गाणगापुरात कार्तिक पौर्णिमेचा उत्सव फार मोठ्या थाटामटात साजरा केला जातो. हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. या दोनही दिवशी श्रींची पालखी निर्गुण मठातुन संगमावर जाते व रात्री पुन्हा मठात येते. वर्षातुन हे दोन दिवस देव मंदिराच्या बाहेर पडतो. त्यामुळे या उत्सवाला फारच महत्व आहे. या दिवसासाठी अक्खा गाव महीनाभर तयारी करतो. दीपावलीचे दिवस संपल्यावर कार्तिक पौर्णिमेचे वेध लागतात. मंदिराकडून संगमावर जायला नदी किनाऱ्यावरुन जायला जुनी पायवाट आहे. श्री नृसिंहसरसवती (श्री गुरु) याच वाटेने संगमावर जात असत. या करणास्तव या पायवाटेला फार महत्व आहे. अष्टतीर्थ करणारे याच वाटेने जातात. पूर्वी पासून या वाटेवर अनेक मठ आहेत. सर्व मठासमोर पालखी क्षणभर तरी थांबते.
देव आपल्या दारी येणार या विचाराने प्रतेक मठातील, घरातील भाविक उत्साहित असतात. दारासमोरिल जागा स्वच्छ करुन सारावली जाते. देवासाठी मोठा मंडप घातला जातो. रांगोळ्या काढल्या जातात. पणत्या व फुलांची आरास करुन सर्व परिसर सुशोभित केला जातो. वातावरण एका अनामिक आनंदाने धुंद झालेलं असत. गावातील लोक सुंदर सुंदर कपड़े घालून देवाच्या आगमनाची चातका सारखी वाट पहात असतात. सुवासिनी ताम्हणात निरंजन घेऊन ओवाळ्ण्यासाठी आतुर झालेल्या असतात. सहस्त्र दिव्यानि सर्व उजळून गेलेले भासते. सर्व चित्र फार विलोभनिय असत. देवाची पालखी येण्यापुर्वी तुतारीचा आवाज येतो. आवाज ऐकल्यावर एकच धांदल उडते. देवाला डोळे भरून पहावं म्हणून प्रत्त्येक जण आसुसलेल्या नजरेने देवाच्या मूर्तीला मनात साठवून ठेवण्यासाठी धडपडत असतो. दत्तनामाने आसमंत दणाणून गेलेला असतो. जोडीला वाजंत्री, तूताऱ्यांचे सूर फेर धरून झिम्मा खेळत असतात. भाविकांचा लोंढा एवढा जबरदस्त असतो की बाजूने वाहणाऱ्या भीमेलाही हेवा वाटावा. पालखी वाहणाऱ्यांच्या पायावर पाणी घालण्यासाठी काहींची झुंबड उडालेली असतें. गुलाल बुक्क्याने नटलेला पवन मस्त धुंद झालेला असतो. श्रींच्या मुखावरील तेज भक्तांच्या भेटीला आतुर झालेल्या, आईच्या वात्सल्याने ओसंडून वाहाताना दिसत असते. जणू सर्व विश्वाची काळीज विसरून देव भक्तांच्या अधीन झाला आहे असं वाटावं. श्रींच्या आगमनाने वातावरणात बदल होतो. जणू सर्व सृष्टि मायबापाच्या आगमनाने पुलकित झाली असावी. यक्ष किन्नर गंधर्व देवदेवता श्रींच्या पालखीवर स्वर्गातून पुष्पांचा वर्षाव करताहेत असा भास व्हावा. आनंदाचा सडा शिंपत जशी पालखी दारासमोर येते, तशीच भरभर पुढे निघूनही जाते. देवाला डोळे भरून अजून पहायला हवं होतं. या विचाराने सर्वांचं मन क्षणिक खट्टू होत. परंतु पुन्हा पालखी येणार या विचाराने प्रत्येक जण पुढच्या तयारीला लागतो. असा हा मनाच्या गाभाऱ्यात स्वत्व विसरायला लावणारा सोहळा.
न वर्तंते प्रभुधीय: । परतंत्रास्तथाsपि ही। भक्तीप्रीयो भक्तीगम्यो ।भकताधिनत्वमेत्यज:।
या आनंदमयी कार्तिकी पौर्णिमेचे औचित्य साधून भाऊ महाराजांनी काही नवीन प्रथा चालू केल्या. देवाची पालखी दारावर आल्यावर श्रींच्या डोक्यावर पुष्पवृष्टी केली जाते. पालखी येण्याच्या वेळेला दरवाजाच्या समांतर भागात भिंतीला लागून सर्व कुमारिका एक सारखा पारंपारिक वेष करून हातात निरंजन घेऊन उभ्या असतात. जेणेकरून महाराजांची दृष्टी त्यांच्यावर पडावी. संस्थेतर्फे देवाला महावस्त्र अर्पण केल जात. सर्व स्त्रिया देवाला ओवाळतात. तो पर्यंत सर्व भाविकांना गरम गरम दूध दिले जाते. सायंकाळी संगमावर देवासमोर एखाद्या देवाच्या गाण्यावर बसवलेलं, नृत्य सादर केल जात. नृत्य संपल्यावर सर्व शिष्यवर्गातर्फे रासगरबा सादर केला जातो. रात्री पुन्हा पालखीच स्वागत केलं जातं. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम थोडा वेगळा असतो. या दिवशी नदीकिनारी वनभोजन करण्याचा प्रघात आहे. सर्व ब्राम्हण कुटुंब, मठातील भाविक, गावकरी नदीकिनारी मंडप घालतात. देवाला दाखवण्यासाठी ५२ भोगाचा चढावा देण्यासाठी विविध रुचकर पक्वांन बनविली जातात. देवाला प्रसाद दाखविल्यावर सर्व भाविक आपल्या मंडपात सहकुटुंब सहपरिवार मिष्टांन भोजन करतात. आजूबाजूच्या लोकांना आवर्जून प्रसाद अन्न दिल जात. संस्थेतर्फेही नदीकिनारी वनभोजन केलं जातं. त्याची तयारी पंधरा दिवस अगोदरच चालू झालेली असते. विविध चविष्ठ पक्वांन बनविली जातात. प्रत्येकजण कामाला लागलेला असतो. मठाला युध्दातळाचे स्वरूप प्राप्त झालेल वाटावं, इतकी कामाची गडबड चालू असते. वनभोजनाचा आनंद घेऊन प्रतेयकजण तृप्तीचा ढेकर देऊन संतुष्ट होतो. वनभोजन झाल्यावर सर्वजण मठात परत येतात व संध्याकाळच्या पालखीच्या तयारीला लागतात. देवाची पालखी गेल्यावर देव आपल्या दारावर वर्षभराने येणार या विचाराने प्रत्येकाच्या मनात उदासीनता येऊ लागते.
पालखित स्वारी नेम गुरुवारी । आनंद दरबारी वर्णवेना।