
पुराणकाळापासून नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नदी म्हणून `गंगा’ नदी मानली जाते. कारण ती श्रीविष्णूच्या पायात (म्हणजे उजव्या पायाच्या अंगठयात) राहात होती. म्हणून ती विष्णूपदी आहे. विष्णूलोक (वैकुंठ) हे तिचे माहेर! केवळ गंगा हा शब्द जरी उच्चारला तरी मनुष्य पापमुक्त होतो. तिचे स्मरण आणि उच्चार स्नान करते वेळी पाण्यास स्पर्श केला तर ते गंगोदक होऊन मानवाची शतजन्मांची पातके दूर होतील, असा पुराणांचा संकेत आहे. यामुळेच गंगास्मरणाला अत्यंत महत्व देऊन गंगास्तोत्राची निर्मिती झाली आहे. त्यासाठी हिमालयात जायची गरज नाही की वाराणशी तीरावर. येथे भक्तिभाव महत्वाचा.

गंगेचा इतिहास – सगरवंशातील भगीरथ याने अथक प्रयत्नाने गंगेला पृथ्वीतलावर आणले म्हणून गंगेने भागीरथी हे नांव धारण केले. भगीरथ ज्याच्या वंशातील तो सगरराजा हा भगीरथाचा खापरपणजोबा. त्याच्या सैन्याच्या हातून अश्वमेध यज्ञाचा घोडा फिरवताना महान ऋषी कपिल यांचा घोर अपमान झाला. तेव्हा कपिल ऋषींनी सगर राजाच्या साठ हजार सैन्याला शापवाणी उच्चारून भस्म केले. त्या सकल सैन्याला पापमुक्ती मिळविण्या करीता सगराने शिवाय पुढील पिढीतील अंशुमान (हा सगराचा नातू आणि असमंजसचा पुत्र. असमंजस हा आळशी, बाहेरख्याली होता. त्याने आपले आयुष्य मौज-मजा,मद्य पिण्यात घालवून मृत्यु पावला) त्याचा पुत्र दिलीप आणि दिलीप पुत्र भगीरथ यांनी फार तपश्चर्या केली. पैकी भगीरथाच्या अथक प्रयत्नांना यश येऊन गंगा पृथ्वीतलावर आली. तत्पूर्वी गंगेने भगीरथाला सांगितले माझ्या जबरदस्त ओघाने पृथ्वी रसातळाला जाईल. त्यासाठी मला वरचेवर धारण करण्यासाठी श्रीशंकाराची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घे. भगीरथाने पुन्हा श्रीशंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. महादेव भक्तीचे भुकेले असल्याने प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला मस्तकी धारण केले. येथे प्रश्न उपस्थित होतो; सर्व शक्तीमान असे श्रीशिव यांनी गंगेला मस्तकीच का धारण केले? कारण हरी-हर (श्रीविष्णू -श्रीशिव) हे एकमेकांचे गुरू-शिष्य. शिवाय गंगा ही श्रीविष्णूंच्या उजव्या अंगठयापासून उदय पावली. आपल्या गुरूंच्या चरणकमलातून गंगा उत्पन्न झाली म्हणजे गुरूंच्या चरण तीर्थांचे आगमन आपल्या मस्तकी का होऊ नये? म्हणूनच महादेवांनी श्रीविष्णूचे चरण तीर्थ (गंगा) आपल्या मस्तकी धारण केले.
गंगा एक तर जगत्पालक श्रीहरींच्या चरणातून उदय पावून सर्वशक्तीमान महादेवाला अभिषेक करून पृथ्वीवर येती झाली. म्हणजे अति पवित्र होऊन तिने सगराच्या साठ हजार सैन्याला मोक्षगती दिली. त्यापासून गंगा पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना पापविनाशीनी ठरली. शिवशंकरांनी गंगेला मस्तकी धारण केले म्हणून त्यांना गंगाधर असे नांव पडले. हे भागीरथामुळे घडले. गंगास्तोत्रातील उपयुक्त मंत्र :
नमामि गंगे तव पादपंकजै सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम। भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्।।
हे गंगामाते, मी तुला तुझ्या पादकमलांना वंदन करतो. तुझ्या दिव्य रूपाला देव आणि राक्षस सदैव वंदन करतात. ज्याचा जसा भाव तशी तू त्याला भोग व मोक्ष देतेस. तुझ्या दर्शनाने सर्व पापे जळून जातात, स्पर्शाने मोक्ष मिळतो आणि स्नानाने मुक्ती अर्थात पुनर्जन्म होत नाही. म्हणूनच गंगा ही कायिक, वाचिक आणि मनाने केलेल्या त्रिविध तापांचे हरण करणारी आहे. गंगा हीच यमुना आहे, भागिरथी आहे, नर्मदा आहे. तीच इतर नद्यांच्या रूपाने नटलेली आहे. म्हणून कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करण्यापूर्वी तिच्या तीरावर उभे राहून तिची गंगा म्हणून स्तुती करून भावपूर्ण अंत:करणाने प्रार्थना करून तिला नमस्कार करावा. क्षमायाचना करून मगच आपल्या पायांचा स्पर्श तिच्या पाण्याला करावा. नंतर स्नानासाठी नदीत उतरून गंगास्तोत्र म्हणावे. तिचं स्मरण करीत स्नान करावे. पूर्ण गंगा स्तोत्र पुढीलप्रमाणे म्हणावे :
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिंधु कावेरी, जलेस्मिन सन्निधम् कुरू: ।। नमानि गंगे तव पाद पंकजैम् सुरासुरै: वंदिती दिव्य रूपम्। भुक्तीम् च मुक्तीम् च ददासि नित्यम् । भावानुसारेन सदा नराणाम् ।। गंगा गंगेतियो: ब्रुयात् योजना नाम शतै:पि (शतैरपि)। मुच्यते सर्व पापेभ्यो: विष्णू लोकं स गच्छति।। गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके निल पर्वते स्नात्वा तु कनखले तीर्थे, पुन:र्जन्म न विद्यते। पापो हं पापात्मा पापसंभव: त्राही मां कृपया गंगे, सर्व पाप हराभव।।
ओम शांती:। शांती:। शांती:।