गोपाळकाला

भगवान श्री कृष्ण हे भाऊ महाराजांचे आराध्य दैवत. कठीण दत्त भक्ती सुगम, सुलभ व्हावी यासाठी भाऊंनी त्याला कृष्ण भक्तीची जोड दिली. श्रीकृष्णाला देवाचा पुरणावतार मानलं गेलं आहे. श्रीकृष्णाने ज्या ज्या लीला केल्या त्या मानवाला आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. साधनेत प्रगती करावयाची असल्यास कृष्ण कळायला हवा. कृष्ण कळण्यासाठी त्याच्या वर निस्सीम प्रेम करता आलं पाहिजे. त्याच्या लीलांमध्ये रंगून जाता आलं पाहिजे. कृष्णाप्रति राधे सारखी भक्ती निर्माण करता आली पाहिजे. साधनेचा हा पाया भक्कम होण्यासाठी भाऊंनी वाशिंद च्या मठात गोपाळकाला सुरू केला. आपल्या लहान मुलांचा ज्या वर प्रथम अधिकार आहे ते दही, दूध, लोणी ब्रिजवासी कंसाला पाठवत असत ते मान्य नसल्याने श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याना घेऊन ते पळवीत असे व सर्व मुलांना वाटत असे. तसेच गुर राखायला जाताना प्रत्येक जण आपली शिदोरी आणत असत .सर्व शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून सर्वानी मिळून खाल्ला जात असे. आपण परमेश्वराची एकसारखी लेकरं आहोत हीच शिकवण कृष्णाने आपल्या कृतीतून दिली. त्या लाडक्या देवाची आठवण म्हणून भाऊंनी जन्माष्टमी व गोपाळकाला सुरु केला.