भाऊप्रणित कार्यक्रम

।।योग: कर्मसु कौशल्य: ।।

या एका वाक्यात भगवान कृष्णाने साधनेच सार काढून दिल आहे. कर्माला योग जोडला असता त्या कर्मामध्ये कौशल्य प्राप्त होते. हा त्याचा साधा सोपा अर्थ आहे. आपण करीत असलेल्या कोणत्याही कर्माला साधनेची, परमेश्वराच्या नामाची जोड दिली असता त्यातील निपुणता येऊ लागते. हीच गोष्ट संतांनी अभंगांमध्ये, हरी बोला देता, हरी बोला घेता, हासता खेळता हरी बोला; यामध्ये सांगितली आहे. आपण करीत असलेले सत्कर्म किंवा योग्य कर्म  हे परमेश्वराचे आहे, त्यात तोच भरलेला आहे, त्यांच्यासाठीच आहे ही भावना निर्माण झाली की त्या परमेश्वराचा अंश त्या कर्मात जोडला जातो व ते कार्य सिद्धीस जाते. आपण याला  कर्म ईश्वर समर्पण असे म्हणू शकतो. विविध अर्थाने जरी हा भाग समजला तरीही आचरणात येण्यास फार कठीण आहे. आजच्या जीवनशैलीत हे अंगीभूत होणे महाकठीण. आजचा मानव अनेकविध गोष्टीत गुंतलेला आहे. अनेक समस्या त्याच्या बाजुला फेर धरून नाचत आहेत. माणूस एका वेगळ्या हिप्नोटाईज जगात वावरत आहे आणि त्याला तो खर जग मानत आहे. माणसांचा लोंढाच्या लोंढा एका दिशाहीन मार्गावर प्रवास करीत आहे. कोणालाच कळत नाही आहे की नक्की आपल्याला जायचे कुठे आहे. फक्त चालणं चालू आहे. विचित्र परिस्थितीचा माणूस गुलाम होऊन बसलाय. हा प्रवास नक्कीच शाश्वत सत्याकडे नेणारा नाही आहे.

भाऊ महाराज हे मानस शास्त्राचे ,परा मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. आजचा मानव हा धरून, बसवून साधना करणारा नाही किंवा ते शक्य नाही हे त्यांना माहीत होतं. तसेच साधनेसाठी उपयुक्त जागा ही उपलब्ध होणे कठीण आहे. या ना त्या कारणाने माणूस या पासून पळ काढणार हे नक्की. या सर्वाचा अभ्यास करून भाऊनी सहजोग साधनेची बैठक अशा पद्धतीत, कार्यक्रमात  बसविली की त्यात सहभागी होणाऱ्याची सहज साधना झाली पाहिजे. चालता बोलता साधना झाली पाहिजे. यात्रेच निमित्त करून भाऊ महाराजांनी सर्वाना गाणगापूर, वाडीला न्यायला सुरवात केली. यात्रेच्या नावाखाली सर्वच खुश असतात. या आनंदात परमार्थ करण्यास माणुस उत्साहित असतो. अनायसे त्याच्या कडून परमार्थ होऊन जातो. भक्त वर्षभराचा आनंद आपल्या सोबत घेऊन येतो. आपल्याकडून उच्चप्रतीच देवकार्य झाले आहे या विचाराने माणूस अंतर्बाह्य बदलायला लागतो. चूकीची कर्म करायला धजावत नाही.सत्कर्माची कास धरु लागतो. अशा विविध कार्यक्रमाची बांधणी व आवड भाऊनी शिष्याना लावली. सत्कर्माची जबाबदारी शिष्यांवर टाकली. ज्या जबाबदाऱ्या देवकार्याच्या होत्या. कामाच्या जबाबदारीचा विचार करता करता माणूस परमेश्वराशी नकळत  जोडला जातो. चुंबकावर सातत्याने लोखंडाची पट्टी फिरवली असता कालांतराने ती पट्टी चुंबक होऊन जाते. हीच पद्धत ध्यात्मात भाऊंनी वापरली. सर्व शिष्याना भाऊंनी कार्यकर्मात असे काही गुंतवून टाकलं की चालता, बोलता त्यांच्या कडून कधी साधना होत आहे हे त्यांनाही नाही कळलं. हेच भाऊनी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे मर्म आहे.

मंत्रपठण, पारायण, विविध उत्सव सोहळे, पारायण, नामस्मरण, अन्नदान सेवा, इ. अनेक उपक्रम हाती घेऊन साधनेच्या जवळ नेले. छोट्या छोट्या गोष्टीतुन अध्यात्मातला आनंद दिला आणि सर्वांचं जीवन कृतकृत्य केले.

|| श्री गुरुदेव दत्त ||