाची सुरवात पिंपळेश्वर दत्त मंदिरात काही मुलांना आणि सहकाऱ्याना घेऊन केली. जे सुंदर गाऊ शकत असत ते भजन म्हणत असत. आणि बाकी सगळे कोरस देत असत. हळूहळू बरीच मुले भजनामध्ये पारंगत होऊ लागली. नवनवीन अभंग, गवळणी, राग आळवू लागले. भाऊंनी स्वतः हजारो अभंगांना, गवळणीना चाली लावलेल्या आहेत. एकच गाणे दोन रागात बसवले आहे. कितीतरी नवनवीन रागावर आधारित अभंग, गवळणी, भैरवी भाऊंचे शिष्य सहज आळवू लागले. दत्त महाराजांनी स्वतः त्यांच्या नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीवेळी सर्व शिष्यगणानां सांगितले आहे, गायनी आम्हास बहू प्रीति.
- गुरुचरित्र अध्याय ५१ वा –
- श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज-मठासी । पावतां खूण तुम्हांसीं । प्रसादपुष्पें पाठवूं ॥ ३८ ॥
- येतील पुष्पें शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंडिती । लक्ष्मी वसो तुमच्या घरीं ॥ ३९ ॥
- आणिक सांगेन एक खूण । “गायनीं” करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ ४० ॥
- नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ ४१ ॥
- व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ४२ ॥
यावरून भजनाची सार्थकता लक्षात येते. भाऊ आणि त्यांचे शिष्य दर दिवाळीत गाणगापूर निर्गुण पादुका मठ आणि मे महिन्यात नृसिंहवाडी मंदिर दक्षिण द्वार ह्या ठिकाणी आवर्जून ही सेवा दत्त महाराजांच्या समोर सादर करत असतात. जी आजपर्यंत अव्यहातपणे सुरू आहे. तसेच वाशिंद ग्रामी दर गुरुवारी दत्त पादुका पालखी समोरही प. पू. टेंब्ये स्वामी रचीत करूणात्रीपदी, अभंग, विविध पद सादर केली जातात. भैरवीने या सुंदर गायनसंध्येचा शेवट होतो.
- श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। नामसाठी त्वरा करा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
- चैतन्याचे ठायी गुरुविण कोणी नाही। मेघ सांडतो वत्सलतेचा। जन्मची सारा चिंब करा।।
- श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। सर्व सोपवा त्याला। निरोप द्या दुःखाला।।
- सत्वगुणांच्या क्षितिजावरती आनंदाचे रंग भरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
देववाणीचा सूर – भजन सेवा ही आपल्या वारकरी संप्रदायाची जणू पांडुरंगाच्या पायाखालची वीट आहे असं म्हणावं लागेल. संतांनी कृष्णाला भजनातच पकडलं. देवाची स्तुती करण्याचा भजना सारखा दुसरा मार्ग नसेल. कर्मठ दत्तभक्तीच रूप सहज, सोपं करण्यासाठी त्याला भाऊंनी कृष्णभक्तीची जोड दिली. सहजोग साधनेच्या रुपात दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय याच अजोड मिश्रण तयार केलं.आपल्या प्रत्येक शिष्याला या भजन सेवेत गुंतवून टाकलं. सामुदायिक पारायण काळात संध्याकाळी देवासमोर भजन सादर करण्याची प्रथा सुरू केली. ते म्हणत असत.. पारायण काळात तुम्ही भजन करत नसाल तर पारायण अपूर्ण आहे
भजनात, गात असताना भाऊना पाहणं, हा एक वेगळा अनुभव होता. भाऊ भान हरपून गात असत. काही भजन अर्धा अर्धा तास भाऊ आळवत असत. हातवारे करत ,तल्लीन होऊन खर्जा पासून ते सप्तका पर्यंत सगळ्या पट्टीत, विविध हरकती घेत ,देवाला आळवत असत. गंमत अशी की एखाद भजन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या हरकती घेऊन सादर करीत असत. भाऊंनी हजारो भजनांना चाली लावल्या. ज्या अभंगांना, गवळणींना चाल लावत असत ते भजन अर्थपूर्ण असे. शिवाय त्यात गूढार्थ भरलेला असे. कधी कधी ते त्या भजनाचा गूढार्थ सांगत असत. संतांनी लिहिलेले अभंग गूढार्थाने किती खोल विचाराचे होते याच आश्चर्य वाटे. भाऊंनी त्या गाण्यातील भावार्थाला व गूढार्थाला न्याय मिळेल अशा चाली मध्ये त्या संगीतबद्ध केल्या.
एखादया नवीन अभंगाला किंवा गवळणीला चाल लावताना ते वेगळ्या अवस्थेत, अशा धुंदीत जात असत. किती तरी वेळ त्या अवस्थेत असत. भजनाच्या वेळी ती चाल सर्वाना म्हणून दाखवत व त्या वेळी रेकॉर्ड करायला सांगत. कारण ते म्हणत असत की “नवीन लावलेली चाल पुन्हा माझ्या मुखातून बाहेर पडणार नाही”. एकदा बोलता बोलता त्यांनी याच गुपित सांगितलं. “मी या ज्या चाली लावतो, त्यासाठी मी साधनेत जातो. त्या अवस्थेत साधनेतून त्या चाली जन्माला येतात. त्या चाली तेंव्हा जर रेकॉर्ड नाही केल्या, तर पुन्हा माझ्या मुखातुन बाहेर पडणार नाहीत. प्रत्येक गाण्यामध्ये मी देववाणी सूर टाकला आहे जो देवाशी जोडला गेला आहे”. काही चाली फार गोड नसत पण परिणामकारक असत. उदा. एका शिष्याला नोकरी नव्हती. भाऊंनी त्याला एक भजन शिकवलं व भजनात नेहमी म्हणावयास सांगितलं. तीन महिन्यानंतर त्याला BEST चा कॉल आला. भजन होत…” पोटापुरती देई मागणे। लई नाही लई नाही देवा । लई नाही लई नाही। चाल फार साधी होती पण परिणाम करून गेली. एकदा एका शिष्याची दहावीची परीक्षा होती पण अभ्यासाच्या चिंतेने त्याला प्रचंड दडपण आलं होतं. भाऊनी त्याला बोलवलं व त्याच्या समोर एक भजन आळवल. त्याला फक्त ऐकायला सांगितलं. गाणं संपेपर्यंत त्याचा मेंदू ताजातवाना झाला होता. देववाणीचा सूर नक्किच चमत्कार घडवून आणतो. हा चमत्कार नाही आहे. संगीताच्या लहरींचा परिणाम आहे. भाऊ नेहमी साधनेच्या अविष्काराच विश्लेषण करून त्यातील विज्ञान समजावून सांगत असत…
प्रभाताई चाफेकर, पुण्याच्या उदयोगपती. मोठं प्रस्थ. प्रभाताई भाऊंना मोठा भाऊ मानत. प्रभाताई शितोळे गुरुजींच्या शिष्य. साधना अखंडित चालू. पण समाधीच्या अवस्थेसाठी आसुसलेल्या होत्या. नरसोबा वाडीच्या कार्यक्रमाला नेहमी हजर असत. पारायण काळात भजन न चुकवण्याचा सर्वाना नियम. आणि एके दिवशी भाऊंची शिष्या भैरवी आळवत असताना, प्रभाताईंची समाधी लागली. कितीतरी काळ त्या समाधी अवस्थेत होत्या. संत असेच भजनातून देवाशी एकरुप झाले होते…
|| श्री गुरुदेव दत्त ||