
भारतीय कालगणनेनुसार वर्षभरात बारा शिवरात्री येतात. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी या दिवशी येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटले जाते. महाशिवरात्री हा उत्सव इंग्रजी महिन्यानुसार बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. शिवापुरणानुसार या दिवशी शिव पार्वतीचे मिलन झाले. शिव व शक्ति ही दोन्ही तत्व एकरूप झाली, अस मानल जात. महादेव यांना आदीगुरु ,आदीशिव असेही म्हटले जाते. महादेव हे प्रलयकर्ता म्हणजेच सर्व विनाश करणारे अस म्हटलं तरी विनाशानंतर नव्या सृष्टीची निर्मिती होते. ब्रम्हदेवाची उत्पत्ती महाविष्णू यांच्या नाभीतून झाली व महाविष्णू हे महादेवातून प्रकट झाले अस पुराण सांगते. म्हणजेच सर्वांचे निर्माणकर्ता आदीशिवच आहेत असा निष्कर्ष निघतो. नव्या सृष्टिला जन्माला घालण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टी निकालात निघायला हव्या, असा एक अलिखित नियम आहे. आपण एक उदा. पाहू. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर ऑक्सिजन हा नंतर निर्माण झाला. त्यापूर्वी निळ्या रंगाची वनस्पती होती. त्या वनराई साठी ऑक्सिजन हा विषारी होता. परंतु ऑक्सिजन शिवाय जीवन फुलणार नव्हते. त्या काळात पृथ्वीवर जीवन सुरु झाले नव्हते. काही कारणाने या निळ्या वनस्पतींचा नामशेष झाला व ऑक्सिजन पृथ्वीवर निर्माण झाला. अस काय घडलं की ती निळाई संपली. पुराणकथानुसार समुद्र मंथनातून हलाहल निघाले. हे हलाहल जे महादेवांनी प्राशन केलें. म्हणून सृष्टि वाचली. नंतर जीवन समृद्ध होईल अशा गोष्टी मंथनातून निघाल्या. ही जी निळी वनस्पति होती ती महादेवांनीच नामशेष केली नसेल कशावरून? यालाच कथाकारानी हलाहल म्हटले नसेल कशावरून? ज्या दिवशी समुद्र मंथन झाले तो महाशिवरात्रीचा दिवस होता असे मानले जाते. पौराणिक कथा या अपभ्रंश झालेल्या आहेत. नीट तपासून पाहिल्यास त्यातून नक्किच काही सत्य सापडू शकते.
आपल्या पूर्वजानी काही विशेष दिवसांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. काही विशिष्ट दिवशी तारांगणात ग्रह ताऱ्यांची स्थिती सुद्धा वैशिष्टयपूर्ण असते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने जर समुद्राला भरती ओहोटी येते, सूर्या वर होणाऱ्या वादळामुळे पृथीवी वर अनिष्ठ घटना घडू शकतात, तर या ग्रहस्थितीमुळे मानवी जीवनावर नक्कीच फरक पडत असणार. अशा विशिष्ट दिवशी या पारलौकिक शक्तीचा मानवाला फायदा होण्यासाठी पूर्वसूरींनी काही व्रत, वैकल्ये, अनुष्ठान सांगितली आहेत. महाशिवरात्री दिवशी पूर्ण दिवस उपवास करून साधना करणे हा त्यातीलच भाग आहे. साधनेच्या अनुषंगाने वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात खेचून घेणे व आपली आत्मशक्ती वाढवणे हे ईप्सित आहे.

श्री गुरुचरित्रात महाशिवरात्रिसंबंधी शिवपुराणातील कथा दिलेली आहे. एकदा गौतम ऋषी महाशिवरात्री निमित्त गोकर्ण महाबळेश्वर येथे गेले असता त्यांच्या समोर एका वयोवृद्ध चांडाळींनीने देह ठेवला. तत्क्षणी तेथे शिवदूत अवरले. ऋषींनी शिवदूताना येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उत्तर दिले. आम्ही या चांडाळणीला शिवलोकात न्यायला आलो आहोत. गौतम ऋषी स्तंभित झाले व त्यांनी याचे कारण विचारले. शिवदूतानी तिची पूर्ण कथा सांगितली. त्यांनी तिच्या एका जन्मी केलेल्या सर्व पापांचा पाढा वाचून दाखविला. केलेल्या पापांमुळे तिला पुढील जन्म चांडाळणीचा मिळाला. विद्रूप असलेल्या शरीराला अनेक व्याधींनी ग्रासले होते. भिक्षा मागून पोट भरण्यात आयुष्य गेले. देह ठेवण्यापूर्वी महाशिवरात्रीला काहि तरी खायला मिळेल या उद्देशाने ती या स्थानी आली होती. पण उपवास असल्याने कोणी तिला काही खायला दिले नाही . भुकेने प्राण कंठाशी आले होते. एका भक्ताने बिल्वपत्र तिच्या हाती ठेवलें. हुंगुन पाहिल्यावर ही खाण्याची गोष्ट नाही, म्हणून तिने ते टाकून दिले.अघटीतपणे ती बिल्वपत्रे शिवलिंगावर पडली. आणि तिने प्राण सोडला. नकळतच उपवास घडल्याने व बेलाची पाने शिवलिंगावर पडल्यावर आयुष्य संपल्याने, तिला अलभ्य लाभ झाला. या एवढ्याशा पुण्यावर शिवदूत तिला शिवलोकी न्यायला आले होते. कधी कधी छोटाश्या चुकीची आपल्याला खूप मोठी शिक्षा भोगावी लागते. तसच छोटाश्या पुण्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो हेच या कथेच मर्म आहे.

महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी सद्गुरू शिवस्वरूपात असतात. त्यांच्यात शिवतत्त्व नांदत असते. काही काळासाठी सद्गुरुं मध्ये शिवकळा येत असते. या समयी शिष्यानि गुरूंचे शिव स्वरूपात पूजन करावयाचे असते. गुरू म्हणजे पापाचे दहन करणाऱ्या महाविष्णूचे रूप असलेला परमसिद्ध. अस गुरुचरित्र सांगते. गुरू हे तत्व आहे जे आदीगुरु आदिशिव यांच्या कडून आलेले आहे. या दिवशी सद्गुरू भाऊ महाराजांचे महाशिवरात्री दिवशी पहाटे शिवस्वरूप मानून पूजन केले जाते. या कालावधीत भाऊ ध्यानात बसायचे व सर्व शिष्य त्याच्या मस्तकावर बिल्वपत्र वाहून , कपाळाला भस्म लावून पूजन करत असत. भाऊ महाराजांच्या पश्चात, आता त्यांचे उत्तराधिकारी सद्गुरु काकाश्री यांचे पूजन केले जाते. त्याच वेळेला भाऊं महाराजांच्या समाधि वरही रुद्राभिषेक व पूजन केले जाते. या दिवशी शिव लीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय पठण केला जातो. सर्व भविकांसाठी सामुदायिक रुद्राभिषेक आयोजित केला जातो. हा सर्व कार्यक्रम वाशिंद मठात पार पडतो.