गुरुवारची पालखी (वाशिंद)

श्रीदत्त पालखी वाशिंद – भाग १
श्रीदत्त पालखी वाशिंद – भाग २
श्रीदत्त पालखी वाशिंद – भाग ३

सन २००१ – एकदा भाऊंना श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी दृष्टांतामध्ये सांगितले की, मला फिरायला घेऊन चल!’ भाऊंनी विचारले कुठे?’ स्वामी म्हणाले, मला वाशिंदला फिरायला घेऊन चल!’ आता देवालाच आणायच तर पालखीतूनच आणावयास हवे. या संकल्पनेतून २००२ साली मार्च महिन्यात गाणगापूर ते वाशिंद पायी पालखी परिक्रमा करण्याचं नियोजन भाऊंनी केलं. मानवनिर्मित चांदीच्या पादुका गाणगापुरातील निर्गुण पादुकांना स्पर्शित, अभिषिक्त करून २१ दिवस ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषात वाशिंद मठात पोहोचल्या. पालखी विशेषांकात याचा इतिवृत्तांत आला आहे. गाणगापूरच श्रीदत्तात्रेयांच तत्व भाऊंनी वाशिंदला आणले. जस बाळ जन्माला आल्यावर त्याची काळजी घ्यायची असते, काही सोपस्कार करायचे असतात. त्याप्रमाणे या दत्त पादुकांवर काही उपचार होणे गरजेच होत. या संकल्पातून भाऊ महाराजांनी दत्त पादुकांवर शिष्यांकरवी एक महिनाभर रूद्राभिषेक करून घेतला. नृसिंहवाडीला ‘मनोहर पादुकांवर’ विशिष्ट कालावधीत पवमान सुक्त अभिषेक केला जातो. येणा-या भक्तांचे दु:ख देव आपल्याकडे घेत असतो. हा त्रास काही मंत्रोपचाराने कमी व्हावा, या कारणाने अशा मंत्राभिषेकाची विधी करण्याची पध्दत आहे. त्यापासून एक नविन पध्दत भाऊंनी वाशिंदला चालू केली.

प्रत्येक मे महिन्यात २१ दिवस अनुक्रमे ७ दिवस अखंड नामघोष’, ७ दिवस अखंड विणावादन आणि ७ दिवस हरिभजन असा सेवेचा प्रकार सुरू केला. जो आजतागायत चालू आहे. या कार्यक्रर्माची आखणी अशी केली जाते की, प्रत्येक भाविक यात सहभागी होऊ शकतो. आपली सेवा देवाचरणी रूजू करू शकतो. सामुदायिक नामस्मरणावर भाऊंचा प्रचंड जोर होता. गाणगापूरहून श्रीदत्त पादुका वाशिंद ग्रामी पोहोचल्यावर, दर गुरूवारी श्रीदत्त पादुका पालखी सेवा भाऊनी सुरू केली. ज्याप्रमाणे गाणगापुरात, नृसिंहवाडीला सायंकाळी श्रीदत्त पालखी निघते, त्याचप्रमाणे वाशिंदला दर गुरूवारी सायंकाळी पालखीचा सोहळा पार पडतो.

अवधून चिंतन श्री गुरुदेवदत्त – शंखाचा निनाद झाल्यावर दत्त नामघोषात श्रीदत्त पादुका पालखीत ठेवल्या जातात. देवासमोर चवरी चामर ढळू लागतात. अग्निदेवता लहान बाळाच्या निर्व्याज,पवित्र निरंजन रूपात देवासमोर आळवणी सुरू करतात. विश्वातील सर्व देवदेवता, यक्ष, किन्नर स्वर्गातून महाराजांवर मंत्रपुष्पे वाहत आहेत असा भास होऊ लागतो. तदनंतर सामूदायिक. आदौ ब्रम्ह – हे गुरुचरित्रांतर्गत स्तोत्र म्हटले जाते. उत्सवमूर्तीला, पादुकांना पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा सुरू होते. चवरी, चामर, अबादागिर, दिवटी असा सर्व भक्तमेळा देवाला घेऊन पुढे निघतो. दर्शनोत्सुक वरुण देवताही कधी कधी महाराजाच्या सेवेला हजर होतो. आलेल्या भाविकांना पालखी खाली झोपण्याची व्यवस्था स्वयंसेवकाकडून केली जाते. या प्रदक्षिणा दरम्यान चारही दिशेला पालखी थांबते. प्रत्येक ठिकाणी विविध पदे, स्तोत्र, संस्कृत पद (टेंब्येस्वामी रचित करूणा त्रिपादीचा यात समावेश असतो). अशी अनेक पदे टाळ मृदंगाच्या गजरात म्हटली जातात. अनेक शिष्य आपली गायनसेवा देवासमोर सादर करतात. सुमधुर संगीताच्या विश्वात सर्व भक्त आकंठ बुडून जातात. वातावरणात अनामिक आनंदलहरी वाहू लागतात. वाशिंदच निसर्गसौंदर्य त्यात आणखीनच भर घालते. तीन प्रदक्षिणा पूर्ण करून शेवटी भैरवीने पालखी प्रदक्षिणेची सांगता होते. देवाची आरती केली जाते. सामुदायिक घोरातकष्ट, इंदुकोटी स्तोत्र म्हटले जाते. देवाला नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्यार्पण झाल्यावर दत्त पादुका पुन्हा गाभाऱ्यात ठेवल्या जातात. हा पूर्ण कार्यक्रम कडक सोवळयात पार पाडला जातो. यात एक महत्वाचा फरक असा की, पालखी वाहणारे भक्त सर्व वर्गातील असतात. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा उर स्वानंद प्रेमाने भरून येतो. कारण प्रत्येकाच्या मनात भाऊंच्या शब्दाचे पडघम वाजत असतात.. जो वाहतो विश्वाची पालखी त्याची पालखी आम्ही वाहतो

केवढं मोठ दत्तभक्तीच दान भाऊंनी आमच्या पदरी घातलं. भाऊंचे चरण लाभले नसते तर आमच्या खांद्यावर देवाच्या पालखीचा मान कोणी दिला असता? हजारो वर्षे पुण्य करूनही जे लाभणार नाही ते भाऊंनी आम्हा शिष्याना दिल. नकळतच भाऊ माऊलीच्या आठवणीने नेत्र पाझरु लागतात. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो भक्तांचे दुःख ,संकट दूर झाली आहेत. नित्य दिव्यत्वाची अनुभूती येत असते. भक्तांच्या प्रारब्धातील दुःख दूर करण्यासाठी, कल्याणासाठी भाऊ महाराजानी दत्त महाराजांचा अंश वाशिंद मठात स्थापित केला आहे.