दत्तजन्म सोहळा सर्व दत्त संप्रदायासाठी महापर्वणीच असते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा पूर्ण भारतभर दत्तजन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दत्त महाराजांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला असे मानले जाते. पौर्णिमा बऱ्याच अंशी दुपक असल्याने ज्या दिवशी रोहिणी नक्षत्र असते त्या दिवशी गाणगापूर तसेच अनेक दत्त क्षेत्री दत्तजन्म साजरा केला जातो.

दत्तजन्म रहस्य – दत्त संप्रदाय हा फार जुना असला तरी फारसा प्रसिद्धीस पावलेला दिसून येत नाही. अत्री अनसूया पुत्र दत्तात्रेय यांची जन्मकथा प्रचलित आहे. ब्राम्हणपुराणात, दत्तपुराणात दत्तजन्माच्या अनेक कथा प्रचलित आहेत. लौकिक अर्थाने श्रीपाद वल्लभांच्या जन्मा नंतर खऱ्या अर्थाने दत्त संप्रदाय प्रसिद्धीस पावला. हिंदू धर्म हा खऱ्या अर्थाने वैदिक सनातन धर्म आहे. संस्कृतीच्या उच्च शिखरावर पोहचलेला सर्वात प्राचीन हाच धर्म असावा. कारण वेदांमध्ये तत्कालीन तारांगणाचे जे वर्णन केले आहे त्यावरून तो कालखंड पाच ते सात हजार वर्षे मागे जातो. या काळात वैदिक धर्मा बरोबरच त्याला विरोध करणारे इतरही काही धर्म ,पंथ त्या काळात उदायास आले होते. निसर्ग देवता मानणारे काही पंथ होते. तंत्र उपासना करणारे शाक्त पंथीय होते. यातुविद्या करणारे काही होते. भैरव आदी तामसी देवताना मानणारे काही पंथ उदयास आले होते. कोणाला कोणाचे भय राहिले नव्हते. प्रत्येक पंथिय आपल्या पंथाला सर्वश्रेष्ठ धर्म मानून इतर धर्माना कमी लेखन्यात त्यांच्या खच्चीकरणात व्यस्त झाले होते. देव दानव व मानव हे सर्वच ज्यांच्या चरणाशी येतील असे दैवत जन्माला येण ही त्या काळाची गरज होऊन बसली होती. यावर उपाय म्हणून ब्रम्हा, विष्णु, महेश या तिन्ही तत्त्वांनी एकत्र येऊन एकत्त्व दत्तस्वरूपाला आकारास आणले. यासाठी अत्री व अनुसूया या पवित्र गुरुतुल्य दाम्पत्यांची निवड करण्यात आली. अनुसूया म्हणजे साक्षात मातृत्वाच ओतप्रोत भरलेलं परिपूर्ण पवित्र रूप होती. याच मातृत्वाच रूप त्रिमूर्तींनी तिच्याकडे मागितलं आणि तिने ते त्या तीन तत्वांच एकत्रीकरण करून या सृष्टीला ललांभूत करणार दान दिल. सर्वम् दत्तमयं जगत् दत्त जन्म झाला आणि सर्व देव दानव मानव त्यांच्या चरणाशी लिन झाले. दत्त महाराजानी सर्व पंथ, धर्मावर आपला अंकुश प्रस्थापित केला. सर्व धर्मीय पंथीय दत्त महाराजाना गुरू मानू लागले.
गाणगापूर येथे दत्तजन्म सोहळा फार मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. स्वाभाविकच सर्वच दत्तक्षेत्री हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गाणगापूरला अलोट गर्दी उसळते. मुख्य मंदिर ते संगम या मध्ये ३ की.मी. च अंतर आहे. पायवाट व गाडीचा रस्ता असे दोन्ही रस्ते भक्तांनी फुलून गेलेले असतात. मंदिरात मुंगी शिरू शकणार नाही एवढी गर्दी असते. दर्शन भेट होणे महाकठीण. डिसेंबर महिना असल्याने थंडी प्रचंड असते. काही लोक रस्त्यावर तंबू ठोकून रहातात. पहाटे संगमावर जाऊन स्नान करणे व मग दर्शन घेणे, हा गाणगापूरला अलिखित नियम आहे. ब्राम्हमुहूर्ता पासूनच भाविकांचा लोंढा संगमावर जाताना दिसतो. या सर्व भाविकांना गरम गरम चहा मिळावा असे भाऊ महाराजाना वाटले. दुसरा कोणताही कार्यक्रम न करता चहा वाटपाची सेवा भाऊंनी सुरू केली. पहाटे पासून भाविकांना अविरतपणे चहा वाटप केला जातो. रस्त्यावरील गर्दी पुर्णपणे संपेपर्यंत चहा वाटप चालू असते. आदल्या दिवसापासून याची तयारी केली जाते.

वाशिंद मठात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो. दत्तजन्मा अगोदर सात दिवस श्री गुरुचरित्र पारायण आयोजित केले जाते. अनेक भाविक मठातच राहून पारायण करतात. याच काळात मठाच्या सजावटीचे काम सुरू होते. सर्व शिष्य परिवार आपल्या वेळेनुसार मठात येऊन सजावटीचे, साफसफाईचे व इतर कामे करतात. सर्व मठ सजवला जातो. गोंडे व पानांची तोरण लावली जातात . झाडाच्या पानापासून काही सजावट केली जाते. काही ठिकाणी रंगकाम केले जाते. विविध अंगांनी मठ सजवला जातो. पहाटे सुमधुर काकड आरतीने सोहळ्याला सुरवात होते. सामुदायिक गुरुगीता पठण केले जाते. त्यानंतर सामुदायिक रुद्राभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता दत्तजन्माच्या वेळी सर्व भगिनी एकत्र येऊन पाळणा म्हणतात व दत्तजन्म साजरा करतात. त्याच वेळेला एक रुद्राचं आवर्तन म्हटलं जात. जन्म झाल्यावर सर्वाना गोड मिठाई वाटली जाते. महाप्रसादाला सुरवात होते. आलेले सर्व भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. चार वाजायच्या सुमारास दत्त महाराजांची पालखी मिरवणूक गावात निघते. गावातील प्रत्येक घरासमोर पालखी थांबते. घरातील गृहिणी महाराजाना ओवाळतात. पालखी समोर सतत भजन चालू असते. नामघोषाच्या गजरात पालखी गावाभोवती फिरून पुन्हा मठात येते. पालखीची सांगता आरतीने होते. सर्व कार्यक्रम संपल्यावर महाराजांची क्षमायाचना करून सर्व भाविक आपापल्या घरी परततात.