अन्नछत्र वाशिंद

असामान्य बुद्धिमत्ता, अफाट कर्तृत्व, अचाट कल्पनाशक्ती, विविध कला पारंगत, द्रष्टा पुरूष म्हणजे सद्गुरू भाऊ महाराज. भाऊंनी एखादी गोष्ट केली आणि ती आपल्याला सहज सोपी वाटली अस कधीही झालं नाही. त्यांच्या कुठल्याही कृत्यात अनेक अर्थ लपलेले असायचे. एक दगडात दोन पक्षी अस आपण नेहमी म्हणतो. परंतु  एका दगडात अनेक पक्षी अस भाऊंच्या बाबतीत म्हणावं लागेल. याच उत्तम उदाहरण म्हणजे वाशिंद मठ उभारणी. सहज बोलता बोलता भाऊ आपल्या बालपणाबद्दल बोलायचे. त्या काळी किती गरिबी होती हे सांगायचे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड फारच दुःखदायक होता. गरिबी तर प्रत्येकाच्या पाचवीला पुजली होती. कोकणात गरिबीच प्रमाण खूप होत. मुलांच्या अंगावर धड कपडा नसायचा. पोटभर अन्न मिळायचं नाही. शाळेच्या कपड्याचा एकच जोड असायचा. तोच धुवायचा व खडकावर सुकवायचा. तो सुकला की घालायचा अशी अवस्था. ही गरिबी भाऊनी पाहिली होती. दिव्याच्या उजेडात अभ्यास करून परीक्षा दिल्या होत्या. अशा मुलांप्रति भाऊंचा जीव तळमळायचा. आपल्या पूर्वायुष्यात भाऊनी खूप खूप लोकांना मदत केली होती राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशभक्ती केली होती. परंतु सर्वापासून नामानिराळे राहिले. IAS ची नोकरी सोडल्यावर त्याकाळी त्यांना अंदाजे अकरा हजार पेन्शन मिळणार होती . परंतु त्यांनी ती नाकारली. पेन्शनवर आपलं उर्वरित आयुष्य त्यांना काढायचं नव्हतं. याला म्हणतात स्वाभिमान.

दत्त महाराजानी भाऊंकडे दत्तप्रसारच काम दिल होत. ते काम पूर्ण करण्यासाठी भाऊ सतत कार्यरत असायचे. दत्तभक्ती बरोबर लोकसेवा व्हावी अशी त्यांची ईच्छा होती. गाणगापूर मठ पूर्ण झाल्यानंतर मुंबई जवळ एखाद दत्तास्थान असावं. ज्या ठिकाणी प्रति गाणगापूर उभं राहावं, असा भाऊंचा मानस होता. शहापूर- वाशिंद या ठिकाणी मठ बांधण्यामागे अनेक अर्थ होते. मठाच्या माध्यमातून दत्त सेवा घडणार होती. भाऊना आपल्या शिष्यांना दत्तभक्ती बरोबरच समाजसेवेचीही दीक्षा द्यावयाची होती. नकळत त्यांच्या मनात परोपकाराचा ठसा उमटवायचा होता. नाहीतर शिष्य स्वयंकेंद्रित झाले असते.  दत्तभक्त हितार्थाय दत्तभकते एवं निर्मितं।  श्री क्षेत्र वाशिंद मठ वसुधायाम विराजते। वाशिंद मठ माहुली गडाच्या पायथ्याशी आहे. ११ की.मी. वर शहापूर. मुख्य रस्त्यापासून काटकोनात निघालेला रस्ता वाडा ,विक्रमगड या महाराष्ट्रातील अतिदुर्लक्षित दुर्गम भागाकडे जातो. या मधील ३६ की.मी. चा हा रस्ता पूर्ण जंगल आणि डोंगराने वेढलेला आहे. मधल्या दुर्गम भागात वसलेले अनेक पाडे आहेत. मठाच्या निमित्ताने या आपल्या देशबांधवाचही काही हित करावं, त्यांची सेवा करावी, अशी भाऊंची कल्पना होती. त्या निमित्ताने शिष्याना देशबांधवाच दुःख ही कळेल. मठाच काम सुरू झाल्यावर भाऊंनी या विभागातील अनेक दुर्गम पाड्याना भेट दिली. तेथील परिस्थिती जाणून घेतली. यातून एक महत्वाची  गोष्ट त्याच्या निदर्शनात आली. आणि ती म्हणजे कुपोषण. लहान मुलांना पोटभर, पुरेस अन्न मिळत नव्हते. करू काहीतरी असे शब्द भाऊंच्या शब्दकोशातच नव्हते. आजूबाजुच्या सर्व दुर्लक्षित पाड्यांची यादी तयार करण्यात आली . प्रत्येक पाड्यात बालक अन्नदान केंद्र निर्माण करण्याचे कार्य हाती घेतल गेलं. अंदाजे १२/१५ पाड्यांची नावे घेण्यात आली. प्रत्येक पाड्याची जबाबदारी आपल्या एका- दोघा शिष्यांच्या खांद्यावर टाकली. गुरुवाक्य मज कामधेनू या उक्ती प्रमाणे सर्व शिष्यानि ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. आणि अन्नछत्र चालू झाले. प्रत्येक पाड्यातील एका व्यक्तीवर मुलांना जेवण बनवून वाडण्याची जबाबदारी देण्यात आली. अशा तर्हेनें अन्नछत्र सुरू झाले. मुलांना पोटभर अन्न मिळू लागल. वाशिंद मठातही शाळेतील मुलांसाठी अन्नछत्र सुरू केलं गेलं. मुलांबरोबर येणारे भक्तही अन्नप्रसादाचा लाभ घेत असत. दत्तमहाराजांना प्रिय असणार अन्नदानाचे कार्य वाशिंद भागात सुरू झाले. भाऊंनी भक्ती बरोबरच सामाजिक बांधिलकीचा धडा घालून दिला.