साडेतीन मुहूर्तपैकी सर्वात पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. चैत्राची चाहूल आणि मराठी नववर्षाची सुरवात. नवीन संकल्पना, नवीन कार्य सुरू करण्यासाठी प्रेरणा घेऊन येणारा मराठमोळा सण. दत्त महाराजांच्या दृष्टांतानंतर, दर गुरुवारी भालचंद्र महाराज मंदिरात भाऊंनी आरती करण्यास सुरुवात केली. सामूदायिक संत चरित्र पठण होऊ लागलं. अनेक धार्मिक कार्यक्रम होऊ लागले. आपणही एक संस्था स्थापन करावी असा एक विचार भाऊनी बोलून दाखवला. तो अमलात आणला गेला. आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ती ‘सदगुरु भालचंद्र महाराज सेवा संघा’ची गुढी उभारली गेली. प्रथम संस्था उदयास आली. ह्या संस्थेचे अध्यक्ष अर्थातच भाऊ महाराज, आणि चिटणीसपदी काकाश्री (श्री. विजय चव्हाण) हे होते. मुंबई विभागातील सर्व धार्मिक कार्यक्रम सदर संस्थेतर्फे केले जातात. ह्यांनतर निर्माण झालेल्या सर्व संस्थाचा गुढीपाडवा हा वर्धापनदिन म्हणून ठरवण्यात आला. सदर दिनी दरवर्षी सर्व शिष्यपरिवार श्री गुरुगीता ह्या मंत्राचे सामुदायिक पठण करतात. सर्व मठाच्या ठिकाणी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो.