मातृपितृ दिन

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामाङ्गी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता. त्यावेळी स्वतः श्रीहरी विठ्ठल त्याला दर्शन देण्यास आले. पण आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत पुंडलिकाने देवाला सुद्धा थांबायला सांगितले, आणि जवळच असलेली वीट त्याच्याकडे सरकवली. पुंडलिकाची माता-पित्याची सेवा करतानाची तळमळ पाहून, स्वतः विठ्ठलही त्या विटेवर आज अठावीस युगे उभा आहे.

भाऊ महाराज आपल्या बोलण्यात आपल्या शिष्यांबद्दल बोलताना नेहमी माझे सहकारी, माझी मूल, तरुण सहकारी, असा करीत असत. मुलींना ते स्वत:च्या भाच्या मानत असत. शिष्य परिवारातिल वातावरण भाऊनी एखाद्या कुटुंबासारख ठेवल होत. एकामेकांची काळजी घेणार मोठ कुटुंब. जिथे असूया, आपपर भाव नव्हता. आपल्याला आणखीही नातेवाईक आहेत हेच सर्व विसरून गेले होते. कुटुंब म्हटले की सर्वच गोष्टी आल्या. सण, उत्सव, वाढदिवस ,लग्न इ. भाऊनी आपला लग्नाचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यास सुरु केला. हाच तो मातृ पितृ दिन. या दिवशी सर्व शिष्याना भाऊंच्या तर्फे प्रीति भोजन दिल जात. या दिवशी भाऊ आणि मम्मा सर्व शिष्यांचे माता पिता या रुपात सर्वाना आशीर्वाद देतात. दरवर्षी ५ जानेवारी, हा दिवस मातृ पितृ दिन म्ह्णून  साजरा केला जातो. या दिवशी भाऊंच्या लग्नाचा वाढदिवस असतो. खऱ्या अर्थाने, आपले स्वतःचे आई वडील यांना प्रथम गुरू म्हणून संबोधले जाते. कारण ज्यावेळी आपण अजाण अवस्थेत असतो, त्यावेळी फक्त हेच आपलं बोट धरून, जगाची खरी ओळख सावधतेने करून देत असतात. निसर्ग नियमांनि आपली सर्व व्यवस्था आईच्या गर्भात आधीच करून ठेवलेली असते. जन्माला आल्यानंतर जी नाळ गर्भात आपलं पालनपोषण करत असते ती कापली जाते आणि आपला या जगात पहिल पाऊल पडते. त्यांनतर येणारे अनेकविध अनुभव घेत आपण मोठे होतो. पण त्यामागील खरी मेहनत आई वडिलांची असते. त्यांच प्रेम, त्यांची आठवण, यासाठी आयुष्याचे सर्व दिवस मोजले तरी पूर्ण होऊ शकणार नाहीत. असा हा दिवस, सुवर्ण अक्षरात कोरून ठेवण्यासारखा. ज्याची गणती बाकीच्या कुठल्याही दिवसाशी होऊ शकत नाही.

गुरू म्हणजे दुसरे आई वडीलच. जन्मदाता आई वडील आपल्याला या जगाची ओळख करून देतात. ते समज येण्याइतपत मोठं करतात. पण गुरू त्यापलीकडे असणार कर्मच पुसून टाकण्यासाठी दिवसरात्र एक करतात. कर्मबंध नाही म्हणजेच पुनर्जन्म नाही. जन्म-मरणाचे येरझारे नाहीत. आणि हीच खरी या मनुष्य जीवनाची सार्थकता.  भाऊ महाराजांच्या पश्चात आज गुरुवर्य काकाश्री हा कार्यक्रम त्याच पद्धतित साजरा करतात.