दत्तभक्ती – उपासनामार्ग

।। श्रीगुरूदेव दत्त।।

जगामध्ये हजारो वर्षांमध्ये कित्येक धर्म, पंथ, संस्कृती जन्माल्या आल्या व अस्तासही गेल्या. भारताकडे आज सर्व जग सर्वात प्राचीन संस्कृती व लयास गेलेली संस्कूती अशा अर्थाने पहात आहे. याच कारण भारत हे जगातील अध्यात्माच मूळ स्थान आहे. इथुनच खऱ्या अर्थाने अध्यात्माला व संस्कृतीला सुरूवात झाली. कोणत्याही संस्कृतीला सर्वसमाद्देशक रूप प्राप्त होण्याकरीता एखाद्या धर्माची बैठक असावीच लागते किंबहुना असं म्हणावं लागेल की, धर्माच्या बैठकीमुळेच तत्कालीन मानवाच्या आचारधर्माला संस्कृतीचं रूप प्राप्त झालं. सांप्रत आपण धर्माची व्याख्या, `मानवाला स्वत:ची सर्वतोपरी उन्नती करण्यासाठी निर्माण केलेली विचारधारा.’ असा आपण घेऊ शकतो. जगातील इतर धर्माची निर्मिती एखाद्या प्रेषितामुळे किंवा देवपुरूषामुळे झाली आहे. परंतु सनातनी वैदिक हिंदु धर्माची निर्मिती कोणी एका पासून नसून अनेक देवपुरूष, प्रेषित, अवतार, ऋषीमुनींच्या योगदानामुळे झाली आहे. उदाहरणादाखल म्हणायचं झाल तर, वेदांची निर्मिती अनेक ऋषीमुनींनी केलेली आहे. परंतु कालांतराने वेदांमध्ये झालेला कालबाह्य अनावश्यक भाग व्यासांना काढून टाकावा लागला व त्याचे संहितीकरण करावे लागले.

धर्माच्या बाबतीतही असाच काहीस झालं आहे. धर्माची मूळ संकल्पना लयास जावून अनावश्यक आचारधर्माचा भरणा वाढू लागला. परीणामी धर्माला विकृतरूप येऊ लागले. विविध भागांमध्ये राहणाऱ्या तसेच जनसमुदायांचा एकमेकांशी संपर्क नसल्याने विक्षिप्त पंथ जन्माला येऊ लागले. पंथांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागले. शैव व वैष्णव पंथांमध्ये झालेल्या लढायांचं वर्णन इतिहासाला नविन नाही. सर्व धर्माचं, पंथांचं संहितीकरण करण्यासाठी `दत्तावतार’ झाला व `दत्तसंप्रदायाची’ सुरूवात झाली. पुराणामध्येही दत्तावताराचा उल्लेख आहे. अत्रि व अनसूया यांच्या कथेमधील त्रिमूर्तीच्या एकत्रीकरणातून `दत्त’ रूप निर्माण झाले हे सर्वमान्य आहे. विविध पंथांना एकत्र करून सर्वश्रेष्ठ अशा दत्तसंप्रदायाच एकछत्री, एकसुत्री रूप निर्माण करण्याचा हा प्रयोग असावा.

सांप्रत लौकीक अर्थाने `श्रीपादश्रीवल्लभ’ हा पहिला अवतार मानला गेला आहे. वयाच्या तिसाव्या वर्षीच `कुरवपूर’ येथे श्रीपादवल्लभ कृष्णानदीच्या पाण्यात अदृश्य झाले. या अवतारात एका ब्राह्मणस्त्रीला दिलेल्या आशिर्वादानुसार पुढील जन्मी तिच्या पोटी जन्म घेतला व वयाच्या ८व्या वर्षी `नृसिंहसरस्वती’ या नावाने संन्यासदीक्षा घेतली. श्रीमान् नृसिंहसरस्वतीस्वामींनी केलेल्या लीला, सिद्धांमुखी ऐकून सरस्वती गंगाधरांनी `श्रीगुरूचरित्राच्या’ रूपात ग्रंथीत केल्या. श्रीगुरूचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तीमध्ये प्रमाण मानला गेला आहे.

कृतेजानर्दनु त्रेतालेयायुनरधुनानम्। द्वापारे रामकृष्णौचं कलौ श्रीपाद वल्लभ:।।

तात्वीकदृष्टया तसेच तर्कदृष्टया विचार करावा लागला तर असं म्हणावं लागेल की, भौतिक, आदीभौतिक, आदीदैविक व आध्यात्मिक अशा चारही विषयात येणाऱ्या संकटातून श्रीदत्त आपल्या भक्तांचे रक्षण करतात असा भक्तांचा अनुभव आहे. उदा. जात्याच्या खुटापाशी राहिलेले दाणे जसे भरडले जात नाहीत. जगरहाटीच्या जात्याला फिरवणारा खुटा म्हणजेच श्रीदत्त आहेत. त्यांचे चरण धरल्यावर संकटांची चिंता कशाला? संपूर्ण श्रीगुरूचरित्रामध्ये सदगुरूच स्तवण केलं गेलं आहे. सदगुरू हे देवाचे सगुण रूप आहेत. सदगुरू हे मानवी रूपात असले तरी त्यांच्यामध्ये दत्तशक्ती काम करत असते. सदगुरू ही व्यक्ती नसून शक्ती आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने `कली’ समोर `गुरू’ स्वरूपाचे वर्णन केले आहे. दत्तशक्ती सदगुरूच्या रूपाने पृथ्वीवर काम करत असते. मानवाच्या उद्धारासाठी सदगुरू अहोरात्र झटत असतात. विविधांगी मार्गाने मानवांमध्ये ईशत्व निर्माण करून मोक्षापर्यंत नेण्यासाठी सदगुरू पृथ्वीवर पुन: पुन्हा जन्म घेत असतात. श्रीदत्तात्रेयांनी कर्ममार्गातून मानवाचा उध्दार व्हावा, यासाठी तीर्थस्वरूपाच्या रूपात सिध्दपीठ निर्माण केली आहेत. वैज्ञानिकदृष्टया स्थान महिमेचा विचार केला असता अस उत्तर सापडेल की, पृथ्वीवरील काही स्थानात, डोंगरावर, नदीसंगमांवर वैश्विकउर्जा संपकार्त येत असते. ही पारलौकिकशक्ती सातत्याने ठरावीक स्थानावर कार्यरत रहावी, या उर्जालहरींमध्ये मानव संपर्कात आल्यावर आपोआपच त्याचा उद्धार होईल अशी व्यवस्था केली गेली आहे. उद्धार हा शब्द म्हणजे आताच्या काळात वेगळया म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर मानवाचं शरीर वा कोणाही सजिवाचं शरीर हे पेशींनी बनलेले असते. प्रत्येक पेशींमध्ये पोकळी असते. त्यात प्लाझमा सारखा तरल पदार्थ असतो असे शास्त्रज्ञ म्हणतात. या पोकळीमध्ये, अवकाशामध्ये प्रत्येक मानवाचं संचित साठवलेलं असतं. हे संचित पूर्वजन्मानुसार आपल्याबरोबर कार्यान्वित होत असतो. उदा. एखादयाच्या जन्मपत्रिकेमध्ये ती व्यक्ती डॉक्टर होणार आहे असे संकेत असतात, पुढे जाऊन तो मुलगा डॉक्टर बनतो. याचा अर्थ पत्रिकेमुळे तो डॉक्टर झाला नाही तर तो त्याच्या प्रयत्नांनी डॉक्टर होणार हे पत्रिका दर्शवत असते. त्यासाठी लागणारी उपाययोजना, सिध्दता आपोआपच होत असते. किंबहुना काही लोक खूप प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही. हे बऱ्याच अंशी त्यांच्या संचितावर अवलंबून असते. असो, मूळ विषयाकडे वळू; या पेशीतील अवकाशात असलेले संचित या उर्जालहरींच्या संपर्कात आल्याने त्यात बदल घडून येतो, त्यातील दोष निघून जातो. असा अनुभव आहे. याच कारणाने बऱ्याच ग्रंथामध्ये, या स्थळी अमूक अमूक दिवशी स्नान करावे, दर्शन घ्यावे त्याबदल्यात शतफळ, लक्ष लक्ष फळ मिळेल असे मांडण्यात आले आहे. त्यामागील उद्देश हाच होता की, किमान या दिवशी तरी भाविकांनी या उर्जालहरींच्या संपर्कात यावे. तसेच अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी चंद्रबळ वेगवेगळया परिमाणात परिणाम करीत असते. चंद्रबळामुळेच समुद्राला भरती-ओहोटी येत असते हे त्याचे उदाहरण आहे.

पृथ्वीवरील मुळात अस्तित्वात असलेल्या या उर्जाकेंद्रांना संतांनी, देवपुरूषांनी, ऋषीमुनींनी शोधून काढली व आपल्या तपस्येमुळे ती उर्जा कित्येकपट वाढवली. आजही शिर्डी, शेगांव, गाणगापूर, नृसिंहवाडी तसेच इतर पुण्यभूमीत गेल्यावर भक्तांना या उर्जालहरींचा अनुभव येतो किंवा प्रसन्न वाटते. हे जे काही प्रसन्न वाटणे हे त्या उर्जालहरीचा परिणाम आहे. अशा पवित्र ठिकाणी आपण जाऊन उपासना, साधना केली तर या उर्जालहरी आपल्यावर अधिक प्रमाणात परिणाम करतील. हे एक वेगळया प्रकारच विज्ञान आहे जे आपल्या पूर्वजांनी शोधून काढले व आपल्याला दिले. परंतू खालच्या पिढीमध्ये हे विज्ञान पाझरत असताना काही गोष्टींमुळे त्यात अनाठायी, कर्मकांडी, अवास्तव चुकीचा ज्ञानाचा भरणा होत गेला. मूळ गाभा विरून गेला. हाच मूळ गाभा पुन्हा मानवाकडे येण्यासाठी देवाने संतांच्या रूपात अवतार घेऊन त्याचे पूर्नजिवीतकरण केलं, संहितीकरण केलं. काळानुसार भक्तीमध्ये साधनेमध्ये बदल होत गेला. जसा कालखंड असेल तसं देवानेही स्वत:चं स्वरूप बदललं. उदा. १४व्या शतकात श्रीमान् नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या अवतार कार्यात संन्यासधर्म स्वीकारून ही ढासळलेली वीट त्यांनी पुन्हा घट्ट बसविली. पुढे ते ३०० वर्षे श्रीशैल्या येथील कर्दळीवनात तपश्चर्येला होते. कर्दळीवनातून निघालेल्या स्वामींचे आचरण हे नृसिंहसरस्वतींच्या आचरणापेक्षा विसंगत आहे. संन्यासधर्माचे काटेकोर पालन करणारा देव, स्वामी रूपात बदलला व लोकाभिमुख झाला. गुरूचरित्रातील कथांमध्ये श्रीगुरूंनी सर्वच वर्गातील भक्तांवर सारखीच कृपा केलेली निदर्शनास येते. अगदी बिदरच्या म्लेंच्छ राजावरही त्यांनी कृपा केली आहे. पण संन्यासधर्मामुळे देवाला भक्तांमध्ये मिसळता येत नव्हते. हे सर्व त्यांनी स्वामींच्या अवतार रूपात येऊन पूर्ण केले. अर्थात काळाप्रमाणे देवाने साधनेमध्ये व स्वत:मध्ये बदल घडवून आणला. आजच्या धकाधक्कीच्या जीवनातही मानव भक्ती मार्गापासून दूर जाणार नाही असा भक्तिमार्ग जो सहज, सुलभ असेल. जी भक्ती चालता-बोलता, उठता-बसता करता येईल असा उपासनेचा प्रकार जन्मास घातला व ते संतांच्या रूपात भक्तांपर्यंत पोहचविला.

असो, दत्तभक्तीच्या मूळ मार्गाचे परीक्षिलन करूया; श्रीगुरूचरित्र हा ग्रंथ तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. १) ज्ञानमार्ग २) भक्तीमार्ग ३) कर्ममार्ग.

साधनेत अंतर्भूत असलेल्या योगमार्गाचा उहापोह या ग्रंथात केलेला दिसून येत नाही यावरून असे लक्षात येते की `योगमार्ग’ हा सामान्य माणसांचा भाग नाही. त्यासाठी मूळातच काही अंशी पात्रता असावी लागते. मग असा प्रश्न निर्माण होतो की, सामान्य माणसाने, भक्ताने काय करायचे? या प्रश्नाचं उत्तर आहे `श्रीगुरूचरित्र’! असं म्हणण वावग ठरणार नाही. कारण जे जे या ब्रह्मांडात आहे ते सर्व या ग्रंथामध्ये आहे. असा कोणताही प्रश्न नाही की ज्यावर उत्तर श्रीगुरूचरित्रात नाही. गुरूचरित्रात वर्णन केलेल्या दत्तभक्तीचे आचरण केल्यास सामान्य भक्ताचा उद्धार होणार ही काळया दगडावरची रेष आहे व तसा अनुभव ही आहे. श्रीगुरूचरित्रात श्रीगुरू म्हणजेच श्रीनृसिंहसरस्वती यांच्या जीवनचरित्रावर आहे. काही अध्याय श्रीपादवल्लभ यांच्यावर लिहिले आहेत. ११व्या अध्यायापासून श्रीगुरूंचे जन्माख्यानपासून ते श्रीशैल्यास पाताळगंगेत गुप्त होऊन कर्दळीवनात जाईपर्यंतचे चरित्र ५१ अध्यायापर्यंत वर्णीलेले आहेत. या ग्रंथाला सत्याची जोड आहे. कारण यात वर्णन केलेल्या ऐतिहासिक व्यक्ती वास्तवात त्या काळात होऊन गेल्या. त्यामुळे या ग्रंथाच्या सत्यतेवर बोट ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उदा. बिदरच्या बादशहाचा कालखंड व त्यांच्या राजवाडयात असलेले दत्तमंदिर. नंतरच्या काळातील उदाहरण द्यायचं म्हटलं तर नृसिंहवाडी येथील मुस्लिम राजाने बांधलेलं मुस्लिम धाटणीचं दत्तमंदिर. त्याबद्द्लची कथा सर्वश्रुत आहे. एखादा मुस्लिम राजा हिंदु देवतेचं मंदिर बांधून देतो यामागे त्याला आलेला अनुभव असाच अर्थ असू शकतो.

खऱ्या अर्थाने दत्तसंप्रदायाला श्रीनृसिंहसरस्वती यांच्यापासून सुरूवात झाली. श्रीपादवल्लभांनी अनेक लीला केल्या परंतु शंकरभट्टा करवी लिहिले गेलेल चरित्र २१व्या शतकात प्रकाशित झालं. श्रीपादवल्लभांचे विचार तत्कालीन समाजाला पटणारे नव्हते. त्याकाळात हा ग्रंथ प्रकाशित न होण्याचे बहुधा हेच कारण असावे. तत्कालीन समाजाला अचानक मुरड घालायला लावणे अशक्यप्राय होत. श्रीनृसिंहसरस्वतींनी संन्यास धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसविली. त्यासाठी भारत भर काही विशिष्ठ ठिकाणी प्रवास केला. या महत्कार्यासाठी एकापेक्षा एक असे शिष्य घडविले. त्यांना भारतभर विविध यात्रान्वये भ्रमण करण्यास सांगतिले. संन्यासधर्माची विचारधारा शिष्यांकरवी पूर्ण भारतवर्षात प्रसारीत करण्याचे महत् कार्य करवून घेतले. श्रीगुरू मार्गात असताना ठिकठिकाणी उच्चत्तम साधकाची भेट होत असे. त्या साधकांच्या तपश्चर्येच फळ म्हणूनच श्रीगुरूंची भेट होत गेली. अशा कित्येक साधकांना, तपस्व्यांना `मध्यमस्थितीमार्ग’ देऊन सिध्दपदी घडविण्याचे कार्य श्रीगुरू करीत होते. काही साधकांचा उल्लेख श्रीगुरूचरित्रात आहे. अशा कित्येक साधकांना श्रीगुरूंनी दिक्षा दिली असेल पण त्याबद्दल आपणाला काही माहिती नाही. उदा. एकदा श्रीगुरू शिष्यांसमवेत प्रवासात असताना सिंहस्थ पर्वणीच्या वेळी त्र्यंबकेश्वरी काही कारणास्तव नाही पोहचू शकले. शेगावच्या जवळ एके ठिकाणी पोहोचले. शिष्यांनी मनातली काळजी श्रीगुरूंना बोलून दाखविली. श्रीगुरूंनी शिष्यांना आश्वस्त केले व एका विशिष्ठ ठिकाणी ध्यानास बसले. गंगेला आवाहन केले. मुखातून `हर हर गंगे’ उच्चार होताच समोर मोठा खड्डा पडला व गंगा अवतीर्ण झाली. हळूहळू तो खड्डा पूर्ण पाण्याने भरला. श्रीगुरूंच्या नावाने जयजयकार झाला. श्रीगुरूंनी शिष्यांसहित तेथे स्नान केले. नंतर कित्येक काळ ते कुंड अस्तित्वात होते. कालांतराने दुर्लक्षामुळे कालाधीन होऊन ते बुजल गेलं. काही शतकानंतर गोमाजी महाराज तिथे आले व त्या स्थानाचा उद्धार झाला. त्यांच्या तपश्चर्येत गंगा पुन्हा अवतीर्ण झाली. आज गोमाजी महाराजांचे स्थान म्हणून ते स्थान प्रसिध्द झाले. श्रीदत्तात्रेयांचे कार्य अखंडित चालू आहे कारण दत्तमहाराज `चिरंजीव’ आहेत.

श्रीशैल्य यात्रेला जातो असे सांगून श्रीगुरू कर्दळीवनात तपश्चर्येसाठी निघुन गेले. लौकिकअर्थाने जरी कर्दळीवनात गेले असले तरी गुप्तरूपाने गाणगापूरी, कृष्णातीरी, औदुंबरी नित्य वास आहे असा आजही भक्तांचा अनुभव आहे. कर्दळीवनाचा भाग आजही अस्पर्श जंगलाचा भाग आहे. श्रीगुरू तेथे येण्यासाठी हजारो ऋषीमुनी, सिध्द तेथे हजारो वर्षे तपश्चर्या करीत होते. त्या साधकांसाठी श्रीगुरू कर्दळीवनात समाधी अवस्थेत निमग्न झाले. या काळात त्यांनी कृपा केलेले कित्येक सिध्द पुरूष लोक कल्याणाचं कार्य करीत होते. सगळयाच गोष्टी इतिहासात नमूद नाही आहेत अथवा ज्ञात नाहीत. पुढे जाऊन श्रीगुरू जेव्हा स्वामी रूपाने लोकांसमोर आले तेव्हा त्यांच्या कार्यकालात त्यांनी अंदाजे ३०० पेक्षा अधिक सिध्द घडविले. आजही ते सिध्द पुरूष व्यक्त-अव्यक्त रूपात कार्य करीत आहेत. दत्तसंप्रदायाचा प्रसार सर्वत्र करीत आहेत.

श्री. समीर ए. चव्हाण.


।। श्रीगुरूदेव दत्त।।