अन्नदान

होता दोनप्रहरचे बारा । अन्नावीण जीव घाबरा । जैसें आपण तैसेच इतरा । जाणील अंतरा तोचि भला ।

प्रत्येक प्राणीमात्रला, डोक्यावर सूर्य आला, की भुकेने जीव कासावीस होऊ लागतो. दोन घासासाठी जीव तळमळू लागतो. याचाच विचार करून  पूर्वीच्या काळी, ऋषि मुनींनी  ‘अतिथी भोजन’ याची प्रथा घालून दिली. आणि अतिथी देवो भव: ही संकल्पना हिंदू संस्कृतीत प्रमाण मानली गेली. असेच कित्येक दत्तभक्त दत्त महाराजांच्या केवळ दर्शनासाठी गाणगापूरी येत असतात. येणारी ही कुटुंबे खूप गरीब असतात. येताना आपल्या बरोबर फक्त एक गाठोडे त्यांच्या सोबत असते. महाराजांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या वरील दृढ विश्वासावर ते मार्गक्रमण करतात आणि गाणगापूरी पोहचतात. रस्त्याच्या काठी, किंवा शेतात, कोपऱ्यात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पहुडतात. यांच्या या परिस्थितीचे अवलोकन करून भाऊ महाराजांनी माधुकरी सेवा चालू केली. दुपारी ठीक बारा वाजता माधुकरी वाढली जाते. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन, पालखी रस्त्यावर पाणपोईची व्यवस्था केली गेली. माघ महिण्यामध्ये माघी पोर्णिमेनिमित्त, भक्तांचा ओघ खूपच असतो. म्हणून माघी अन्नदान भाऊ महाराजांनी सुरू केले. वाशिंदला, जवळपास असणाऱ्या आदिवासी पाडयातील मुलांना पोटभर अन्न मिळावे म्हणून बालक अन्नछत्र केंद्र ही सेवा सुरू करण्यात आली. वाशिंद मठातही दुपारच्या वेळेला अन्नप्रसाद दिला जातो. ही सेवा सर्व मठामध्ये चालते. आपलं कोणी लेकरू उपाशी राहू नये असे त्या दयाघनाला वाटत असते, म्हणूनच महाराजानी आपल्या भक्तांना, भुकेलेल्याला प्रथम अन्न द्यावे मग आपण खावे असा अलिखित दंडक घालून दिला आहे. ‘स्वतः दत्त महाराजांना माधुकरी मागणे आणि माधुकरी वाढणे’ दोन्हीही प्रिय आहे. म्हणुनच प्रत्येक दत्तक्षेत्रात अन्नछत्र चालवली जातात. खालील पंक्तीवरून अन्नदानाची महती लक्षात येते.

हरीरन्नम हरीर्भोक्ता । हरिच रसाची चवी चाखीता । धन्य तेथील अन्न वाढिता । तो सेविता दाताही ।