
घोरकष्टोध्दरण स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलदायी असे स्तोत्र श्रीवासुदेवानंदसरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांच्या सिध्दहस्त लेखीतून साकार झाले आहे. श्रीमहाराज हे प्रभू दत्तात्रेयांचे अंशावतार होते, अशी त्यांच्या भक्तांची पूर्ण श्रध्दा आहे. भविष्य पुराणात`कलौ योगिराजो भविष्यात” असे एक वचन आहे. श्रीमहाराजांच्या दिव्य चरित्रांतील अतर्क्य घटना पाहता भगवंतानेच श्रीमहाराजांच्या रूपाने अवतार घेऊन आपले वचन पूर्ण केले असेच म्हणावे लागेल! कलियुगात वर्णाश्रम धर्माचा लोप होत असताना श्रीमहाराजांनी आसेतुहिमाचल संचार केला आणि वर्णाश्रमधर्मांची विस्कटलेली घडी पुन्हा ठिकठाक करण्याचे दुर्घट कार्य पार पाडले. त्याचप्रमाणे निरंतर दत्तभक्तीचा प्रसार करून दत्तसंप्रदायाचा पुरातन वृक्ष जोमाने फुलविला!
श्रीमहाराजांचे उपास्य दैवत अर्थातच भगवान दत्तात्रेय होते. या दैवताशी ते इतके तादात्म्य पावले होते की, एकदा वाडीच्या पुजाऱ्यांनी दत्तपादुकांवर चुकून कडक पाणी ओतले परंतु त्यामुळे झाले काय, तर तेथे प्रार्थना करत उभ्या असलेल्या श्रीस्वामींच्या अंगावर फोड उठले! श्रीस्वामीमहाराजांच्या दिव्य चरित्रात अशा तऱ्हेच्या कितीतरी अद्भूत घटना पानोपानी आढळून येतात. श्रीमहाराज हे व्युत्पन्न कवि होते. त्यांची भाषा ओजस्वी आणि प्रासादिक होती. त्यांनी केलेली स्तोत्रे भावभक्तीने व दत्तप्रेमाने बहरलेली आहेत. आणि त्यांच्या नित्य पठनामुळे भक्तांची संकटे दूर होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक दाखले आहेत. ही स्तोत्रे मुख्यत: संस्कृत भाषेत असली तरी भाषा अत्यंत मधुर आणि सहज सोपी असल्याने न कळत पाठ होऊन जातात आणि मग रोजच म्हणावीशी वाटतात!
श्रीमहाराजांचे मुख्य उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असल्याने या दैवतावर त्यांनी रचिलेल्या स्तोत्रांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे ४२ आहे. त्याशिवाय दत्तमाहात्म्य सारखे काही ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. श्रीदत्तात्रेयांव्यतिरीक्त श्रीगणेशादी दैवते तसेच गंगा, यमुना, इ. पवित्र नद्या, त्याचप्रमाणे नृसिंहवाडी, अरूणाचल इत्यादी क्षेत्रे यावरही भावमधुर स्तोत्रे रचिली आहेत. यांची संख्या सुमारे ९३ आहे. याशिवाय वेदांतपर अशा सहा स्तोत्रांची रचनाही त्यांनी केली आहे. त्यांच्या श्रीदत्तप्रभुंवरील स्तोत्रांत नामावली, भजन, क्षेत्रवर्णन, मंत्रात्मकश्लोक, कथात्मक श्लोक, प्रार्थना इत्यादी प्रकार आढळून येतात. ही स्तोत्रे विविध वृतांत आहेत. परंतु त्यातील बरीचशी अनुष्टुप छंदात आहेत. अलंकाराचा वापरही त्यांच्या स्तोत्रवाङमयात मुक्तहस्ताने केलेला दिसतो. काही स्तोत्रांची विशिष्ट क्रमांकाची अक्षरे क्रमाने वाचली तर निरनिराळे मंत्र तयार होतात. या संदर्भात मंत्रगर्भ गणपती स्तोत्र, अष्टोतरशतनाम स्तोत्र इत्यादी स्तोत्रे पाहण्यासारखी आहेत.
श्रीस्वामीमहाराज रचिलेली कितीतरी स्तोत्रे आज अनेक दत्तस्थानी नियमाने म्हटली जातात. त्यायोगे त्या स्थानांचा प्रभाव जागृत राहतो. त्याचप्रमाणे ती स्तोत्रे नियमाने म्हणणाऱ्या भक्तांचे ईप्सित पूर्ण होऊन प्रभूचरणी त्यांची भक्ती दृढ होते! घोरकष्टोध्दरण स्तोत्र हे अशाच प्रकारचे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे त्याची कथा अशी ;
भक्तवर्गाची ही अडचण ओळखून श्रीस्वामीमहाराजांनी ताबडतोब घोरकष्टोध्दरण स्तोत्र लिहून तयार केले आणि सांगितले की, हे स्तोत्र रोज श्रीदत्तगुरूंपुढे म्हणा म्हणजे तुमची सर्व दु:खे दूर होऊन तुमच्यावर प्रभुकृपा होईल. त्यावेळी ते स्तोत्र म्हणजे सर्वानाच मोठा आधार वाटला आणि तेव्हापासून वाडी, गाणगापूर, औदुंबर येथील नित्यक्रमात ते म्हटले जाऊ लागले. इतर अनेक दत्तक्षेत्रातही ते दत्तपुजेनंतर नियमाने म्हटले जाऊ लागले. कित्येक दत्तभक्त घरीही देवपुजेनंतर तालासुरात हे स्तोत्र म्हणून दत्तप्रभुंची प्रार्थना करताना दिसतात. हे स्तोत्र केवळ बाराच ओळींचे (सहा श्लोकी) असल्याने ते म्हणण्यास तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ लागत नाही. यातील प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण सारखाच असून त्याचा अर्थ भयंकर दु:खातून (कष्टांतून) आमचा उध्दार कर, तूला नमस्कार असो असे आहे. या स्तोत्राचा शुध्द स्वरूपातील पाठ पुढीलप्रमाणे –
- श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव। भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।1।।
- त्वं नो माता त्वं पिताSSप्तोSधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वम् त्वं सर्वस्वं न: प्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।2।।
- पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराSशु त्वदैन्यम। त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।3।।
- नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योSघहर्ता। कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।4।।
- धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि मुक्तिं च भुक्तिं। भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।5।।
- श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम्। प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्।।6।।
या सहा श्लोकी स्तोत्रांत दत्तप्रभूंना भावग्राह्य आणि क्लेशहारीन् ही विशेषणे श्रीस्वामीमहाराज लावतात. यापैकी भावग्राह्यचा अर्थ भक्तीभावाने वश होणारा असा आहे. भगवंत हा केवळ भक्तीभावाचा भुकेला आहे. त्याला वश करण्यासाठी इतर कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही. कारण अनंतकोटीब्रम्हांडनायक अशा त्या जगन्नायकाची पूजा करण्यासाठी आपण शुद्र मानव करून करून कोणते उपचार करणार? एखादा कोटयाधीश सोन्याच्या ताम्हणात त्याची मूर्ती ठेवेल आणि सोन्याच्या पळीतून तिच्यावर सुगंधीत पाणी घालेल. परंतु त्या पळीत मावेल इतका देखील भक्तीचा, भावनेचा ओलावा त्याच्या हृदयात नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? दुसरे विशेषण आहे क्लेशहारीन्! क्लेशहारीन् म्हणजे क्लेश किंवा दु:ख हरण करणारा, सुर्याला जसा अंधार ठाऊक नसतो त्याचप्रमाणे आनंदरूप भगवंताच्या ठायी दु:खाचा लवलेशही आढळत नाही. तसेच सुर्य ज्याप्रमाणे अंधाराचे हरण करतो त्याचप्रमाणे भगवंतही दु:खाचे हरण करतो! मानवी जीवन हे अनंत दु:खांनी भरलेले आहे. अशा परिfस्थतीत त्याने ते दु:ख दूर होण्यासाठी भगवंताfशवाय जायचे कुणाकडे?
असो, प्रस्तुतच्या सहा श्लोकांपैकी नंतरच्या चार श्लोकांचा अर्थ थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल. हे विश्व तुझेच रूप असल्यामुळे आमची माता, आमचा पिता तसेच आमचे कल्याण करणारा तूच आहेस. तेव्हा पाप, ताप, भिती, दु:ख यांचा तू नाश कर. आम्हांला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही त्राता नाही. शरणांगताचे रक्षण करणारा तुच एक असून तू आमच्यावर कृपा कर. आम्हांला धर्मांवर प्रेम, सद्बुध्दी, ईश्वरभक्ती, सत्संग, भक्तीभाव या गोष्टी देऊन सांसारीक सौख्य दे. सदैव आनंदरूप असलेल्या देवा, भयंकर दु:खातून आमचा उध्दार कर.
अखेरच्या सहाव्या श्लोकात या स्तोत्राच्या पठणाची फलश्रुती सांगितली आहे. तीत असे म्हटले आहे, की जो (मनुष्य) नित्यनेमाने या पाच श्लोकांचा पाठ करील तो श्रीदत्तास प्रिय होईल. एकूण या स्तोत्रात, दु:खाचा नाश, सुखाचा लाभ, धर्मप्रेम, ईश्वरभक्ती, सत्संग, सांसारीक सौख्य, भक्तिभाव आणि अंती मोक्ष या प्रमुख गोष्टींची मागणी केलेली आहे. प्रस्तुतचे स्तोत्र हे श्रीस्वामीमहाराजांसारख्या प्रभू दत्तात्रेयांचा पूर्ण कृपाशिर्वाद प्राप्त झालेल्या एका महान अधिकारी विभूतीच्या प्रासादिक लेखणीतून साकार झाले आहे. त्याशिवाय या स्तोत्राला त्यांचा पूर्ण आशिर्वाद ही आहे. हे स्तोत्र रोज नित्यनेमाने म्हणणाऱ्या भक्ताची सर्व दु:खे दूर होऊन दत्तकृपेचा लाभ होईल असे त्यांनी स्पष्ट शब्दांत वाडीच्या भक्तांना सांगितले आहे आणि स्तोत्र पाठकांचा अनुभवही तसाच आहे. मात्र दु:खाच्या प्रमाणानुसार या स्तोत्राचे कमी अधिक पाठ केले पाहिजेत. अर्थांशी समरस होऊन पूर्ण एकाग्र मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने ओथंबलेल्या स्वरात असे पाठ केले तर दत्तकपा दूर नाही!
विशेष संकटकाळी मात्र याचे रोज १०८ पाठ करणे आवश्यक ठरेल. अशा १०८ पाठांनी अभिमंत्रित केलेली विभूती किंवा पाणी अनेक असाध्य रोगांवरही गुणकारी ठरते असे महान अनुभवही आहेत! श्रीटेंबेस्वामी महाराजांनी प्रभू दत्तात्रेयांच्या प्रेमापोटी जी अनेक लहान मोठी स्तोत्रे केली त्या सर्व स्तोत्रात मुकुटमणि म्हणून शोभावे असे हे घोरकष्टोध्दरण स्तोत्र असून भक्तांनी नित्यनियमाने त्याचे अकरा पाठ करून दु:खमुक्त व्हावे व प्रभू दत्तात्रेयांच्या कृपेला पात्र व्हावे.
