गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. सर्व भारतभर गुरुप्रीत्यर्थ साजरी केली जाते. ज्यांनी महाभारत, भागवत, पुराणे लिहिली. तसेच वेदांचे संहितीकरण केले. त्या श्रेष्ठ आचार्य व्यासांचे पूजन या दिनी करण्याची प्रथा आहे. म्हणूनच याला ‘व्यास पौर्णिमा’ म्हणतात. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ असें म्हणून त्यांना प्रथम वंदन केले जाते. व्यासांच्या रूपात महाविष्णू यांनी अवतार घेतला होता असे मानले जाते. व्यासपूजनाच्या अनुषंगाने गुरुतत्त्वाचे पूजन केले जाते. ‘नास्ति तत्वं गुरो परम’. गुरुतत्त्वा इतके श्रेष्ठ तत्व जगात दूसरे कोणतेही नाही. म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात.

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा॥ गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्। गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः।गुरुगीतेमध्ये सद्गुरूंचे यथार्थ वर्णन महादेवांनी केलेले आहे. गुरुशिवाय मानवाचे जीवन अपूर्ण आहे. शिष्याच्या अनेक जन्माच्या, पूर्णत्वाच्या प्रवासात, श्रीकृष्ण रुपात त्याच्या जीवनाचे सारथ्य करण्यासाठी वेळोवेळी सदगुरु जन्म घेत असतात.

ये हॄदयिचे ते हॄदयि घातले ।द्वैत न मोडता आपणा ऐसे केले अर्जुना। माऊली ने श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील गुरुशिष्याच्या नात्यावर लिहिलेल्या या ओवीमध्ये सद्गुरुंची कृपा विशालता दिसून येते. एक ज्योत पेटलेली आहे आणि दुसऱ्या पणतीमध्ये तेल आहे, वात आहे. परंतु ज्योत नाही आहे. गुरू आपल्या ज्योतीने त्या पणतीमधील वातीला स्पर्श करून तिचे ज्योतित रूपांतर करतात. आता ती पणतीसुद्धा प्रकाश देऊ लागते. असा गर्भितार्थ या ओवीमध्ये लपलेला आहे. शिष्याला त्या फक्त एक परीस स्पर्शाची गरज असते. परिस स्पर्शाने लोखंडाचे सोन्यात रूपांतर होते. ते चमकू लागते पण परिस मात्र तसाच निर्लिप्त खड्या समान राहतो. इथे शिष्याची कसोटी लागते. अनेक खड्यांमधून त्याला परिसाला शोधायचे असते. पण सदगुरु दयेचे सागर असतात. शिष्याला आपल्याकडे आणण्याची व्यवस्थाही तेच करतात. आई वडील आपल्याला जन्म देतात. परंतु आपला शिष्य कोणाच्या पोटी, कोणत्याही कुळात, कधी आणि कुठे जन्म घेणार हे सद्गुरु ठरवितात. खऱ्या अर्थाने तेच जन्मोजन्मीचे मायबाप असतात. डोळ्याने आपण पाहतो परंतु जगाकडे पाहण्याची व देवाला पहाण्याची दृष्टी गुरू देतात. इथे तुकाराम महाराज म्हणतात. परिसा संगे लोह बिघडले ।लोह बि, घडले सुवर्णची झाले। सद्गुरु संगें शिष्य बिघडले ।शिष्य बि, घडले सद्गुरु रूप झाले।

साई सतचरित्रात एक कथा आहे. एकदा एक म्हातारी बाई बाबांकडून अनुग्रह घेण्यासाठी अडून बसली होती. जोपर्यंत बाबा स्वतः अनुग्रह देणार नाही तोपर्यंत अन्न पाणी घेणार नाही असा पण करून बसली. बाबांनीही तिची परीक्षा घेण्याचे ठरविले . तीन दिवस तिच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हातारी पण खमकी होती. तिने ही दाद लागू दिली नाही. शेवटी श्यामाला दया आली. ते बाबांना म्हणाले. देवा इतके लोक इथे येऊन जातात सर्वांचं तू कल्याण करतोस, मग म्हातारीकडे का पहात नाहीस? मग बाबा ही विरघळले. म्हातारीला म्हणाले, आई का जीवाला का घोर लावून घेतेस. माझ्या गुरूने माझे कान नाही फुंकले तर मी तुझे कसे फुंकणार. माझ्या गुरूने मला दोन नाणी दिली ती मी गुरूंना परत केली. ती दोन नाणी होती श्रद्धा आणि सबुरी. मला सर्व ठिकाणी गुरुच दिसू लागले. मी त्यांच्याकडे पाहून एकरूप होऊ लागलो. त्यांच्याकडे पहात स्वत:लाच विसरून बसलो. अशी अवस्था झाली. हीच गुरू कृपा आहे. बाबा म्हणाले आई कोणत्याही मंत्राची गरज नाही. तू माझ्याकडे अनन्य पाही मग मीही तूझ्याकडे तैसेचि पाहीन. हेच खरं गुरुभक्तीच मर्म आहे. जे बाबांनी सहज सोप्या शब्दात म्हातारीला सांगितले. या ग्रंथात ज्या लीला ग्रंथीत झाल्या आहेत, त्या मुळातच आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी घडवल्या व लिहिल्या गेल्या असाव्यात.

शिष्याने सदैव गुरुस्मरणात असावे हाच अर्थ यातून निघतो. या सृष्टीमध्ये एकच तत्व सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणजे गुरुतत्व. हे तत्व आहे. शक्ती आहे. परंतु आपण ते व्यक्तीमध्ये शोधावयास जातो. श्री गुरुचरित्र, साई सतचरित्र, गजानन विजय, स्वामी चरित्र या सर्व ग्रंथात गुरुमहिमा वर्णीलेला आहे. कलियुगात गुरू शिवाय तरणोपाय नाही. सद्गुरु भाऊ महाराज यांच्या बद्दल सांगायचं झाल, तर ते सर्वाच्या पलीकडे होते. नक्की कोणत्याही बिरुदावलीमध्ये, विशेषणात त्याना बांधता येणार नाही. म्हणूनच की काय गुरुंना देवाचे सगुण रूप म्हणतात. मायेची उब देणारे, शिक्षकाचा दरारा ठेवणारे, मोठ्या बंधु सारखे सदैव मागे उभे रहाणारे, बहिणीसारखे पाठीशी घालणारे, मित्रासारखे सर्व आपल्या मनातील जाणणारे, स्वतःच अस्तित्व विसरायला लावणारे, संकटकाळी आपलं सर्वस्व पणाला लावणारे, तरुणांशी त्यांच्यातलेच होऊन जाणारे, अनेकांच्या विस्कटलेल्या जीवनावर मायेचं पांघरूण घालणारे अशा कितीतरी भूमिकांमधून वेळोवळी आपल वेगळेपण, आपलं वात्सल्य अधोरेखित करणारे भाऊ खरतर कोणत्याच शब्दात वा कोणत्याच चौकटीत बांधता येणारे नाही. ते सर्व शिष्याना आपली मुलं मानायचे. प्रत्येकाला हाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. शिष्याना ते नेहमी म्हणायचे, तुम्ही सर्व मुळातच हिरे आहेत. परंतु त्यावर जळमटे बसलेली आहेत. ही जळमटे मी दूर करतो. मग तुम्ही आपोआप चमकू लागाल. किती मनाचा मोठेपणा. खरे पाहिलयास शिष्य हे दगडच असतात. सद्गुरू त्यांचे रुपांतर हिऱ्यामध्ये करतात. अथवा त्या दगडातून एखादी मूर्ती घडवतात. भाऊ असे किमयागार होते की ज्यांच्या स्पर्शानेच कित्येक दगडांच सुंदर हिऱ्यामध्ये, मूर्तीमध्ये रूपांतर झालं.

गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या परत फेड न करता येणाऱ्या उपकाराच ओझं खांद्यावर घेऊन, त्यांचा झेंडा त्रिखंडात लावण्याच्या कार्याला वाहून घेण्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्याचा दिवस. त्याच्या चरणी लिन होण्याचा दिवस. गुरुकार्यासाठी कटिबध्द होण्याचा दिवस. जन्मोजन्मी त्यांच्या चरणी भृंग होण्याचा दिवस..
असाल जेथे तेथूनि आम्हा दर्शन ते द्यावे। गुरू भानुदासा, भाऊ भानुदासा, धाव त्वरा माये। दर्शन ते द्यावे।




























