मुलाधार स्थितोसी नित्यम ।
गणपतीचे शरीरातील स्थान. ह्याची जागृती म्हणजेच साधनेची सुरवात. जीवापासून शिवापर्यंत (मूलाधार चक्र ते सहस्त्रार चक्र) पोहचण्यासाठी खऱ्या अर्थाने सुरू झालेला प्रवास. ह्याचाच एक भाग म्हणून, भाऊंनी आपल्या शिष्याना अथर्वशीर्ष हे गणपतीचे मंत्र शिकवून, गणपती आराधना करण्यास शिकवले. वाशिंद मठात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वप्रथम गणेशोत्सव भाऊंच्या रूम मध्ये साजरा केला जायचा. कारण त्यावेळी मठाचे बांधकाम झाले न्हवते. आत्ता हा उत्सव दत्तमंदिरात केला जातो. यानिमित्त करण्यात आलेली सजावट पूर्णतः नैसर्गिकच असते. उदा. ही सजावट झाडे, फुले, फळे, माती, नारळाच्या जावळ्या, केळीचे खांब अश्या विविध नैसर्गिक वस्तू वापरून केली जाते. सर्वजण मठात जमा होतात.
अथर्वशिर्षच्या आवर्तनाने गणेशाची स्थापना केली जाते. मोदकाचा तसेच इतर विविध पदार्थ बनवून नैवेद्य दाखवला जातो. दुपारी स्त्रीवर्ग झिम्मा फुगडीचा पारंपरिक खेळ खेळतात. हरी भजनाने रात्र जागवली जाते. आणि दीड दिवसाने वाजत गाजत ह्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. असा हा साधा सोपा वाटणारा पण खूप आनंद देणारा गणेशोत्सव वाशिंद मठात दरवर्षी साजरा होतो.