आदौब्रम्ह स्तोत्र

श्रीगुरूचरित्रातील कथेप्रमाणे सायंदेवाची परिक्षा घेतल्यानंतर तो श्रीगुरूंना शरण आला तेव्हा श्रीगुरूंनी त्वष्ठा ब्राह्मणाच्या मुलाची कथा सांगून सुक्ष्म देहानं योगमाया शक्तीने काशीयात्रा करवून आणले तेव्हा त्या दिव्य अनुभवाने सायंदेवाच्या मनात भक्तीभाव उफाळून येऊन त्याने श्रीगुरूंची स्तुती केली ते आदौब्रह्म’ स्तोत्र होय. याची आठ कडवी असून `वंदेSहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्’ हे त्या स्तोत्राचे पालुपद आहे. या पालुपदाचा अर्थ होतो, मी श्रीनृसिंहसरस्वती व (पुर्वील अवतार) श्रीपादश्रीवल्लभ यांच्या चरणांना नमस्कार करतो. अष्टक पुढीलप्रमाणे.

  • आदौ ब्रह्म त्वमेक सर्व जगतां, वेदात्ममूर्ति विभूं। पश्चात क्षोणिजडा विनाश-दितिजां, कृत्वाSवतारं प्रभो। हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाSत्मजोत्रेगुहे। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।1।।
  • भूदेवाखिलमानुषं विदुजना, बाधायमान कलिं। वेदादुष्यमनेकवर्णमनुजाभेदादि भूतोन्नतम्। छेद:कर्मतमान्धकारहरणं श्रीपाद-सूर्योदये। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।2।।
  • धातस्त्व हरि शंकर प्रति गुरौ, जाताग्रजन्मं विभो। हेतु सर्वविदोजनाय तरणं ज्योति:स्वरूपं जगत्। चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातु: सदा सेव्ययं। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।3।।
  • चरितं चित्रमनेककिर्तिमतुलं, परिभूतभूमंडले। मूकं वाक्यं दिवांधकस्य नयनं, वंध्या च पुत्रं ददौ। सौभाग्यं विधवा च दायक श्रियं, दत्वा च भक्तं जनं। वंदेहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।4।।
  • दुरितं घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिषं। स्वर्धेनुं सुरपादपूजितजना, करूणाब्धि भक्तार्तित:। नरसिंहेद्र-सरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।5।।
  • गुरूमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसो।चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं, सरितादी भागीरथी। तुरगामेध-सहस्त्रगोविंदुजना:सम्यक ददन् तत्फलं। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।6।।
  • नो शक्यं तव नाममंगल स्तुवं, वेदागमागोचरं। पादद्वं ह्दयाब्जमंतरदलं, निर्धार मीमांसतं।। भूयोभूय: स्मरन नमामि मनसा, श्रीमदगुरूं पाहि मां। वंदेहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।7।।
  • भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षा ददन् योगिनां। सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्वा चतुष्कामदं।। स्तुत्वा भक्तसरस्वती गुरूपदं, जित्वाद्यदोषादिकं। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।8।।
  • एवं श्रीगुरूनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठे नित्यसौ। तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्ध वपु:।। पुत्रापत्यमनेकसंपदशुभा, दीर्घायुमारोग्यतां। वंदेSहं नरकेसरीसरस्वती-श्रीपादयुग्मांबुजम्।।9।।

अर्थ : हे प्रभो, आपण अत्रीमुनींच्या घरी पुत्ररूपाने अवतार घेऊन अधर्माचरण करू पाहणाऱ्या दैत्यांचा नाश करून अनेक धर्मांचे आचरण केलेत, त्या श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।1।।

कलीकाळाच्या दोषाने, लोकांनी धर्म सोडून दिला. देव-देवतांनाही उपवास घडू लागले तेव्हा तुम्ही अवतार धारण करून, सूर्याने अंधाराचा नाश करावा त्याप्रमाणे महामोहरूप असलेला अंधार ग्रासून टाकून शिथिल झालेला धर्मरूप सेतु दृढ केलात, अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।2।।

तुम्हीच धाता म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू व शंकर असून सकल शास्त्रज्ञ विद्वान किंवा ज्ञानी लोकांना तारण्याच्या हेतूनं ब्राह्मकुळात जन्म घेतलात. तुम्हीच जगत्प्रकाशरूप असून, संन्यासाश्रमाचा लोप होत असताना त्याची पुर्नस्थापना केलीत, अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।3।।

निजचरित्राने आणि अतुल किर्तीने तुम्ही भूमंडळ भरून टाकलेत. मुक्याला वाचा दिलीत, अंधाला डोळे दिलेत, वांझेला संतान, विधवेला सौभाग्य व भक्तगणांना ऐश्वर्य दिलेत, अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।4।।

थोर पातक, दारिद्रयाचा वणवा आणि अंधार (अज्ञान) नाहिसे करून जगताला प्रकाश दिलात. आपणच कामधेनू व कल्पतरू असून भक्ताची पीडा नाहीशी करून त्याची इच्छा पूर्ण करणारे करूणेचे महासागर आहात. तुम्हीच शरणागताचे रक्षण करणारे आहात. अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।5।।

श्रीगुरूंच्या चरणयुगुलाचे नित्य स्मरण करणाऱ्या भागीरथ्यादी अनंत पुण्यदायक तीर्थांची व क्षेत्रांची यात्रा केल्याचे फल प्राप्त होते. सहस्त्र अश्वमेध यज्ञ अथवा गाय दान केल्याचे उत्तम पुण्य विद्वजनांना लाभते अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।6।।

निगम-आगमाला अगोचर असलेले तुमचे मंगल नाम यथार्थ (हक्काने) स्तवण करणे कोणालाही शक्य नाही. माझ्या ह्दयकमलामध्ये तुमचे चरण धारण करून मी मनानेच तुम्हांला नमस्कार करतो. हे श्रीगुरू माझ्याकडे पहा, माझे रक्षण करा. त्या श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।7।।

जगतातील सकल भक्तांना तारण्यासाठी आणि योग्यांना दीक्षा देण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे. सेवा करणाऱ्याला सर्व पुरूषार्थ देण्यासाठी तुम्ही गाणगापूरी राहिलात. तुमची स्तुती करून भक्त सरस्वतीने सर्व दोष जिंकून टाकले श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलाला नमस्कार करतो।।8।।

याप्रमाणे श्रीगुरूंचे अष्टक स्तोत्र जो नित्य पठण करतो त्याला तेज, किर्ती, लौकिक, बल, श्री, आनंदवर्धक शरीर, पुत्र संतति अनेक प्रकारची शुभ संपत्ती, दीर्घायुष्य व दृढ आरोग्य लाभते. अशा श्रीनृसिंहसरस्वती व श्रीपादवल्लभ पदयुगलला नमस्कार करतो।।9।।

हे स्तोत्र नरसोबावाडी येथे नित्य म्हटले जाते. सायंदेवाला काशीयात्रा घडल्यानंतर प्रखर भक्तीभाव प्रगट होऊन श्रीगुरूंची स्तुती सायंदेवच्या मुखातून आली असल्याने ह्या स्तोत्राला विशेष महत्व प्राप्त झाले. या स्तोत्राचा जो अर्थ दिला आहे त्यावरून दिसून येते की, परमेश्वराने वर्णन कसे केले जाते? त्याने भक्तिभाव कसा प्राप्त होतो? हे जेव्हा भक्ताच्या मुखातून त्या भक्तिभावाने प्रगट होते तेव्हा परमेश्वर संतुष्ट होतो. भक्ताची भावभक्ती परमेश्वराला संतुष्ट करणारी हवी. त्यातूनच त्याला आशिर्वाद प्राप्त होतात. म्हणून हे स्तोत्र भाऊ महाराजांनी भक्तांना शिकवले आणि ते वाशिंद मठात गुरूवारी दत्त पादुका पालखी सुरू होण्याआधी म्हणण्याची प्रथा पाडली. ह्याचा अर्थ भक्ताने भावभक्तीने तो वेळ दत्त महाराजांच्या सान्निध्यात घालवावा. त्यांचे आशिर्वाद, कृपा प्राप्त करून घ्यावी.