अष्टतीर्थ यात्रा

दिवाळी ह्या सणाच्या नावानेच सगळ्याच्या मनात एक चैतन्य संचारते. कारण दिवाळी म्हणजे आनंद. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी. फराळ, फटाके, रांगोळी, नवनवीन कपडे, सजावट सगळीच मज्जा. अशी ही दिवाळी मुंबईकराच्या धावत्या जीवनात आनंदाचे कारंजे उडवणारी. जशी येते तशीच ती दोन तीन दिवसात क्षणिक आनंद देऊन संपते सुद्धा. अशी आंनदायी मुंबईची दिवाळी सोडून कोणी मुंबईकर देवस्थानाला जाईल का ? नक्कीच नाही. परंतु भाऊ महाराजानी हे करून दाखवलं. पाहिलं केलं मग सांगितलं. सद्गुरू भालचंद्र महाराज सेवा संघाची स्थापना केल्यावर प्रथम दीपावलीचे औचित्य साधून गाणगापूर यात्रेच आयोजन केलं. भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवणारे काही सहकारी जमा झाले होते. त्यांना भाऊंच्या वेगळेपणाची जाणीव झाली होती. भाऊंनी सर्वाना अष्टतीर्थ यात्रेचे महत्त्व सांगितले, पारायण कसे करणार या बद्दल सांगितले, पुण्यभूमी बद्दल माहिती दिली. मुंबईत दिवाळी नेहमीच साजरी करतो

पण हीच दिवाळी देवाच्या घरात साजरी केली तर? तिची मज्जा, तो आनंद काही औरच असेल. शिवाय काही पुण्य पदरी पडेल ते वेगळेच. भाऊंनी आपल्या शिष्याना गाणगापूर यात्रा करवुन आणली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अतीव आनंदाच्या छटा दिसत होत्या. जणू काही स्वर्गसुखाचा आनंद घेऊन आले होते. खरच ते देवभूमीतून देवाची कृपा घेऊन आले होते. आणि मग काय, प्रत्येक जण पुढच्या वर्षिच्या दिवाळीच स्वप्न पाहू लागला. आज ही दीपावलीचा कार्यक्रम असाच साजरा होतो. अनामिक स्वर्गीय आनंद जो भाऊंनी आपल्या शिष्याना दरवर्षी दिला. आजतागायत ही प्रथा चालू आहे.

भाऊ महाराज त्यांच्या शिष्य परिवाराला देवाच्या दारात दिवाळी साजरी करण्यासाठी दरवर्षी गाणगापूरला घेऊन जातात. संगम रोडवर भालचंद्र महाराज उपासना मठ, ह्या त्यांच्या मठात सर्वजण दिवाळीच्या आदल्यादिवशी जमा होतात. दरवर्षी गाणगापूरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी अष्टतीर्थ यात्रा असते. ह्या तिर्थाबाबत स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजानी आपल्या शिष्याना या दिवशी अष्टतीर्थ यात्रा करविली त्याची महती सांगितली. त्या दिवसापासून ही यात्रा सुरू झाली. गुरुचरित्रत ह्याचे महत्त्व विशद केले आहे. दत्तमहाराजांच्या नावाचे निशाण, राजदंड मुख्य मंदिरातून संगमावर निघतो. मंदिरातील सर्व ब्रम्हवृंद या राजदंड्याबरोबर असतात. दंड्याला पहिल्या तीर्थावर स्नान घालून राजदंड पुढच्या तिर्थाकडे निघतो. तिथेही स्नान घातले जाते. महाराजांच्या स्नानानंतर त्या पवित्र झालेल्या जळात भाविक स्नान करतात. आणि सोहळा सुरू होतो. षटकूल तीर्थापासून पासून सुरु झालेली ही यात्रा कलेश्वर तीर्थावर येउन संपते. एकूण आठ तीर्थे आहेत. त्या प्रत्येक तीर्थात स्नान करत करत आपल्याला शेवटच्या तिर्थवर पोहचायचे असते. तीर्थावर जाण्याचा रस्ता खूप चिंचोळा, पायवाटेचा काट्याकुट्याने भरलेला असतो. सर्वत्र चिखल झालेला असतो. थोड जरी दुर्लक्ष झाला तर कपाळमोक्ष झालाच समजा. परंतु अस कधी ही झालं नाही .एखादी व्यक्ती चिखलाने पडली तरी त्या व्यक्तीस तशी इजा होत नाही. कारण स्वतः दत्त महाराज आपल्या भक्तची काळजी घेत असतात. कित्येक भक्तांना हा अनुभव आलेला आहे.कोणाचंही कोणाकडे लक्ष नसत. प्रत्येक जण राजदंड्याला स्नान घालण्यासाठी धावत असतो. दगड, माती, चिखल, काटे याच कोणालाही भान नसत. जवळपास ४-५ तास ओलेत्याने हा प्रवास पूर्ण करून, कल्लेश्वर देवस्थानातील गरमागरम आल्याचा चहा घेवून सगळेजण मठात परततात. अशी ही दिवाळी सर्वप्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त, आणि दत्तचरणी सेवा रुजू करून सुरू होते.

अष्टतीर्थांची नावे
१) षटकुल तीर्थ
२) नृसिंह तीर्थ
३) भागीरथी तीर्थ
४) पापविनाशी तीर्थ
५) कोटी तीर्थ
६) रुद्रापाद तीर्थ
७) चक्रेश्वर तीर्थ
८) कलेश्वर तीर्थ

श्री गुरुदेव दत्त