कृष्णभक्ती – दत्तभक्ती – विवेचन

नमो भगवते वासुदेवाय मधुराधिपते अखिलं मधुरम्

ज्याची प्रत्येक गोष्ट मधुर आहे तो मधुराधिपते असा तो भगवान श्रीकृष्ण. ज्याची तुलना कोणाशीही, कशाशिही होऊ शकत नाही असा जगदवंद्य महापुरुष. झाले बहु होतिल बहु परंतु नाही कोणी त्याच्यासम असा तो जगदपालक विश्ववंद्य मुरलीमनोहर. माधावाला जितकी विशेषणे लवावी तितकी कमी. वेदानाही नाही कळला अंत पार याचा ज्याचे वर्णन करता करता श्रुति, स्मृति ,पुराणे,महाकाव्ये  ही कमी पडावित असा तो महानायक. श्री कृष्णभक्तिचा अभ्यास करताना प्रथम आपल्याला श्रीकृष्ण समजून घेतला पाहिजे. कृष्ण समजण्यासाठी त्याच्या चरित्राचा सखोल अभ्यास करावायास हवा. त्यातील बारकावे समजुन घ्यावे लागतील. भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केला तेंव्हा द्वापार युग संपत आल होत. नव्या युगाची सुरवात झाली होती. आपल्या अवतार कार्यात अनेक अनिष्ट गोष्टि संपुष्टात आणल्या होत्या. नव्या जगाच्या क्षितिजावर नवीन पहाट होत होती. एका नवीन भक्तिमार्गाची…!!

भारतभर श्रीकृष्ण भक्ति प्रसिद्ध आहे. मात्र महाराष्ट्रात त्याचे अपरूप असलेल्या पाडुरंगाची भक्ति जोपासली गेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्या सीमेजवळ् असलेल्या पंढरित हा भक्तवत्सल सावळा विट्ठल भक्तांच्या कल्याणा करीता युगानुयुगे विटेवर, कटिवर हाथ ठेवून  उभा आहे. आज आपण जी मूर्ति पहातो ती मूर्ति पूर्वी अशी नव्हती. त्या मूर्तिचे वर्णन अभंगातही आलेल आहे. एक गुर राखणाऱ्या गुरख्याच्या गोंडस परंतु पौगांडावस्थेत असलेल्या मुलासारख रूप त्या मूर्तिच होत. त्रिभंगी देहूडा अस वर्णन या मूर्तिच केलेल आहे. म्हणजे तीन ठिकाणी नृत्याच्या मुद्रेसारखी वाकलेली. रूप सावळया खटयाळ् मिश्कील हास्य करणाऱ्या कान्हाच आहे. ज्याच्या कपाळावर मयूरपंख खोवलेल आहे. खांद्यावर घोंगडी आहे. हातात काठी आहे. गळ्यात तुलसीमाळ आहे. ज्याच्या हॄदयावर श्री वत्सलांछन हा मंत्र कोरलेला आहे. अशी ती मूर्ति होती. काही करणास्त्व ही मूर्ति बदलली गेली. कंबरेवर हात ठेवून उभी असलेली मूर्ति प्रतिष्ठापित केली गेली. आज जी विठ्ठलाची मूर्ति पहातो त्याच वैशिष्ट म्हणजे त्याचा मुकुट हा खुप ऊंच आहे. आपल्या कपाळावर शिवलिंग धारण केलेल्याच प्रतीक आहे. शैव व वैष्णव पंथियामधील वाद मिटविण्यासाठी अशा मूर्तिची निर्मिति केली गेली. आपल्या भ्रूमध्या मध्ये थोड़ वर आज्ञाचक्राचे स्थान आहे. या चक्रातील दोन नाड्या क अक्षरासारख्या आहेत.ज्याचं प्रतीक म्हणून कंबरेवर हात ठेवलेली मूर्ती बनविण्यात आली आहे. विठ्ठलाच्या पायाशी असलेली विट ही आपल्या आज्ञा चक्राच्या खाली आहे. दक्षिणेकडील लोक त्या ठिकाणी आडवं गंध लावतात.

आध्यात्म शास्त्राची बैठक पूर्णतः शरीर विज्ञान शास्त्रावर आधारलेली आहे. मानवाला दोन मेंदू असतात. मोठा मेंदू आणि छोटा मेंदु. मोठ्या मेंदूचे दोन भाग पडतात. उजवा मेंदू व डावा मेंदू. उजवा मेंदु हा व्यावहारिक बाबतीत कार्य करतो. तसेच उजवा मेंदू जागृत झाल्यास अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त होते. हे दोन्ही मेंदू आज्ञा चक्राच्या ठिकाणी जोडले गेले आहेत. आज्ञा चक्राच्या जागृतीने उजव्या मेंदूचा प्रवास सुरु होतो. हा प्रवास भक्ताला, अचाट बुद्धिमत्ता, अमर्याद  कल्पनाशक्ति, अंतर्ज्ञान, ध्यान ,धारणा ,समाधि या गोष्टीकडे घेऊन जातो. या आध्यात्मिक प्रवासाला  श्रीनृसिंह सरस्वती म्हणजे श्री गुरू मध्यम स्थितीमार्ग अस म्हणतात, ज्याचा उल्लेख गुरुचरित्रात केला गेला आहे. सदगुरू कृपेने  कृष्णभक्ती साधनेच्या माध्यमातून आज्ञाचक्र जागृत होते. आपल्या संतांनी येणाऱ्या पिढीसाठी अध्यात्मातील हमरस्ता बनवून ठेवला आहे. आपल्याला फक्त त्या रस्त्यावर कृष्ण भक्तीत रममाण होऊन चालायचे आहे. जी कृष्णभक्ती संतांनी अभंगा मध्ये हरिभजनामध्ये , नादब्रम्हात, हरिपाठामध्ये बांधली आहे. त्याच्या चरित्रात जी लपलेली आहे. जस जसे आपण कृष्णचारित्रात रंगून जाऊ लागतो तस तसे त्याचे गुण अंगी येऊ लागतात. श्रीकृष्ण आपली रोमारोमात भिनू लागतो. तो आपल्या अवतिभावती वावरतो आहे असा भास होऊ लागतो. गोपगोपी आपल्या आजूबाजूला फेर धरून नाचू लागतात. हळूहळू आपणच कृष्णमय होऊन जातो. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठला भेटाया गेलो । विठ्ठल होऊनि ठेलो।

कृष्णभक्ती प्रसार

महाभारताच्या युद्धाने द्वापारयुगाची समाप्ती झाली. व्यासांनी महाभारताचे लिखाण पूर्ण केल्यावर त्यांना काहीतरी राहून गेलय, काही तरी अपूर्ण राहिलय अस वाटू लागलं. कालांतराने त्यांच्या लक्षात आलं, इतिहास लिहून झाला परंतु कथेचा खरा नायक भगवान श्री कृष्ण मात्र अपूर्ण राहिला आहे. स्वतः व्यासांना विष्णूचा अवतार मानलं गेलं आहे. अनेक पुराणे, महाभारत, तसेच वेदांचे संहितीकरणं केल्याने व्यासांना विशालबुद्धे म्हटले गेले आहे. सर्व भारतभु व्यासांना आचार्य मानत असे. महाभारताचे लिखाण होई पर्यंत श्रीकृष्णाला सर्व लोक एक श्रेष्ठ योद्धा मानत असे. सुदर्शन चक्र धारण करणारा, अजेय लढवय्या, महान मूष्ठी योद्धा म्हणजेच कुस्तीगिर मल्ल, राजनीती तज्ञ, श्रेष्ठ धनुर्धर, केरळ मध्ये खेळल्या जाणाऱ्या करालीपट्टू या युद्धतंत्राचा उद्गाता अशा अनेक गोष्टींचा एकमेवद्वितीय असा पुरुष. अशी श्रीकृष्णाची ओळख होती. व्यासांना माहीत असलेला श्रीकृष्ण हा त्याहून अधिक होता जो कोणाला माहीत नव्हता. त्याकाळी प्रसारमाध्यम नसल्याने अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहचत नसत. खऱ्या भगवान श्रीकृष्णाची ओळख जनमानसात पोहचवी म्हणून व्यासांनी भागवत या महान ग्रंथाचे लिखाण केले. भागवत लिहून झाल्यावर व्यासांनी उत्तरेकडे असलेल्या आत्ताच्या बिहार नजीक असलेल्या अवन या गावात सभा बोलावली. भारतभूमी वरील सर्व ऋषी मुनी, तत्कालीन विविध आश्रमाचे कुलगुरू,अध्यापक यांना, ब्रह्मण श्रेष्ठ अशा सर्वाना पाचारण करण्यात आलं. आज आपण जी रंगपंचमी साजरी करतो, त्या कालावधीत प्रथमा पासून पंचमी पर्यंत सलग पाच दिवस, व्यासांनी भागवत ग्रंथाचे वाचन केले. भगवान श्रीकृष्ण संमजवून सांगितला. त्या दिवसा पासून एक प्रथा सुरू करण्यात आली. या पाच दिवसात भगवान श्रीकृष्णाचे गुणगान करावे. त्यायोगे पंचरात्र धर्म याची स्थापना करण्यात आली. पुढे जाऊन तोच वारकरी पंथ झाला. व्यासानी सर्व ऋषी मुनींना संपूर्ण जगात श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करण्याचे कार्य दिले. तत्कालीन ऋषी मुनींनी हे कार्य चोख पार पाडले. अशा तऱ्हेने संपूर्ण जगात कृष्णभक्तीचा प्रसार झाला.

भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण जीवन विविध रंगांनी, घटनांनी नटलेले आहे. व्यासांनी कृष्णाला अवतार दर्शविण्या साठी कुठेही चमत्काराचा उपयोग केला नाही आहे. आपल्याला आज त्यातील काही घटना अदभूत वाटत असल्या तरी तत्कालीन विज्ञानाचे ते अविष्कारण आहे. त्या काळातील सामाजिक जीवन वा तंत्रविद्या, अस्त्र विद्या, योगविद्या यावर ग्रंथ उपलब्ध नसल्याने किंवा आता अस्तित्वात नसल्याने आज ते अतीरंजित वाटू शकते. परंतु तत्कालीन मानव हा अनेक गोष्टी मध्यें अग्रेसर होता. तंत्रज्ञान, अनेक विद्या, अस्त्र, शस्त्रें या पराकोटीला पोहचल्या होत्या. मानव अतिप्रगती मुळे विनाशाकडे चालला होता. अस्त्रविद्या तर महाभयंकर स्थितिला पोहचली होती. ज्यायोगे पूर्ण पृथ्वीचा विनाश होऊ शकला असता. आज आपण जे अणुबॉम्ब म्हणतो त्याला त्याकाळी ब्रम्हास्त्र म्हटले गेले आहे. सोडलेले अस्त्र पुन्हा परत बोलावण्याची कला मानावा कडे होती जी अर्जुनाला ज्ञात होती, जी आज नाही आहे. विनाशाकडे नेणाऱ्या या अतिभयंकर अस्त्रविदयेला पूर्णविराम देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला. हे त्याच्या अवताराच एक कारण. आपल्या कर्तृत्वाने या सर्व अस्त्र विद्येचे जाणकार, निपुण योदधे, तंत्रज्ञ या सर्वांचा येनकेन प्रकारे विनाश घडवून आणला व या भूमातेला विनाशापासून वाचविले. हरिवंशपुराणा मध्ये अनेक युद्धांमध्ये अजेय असलेला महान योद्धा या रूपाच वर्णन आहे.

भगवान श्रीकृष्ण याच जीवन उलगडत जाणाऱ्या अनेक पटांमध्ये रंगलेलं आहे.ज्याला जसा हवा तसा तो दिसतो. व्यासांना अपेक्षित असलेला श्रीकृष्ण पूर्णावतारी, पूर्णपुरुष, सर्वाशक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्व साक्षी असा आहे. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानलं जातं. या पूर्वीचे सात अवतार हे अंशावतार आहे. परंतु श्रीकृष्ण हा विष्णु चा पूर्णावतार आहे. असे असूनही तो पूर्ण मानव ही आहे. हीच यातली गोम आहे आणि श्रीकृष्णाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपल्या आयुष्यातील अनेक चमत्कारिक घटनांमध्ये कृष्णाने ज्या गोष्टी केल्या त्या पूर्णपणे मानवी शक्यतातील आहे. या मध्ये जिथे गरज नसेल तिथे कुठेही आपल्या दैवी शक्तीचा वापर केला नाही. वृंदावनात कंसाने पाठवलेल्या राक्षसाना कृष्ण आणि बलरामानी मल्लविदयेच्या जोरावर मारले आहे. कंसासमोर झालेल्या द्वंद्वयुद्धात चाणूर सारख्या मल्लाना याच विद्येच्या निपुणनतेने मात दिली आहे. या विद्येला कृष्णाने योगाची जोड दिली आहे. मल्लविद्येत जो मुष्टिप्रहार केला जातो, त्याठिकाणी न्यास साधनेचा वापर श्रीकृष्ण करीत असे. आपल्या शरीरातील सर्व शक्ति मुष्टिमध्ये आणून प्रहार करणे. याला शक्तीचे एकत्रीकरण म्हणतात. बऱ्याचदा आपण आपल्या शक्तीचे विभाजन करत असतो. सर्व शक्ति जर एखाद्या इंद्रिया मध्ये आणली तर ती किती काम करू शकते हे साधनेच गुपित श्रीकृष्ण नकळत शिकावून गेला. हा चमत्कार नसून साधना आहे. इतर मानवापेक्षा श्रीकृष्णाचा रंग थोड़ा वेगळा होता. सावळा असला तरी त्याला निळसर छटा होती. हेच विष्णुच्या पूर्णावताराच प्रतीक आहे. प्रतेक मनुष्याच्या भोवती एखादया रंगाच वलय असत. ज्याला आपण ऑरा म्हणतो. या वलायाच्या रंगावरुन त्या व्यक्तिची आध्यात्मिक ऊंची ठरली जाते. या रंगवलयामध्ये निळया रंगाच वलय हे परमेश्वराचे मानले जाते. ज्या व्यक्तिभोवती हे वलय असते, तो देवाशी एकरूप झालेला असतो. आपल्या सप्तरंगांमध्ये शेवटचा रंग हा निळसर जांभळा आहे ज्याचे वक्रीभवन सर्वात कमी होते. जो रंग उच्च ऊर्जेचा द्योतक आहे. हाच रंग श्रीकृष्णाचा होता. ज्यामुळे पुतनेच्या विषाचा परिणाम कृष्णावर झाला नाही. हा चमत्कार नसून देवाच्या पूर्णावताराच, अलौकिक सामर्थ्याच लक्षण आहे.

देवाला भावणारा भक्त

राधेचा जन्म हा मानवी रुपात देवाला भावणारा भक्त कसा असावा हे लोकांना समजण्यासाठी झाला असावा. राधा ही भक्तीच पूर्ण रूप आहे. ज्या भक्तीशीवाय देव अपूर्ण आहे. श्रीकृष्णाने त्याच्या देहत्यागानंतर उद्धवाला राधेची भेट घ्यावयास सांगितली होती. जेंव्हा उद्धव राधेला भेटला तेंव्हा तो चकित झाला. कारण राधा कृष्णांच्या भक्तीत बुडून गेली होती, तिला स्थळ काळाच, देहाचं भान राहील नव्हतं. ती पूर्णपणे कृष्णरुप झालीं होती. तिच्या वयातही यत्किंचितही फरक पडला नव्हता. भक्तीच खर रूप उद्धवाला पहावयास मिळालं. या भक्तीच वर्णन उद्धवगीतेत आलेलं आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला गुरू मानलं. जे समर्पण अर्जुनाने केलं ते इतर पांडवांना जमलं नाही म्हणूनच जगाला आजही अर्थ शोधायला भाग पाडणारी भगवदगीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. अर्जुनाच्या रथाला पाच घोडे होते ते पंचप्राण, पंचतत्व याचे प्रतीक होते. ज्याच्या वेसण घातलेल्या दोऱ्या श्रीकृष्णाच्या हाती होत्या. आयुष्य रथाच सारथ्य जर गुरुकड़े असेल तर आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी त्याच निवारण करण्यासाठी सदगुरु समर्थ असतात हेच प्रतित होत. युध्दात येणार कोणतही संकट प्रथम कृष्णाकड़े येणार होत. नारायण अस्त्राचा वापर करण्यात आल्यावर कॄष्णाने सर्वाना नम्रलीन होण्यास सांगितले व ते अस्त्र स्वत: मध्ये विलीन केल. जे अस्त्र सर्व सैन्याचा विनाश करू शकल असत. अख्ख जग विनाशाच्या खाइत लोटल गेल तरी गुरुकृपा असेल तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही हेच यातून प्रतीत होत. कृष्णाने विविध घटना घडवून अर्जुनाला घडविले. अर्जुनानेही उत्तम शिष्यांचे उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे अजिंक्य असणारा अर्जुन कृष्णाच्या देहत्यागानंतर मात्र भिल्लांकडून हरला. यावरून खुप मोठा बोध घेण्यासारख आहे.

विद्यार्थिदशेत असताना पूर्ण वर्षाचा अभ्यास कृष्ण सहा दिवसात पूर्ण करीत असे. हे मानवी अफाट बुद्धिमतेच उदाहरण आहे. हा दैवी चमत्कार नाही आहे. जी साधना कृष्णाने जन्माला घातली ती जर् आपण केली तर आपण ही प्रगल्भ, बुद्धिमान, प्रज्ञावन्त होऊ शकतो. श्रीकृष्णाच पूर्ण चरित्र, त्यातील प्रत्येक कृती मानवाला शिकवण देणारी आहे. आपण त्या कृतिकडे चमत्कार म्हणून पाहिल्यामुळे त्यातील साधनेचे अविष्कार आपल्याला कळु शकले नाही. ज्या साधनेने गोकुळातील स्त्री वर्गाला अतिउच्च आनंदाचा अनुभव दिला. संगीतातून त्यांच्या देहभावाच विस्मरण घडवून आणल. मनमोकळेपणाने आनंदात नाचायला शिकवलं. मन ताजतवान करायच, मनाचं  पृथकरण करायचं तंत्र शिकवल. कृष्णाने आपल्या पवित्र स्पंदनात सर्व गोकुळवासीयांना मंत्रमुग्ध केलं होतं. गोवर्धन हा प्रतीकात्मक शब्द आहे. गो या शब्दाचा अर्थ इन्द्रिय आहे. साधनेच्या द्वारे इन्द्रियांची शक्ती वाढविण्याचे तंत्र कृष्णाने गोपगोपिना शिकविले. याला गोवर्धन म्हटले आहे. इंद्रियाचे वर्धन करणे, म्हणजे त्याची क्षमता वाढविणे. आपण जे पहातो ते खर मानतो पण त्यापलिकड़ेही जे असते ते आपल्याला दिसत नसते, अस जर नसत तर सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला नसता. आज मोबाइलद्वारे आपला आवाज जगाच्या पाठीवर कुठेही पाठवू शकतो. परंतु साधनेद्वारे आपले विचार दूर कोणाकडे ही संक्रमित करता येतात. सकारात्मक स्पंदन पाठविता येतात. एखादयाचे आजारही या लहरी मार्फ़त बरे करता येतात. यालाच गोवर्धन म्हटले गेले आहे. स्पर्श ज्ञान सर्वाना असते. अंध व्यक्तिना याचे ज्ञान अधिक असते अस म्हटलं जात. खरे तर त्याना डोळ्यांनी दिसत नसल्याने स्पर्श ज्ञानाची क्षमता ते स्वत: वाढवितात. ऐकण्याची क्षमताही ते वाढवितात. आपल्याला दिसत असल्याने आपण आपल्या इतर इंद्रियांची शक्ति पूर्णपणे वापरित नाही. सहजोग साधनद्वारे गोवर्धन करण्याचे साधन भगवान कृष्णाने जगाला दिले. जी साधना त्याने राधेला दिली. जी साधना गोपगोपिना दिली, अर्जुनाला दिली, उद्धावाला दिली, अख्या जगाला दिली. तीच सहजोग साधना सदगुरु भाऊ महाराजानी पुनर्जीवित केली व आपल्या शिष्याना दिली व विविध मार्गे करवूनही घेतली. खऱ्या अर्थाने पोकळ असलेल्या जीवानाच्या बासरित, साधनेच्या संगीताचे सप्तसुर भरले असता, हे जीवन संगीताच्या मधुर ध्वनित रूपांतरित होऊन आनंदमयी होऊ शकत. हीच शिकवण. जणु कृष्णाने आपल्या बासरी वादनातून जगाला दिली असावी. दैव कसेही असले तरी त्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे. आपल्या प्रयत्नातून देवाला प्रसन्न करून दैव बदलता येत. एका ब्राम्हण पुत्राला मृत्युलोकातुन परत आणून जीवनदान देऊन श्रीकृष्णाने आपल्या कृत्यातून हे खरे करुन दाखविले. माना मानव वा परमेश्वर ,मी स्वामी पतितांचा। भोगी म्हणुनी उपहासा मी,योगी कर्माचा।

अन्यायाविरुद्ध लढ्याची शिकवण

भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला त्याला अनेक विषयांची अंग आहेत. त्या काळात त्याने १६००० स्त्रियांना बंदिवान बनविले होते. हे कित्येक राजाना माहीत असूनही कोणी याबद्दल ब्र काढीत नव्हता. विरोध करणे लांबच राहील. नरकासुर हा अनेक भारताबाहेरील राजाना स्त्रिया पुरवीत असे. तो त्याचा व्यवसाय होता. ते प्रखरपणे न मांडता आल्याने त्यासंबधी यज्ञाच कारण मांडलं गेलं आहे. खर तर त्या काळातील तो मोठा समाजकंटक होता. त्याचा प्रचंड दबदबा होता. काहीही करून माधवला हा समाजकंटक मोडून टाकायचा होता. कृष्णाला नरकासुराला आव्हान देण्यासाठी काहीतरी कारण हवं होतं. लवकरच ते मिळालं. सत्यभामेच्या बहिणीला पळविले गेले म्हणून तिने कृष्णाला युद्धासाठी तयार केलं. युद्धात सत्यभामा कृष्णाचं सारथ्य करेल अस ठरेल. सत्यभामा ही उत्तम सारथी होती, ही सारथ्य कला कृष्णांने तिच्या कडून त्यानिमित्ताने शिकून घेतली. हे मुद्दाम नमूद करावंसं वाटत कारण त्याने मानवी मर्यादांच पालन केल आहे. दैवीशक्तीच्या जोरावर ते तो करू शकला असता. हे कृष्णांच वेगळेपण आहे. नरकासुराच्या बंधनातुन सोळा हजार स्त्रियांना मुक्त केल्यावर त्यांनी अच्युताला ओवाळले, म्हणून आपण त्या दिवशी दीपावली साजरी करतो. परंतु नंतर त्या रडू लागल्या. कारण त्याचा प्रश्न होता, आता आम्हाला कोण स्वीकारणार? आजही एखादी मुलगी एक रात्र बाहेर राहिली तरी समाज तिच्याकडे विचित्र नजरेने पहातो. माधवाने त्या अबलांचं स्वामित्व घेतलं. स्वामित्व म्हणजे पितृत्व. आपण त्याचा गैर अर्थ काढला. नावाला स्वामित्व घेतलं नाही त्या सर्व स्त्रियांची आपल्या यादवांशी लग्न लावून दिली. त्यांचे संसार उभे केले. या कथेला आध्यात्मिक गूढार्थ आहे. आपल्या शरीरात असलेल्या सोळा हजार नाडयांचा स्वामी श्रीकृष्ण आहे. केशवाला भजले असता किंवा त्याच्या कृपेने त्या सर्व नाड्या शुद्ध होतात, जागृत होतात. असे अनेक गुढार्थ कृष्णकथेत गुंफलेले आहेत. राधा ही सुद्धा एक नाडी आहे, जी विशुद्ध चक्राच्या ठिकाणी स्थित आहे. विशुद्ध चक्राच्या ठिकाणी दोन नाड्या आहेत. एक कृष्णाची जी निळ्या रंगाची आहे व दुसरी पांढऱ्या रंगाची राधेची. या दोन्ही नाड्या नादब्रम्हाने, संगीताने, हरिस्तवनाने जागृत होतात. राधा ही भक्तीची नाडी आहे, जी कृष्णाच्या स्तवनाने जागृत होते. हे कृष्ण भक्तीच गुपित आहे. सारथ्यकुशल सत्यभामा ही पण एक आध्यात्मिक नाडी आहे.जी आपल्या प्राणांच सारथ्य करते. 

दिल्लीला जनपद रोडवर एक जून संग्रहालय आहे. या संग्रहालयात पाच हजार वर्षा पूर्वीची शस्त्रे आयुधं ठेवलेली आहेत. त्या ठिकाणी एक शस्त्र आहे जे बुमरँग सारख वापरले जात होते. श्रीकृष्णाच सुदर्शन चक्र अशाच पद्धतिच होत. जे फेकल्यावर पुन्हा आपल्या कड़े येत असे. अजेय अस सुदर्शन चक्र, ज्याचे निमिषमात्रे हजारो फेरे होत असत ते फक्त केशवाकडेच होत. आध्यात्मिक सुदर्शन चक्राचा अर्थ वेगळा आहे. ज्याला आपण भक्तांच्या पाठीशी असणार, परमेश्वराच्या असीम शक्तिच सुरक्षा कवच म्हणू शकतो. श्रीकृष्णाच्या कृपेने ते प्राप्त होते. जे कवच आपल दैविक, भौतिक, आधिदैविक संकट भेदु शकत नाही. मात्र आपल्याला त्यासाठी देवाची अनन्यभक्ति करणे गरजेचे आहे. अनन्यभक्ति म्हणजे देवावर केलेल आत्यंतिक प्रेम. जे राधेने केल, जे मीरेने केल. मग त्या सुदर्शन चक्रांची कृपा आपोआपच प्राप्त होते. स्वतः देव असूनही मानवाप्रमाणे उत्तम संततीसाठी तपश्चर्या केली आहे. महादेवाची बारा वर्ष तपश्चर्या केल्यावर जे अपत्य जन्माला आल त्याच नाव सांब ठेवले. या कृतितुन माधावाने समस्त भक्तानां तपाचे महत्व पटविले आहे. वेळ आल्यावर ज्या देवाची उपासना केली त्याच महादेवांच्या विरोधात शस्त्र ही उचलेल आहे. श्रीकृष्ण आणि महादेवांमध्ये झालेली भीषण लढाई हरिवंश पूराणात दिलेली आहे. हा देवाच सर्वापेक्षा वेगळा आहे. गोकुळातून कंसाला दही, दूध, लोणी पाठविले जात असे. त्या दही दुधावर प्रथम वासरांचा आणि मग बालकांचा अधिकार आहे. सबब ते कंसाला पाठवू नये असे क्रांतिकारक पाऊल लहान वयातच कृष्णाने उचलेल होत. अन्याया विरोधात उभ राहाण्याचा संदेश जणू आपल्या कृतितुन जगाला दिला आहे.

श्रीकृष्णाचं वेगळेपण

श्रीकृष्णाच्या आठ पत्नी मध्ये रुक्मिणी ही वेगळी होती. इतर स्त्रियां माधवाला फक्त नवरा मानत असत. परंतु रूक्मिणीच अशी होती कि जी कृष्णाला गुरु मानत असे. श्रीकृष्णाची सुवर्ण तुला केली असता काही केल्या पारड वर जात नव्हतं. रुक्मिणीने एक तुलसी पत्र ठेवताच पारड खाली गेल. या कथेत बराच अर्थ लपला आहे. परमेश्वराची तूलाना कशानेही होऊ नाही. मात्र भक्तिच एक तुलसी पत्र देवाला तोलु शकत. ज्ञानेश्वर आपल्या अभंगात,गवळणीत भगवंताला बापरखुमादेवीवरु असा नामोल्लेख करतात. कोणत्याही संताने इतर पत्नीच्या नावे माधावाला संबोधले नाही आहे. ही रुक्मिणीच्या शिष्यत्वाला मिळालेली पावती म्हणावी लागेल. रामाने आपल्या अवतारात एक पत्नी एक वचनी हे ब्रीद राखले. परंतु त्या जन्मात रामाने ज्याना ज्याना जी वचने दिली होती ती सर्व श्रीकृष्णाने पूर्ण केली. भले त्यासाठी त्याला स्वतः ला कलंक माथ्यावर घ्यावा लागला. हलाहल प्राशन करणारा महादेव देवेश्वर ठरतो, परंतु हजारो स्त्रियांच पितृत्व, स्वामींत्व घेऊनही भोगी म्हणून कलंकित होणारा दूसरा देव नसेल म्हणूनच श्रीकृष्ण हा सर्वापेक्षा वेगळा आहे.

महाभारत युद्धाच्या शेवटी अश्वत्थामाने ऊत्तरेच्या गर्भावर ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला. जेणेकरून पांडवांचा वंश समूळ नष्ट होईल. या चूकीची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळावरील मणि कापून काढला व त्याला शाप दिला. ज्या शापास्तव आज ही ओली जखम घेऊन नर्मदा किनारी अश्वत्थामा फिरत आहे. ब्रम्हास्त्राच्या प्रयोगामुळे उत्तरेने मृत पुत्राला जन्म दिला. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मुख़ातून काही वाक्य बाहेर पडली, ती अशी होती. मी जर आजन्म सत्याच पालन केल असेल, आजन्म ब्रम्हचार्याच पालन केल असेल, कधीही अधर्माने वागलो नसेन तर हे मूल जीवंत होईल. आणि ते मूल जीवंत झाल. कोणालाही बुचकळयात टाकणारी वाक्य आहेत ही. कृष्णाला आठ पत्नी होत्या. शिवाय सर्वाना मुलही झाली होती मग ब्रम्हश्चर्य कस? अगर तस नसत तर मूल जीवंत झालच नसत. तिथेहि कृष्ण आपल्या दैवी शक्तिचा वापर करुन मुलाला जीवंत करू शकला असता. परंतु त्याने तस नाही केल, हेच त्याच वेगळेपण आहे. यातून एक धड़ा समस्त मानव जातीला त्याने दिला आहे. आपण जर सत्याने वागत असु, धर्माने वागत असु, तर आपला शब्द खोटा ठरणार नाही, असत्य ठरणार नाही. आपण जे बोलू तसच होईल. यालाच वाचा सिद्धि म्हणतात, जी प्राप्त होण्यासाठी साधनेबरोबरच, जिभेला सत्य बोलण्याची सवय लावायला हवी.

दूसरा भाग ब्रम्हश्चर्याचा जो अतिमहत्वाचा आहे, जो कर्म सिद्धांताशी निगडित आहे. आपण जे क्षणा-क्षणाला कर्म करीत असतो ते आपल्या खात्यात जमा होत असत. कर्माच्या प्रकाराप्रमाणे त्याच फळ मिळत असते. चांगल्या वाईट कर्माच्या वर्गवारी प्रमाणे बरे वाईट फळ मिळत  असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल पूर्वसंचित कर्मप्रारब्ध कारणीभूत असत. आपण नेहमीच आपल्या दैवाला दोष देत असतो. कारण आपल्याला माहित नसत मागील जन्मी आपण कोण कोणती कर्म केलेली आहेत. दैवजात दुखाने मनुजा पराधीन केले, त्या पतितांचे केवळ रड़णे मजला ना रुचले. मग यातून सुटका कशी करुन् घ्यायची?  भगवान कृष्णाने अर्जुनाला याच उत्तर दिल आहे. कृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तू जे जे कर्म करशील ते ते कर्म मला अर्पण कर हेच कर्म सिद्धांताचे सार आहे. याच्या थोडक्यात अर्थ असा आहे की आपण जे कर्म करतो ते जर ईश्वरार्पण, गुरु अर्पण केल तर त्याच्या पुण्याचा आणि पापाचा काहीही संबध उरणार नाही. सबब त्या कर्मासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. हे समजायला उमजायला जेवढ सोप तेवढच आचरणात आणायला कठिण.  कृष्णाने यातून ही शिकवण तर दिलीच पण स्वतः ही आचरणात आणली. तस नसत तर ऊत्तरचा पुत्र जीवंत झाला नसता.

साई चरित्रामध्ये या संबांधि एक छान कथा आहे. एकदा चरित्रकार दाभोलकर बाबांचे पाद संवाहन करीत असतात. हात झटकताच त्यांच्या खाकी कोटाच्या वळकटीतून पंधरा-विस फुटाणे खाली घरंगळत  पडतात. बाबा मुळातच विनोदी होते. ते सहज म्हणाले. या हेमाडपंताना एकट एकट खाण्याची भारी सवय आहे. दाभोलकर अचंबित झाले. ते बाबाना म्हणाले, मी आज शिर्डीचा बाजार पाहिला नाही, फुटाणे घेतलेच नाहित तर खाणार कुठून?  मला एकट खाण्याची सवय नाही, कोणाला दिल्या शिवाय मी एकटा खात नाही. त्यावर बाबा म्हणाले. अरे पण जेंव्हा खातोस तेंव्हा तरी माझी आठवण काढतोस का? दाभोलकर यावर निशब्द झाले. खरच आपण जे ग्रहण करतो ते प्रथम सदगुरुना अर्पण करावे मगच ग्रहण करावे मग ते काहीही असो. हेच श्रीकृष्णाच ब्रम्हश्चर्य

जन्म रहस्य – ईच्छा शक्ती

श्रीकृष्ण हे देवकीच आठव अपत्य. आकाशवाणी मुळे कंसाने देवकी व वासुदेव या दोघांनाही तुरुंगात ठेवले होते. देवकीची पाच अपत्य तिच्या डोळ्या समोर कंसाने मारली. या घटनेने देवकी व वासुदेव हावलदील झाले होते. कंसाबद्दल मनात प्रचंड घृणा निर्माण झाली होती. दोघे ही सात्तत्याने देवाचा कळकळीने धावा करत होती. कंसाला संपवणारा खरच कोणी तरी जन्माला यावा अशी देवकीच्या मनात प्रचंड इच्छा निर्माण झाली.अशी ईच्छा शक्ति निर्माण व्हावी हीच परमेश्वराची इच्छा होती. ईच्छा शक्तीच्या जोरावर भीष्म इतके दिवस बाणांच्या शय्येवर जीवंत राहू शकला होता. श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म ही अशाच ईच्छा शक्ति मुळे झालेला आहे. श्रीपाद वल्लभ अवतारात एक ब्राम्हण स्त्रीच्या पोटी मतिमंद मुलगा जन्माला आला. त्याचे वडील खूप विद्वान ब्राम्हण होते. त्याकाळी अशा विद्वान ब्राम्हणाना “अध्यापक” म्हणत असत. कालांतराने ते निधन पावले. मतिमंद असल्याने लोकांनी त्या मुलाची निर्भत्सना, अपमान करवयास सुरवात केली. एके दिवशी हे एवढं परकोटिला पोहचल की ते मातापुत्र नदित जीव द्यायला गेले. श्रीपाद वल्लभ तिथे असल्याने त्यांनी त्याना आत्महत्या करण्यापासुन परावृत्त केल.त्या मुलाला श्रीपादवल्लभानी आशीर्वादाने हुशार बनविले. परंतु या सगळ्या प्रकारणाने त्या ब्राम्हण स्त्रीच्या मनात आपल्या पोटी जगदवंद्य पुत्र जन्माला यावा ही प्रबळ ईच्छा निर्माण झाली. त्या स्त्रीने श्रीपादवल्लभांकडे तसा आशीर्वाद मागितला. श्रीपादवल्लभानी तिला तसा आशीर्वाद दिला व शनिप्रदोषाचे व्रत करवायास सांगितले. मनातील आत्यंतिक प्रबळ ईच्छा व तप या दोन्ही गोष्टीमुळे पुढील जन्मी तिच्या पोटी स्वतः श्रीपादवल्लभानी श्रीनृसिंह सरस्वतीच्या रूपात जन्म घेतला. पुढे श्रीगुरू यांच्या लीलांवर श्रीगुरुचरित्र हा परमपावन ग्रंथ निर्माण झाला. दत्तभक्तीची पताका संपूर्ण जगात फडकली.

छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंचे सहावे अपत्य. पहिली पाच अपत्य जीवंत राहिली नव्हती. सर्व ठिकाणी अराजकता माजली होती, जिजाबाईंची भावंडं मारली गेली होती. हिंदु पतन चालू झाले होते. आया बहिणींवर बलात्कार होत होते. जिझिया कर बऱ्याच ठिकाणी लावला गेला होता. जनता अक्षरश: रडकुंडीला आली होती. कोणीही सुरक्षित नव्हता. या सर्वाचा प्रतिशोध घेणारा कोणीतरी आपल्या पोटी जन्माला यावा ही प्रबळ इच्छा जिजाऊंच्या मनात निर्माण झाली होती. गुंडा महाराज यांच्याकड़ून कृष्णसाधनेचे धड़े मिळाले होते. प्रबळ इच्छा व साधना या दोन्ही गोष्टिमुळे जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. या तिन्ही घटनांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, साधना व आत्यंतिक प्रबळ इच्छेच्या जोरावर आपल्या पोटी देवही जन्माला येऊ शकतो. दुर्दम्य ईच्छाशक्तिच्या जोरावर दशरथ माँझी नावाच्या माणसाने कोणाची मदत नसताना एकटयाने भला मोठा रस्ता अथक परीश्रमाने खोदून तयार केला. हाहि एक चमत्कारच आहे. आजही अशा घटना घडताना दिसतात. एक माणूस पिकनिकला गेला असता डोंगराच्या कपारित अडकून पडला. वेळ आल्यावर त्याने स्वतःचाच हात कापून काढला पण तो जीवंत राहिला. दुर्दम्य ईच्छा शक्ति मानवाकड़ून अलौकिक कार्य करवून घेऊ शकते. आपली ईच्छाशक्ती पराकोटीला पोहचविणे व त्याला अनन्यभक्तीची जोड देणे हे कृष्णसाधनेच इंगित आहे. आठवा हो आठवा, हे वाक्य आपण बऱ्याचदा अनेक कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं असेल. कृष्ण हे देवकिच आठव अपत्य होत. म्हणून त्या कृष्णाला आठवा असा त्याचा साधा सोपा अर्थ आहे, का त्यात आणखी काही अर्थ लपला आहे ?

| दैवापेक्षा देव श्रेष्ठ | प्रयत्नांती परमेश्वर | –  सदगुरु भाऊ महाराज

प्रत्येक व्यक्तीच्या जन्माबरोबर त्याच नशीबही त्याच्या बरोबर येत. मागील जन्मातील कर्माप्रमाणे पुढील जन्माचं नशीब तयार होत असत. याला संचित क्रियामाण सत्ता अस म्हणतात. आपल्या पूर्वजांनि प्रत्येकाच नशीब त्याला संमजू शकेल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. अगस्ति ऋषिनी तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाच भकित सांगणारी पट्टी बनवून ठेवली आहे. अनेक ठिकाणी त्या उपलब्ध आहेत. जन्माला येणारी व्यक्ती तारांगणात असलेल्या ग्रहांच्या स्थिती प्रमाणे ज्या ग्रहांकीत स्थितीवर जन्म घेते त्याप्रमाणे त्याच नशीब दर्शविते. त्याप्रमाणे कुंडली मांडली जाते. कुंडलीतील आठव घर हे मृत्यूच आहे. आठव घरातील मृत्यूच स्थान बदलायचं असेल तर त्या आठव्याला आठवायला हवं. आध्यात्म शास्त्राप्रमाणे एक कोटी जप झाल्यावर आपलं एक घर पुढे जात. म्हणजेच आपलं दैव बदलत. योग्य प्रकारे ईश्वर साधना केली असता आपलं दैव आपणच बदलू शकतो, मृत्यू ही पुढे ढकलता येतो. गाणगापूर येथे दीपावलीच्या पहिल्या दिवशी भीमा अमराजा संगमतीरी अष्टतीर्थ यात्रा केली जाते. ज्याला अभ्यंग स्नान म्हणतात. श्रीगुरु (श्री नृसिंहसरस्वती) यांनी आपल्या शिष्याना याच दिवशी अष्टतीर्थ यात्रा करावयास सांगितली. नदितीरी आठ तीर्थ आहेत त्या प्रत्येक तीर्थात स्नान करणे म्हणजे अष्टतीर्थ यात्रा. सलग सात वर्षे ही यात्रा केल्यास आपले सर्व संचित स्वच्छ होते,अस मानल जात. या तीर्थांची संख्या सुद्धा आठच आहे. कृष्ण हा आठवा होता आणि त्याचा जन्म अष्टमीला झाला होता. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी निर्देशित करतात. सदगुरू कृपेने, ईश भक्तीने आपलं संचित बदलता येत. इथे कृष्णभक्ती दत्त भक्तीशी एकरूप झालेली दृष्टीस पडते.

पांडवांचा वनवास

महाभारतातील अनेक घटना मानवला बरच काही शिकवण देणाऱ्या आहेत. भगवान कृष्णा सारखा सखा असताना पांडवांना वनवास घडावा? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नेहमीच डोकावत असतो. अनेक देव भक्ताच्या बाबतीत अशा घटना घडताना दिसून येतात. डोळ्यासमोर चालणाऱ्या, सत्याचा पाठपुरावा करणाऱ्या, नेकीने व्यवहार करणाऱ्या, आयुष्य देवभक्ती साठी झिजवणाऱ्या लोकांच्या आयुष्यात वाईट का होत असते? देवा मी कोणाचं काय वाईट केलं जे मला हे भोगाव लागते आहे? असे प्रश्न या मार्गातील प्रत्येकाला पडतो. कृष्ण हा देव होता, तो खेळली जाणारी द्यूत क्रीडा थांबवू शकला असता पण जुगाराने आयुष्य बरबाद होऊ शकत हे लोकांना माहीत असूनही लोक त्याच्या आहारी जातात. कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. राजमहालात राहणाऱ्या पांडवांना ईश्वर भक्ती करता आली नसती. अहंकार संपला नसता. असत्याची लढाई संपवण्यासाठी लागणारा त्वेष मनात निर्माण झाला नसता. स्वतःला ओळखता आलं नसत. जे वनवासाने घडवून आणल. वनवासाने काही नियम होते ज्याचं पालन करणे क्रमप्राप्त होत. उंची वस्त्र नेसता येत नाही, नोकर बाळगता येत नाही, चांगल्या घरात, गावात, शहरात रहाता येत नाही. सुगंधी द्रव्य वापरता येत नाही. असाच वनवास राम, लक्ष्मण आणि सीतेनेही भोगला होता. हे सर्व नियम पाहिल्यावर लक्षात येत की ज्याला साधनेत बला विद्या म्हणतात त्याच पालन करणे म्हणजे वनवास. सदगुरु भाऊ महाराजांनी गाणगापूर, नृसिंहवाडी येथे गुरुचरित्र पारायणासाठी असेच नियम ठेवलेले आहेत. गुरुचरित्र पारायण करणाऱ्याने पारायण काळात केसाला तेल लावू नये, अंगाला साबण लावू नये, चप्पल घालू नये, चमचमीत जेवण घेऊ नये, उंची वस्त्र वापरू नये हे नियम आहेत. जे साधकाला घडवतात. अंतर्बाह्य स्वच्छ करतात. ही स्वच्छता मनाची, चित्ताची, गुणांची आहे जी साधनेने होते. वनवासाच्या काळात कृष्णाने पांडवांकडून साधना करवून घेतली. चौदा वर्षे अनंत व्रत करून घेतलं. पूर्वी केलेल कर्म साधनेने धुवून काढलं. मोक्षासाठी योग्य बनवलं. अज्ञात वासात उरला सुरला अहंकारही घालवून टाकला. याच एक कारण अस होत की साधनेच्या दृष्टीने परिपक्व होणे व दुसरा अर्थ असा आहे की राजकर्त्याला तळागळाच्या लोकांची दुःख कळली तर ते जनतेची योग्य काळजी घेऊ शकतात. याच काळात कृष्णाने महाभारताच्या भीषण युद्धासाठी पांडवांना तयार केलं. बऱ्याचदा सदगुरुची किमया आपल्याला कळत नसते. शिष्य घडण्यासाठी अनेक घटना घडवून आणत असतात. पांडवांचा वनवास हा त्यातीलच भाग असावा. हिऱ्याला पैलू पाडताना झिझावच लागत. वेळप्रसंगी स्वतःचे काही भाग आपल्यापासून वेगळे करावे लागतात तेव्हा कुठे तो हिरा चमकू लागतो.

श्री गुरुचरित्रात श्री गुरूंनी सायंदेवाची परीक्षा घेतली. अखंड सदगुरूंच्या जवळ राहणं म्हणजे वाटते तितके सोपे नव्हे. गुरूभक्ती किती प्रखर असावी याची अनुभूती दिली. सायंदेव लिन झाला व म्हणाला, हे पूर्णब्रम्हां गुरुभक्त्ती कशी करावी हे आपण मज सांगावे.? यावर श्री गुरूंनी एक कथा सांगितली. त्वष्टा ब्राह्मणाचा मुलगा गुरूगृही शिक्षणं घेत असतो. एक दिवस पावसामुळे आश्रमात पाणी गळू लागते. तेव्हा गुरू त्याला आज्ञा करतात की एक असे गुरुकुल बांधावे की ज्यावर पावसाचा काहीही परिणाम होणार नाही. गुरुपुत्र, गुरूपत्नी, गुरुकन्या आपापल्या मागण्या त्याच्या समोर ठेवतात. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो त्वष्टापुत्र बाहेर पडतो. काय कराव आणि कस कराव हे त्याला काही कळत नसत. चिंतेत असतना मार्गात त्याला एक अवधूत भेटतो. त्वष्टापुत्राच्या चेहऱ्यावरील चिंतेच कारण विचारतो. तो सर्व हकीकत सांगतो. यावर अवधूत त्याला काशियात्रा करावयास सांगतो. ज्यायोगे महादेव प्रसन्न होतील व तूच विश्वकर्मा होशील. परंतु ज्याला पत्रावळी सुद्धा बनविता येत नसतात, तो एवढी यात्रा कशी करणार? म्हणून स्वतः अवधूत यात्रा कशी करावी याची माहिती देऊन त्याला स्वतः बरोबर काशीला घेऊन जातो. त्याच्याकडून नियमानुसार यात्रा करवुन घेतो व एकेक्षणी गुप्त होतो. त्वष्टापुत्राचे डोळे भरून येतात. हा नक्कीच देव असावा अथवा माझे गुरुच असावेत. अस तो म्हणतो. उरलेली यात्रा तो सांगितल्याप्रमाणे पूर्ण करतो. नियमानुसार यात्रा केल्याने प्रत्यक्ष महादेव त्याला प्रसन्न होतात व तूच विश्वकर्मा होशील असा वर देतात. गुरुगृही जाऊन सर्वकाही म्हणाल्याप्रमाणे बनवून दिल्याने गुरुची त्यावर प्रसन्न होतात. या कथेला बरेच कांगोरे आहेत. या एका कथेने सायंदेवाला गुरुभक्तीचे ज्ञान झाले. गुरूने त्वष्टापुत्राकडे असे विचित्र मागणे करावे हे त्याला घडण्यासाठी होते. गुरुआज्ञा पाळण्यासाठी तो जीवाची पर्वा न करता बाहेर पडला हे उत्तम शिष्याच लक्षण होत. रस्त्यामध्ये अवधूत भेटणे ही गुरुलीला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या मागण्या केल्या गेल्या होत्या त्यावर तीर्थाटन हा उपाय न समजणारा आहे. परंतु विचित्र मागण्या पूर्ण करणे हा उद्देश्य नसून त्यायोगे शिष्या कडून यात्रा व्हावी अशी गुरुची योजना दिसून येते. श्री गुरुचरित्रात या कथेचं फार सुंदर वर्णन केल गेलं आहे. सायंदेव श्रीगुरूंना म्हणतात, देवा तुम्ही गोष्ट सांगत असताना खरे तर माझ्याकडूनच काशी यात्रा करवून घेतली आहे, असा मला भास होत होता. हा भास नव्हता श्रीगुरूंनी सायनदेवाला कथेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष काशियात्रा घडविली होती. या कथेच सार लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने पांडवाना वनवासात का पाठविले याचा गर्भितार्थ लक्षात येईल.

विरोध भक्ती..!!!!

श्रीपाद चरित्रामृतामध्ये मानवाच्या बारा अवस्थांचं परीक्षिलन केलेल आहे. शेवटच्या बाराव्या अवस्थेत राम, कृष्ण, श्रीपाद वल्लभ यांची वर्णी लागते. भगवान कृष्ण आणि श्रीपाद वल्लभ हे मुळात एकच रूप आहेत. या दोन्ही रूपात आपल्या भक्तांना त्यांच्या कित्येक जन्माच्या ऋणानुबंधातून मुक्त केले आहे. जसे कृष्णाला देव समजणारे व त्याला पुजाणारे, त्याची भक्ती करणारे होते तसेच विरोध भक्ती करणारेही होते. विरोध भक्ती म्हणजे त्या व्यक्तीचा अत्यंत द्वेष करणे. परंतु द्वेष करताना ती व्यक्ती ज्याचा द्वेष करते त्याचाच नामजप करत असते. नकळत त्याच्या कडून नामजपच होत असतो. कंस हा कृष्णाला मारायला टपला होता, त्याने पाठवीलेल्या सर्व राक्षसांना कृष्ण बलरामाने मारले होते. कृष्णांची वाढती शक्ती पाहुन कंस अधिकच चिंताग्रस्त झाला होता. जळी, स्थळी त्याला कृष्णचं दिसत होता. नकळत त्याच्या कडून कृष्णाची विरोध भक्तीच होत होती. ती सुद्धा भगवंताला प्रिय आहे. कंसाच्या सर्व मल्लाना मारल्यावर कंसाला आपला मृत्यू दिसू लागला. जेव्हा कृष्ण कंसाकडे पोहचला तेव्हा त्याला वाटलं, आता कृष्ण माझा जीव घेणार. परंतु कृष्ण म्हणाला, मी माझ्या भक्ताला कस मारेन? कंस हे ऐकून चकित झाला व म्हणाला, मी तुला ठार मारण्याचा रात्रंदिवस विचार करीत असताना मी तुझा भक्त कसा होऊ शकतो? कृष्ण म्हणाला, तू मला संपवण्याचा विचार करीत असतानासुद्धा माझाच विचार करीत होतास, म्हणजे माझेच स्मरण करीत होतास. जे मला प्रिय आहे. कृष्णाने कंसाचा आत्मा आपल्या मध्ये विलीन केला व त्याला मुक्त केलं. श्रीपाद चरित्रात श्रीपादांचा द्वेष करणाऱ्या नरसावधानी यांना मृत्यूनंतर जिवंत केले व केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त घेण्यासाठी एक नवीन आयुष्य प्रदान केले. नरसावधानी यांच्या कडून श्रीपादांची विरोध भक्तीच होत होती. आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तीलाही परमेश्वर सतमार्गाला लावतो हेच जगतनियंताचे वैशिष्ठय आहे. कारण परमात्मा हा सृष्टिच्या आधीचा आहे, सुष्टी निर्माण कर्ता आहे. या नियमाने सर्व मानव त्याची लेकरं आहेत.जरी उनाड असला तरी आईसाठी मुल हे मुलचं असते.

अवलोकन परमेश्वराच..!!!!

परमेश्वराच हे रुप अवलोकन करताना मनामध्ये काही प्रश्न उभे रहातात. ज्याचा मृत्यू कृष्णाच्या हातुन झाला त्यांचे काय? प्रत्येक घटनेचं उत्तर त्या व्यक्तीच्या पूर्व जन्मात लपलेले असते. युद्ध काळात भीष्म शरशय्येवर कित्येक दिवस पडून होता. त्याबद्दल त्यांनी कृष्णांला विचारले असता त्याने मागील जन्माचा दाखला दिला. एका जन्मात भीष्माने एका सरड्याला काटे टोचून टोचून मारले होते. त्याचेच भोग म्हणून असा मृत्यू पत्करावा लागला. नियती कोणालाच माफ करीत नाही. परंतु सदगुरु आपल्या भक्तांचे / शिष्याचें भोग वेगळ्या अवस्थेतही ते भोग भोगवून संपवितात. स्थूल देहानेच भोग भोगले पाहिजे असा नियम नाही आहे. श्रीपाद वल्लभांनी शंकरभटाची साडेसाती आठ दिवसात संपविली. सदगुरू आपल्या शिष्याला बऱ्याचदा स्वप्नात मारतात, शिक्षा करतात, मृत्यू दर्शन घडवितात, विविध भयंकर घटना दाखवून त्याचे भोग स्वप्नातच संपवितात, म्हणूनच गुरुगीते मध्ये महादेव नास्ति तत्वम् गुरो: परम् अस म्हणतात. भगवान कृष्णांच्या हातून ज्यांना मृत्यू प्राप्त झाला त्यांचं भाग्य थोर. देवाच्या हातून मृत्यू येणे हे सुद्धा परम भाग्यच म्हणावं लागेल. कृष्णाने आपला देह विसर्जित केल्यावर पांडवांनी त्याचा देह अग्नीसमर्पण केला. पण अग्निसंस्कारात त्याचे हात आणि पायच जाळले ज्याने तो युद्ध खेळला होता. बाकीचा देह तासाच राहीला, मग तो नदीत समर्पण करण्यात आला. जो पुढे जगन्नाथ पुरीला पोहचला.

वचनपुर्ती

एक वचनी व एक पत्नी अस रामाचं रूप आहे. त्या काळात बहुपत्नीत्व हा प्रकार रूढ झाला होता. त्यावर उपाय म्हणून रामाने हे ब्रीद राखले होते. रामावतारामध्ये रामाने अनेक लोकांना जी वचने दिली होती, ती कृष्णाने आपल्या अवतारात पूर्ण केली. ज्या स्त्रिया रामावर भाळल्या होत्या व त्याच्याशी लग्न करू इच्छीत होत्या, त्यांना रामाने पुढील जन्मी मी तुमच्याशी लग्न करेन असे आश्वासन दिले होते. त्यांच्याशी कृष्णाने या जन्मी लग्न केले. जांबुवंताबरोबर कुस्ती खेळून त्याची ईच्छा पूर्ण केली. जी जी आश्वासने रामाने दिली होती ती सर्व कृष्णाने पूर्ण केली. रामाकरवी झालेला वाली वध शास्त्र संमत नव्हता. रामाकडून ती चूक झाली होती. त्या वालीचा पुढील जन्म व्याधाच्या रूपात झाला. व्याधाच्या हातून बाण लागावा हा कृष्णाचाच संकल्प होता. व्याधाकरवी मृत्यू स्वीकारून कृष्णाने रामावतारातील कर्माचे फळ या जन्मी स्वीकारले. देवालाही कर्म फेडावे लागते हे भक्तांना दाखवून दिले. श्रीपादवल्लभ व नृसिंहसरस्वती अवतारात असाच एक संदर्भ समोर येतो. एका रजकाला आशिर्वाद देऊन त्याला पुढील जन्मी मुस्लिम राजाच्या, बिदरच्या बादशहा पोटी जन्माला घातले. या घटनेच्या बाबतीत काही बुद्धिवादी लोक आपल्या भुवया उंचावतात. प्रश्न असा उभा राहातो की म्लेंच्छ राजा पोटी जन्माला घालण्या ऐवजी हिंदू राजा पोटी का नाही घातले? याचे उत्तर असे आहे. हिंदू राजा त्याकाळात उरला नव्हता आणि जे उरले होते त्याना फारशी किंमत नव्हती. त्याने फारसा फरक पडला नसता. आपल्या एका सहचर्याला शिवाजी महाराजाच्या रूपात जन्माला घालून स्वराज्य निर्माण करणे हा श्रीपादांचा संकल्प होता. देव हा निसर्गचक्राच्या, नियती चक्राच्या कधी आड येत नाही. परंतू त्यामध्ये नावीन्य निर्माण करून काही गोष्टी बदलता येतात. रजकाचा मनात ईच्छा व्हावी ही श्रीपादांचीच ईच्छा होती. त्याप्रमाणे तो बिदरच्या बादशहा पोटी जन्माला आला. मागील जन्माच्या संस्कारामुळे त्याच्या मनात हिंदूविषयी प्रेम होते. भेटीमध्ये पूर्वजन्माचे स्मरण करवून त्या काळातील मुस्लिम राजकर्त्या करवी हिंदूंचे होणारे छळ थांबविले गेले. ही कथा गुरुचरित्र ग्रंथामुळे सर्वश्रुत आहे. याबाबतीत कोणीही वाद घातलेला दिसून येत नाही याचा अर्थ ही घटना सर्वमान्य आहे. कारण बिदरच्या बादशहाच्या राहत्या राजवाड्यात दत्त मंदिर आहे. एक प्रकारे इतिहासाला देवाने नवे वळण दिले आहे.

विजयनगर च्या साम्राज्याचा पाया बसविणारे हरिहर आणि बुक्क यांच्या पाठीशी विद्यारण्य स्वामींनि उभे राहावे ही आज्ञा स्वतः श्रीपादांनी त्यांना दिली होती. श्रीपादांचा कालखंड हा इ.स. १३२० ते १३५० हा मानला जातो. श्री नृसिंहसरस्वती यांचा कालखंड इ. स. १३७८ ते १४५८ हा मानाला जातो. इ.स. १४५८ साली श्रीगुरु निजांनदी गेले. कर्दळी वनात अंदाजे ३०० वर्षे तपस्या करून स्वामी समर्थ रूप धारण करून प्रज्ञापुरी आले. या कालखंडात स्वामी भक्तांपासून दूर का राहिले? असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभविक आहे. यदा यदा ही धर्मस्य संभवामी युगे युगे हे भगवान कृष्णाचे वाक्य आहे. कलियुगाची सुरवात होऊन त्याच्या प्रभावाला सुरवात झाली होती. मानवाला योग्य मार्गावर आणण्यासाठी कृष्णाने श्रीपाद रूपात आणि नंतर श्री नृसिंहसरस्वती रूपात जन्म घेतला. देव आपला शब्द नेहमीच खरा करून दाखवितो. मात्र आपणास त्याला ओळखता येत नाही आणि नंतर वेळ निघून गेलेली असते. या तीनशे वर्षाच्या कालखंडात स्वामी, तीनशेहून अधिक सिद्ध पुरुषांकरवी भरकटलेल्या जनांना सन्मार्गाची दिशा दाखविण्याचे कार्य करीत होते. हे सिद्ध पुरुष एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांची दुःख दूर करण्याचं कार्य करीत होते. आजही हे कार्य अविरतपणे चालू आहे. मग असा एक प्रश्न मनात येतो की भारतीयांना एक हजार वर्षे परचक्र यातना का भोगाव्या लागल्या? याच उत्तर आहे, सतीची चाल ही जी महाभयंकर प्रथा आपल्या कडे हजारो वर्षे चालू होती त्याचे भोग भारतीयांना या एक हजार वर्षात भोगावे लागले आहेत. याही काळात भगवंताने भक्ताला दूर केले नाही आहे, उलटपक्षी विविध रूपात जन्म घेऊन मानवाचे कल्याण करीत आला आहे.

श्री. समीर ए. चव्हाण.