श्रीटेंबे स्वामींनि आपल्या श्रीनरसिंहसरस्वती स्तोत्रात, अमरख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोस्ति योगिनी: । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्, मेऽस्ति परावरा गति:॥’असा या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. १३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता. तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमाजवळ आलेल्या भागात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली व मनोहर पादुकांची स्थापना केली.

श्रीगुरूंचे जेंव्हा नृसिंहवाडी येथे आगमन झाले तेंव्हा तो घनदाट वृक्षांनी व्याप्त झालेला प्रदेश होता. जवळच भगवती पुण्यपावन गंगा कृष्णामाता आपल्या पुण्यपावन जलाने दु:खितांचे ताप हरण करीत संथपणे वाहात होती. तेथे एका रम्य औदुंबर वृक्षाच्या खाली एका प्रस्तरावर श्री स्वामी महाराज ध्यान धारणा करीत होते. दोनप्रहरचे वेळी पैलतीरावर असलेल्या अमरापूर या ठिकाणी भिक्षेस जात असत व परत त्या ठिकाणी येऊन ध्यानयोग साधत असत. असे काही दिवस गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या अलास गावच्या श्रीपादभट जेरे हे वृद्ध गृहस्थ जवळ असलेल्या शिरोळ ग्रामी जोशीपणाची वृत्ती करीत असत. ते मार्गस्थ असता श्री स्वामी महाराजांना वंदन करून पुढे जात असत. असे काही दिवस गेल्यानंतर त्या ब्राह्मणाचा भाग्योदय झाला व त्याचेकडून भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपी श्री दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांची स्थापना केली व या वृद्ध ब्राह्मणास तेथे अर्चक म्हणून ठेवले. श्री स्वामीमहाराजांनी पुढील कार्यासाठी गमन करतेवेळी या ब्राह्मणास आशीर्वाद दिला की या औदुंबर वृक्षास जेवढी फुले, फळे आहेत. तेवढा तुझा वंशवृक्ष वाढेल. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दु:खे निवारण करण्यासाठी आहेत. काही दिवस श्रीपादभट आलासहून दररोज त्या ठिकाणी येऊन अर्चना करीत असत. काही काळानंतर तेथे हळुहळू वस्ती झाली व श्री नृसिंह सरस्वती तेथे तपश्चर्या करीत असल्याने त्या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नाव प्राप्त झाले. तेथे श्रीपादभटाचे पुत्राने वंशोवंशी राहून श्री महाराजांची अर्चना केली. अशा या ठिकाणी सिद्धगुरु, सिद्ध साधूयोगी यांनी एकांत स्थळ पाहून तपश्चर्या केली. त्यामध्ये परमपावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपाळस्वामी महाराज, श्री मौनीस्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले. काही काळानंतर या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले.

भाऊ महाराजानी दत्त प्रसाराचे कार्य हाती घेतल्यावर आपल्या शिष्याना प्रथम गाणगापूर भूमीची भेट घडविली व नंतर नृसिंहवाडीची. या दत्ताच्या राजधानीत आपल्या शिष्याना राजयोगाची ओळख भाऊंनी करवून दिली. गाणगापूर हे खडतर तपश्चर्याचे स्थान आहे, तर वाडी हे राजयोगाच स्थान आहे. जणू महाराजांनीच आपल्या भक्तांसाठी अशी व्यवस्था केली असावी. आपल्या भक्तांचा योगक्षेम महाराज चालवतात. प्रपंच करणाऱ्या भक्ताला सांसारिक यातना होऊ नये. त्यावर अखंड लक्ष्मीची कृपा राहावी, या साठी ६४ योगिनींचे स्थान निर्माण केले गेले आहे. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला आपण सहाय्यभूत व्हावें असा निर्देश या योगिनींना महाराजानी दिला आहे. याच कारणाने महाराजांची भक्ती करणाऱ्यावर योगिनींची अखंड कृपा लाभते. सांसारिक अडचणीत सापडून परमार्थापासुन दूर होऊ नये या साठी भाऊनी आपल्या शिष्याना या दत्तभुमीच्या सेवेत रुजू केले.
आनंदाचा कंद – मे महिन्यात होणारा वाडिचा कार्यक्रम म्हणजे एका वेगळ्या जगाची सफर करून आणनारा प्रवास. सुट्टीचे दिवस भक्तिरूपी आनंदात देवाच्या कृपाछत्रात घालवावे असा भाऊंचा उद्देश्य होता. त्या नुसार या कार्यकर्माची आखणि केली गेली आहे. सकाळी काकड आरतीचा सोहळा पहावा. नदीवर मनसोक्त पोहण्याचा आनंद घ्यावा. मठात येउन पारायण करावे. दिवसाचे वाचन पूर्ण करुन दुपारच्या सुग्रास भोजनाचा आनंद घ्यावा. सातही दिवस भोजनामध्ये विविध पक्वान्नांची रेलचेल असते. पोटभर बासुंदी, पोटभर श्रीखंड पूरी, गुलाबजामुन असे रोज नवनवीन मिष्ठान्न असतात. थोड़ी वामकुक्षी घेऊन मंदिरात प्रदक्षिणा मारण्यासाठी जावे. या काळात पवमान सुक्ताचा पाठ चालू असतो. थोड्या वेळाने भजनाच्या तयारीला लागवे. रोज सायंकाळी दोन तास दक्षिण द्वार येथे भजन सेवा असते. भजनातून भक्तिरसाचा आनंद घ्यावा. भजन संपल्यावर थोड़े पाय मोकळे करुन पालखीच्या सोहळ्याला हजर राहावे. देवभूमिचा तो सोहळा याचि नयनी पाहुन हृदयी साठवून घ्यावा. मठात परत आल्यावर फराळाचा आस्वाद घेऊन निद्राधीन व्हावे. असे करत करत सात दिवस कधी निघुन जातात ते कळत नाही. घराचे पूर्णतः विस्मरण झाल्याची जाणीव होते. मन एका वेगळ्या धूंदित रंगून गेलेले असते. निघताना पाय जड़ होतात. भाऊंनी आपल्या शिष्याना या कार्यक्रमातून आनंदाचा कंद जणू हाती दिला आहे, जो कधीही कमी होणार नाही उत्तरोत्तर वाढतच जाईल.