इंदूकोटी महास्तोत्र

श्री गुरूचरित्रांतर्गत इंदूकोटी महास्तोत्र

जन्मास आलेल्या नरास आयुष्यात कधी ना कधी निरनिराळया व्याधी होत असतात. रोग, आजार यांची मालिका चालूच असते. काही व्याधी अल्पकालीन असतात. ज्या औषधाने लवकर बऱ्या होतात. तर काही दीर्घकालीन म्हणजे मरेपर्यंत माणसाची पाठ सोडत नाहीत. यासाठी माणूस औषधाबरोबर दैवि उपायही करत असतो. जो पारमार्थिक आहे, तो भक्तीनं, उपासनेनं, तपश्चर्येनं परमेश्वराला साकडं घालीत असतो.

श्रीगुरूचरित्रांत एका ब्राम्हणाची कथा आहे. ज्याच्या संपूर्ण अंगावर कोड उठला आहे. तो गाणगापूरात श्रीनृसिंह स्वामींच्या भेटीस येतो. स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना आपली व्यथा सांगतो. स्वामी, मी कृष्ठरोगी असल्याने सर्व माझी निंदा करतात. मला दूर ठेवतात, माझ्याशी कुणीही नीट बोलत नाही. मी या जीवनाला कंटाळून गेलो आहे. या कटकटींतून सुटण्याचा एकच मार्ग माझ्यासमोर उभा आहे. तो म्हणजे प्राणत्याग! त्या ब्राह्मणाच्या व्येथेने स्वामी नृसिंह सरस्वतींना त्याची दया आली. स्वामींनी त्याला धीर दिला. त्याचवेळी स्वामींच्या मठासमोरून एक मोळीविक्या जात होता. त्याला त्यांनी जवळ बोलावून घेऊन त्याची मोळी उतरवायला सांगितली. त्यामोळीतून एक  सुकलेले लाकूड काढून घेऊन ब्राह्मणाच्या हाती देऊन त्याला सांगितले, `हे लाकूड घेऊन तू भीमा अमरजा संगमावर जा, आणि संगमाजवळच्या अश्वत्थ वृक्षाजवळ लाव. अश्वत्थाला प्रदक्षिणा घाल. संगमावरून दोन कलश भरून आणून ते पाणी तीन वेळा या सुकलेल्या काष्ठावर घालीत जा. ज्या दिवशी या सुकलेल्या फांदीला नवी पाने आलेली दिसतील. त्यावेळी तुझा श्वेतकुष्ठ  बरा झालेला दिसेल.”

नरहरीने स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून ते लाकूड घेऊन संगमावर गेला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो करू लागला. सात दिवस उपवास करून तो रोज दोन कलश तीन वेळा त्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालू लागला. तेथील लोक त्याला वेडा म्हणू लागले. त्याची चेष्ठा करू लागले. परंतु तो ब्राम्हण  कुणाचेही ऐकत नव्हता. स्वामींचे शब्द त्याला कल्पतरूसारखे वाटत होते. गुरू वाक्य मज कामधेनू. स्वामींचे शिष्य संगमावर जात असत. ते ब्राह्मणाचा हा उद्योग पहात होते. त्यांनी स्वामींना सांगितले. तो ब्राम्हण सात दिवस उपाशी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे भावयुक्त अंत:करणाने करत आहे. ’गुरूवाक्य मज प्रमाण!” हेच उत्तर तो सर्वाना  देत असतो. या कथनाने स्वामी संतुष्ट झाले आणि आपल्या शिष्यांना म्हणाले “जशी ज्याची इच्छा, तशी फलप्राप्ती” असं म्हणून स्वामी आपल्या शिष्यांसह संगमावर गेले. नरहरीचा भक्तीभाव पाहून त्याने लावलेल्या लाकडाजवळ जाऊन त्यांनी आपल्या हातातील कमंडलूमधील पाणी त्या लाकडावर घालताच त्याला नवी पालवी फुटून, औदुंबराचे सुंदर झाड दिसू लागले. आणि ब्राम्हणाचे शरीर कोड नष्ट होऊन तो तेजस्वी दिसू लागला. नरहरी स्वामींच्या चरणी विनम्र झाला. अपार भक्ती भावाने त्याने स्वामींची स्तुती केली. ती स्तुती म्हणजेच एक महानस्तोत्र ’इंदूकोटी” होय. या स्तोत्राचा शुध्द स्वरूपातील पाठ पुढीलप्रमाणे –

  • इंदूकोटीतेज करूण-सिंधू भक्तवत्सलं। नंदनात्रिसूनुदत्त इंदिराक्षश्रीगुरूम्। गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदित। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम्।।1।।
  • मायपाश अंध:कारछायदूरभास्करं। आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश नायकम्। सेव्य भक्तवृंद वरद भूय – भूय नमाम्यहं। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ।।2।।
  • चित्तजादिवर्गषट्क मत्तवारणांकुशम् । तत्त्वसारशोभितात्म दत्त श्रियावल्लभ्। उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवत्सलं । वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम्।।3।।
  • व्योमरापवायुतेज भूमिकर्तुमीश्वरम्। कामक्रोधमोहरहित सोमसुर्यलोचनम्। कामितार्थ दातृ भक्त कामधेनु श्रीगुरूम्। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ।।4।।
  • पुंडरीक आयताक्ष कुंडलेंदुतेजसम्। चंडदुरितखंडनार्थ दंडधारी श्रीगुरूम्। मंडलीकमौलि-मार्तंड-भासिताननं। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम्।।5।।
  • वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ति श्रीगुरूम्। नादबिंदुकलातीत कल्पपादसेव्ययम्। सेव्यभक्तवृंदवरद भूय-भूय नमाम्यहं। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ।।6।।
  • अष्टयोगतत्त्वनिष्ठ तुष्ट ज्ञानवारिधीम् । कृष्णावेणितीरवास पंचनदी संगमम्। कष्टदैन्यदूरीभक्त तुष्टकाम्यदायकम्। वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ।।7।।
  • नारसिंहसरस्वती नाम अष्टमौक्तिकम्। हारकृत्य  शारदेन गंगाधरआत्मजम्। धारणीक-देवदीक्ष गुरूमूर्तितोषितम्। परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम्।।8।।
  • नारसिंहसरस्वतीय अष्टकं च य: पठेत्। घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम्। सारज्ञानदीर्घ आयुरारोग्यादिसंपदम्। चारूवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत्।।9।।

ह्या महास्तोत्राच्या नित्य पठणाने दुर्धर व्याधी बऱ्या होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होते. (श्रीगुरूचरित्रातील कथा त्याची साक्ष आहे.) मोठ-मोठी संकटेही दूर होतात. ज्ञान प्राप्ती होते. परमानंद प्राप्त होऊन मन फक्त परमेश्वराच्या चिंतनात गढून जाते. श्री दत्तकृपा प्राप्त होते. भाऊ महाराजांनी हे स्तोत्र सर्व शिष्यांना शिकविले आणि त्याचे अनुभवही दाखवून दिले. आज सर्व भक्तगणांचे हे स्तोत्र मुखोद्गत आहे. त्याची चालही भाऊ महाराजांनी फार सुंदर लावली आहे. भाऊंनी या चालीत गायनातील मूर्च्छना प्रकार बांधला आहे. ही चाल तिन्ही पट्यामध्ये (खर्जा ,मध्यम ,सप्तक) अशी गुंफली आहे की म्हणणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आवडायलाच हवी. ती म्हणताना एक गोड आनंद मिळत जातो.