पारायण पदधती

देवाच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग. मानवाच्या कल्याणासाठी संतांनी, प्रेषितांनी, या भूमीवर पुनः पुन्हा जन्म घेतला. कित्येक लीला केल्या, चमत्कार घडवले. लोकसंग्रहासाठी काही घटना घडवून आणल्या. ईश्वराच्या इच्छेने त्या घटना ग्रंथीत केल्या गेल्या. याच महत्वाचं कारण म्हणजे त्या संतांच्या जवळ असलेल्या भक्तांनी लिलेतून, अनुभवातून आध्यात्मिक मार्गक्रमणा केली व स्वतः चा उद्धार केला. पण ज्यांना त्यांचा सहवास नाही लाभला किंवा त्या नंतरच्या येणाऱ्या पिढीच काय? त्या भक्तांच्या मार्गदर्शनासाठी ग्रंथांची निर्मिती झाली. पारायण करण्याची पद्धत तस पाहिल्यास जुनीच. पूर्वीपासून आपल्या कडे श्रावणात ग्रंथ लावण्याची पद्धत आहे. विविध ग्रंथात असलेली माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा उपक्रम. सर्व जनता सुशिक्षीत नसल्याने एखादा वाचक ग्रंथ वाचन करीत असे. श्रोते श्रवणाचा लाभ घेत असत.          

दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथास वेदाचे स्थान आहे. या ग्रंथ वाचनाचे कडक नियम असल्याने हा ग्रंथ लोकांसमोर निवेदित केला जात नाही. ज्याला वाचवयाचे आहे त्याने कडक नियमांचं पालन करून स्वत: वाचवा असा शिरस्ता आहे. हळूहळू ही पद्धत रुजू लागली. देवाला साक्षी भावाने आवाहन करून त्याच्या लीलांचं पठण केल्यास त्याची कृपा प्राप्त होते हे अनुभवास येऊ लागले. सोबत इतरही ग्रंथाची पारायण होऊ लागली. उदा. शिवलीलामृत, रामविजय, तुलसी रामायण. ग्रंथाच्या प्रति उपलब्ध नसल्याने ही पद्धत मोठ्या प्रमाणात रुजू शकली नाही. विसाव्या शतकात छापखाने सुरू झाले व ग्रंथ उपलब्ध होऊ लागले. दत्त कृपेने कामतांकरवी शुद्ध प्रत संकलित झाली. एखाद्या ग्रंथाचे नियमानुसार केलेले पठण म्हणजे पारायण हा पठणातला व पारायणातील महत्वाचा फरक. श्रीफळाच्या रूपाने साक्षी भावाने देवाचे अधिष्ठान करून, त्याला आवाहन करून, व्रतस्थ राहून, त्याच्या लीलेचे केलेले पठण देवाला अधिक प्रिय आहे. नियमांचं पालन केल्याने मनावर नियंत्रण ठेवण्याची कला साध्य होते. मनाच्या शक्तीच केंद्रीकरण करणे हाच साधनेचा पाया आहे. मनाच्या भांड्यामध्ये सुज्ञानाचे नवनीत पडू लागल्यावर आपोआपच वाईट विचार बाहेर पडू लागतो व ईश्वर अशा मनामध्ये  वास करू लागतो. पारायण हा ज्ञान मार्ग आहे. भावसागरातून तारून नेणारा मार्ग.

भाऊ महाराज आपल्या प्रवचनातून सांगत असत की, मनुष्य हा भूक, तहान, भय, निद्रा, मैथून ह्या गोष्टी मध्ये अडकलेला असतो. ह्या गोष्टी मिळवण्यासाठी तो बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी करतो. त्यातून त्याच कर्म बिघडत जाते आणि त्याला त्रास, दुःख सहन करावे लागते. ह्यातून बाहेर पडण्यासाठी तो सतत धडपड करतो. देवाचा सरळ मार्ग त्याला खूप लांब आणि कठीण वाटू लागतो.  तो शॉर्टकट शोधू लागतो. भोंदू बाबाच्या नादी लागतो आणि अजूनच चक्रव्यूहात अडकत जातो. भाऊ महारांजानी आपल्या शिष्याना अडचणीच्या काळात तरुन जाण्यासाठी एक खुप सोपा मार्ग सांगितला आहे. दिसायला हा मार्ग खूप सोपा वाटला, तरी त्या शिष्याचा पूर्ण कस आणि त्याची देवावरती असलेली श्रद्धा ह्याची कसोटी लागते. तो मार्ग म्हणजे संत पारायण.

संत पारायण म्हणजे सोप्या शब्दात त्या सत्पुरुषचे, देवतेचे ग्रंथ स्वरूपात केलेले वाचन, मनन आणि निधीध्यासन. सर्व सतपुरुषांची त्यांच्या त्यांच्या शिष्यानी, भक्तांनी त्यांचे जीवन चरित्र ओवीस्वरूपात शब्दबद्ध करून ठेवले आहे. उदाहरण सांगायचे झाले तर, साईबाबांचे साईसतचरित्र गजानन महाराजचे गजानन विजय, स्वामी समर्थांचे स्वामी लिलालमृत आणि गुरुलीलामृत, दत्तप्रभूंचे गुरुचरित्र, देवीचे सप्तशती देवी महात्म्य इ. या ग्रंथामध्ये त्या त्या काळात त्या देवतेने किंवा त्या संताने त्यावेळेस त्याच्या भक्तांवर आलेल्या संकटाचे कसे निवारण केले. आपल्या भक्तास वाचविण्यासाठी कशी ती अदृश्य शक्ती धावून आली, ह्याचे वर्णन आले आहे. तसेच भक्ताची त्या देवतेवर असलेली श्रद्धा, त्याची भक्ती ह्याची परीक्षा कशी होते ह्याचे विवरण गोष्टीरूपात वाचायला मिळते. ते वाचताना आपल्याला आपल्या वरच्या संकटाची जाणीव होते. आपले त्या शक्तीप्रति अष्टसात्विक भाव जागृत होतात. तिचे अनन्य भावनेने सहज आवाहन होते. आणि आपले संकट निवारण करण्यासाठी तिची क्षमायाचना आपसूक केली जाते. ती दैवी शक्ती आपली प्रार्थना ऐकते. आणि आपल्या वरच संकट हळूहळू निवारणयास सुरवात होते. चमत्कार घडू लागतात. आणि हे सर्व अनुभवून डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच्या आठवणीने अंगावर काटा उभा राहतो. आयुष्यतील फोलफना लक्षात येऊ लागतो. “यदृछेविना हालत नाही, वृक्षाचे ही पान पाही”, ह्याची जाणीव होते, आणि निशब्दपणे आपण त्या दैवतासाठी आपलं तन मन धन अर्पण करू लागतो. आपल्याला त्या देवतेची ओढ लागते. आणि इथून आपला भक्तिमार्गचा प्रवास सुरू होतो. ते दैवत, ती शक्ती आपली आराध्य बनते.

भाऊ महाराजांनी  सुरवातीपासूनच आपल्या सर्व शिष्याकडून विविध संतांची पारायणे करुन घेतली. भाऊ सांगायचे” हा पाया आहे ,आणि पाया मजबूत असल्याशिवाय इमारत उभी राहु शकणार नाही”. ह्या पारायण पठणामुळे आपली सेवा भगावंताचरणी रुजू होते. संत चरित्राशी ओळख होते. खऱ्या अध्यात्माशी ओळख होण्यास मदत होते. आपल्या आचरणात, विचारात आमूलाग्र बदल झालेले जाणवू लागतात. एक संरक्षक कवच आपल्याभोवती सतत असल्याचा भास होऊ लागतो. आपल्यावरची येणारी बरीचशी संकटे, अडथळे नाहीसे होतात. साधनेची बैठक सुधारते. एकाग्रता वाढते. मनातील विचार स्थिर होतात. आणि तो शिष्य दत्तभक्तीसाठी, भगवतभक्ती साठी तयार होऊ लागतो.

दरवर्षी गाणगापूरात दिवाळीला, नृसिंहवाडीला मे महिन्याच्या कार्यक्रमात, वाशिंदला गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंतीपूर्वी श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे संपुर्ण नियमावलीत आणि सोवळ्यात पारायण सप्ताह केले जातात. त्याशिवाय रामनवमी ते हनुमान जयंती ह्या कालावधीत, साई सचरित्र ह्या साईबाबांच्या ग्रंथाचा पारायण सप्ताह केला जातो. ह्याशिवाय प्रत्येक शिष्य त्याच्या वेळेनुसार इतर संतांचेही एकदिवसीय पारायण आपापल्या घरी करत असतात.

अनुभूती…..

गाणगापूरात दीपावलीच्या दरम्यान होत असलेल्या गुरुचरित्र पारायणाचा एक विशेष अनुभव आहे. जो दरवर्षी प्रत्ययास येतो. या पारायणाला सुरवात होण्यापूर्वी  एका टोपात भस्मच्या डोंगरावरुन आणलेले भस्म बारीक करून, सपाट करून चौरंगाच्या बाजूला ठेवले जाते. त्या टोपाला वरून सफेद कापडाने सर्वसमोर बंद केले जाते. त्याची पंचोपचारने पूजा करून, पारायण सप्ताहास सुरवात होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आरती करून पारायण समाप्ती झाल्यावर सर्वसमोर तो टोप उघडला जातो. त्यावेळी त्या भस्मवर एखादे खूप मोठे किंवा खूप छोटे पाऊल, शंख, चक्र, स्वस्तिक अश्या खुणा उमटलेल्या  दिस्तात. ह्यावरून हे सिद्ध होते की दत्त महाराज आपली प्रत्यक्ष उपस्थिती दाखवतात. असे हे भस्म नंतर भक्ताना दिले जाते. हे भस्म आजारी व्यक्तीस दिल्यास त्याचा आजार कमी होण्यास मदत होते. संकटकाळामध्ये खाल्यास येणारे संकट निवारण होते, असे कित्येक अनुभव आहेत. हजारो भक्तांची संकटे दूर झाली आहेत.

 ।असतील तुज नाना संकट। उपाय येथे आहे फुकट।

|| श्री गुरुदेव दत्त ||