महाआरती

भाऊंचा सामुदायिक मंत्रपठण, नामसमरणावर जास्त जोर असे. ते आपल्या प्रवचनातून हा विषय आवर्जून मांडत असत. ते सांगत, ‘बाळांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट सामुदायिक पद्धतीने केली पाहिजे. सामुदायिक पठणाने मोठ्या प्रमाणात सात्विक लहरी उत्पन्न होतात. ही स्पंदन या लहरी त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कित्येक पटीने सुपरिणाम करतात. आणि त्याचे तुम्हाला अनंत फायदे मिळतात. आपले मुस्लिम बांधव ,ख्रिश्चन बांधव आपल्या प्रार्थना स्थळात ठराविक दिवशी एकत्र जमून सामुदायिक प्रार्थना करतात.आपल्या हिंदू धर्मात अशी सोय नाही आहे. भगवंताचे गुणगान करण्यासाठी, बाकीच्या उपचारापेक्षा, आरती हा खूप सोपा आणि सहज मार्ग आहे. वारकरी संप्रदायामुळे सामूहिक भजन, कीर्तन यांची परंपरा सुरु झाली. सामान्य माणसाला नामस्मरणाची गोडी लागवी म्हणून संतांनी भजन, कीर्तन, आरती यांची निर्मिति केली. यातील आरती हा सर्वात सोपा मार्ग. आरती म्हणजेच त्या भगवंताला आर्त स्वरात घातलेली साद. जे कोणालाही सहज जमाण्यासारख आहे. कोणत्याही गोष्टी मध्ये सातत्य असेल तर ती जास्त लवकर फलद्रूप होते. भक्तीचेही तसेच आहे. त्यामुळे बाकीचे उपचार जमत नसल्यास आरती हा खूप सोपा उपाय आपल्या पूर्वजांनी शोधून काढला. आणि आजतागायत तो आपल्या जीवनात रुढ आहे.

भाऊंनी या आरतीमध्ये शिस्त आणली, काटेकोरपणा आणला. प्रथम भालचंद्र मंदिर, लालबाग येथे सामूहिक आरती सुरू केली. पुढे पिंपळेश्वर मंदिर व नंतर अभुदय नगर काळाचौकी येथे दर गुरुवारी आरतीची सुरवात केली.घडाळ्याच्या काट्यावर आरती सुरू होत असे. रागधारी आरतीची बैठक बसविली. ह्या मध्ये घोरात्कष्ट स्तोत्र, इंदुकोटी, आदौब्रम्ह, साईनाथमहिमान स्तोत्राचा आरतींमध्ये समावेश असतो. मंदिरात जागा नसेल तर एखाद्या मोठ्या सभागृहात रांगेत बसून आरती म्हणण्याची पद्धत घालून दिली. सामुदायिक नामस्मरणाच्या वेळी शक्यतो सफेद कपडे परिधान करण्यावर त्यांचा आग्रह असे. ते नेहमी म्हणत असत “आठवड्यातून एकदा तरी सर्वानी एकत्र येऊन सामुदायिक नामस्मरण करावयास हवे” हळूहळू ह्याचे स्वरूप आता मोठे झाले आहे. आजतागायत ही सेवा नियमितपणे चालू आहे. तसेच  चन्द्रेश्वर शिवमंदिर (डोंगरी) येथे दर सोमवारी सामुदायिक गुरुगीता केली जाते. याच धर्तीवर विविध ठिकाणी राहणाऱ्या शिष्यानिही त्यांच्या परिसरात अशी सामुदायिक आरती सुरू केली आहे. आज डोंबिवली, मालाड या ठिकाणी ही अशी आरती, मंत्रपठण  नियमाने केले जाते.

|| श्री गुरुदेव दत्त ||