
नोकरी कर्तव्य संभाळूनी बरी । शिर्डीचे भाऊ वारकरी । साई भक्तीची ज्योत अंतरी । तेवत होती प्रखर ।। बाबांचे मंदिरी झाडलोट । नित्य सेवेस करिती प्रसन्न चित्त । चरित्र पारायनाच्या सप्ताहास । चालविती नेटाने ।।

ह्या ग्रंथाचे पारायण भाऊ स्वतः शिर्डीला राहून करत असत. शिवाय असे सप्ताह स्वतः आयोजित करत असत. जेणेकरून इतरही त्याचा लाभ घेऊ शकतील. कारण देवाच्या जवळ जाण्याचा, त्याला जाणून घेण्याच सर्वात सोपा मार्ग म्हणजे संत सहवास. पण तो, फक्त ते असतानाच अनुभवास येऊ शकतो. मग त्यांच्या नंतरच्या लोकांसाठी काय? त्यांच्या साठीच ही ग्रंथ संपदा निर्माण झाली. त्या त्या काळातील भक्ताने त्या संतांच्या कृपाशीर्वादाने त्या संतांचे जीवनचरित्र लिहुन काढले. जे आजतागायत कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
साईसचरित्र हा ग्रंथ श्री. गोविंदराव दाभोळकरानी त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून लिहला आहे. सदर ग्रंथाचे लिखाण साईबाबांच्या आज्ञेनेच झाले आहे. ग्रंथामध्ये दाभोळकर स्वतः चे नाव न वापरता, ‘हेमाडपंत’ हे बाबांनी कोपरखळीने मारलेले टोपण नाव वापरताना दिसतात. ह्या ग्रंथामध्ये साई बाबांचे समग्र जीवन चरित्र रेखाटले आहे. बाबांचे शिर्डीमधील आगमन, द्वारकामाईची निर्मिती, माधुकरी मागणे, चावडी वर्णन, त्यांची अवतारसमाप्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या, त्यांच्या भक्तांवर आलेले संकट निवारण, ह्याचे खूप हृदयद्रावक वर्णन केलेले आहे. कसे बाबा क्षणोक्षणी येणाऱ्या संकटातून आपल्या भक्ताला सहीसलामत बाहेर काढतात, हे वाचल्यावर डोळ्यात अश्रू उभे राहतात. हा ग्रंथ वाचल्यावर बाबा किती हालअपेष्टा सहन करून, आपल्या भक्तांसाठी सुखाची वाट करून देतात, हे सहजतेने जाणवते. खऱ्या अर्थाने आपली भक्ती किती फोलपणाची आणि फक्त भौतिक सुखाच्या मागे धावणारी आहे हे ह्यातील उदाहरणवरून सहज लक्षात येते. सहज साईच्या भेटीची तळमळ वाढत जाते, आणि आपसूक मन साईबाबाकडे धावू लागते. जीव कासावीस होतो. मनाची घालमेल वाढते. खऱ्या भक्तीची सुरवात होते.

भाऊंना काकाश्रींची प्रथम भेट झाल्यावर, भाऊंनीही त्यांना साईसचरीत्राचे पारायण करण्यास सांगितले होते. भाऊंची आज्ञा प्रमाण मानून काकाश्रींनी सात पारायणाचे संकल्प पूर्ण केले. आणि एके दिवशी स्वतः साईबाबांनी काकांश्रीना सदेह दर्शन दिले. भाऊंनी आपल्या शिष्यनाही हे संत आशिर्वाद मिळावेत, सदैव त्यांचे भक्तीचे कवच मिळावेत, ह्या साठी विविध संतांची पारायणे करण्यास सांगितले. त्यातील साईसचरीत्र हा ग्रंथ तर कोंदण आहे. दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंती ह्या सात दिवसात ह्या ग्रंथाचे पारायण करण्याचा दंडक बनवला. ह्याच काळात शिर्डीमध्ये रामनवमीच्या उत्सवाची सुरवात होते, जी साईबाबानी स्वतः सुरू करून ठेवली आहे. सर्व शिष्यपरिवार ह्या काळात सात दिवस उपवास करून पारायणास आवर्जून बसतात. आणि साईबाबांच्या लीला पठणाने साईभक्तीत रममाण होतात. पारायण समाप्तीवेळी सर्व जण आपल्या घरातील विविध पदार्थ घेऊन येतात. ते एकत्र केले जातात. त्याचा काला केला जातो आणि प्रसाद म्हणून वाढला जातो. अशी ही एक आगळीवेगळी सेवा भाऊंनी आपल्या बाळाच्या संगोपनासाठी, बाळकडू म्ह्णून दरवर्षी त्यांच्या पदराला बांधून दिली आहे.
धन्य ती माझी साई भाऊ माऊली !