
आपल्या भारतात श्री गणपतीची उपासना वेदकालापासून चालू आहे. पूर्वी भारतात अनेक गणराज्ये होती. त्या गणराज्याच्या अधिपततीला गणपती असे संबोधले जात असे. प्रामुख्याने आर्य कालखंडा नंतरच गणपतीची शास्त्रोक्त पूजा पूर्ण भारतवर्षात सुरू झाली. आर्य हे निसर्ग देवतांचे पूजन करीत असत. त्या काळात भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात होती. हडप्पा, मोहेंजदोडो हे त्या काळातील भारतातील उचतम नागरी व्यवस्था असलेलं शहर, हे त्याचंच चिन्ह आहे. भारतातील अनार्य आणि बाहेरून आलेले आर्य यात युद्ध झाली. आर्यांचा विजय झाला. काही कारणास्तव दोन्ही संस्कृतीचे मिलन झाले व एक नविन संस्कृती उदयास आली. ज्याला आपण आज वैदिक सनातन धर्म असे संबोधतो. निसर्ग देवता मानणाऱ्या आर्यानी आपल्या भारतीय देवतांना आपल्या आचारधर्मात मनाचे स्थान दिले.
मानवाच्या काळासाठी या भारतवर्षातील अनेक ऋषी मुनींनी आपले आयुष्य खर्ची घातले. ज्ञानपूर्ण धर्माची घडी नीट बसवण्याकरिता तसेच स्वयं उत्कर्षासाठी काही मंत्रांची, ऋचांची, स्तोत्रांची, ग्रंथांची रचना केली. याच काळात गणक ऋषी यांनी गणेशाचे खरे रूप जाणले. ब्रम्हादी स्थावरांत देवगणांचा स्वामी असलेल्या गणेशाचे स्वरूप आपल्या मंत्र सूत्रात बांधले. हे मंत्रसुत्र श्री गणपती स्तुतीपर असून ते उच्चार शास्त्राच्या बैठकीवर रचले गेले आहे. निचृदगायत्री हा या मंत्राचा छंद आहे. गणपति ही मंत्र देवता आहे. या गणपति स्तवनमंत्राला अथर्वशीर्ष असे म्हणतात. या शब्दातील शिर्ष हा शब्द मेंदुशी संबंधित आहे. या मंत्राच्या पठणाने आपल्या मेंदुतिल बरीचशी केंद्र जागृत होतात व स्मरणशक्तित वाढ होते असा गूढार्थ यात लपलेला आहे. शरीर विज्ञानाचे अचूक ज्ञान तत्कालीन ऋषि मुनिना असल्याने, आपल्या शरीरात विविध ठिकाणी असलेल्या नाड्या, चक्र यांच्याशी संबधित असलेल्या देवतेचि उपासना मंत्रसिद्धिने होते. याचि जाणीव झाल्याने त्यानी उच्चार शास्त्रानुसार काही मंत्राची रचना केली. विशिष्ट पद्धतीने यांचे पठण किंवा आवर्तने केल्यामुळे शरीरातील काही चक्रे जागृत होतात व आध्यात्मिक तसेच बौद्धिक विकास होतो असा अनुभव आहे. सर्व देवदेवता आपल्याच शरीरात आहेत. खरा गणपती सुद्धा आपल्याच शरीरात आहे.। त्वं मूलाधार स्थितोsसी नित्यंम। अस म्हणताना तू मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित आहेस अस गणक ऋषिना सूचवायचे आहे. आध्यात्मिक साधनेची सुरवात मूलाधार चक्रापासून होते म्हणजेच गणपति पासून होते. म्हणूनच सर्व पूजाअर्चा, मंगल कार्यारंभी गणेशाचे पूजन केले जाते. तो विघ्नहर्ता, मंगलमूर्ति असा असल्यामुळे, सर्व कार्ये निर्विघ्न पार पाडावि व इष्टफलाची सिद्धि व्हावी या इछेने सर्वत्र गणेशाचे पूजन केले जाते.
महाराष्ट्राच लाडक दैवत म्हणजे गणपति. महाराष्ट्रात आसलेले अष्टविनायक व इतर गणेश स्थानांमुळे सर्वत्र गणेश भक्ति पुर्वापार चालत आली आहे. लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या गणेशोत्सवामुळे या भक्तिला सोन्याची मोहर लागली. दगदुशेठ हलवाईच्या गणपति समोर पहिल्या दिवशी हजारो गणेशभक्त अथर्वशीर्ष आवर्तने करातात. कित्येक वर्ष हा प्रघात चालू आहे. याच अथर्वशीर्षामुळे तो गणपति नवसाला पावतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. १९८५ साली भाऊंनी सद्गुरु भालचंद्र महाराज सेवा संघाची स्थापना केली. मंत्र साधनेच द्वार सर्वांसाठी खुल केलं. प्रथमच मंबईत चिंचपोकळी द.वि. गणेशोत्सव मंडळात विनामूल्य अथर्वशीष प्रशिक्षण व पठणाची पद्धत सुरू केली, जी आजतागायत चालू आहे. आतापर्यंत हजारो भक्तांनि याचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षण देऊन भाऊ थांबले नाहीत. दर संकष्टीला आपल्या कुटुंबियांसोबत राहत्या घरीच अभिषेक कसा करायचा हे सुद्धा शिकवलं. त्यासाठी आवश्यक नियमांचं पालन करणे हा एकच नियम असे. सर्व वर्गांसाठी हे प्रशिक्षण खुले होते.
मंत्राची अनुभूती – चंद्रग्रहण काळात मंत्र साधना करावी. जेणेकरून कमीजास्त झालेल्या चंद्रबळाचा आपल्या मानवी शरीरावर होणारा नकारात्मक परिणाम टाळला जातो व आध्यात्मिक शक्ती वाढण्यास मदत होते. असा साधारण साधनेच्या तत्वज्ञानाचा परिपाक किंवा सिद्धांत आहे. चंद्रबळ (गुरुत्वाकर्षण) पाण्यावर परिणाम करत म्हणूनच समुद्राला भरती, ओहोटी येते. मानवी शरीरात सरासरी ७०% पाणी असत. याच कारणाने चंद्रबळाचा आपल्या मनःस्थितीवर त्या त्या काळानुसार परिणाम होत असतो. बरेच लोक अमावास्येला, पौर्णिमेला विक्षिप्त वागतात. चंद्रबळ अति कमी किंवा अति जास्त असल्याचा परिणाम असतो. म्हणूनच चंद्रग्रहण काळात साधनेत रहावं.
चंद्रग्रहण काळात याच कारणासाठी भाऊ आपल्या शिष्याना एखाद्या ठिकाणी घेऊन जात असत. जिथे पाणी जवळ असेल. एकदा भाऊ काही शिष्याना घेऊन अलिबागला गेले. चंद्रग्रहणापूर्वी वेद लागायच्या आगोदर भाऊंनी सर्व मुलांना सवयीप्रमाणे भरपेट खाऊ घातलं. मुंबईहुन निघाल्यापासून ते सर्वाना खूप खायला देत होते. भाऊं बरोबर राहिलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आहे . त्यांच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकाला ते नेहमी खूप ,चांगलं पण स्वच्छ खायला देत .अगदी पोट फूटेपर्यंत. असो. वेद संपल्यावर ग्रहण काळात भाऊ सर्वाना समुद्रात घेऊन गेले व कंबरेच्यावर पाणी येईल इतक्या पाण्यात बसून अथर्वशीर्ष करण्यास सांगितले .सर्वानी शब्द प्रमाण मानून पाण्यात बसून अंदाजे चार तास अथर्वशीर्ष पठण केलं. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला भाऊंनी एकच प्रश्न विचारला की “शौचाला झालं का ? आणि किती झालं? प्रश्न विचित्र होता. सगळेच बाऊन्स झाले. प्रत्येकाने मग उत्तर दिलं, “झालं पण फारच थोड” झालं. सगळ्यांचं उत्तर हेच होत आणि तेच भाऊना अपेक्षित होत. मग भाऊंनी त्यामागचं कारण सांगितलं. चार तास पाण्यात अथर्वशीर्ष केल्याने तुमचा जठराग्नी इतका वाढला की त्यामुळे सर्वच पचन झालं जणू काही जाळूनच टाकलं. पुढे ते अस म्हणाले. “ज्ञानेश्वरांनी आपला जठराग्नी इतका वाढवला होता की त्यावर मुक्ताईनी भाकऱ्या भाजल्या होत्या. हा काही चमत्कार नाही आहे. मंत्राने शरीरात निर्माण होणाऱ्या उष्णतेचा परिणाम आहे “. मंत्राने शरीरावर काय परिणाम होतो हे भाऊंनी अनुभवावरून दाखवून दिल. विज्ञाननिष्ठ पटवून दिल.










