इतर पारायणे

पारायण सप्ताहा शिवाय एकदिवसीय / त्रीदिवसीय पारायणे करण्याची पद्धत आहे. किमान महिन्यामध्ये एक तरी पारायण केले पाहिजे, असा नियम भाऊंनी आपल्या सर्व शिष्याना घालून दिला होता. सकल हितार्थ सकल कामनार्थ असा संकल्प पारायण करताना सोडावा अस भाऊं सर्वाना सांगत असत. स्वतः साठी काहीही न मागता सर्वांचे कल्याण व्हावे ही जगतकल्याणाची भावना भाऊनी शिष्यांमध्ये रुजविली. सर्व काही समष्टिसाठी.  पिंपळेश्वर मंदिरापासूनच सर्व शिष्य दर गुरुवारी मंदीरात पारायणाला बसत.  कारण पारायण करणे हा सर्व साधनेचा मूळ पाया आहे, अस भाऊ सांगत. खाली काही संत पारायणे दिली आहेत, जी भाऊंनी आपल्या शिष्यांकडून करून घेतली आहेत. आणि त्यानुसार पौर्णिमा, अमावास्या, गुरुवारी, सणावारी भाऊंचे शिष्य, आजही ही एकदिवसीय पारायण आपल्या घरी करण्याचा प्रयत्न करतात.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ:॥ श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष गणेश चतुर्थीला श्री अप्पालराज शर्मा आणि महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती गुरुचरित्रात, पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्याचेच विस्तृत वर्णन सदर ग्रंथात वाचायला मिळते. पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे त्यानी आपल्या भक्तांचा उद्धार केला. याचेच रसाळ वर्णन या ग्रंथात आलेले आहे.

स्वामी सारामृत / स्वामी लिलामृत / श्री गुरुलीलामृत

आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एका लाकूडतोड्याचा लाकूड तोडताना घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते.  तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले, त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. हजारो भक्तांचे कल्याण केले. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. ते अजानुबाहू होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले.  त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. याचेच वर्णन स्वामी सारामृत, स्वामी लिलामृत आणि गुरू लिलामृत या तिन्ही ग्रंथात आले आहे.

गजानन विजय

सदर ग्रंथ सदगुरु गजानन महाराज यांचा लीलाग्रंथ असून तो श्री दासगणू यानी लिहिलेला  आहे. वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. श्री. देविदास यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. “गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. त्याच्याच विविध कथा या ग्रंथात ओवीबद्ध केलेल्या आहेत.

सप्तशती गुरूचरित्रसार

हा ग्रंथ परिव्राजकाचार्य परमहंस सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्या सिध्दहस्त लेखणीतुन लिहिला गेला आहे. हा ग्रंथ मूळ गुरुचरित्र याचेच अंशात्मक रूपांतरण आहे. मुळ गुरुचरित्रामध्ये बरेच संस्कृत मंत्र आल्यामुळे हा ग्रंथ वाचण्यास कठीण होत असे. त्याशिवाय मुळ ग्रंथ मोठा असल्याने तो सतत वाचनामध्ये ठेवणे कठीण आहे. त्यामुळे दत्तकृपेने श्री टेंब्ये स्वामी महाराजांनी सदर छोटेखानी ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथामुळे मूळ गुरुचरित्र वाचनाचे फळ प्राप्त होते. आणि मूळ गुरुचरित्र वाचनाचा तोच आनंद मनास मिळतो. सप्तशती गुरूचरित्र याची अजून एक खासियत आहे. प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. यावरूनच स्वामी महाराजांच्या अमोघ लेखन शक्तीची जाणीव होते.

साई अध्यायत्रयी

हा केवळ तीन अध्यायांचा सर्वात छोटा असा ग्रंथस्वरूप आहे. यामध्ये स्वतः साईबाबांनी व्यवहारदृष्ट्या माणसाने कसे वागले पाहिजे. परमार्थ आणि व्यवहार या दोन्ही वेगळ्या कश्या आहेत याचे निरूपण केले आहे. बऱ्याच वेळा माणूस भावनिक होऊन काही निर्णय घेतो. ज्यामुळे त्याला व्यवहारात नुकसान होते. त्यामुळे परमार्थ आणि व्यवहार यामध्ये गल्लत न करता नेमका संसार कसा असावा याचे उत्तम उदाहरण दिले आहे. या ग्रंथातील केवळ हे तीन अध्याय डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

गोमाजी महाराज चरित्र

सध्याचे वरहाड प्रांतातील  प्रसिद्ध देवस्थान  शेगाव पासून जवळच नागझरी  हे गोमाजी महाराजांचे स्थान आहे. गजानन महाराजांच्या पूर्वी काही वर्षे ही विभूति इथे अवतरली होती. श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्या कृपेने निर्माण झालेली कुंडातिल गंगा काही करणास्तव लोप पावली होती. ती गोमाजी महाराजांच्या कृपेने पुन्हा अवतरित झाली. अनेक चमत्कार या संताने या भूमित केले आहे. अनेक भक्तांचे कल्याण केले आहे. अवतार समाप्ती पूर्वी, मी आता शेगावी अवतारणार आहे असे भक्तानां सांगितले होते. गोमाजी महाराजांनी गजानन महाराजांच्या रुपात पुन्हा अवतार घेतला असे भक्त  मानतात. या ग्रंथामध्ये गोमाजी महाराजांच्या सर्व लीला संकलित केल्या आहेत.