ज्ञान मार्ग – विवेचन

ज्ञान हा शब्द आपण आपल्या दैनंदीन व्यवहारात नेहमीच वापरत असतो. आपल्याला जी विविध विषयांतील सारासार माहिती असते, त्याला आपण ‘ज्ञान’ असे संबोधत असतो. ज्ञान आणि माहिती या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत का? नक्कीच आहेत. कारण जर तसे नसते तर हे दोन शब्द निर्माण झाले नसते. एखाद्या विषयाबद्दल असलेली, वाचलेली, ऐकीव किंवा आपल्या तर्कावर आपणच ठरवलेली असते ती माहिती’. ही माहिती पूर्ण सत्य असेलच असे नाही. आपल्याला माहित असलेली माहिती ही स्थळ, कालाप्रमाणे बदलत असते. नविन प्रयोगाद्वारे माहितीमध्ये बदल फरक पडत असतो. ही माहिती स्थिर नसते. त्यात सतत बदल होत असतो. पिरॉमिडच्या बाबतीत नेहमीच नवनविन बातमी बाहेर येत असते. याचा अर्थ यापूर्वीची माहीती खरी नव्हती का? नक्कीच होती पण अपूर्ण होती. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्याची प्रक्रिया सतत चालू असते. म्हणूनच माहिती ही पूर्ण असू शकत नाही. दररोज नवनविन शोध लागत असतात. नविन गोष्टी माहिती होत असतात. माहितीमध्ये नेहमीच बदल (अपडेट) होत असतो. आपण याच प्रक्रियेला चुकून का होईना ‘ज्ञान’ असे म्हणत असतो.

ज्ञानाची परिभाषा वेगळी आहे. ज्ञान म्हणजे सत्य’ जे त्रिकालबाधीत आहे. शाळेमध्ये आपल्याला शिकविले जाते की सूर्य चंद्र हे शाश्वत आहे. हे खरे आहे का? आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सुर्य चंद्र शाश्वत नाही आहेत त्यांचा ही एक दिवस अस्त होणार आहे. ज्ञान हे शाश्वत आहे. सुर्य-चंद्र शाश्वत नसले तरी त्यांना निर्माण करणारा शाश्वत आहे. हेचसत्य’ आहे. या सत्यरूप परमेश्वराबद्दल असलेल शाश्वत सत्य म्हणजे ज्ञान’. जे कधीही बदलत नाही. या सत्याच्या शोधासाठी ऋषीमुनींनी, साधकांनी, सिद्धांनी आपले आयुष्य खर्ची घातले. डोंगरदऱ्यात, जंगलात आपले आयुष्य घालवले.

गौतमबुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली म्हणजेच सत्यस्वरूप, प्रकाशरूप परमेश्वराच आकलन झाले. या सत्यस्वरूप ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे साधना म्हणजेच अध्यात्म.!!! अध्यात्म म्हणजे जे आपल्या आत्म्याचे स्वरूप जाणून घेण्याचे शास्त्र. जे ज्ञात नाही ते अध्यात्म. जाणीवेच्या, नेणीवेच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताचा शोध. या प्रवासात हळूहळू काही गोष्टी कळू लागतात, उमजू लागतात. अशा तऱ्हेने ज्ञानाच्या प्रवासाला सुरूवात होते. सत्याच्या शोधाकडे जाणाऱ्या प्रवासाला आपण ज्ञान म्हणू शकतो.

आपण चिंच’ असा उच्चार केला की, समोरच्याच्या तोंडात पाणी येते. कारण चिंचाबद्दल, तीच्या चवीबद्दल आपल्या मेंदूत अगोदरच माहीती साठवलेली असते. त्या चवीची आठवण येऊन तोंडात पाणी येते. परंतु परमेश्वराच तसं नाही आहे. ज्याबद्दल काही माहीती नाही, ज्याला पाहिलेले नाही, त्याच्याबद्दल मनामध्ये भक्ती निर्माण कशी होणार? प्रेमभावना कशी निर्माण होणार? येथेच सद्गुरू कृपा कार्य करू लागते. देवाला जाणून घेण्याची प्रक्रिया ज्ञानमार्गातून जाते.

ज्ञानमार्गाचा प्रवास सुकर होण्यासाठी, ज्ञानासाठी ग्रंथाची निर्मिती झाली. देवाने संतांच्या रूपात या भूमीवर जन्म घेतला व काही लील्या केल्या. पुढे याच लीला ग्रंथांमध्ये संग्रहीत झाल्या. मानवाच्या उत्कर्षासाठी जणू काही देवानेच तशी व्यवस्था केली आहे. ग्रंथपठणाच्या अनुषंगाने साधकाच्या सत्याचा प्रवास सुरू होतो. पारायण पद्धतीच्या माध्यमातून साधकाला देवाजवळ जाता येते. परमेश्वराच्या लीला वाचताना साधकाचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. कथा वाचतांना त्या कथांशी आपण एकरूप होऊन जातो. हळूहळू देवाच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान होऊ लागते.

श्रीमान् नृसिंहसरस्वतीस्वामींनी केलेल्या लीला, सिद्धांमुखी ऐकून सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरूचरित्राच्या’ रूपात ग्रंथीत केल्या. श्रीगुरूचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तीमध्ये प्रमाण मानला गेला आहे. श्रीगुरूचरित्राचे प्रामुख्याने ३ विभाग आहेत. १) ज्ञानकांड २) कर्मकांड आणि ३) भक्तीकांड. यातील आपण ज्ञानकांड येथे पाहू; ज्ञानकांड : अध्याय १ला ते अध्याय २४वा या विभागात ज्ञानमार्गाचा उहापोह केला आहे.

आपण ज्या देवाची भक्ती करतो तो देव कसा आहे? व त्या देवाबद्दलची माहीती या विभागात येते. परमेश्वराचं जन्माख्यान, भक्तआशिष, अनुग्रह, लीला इ. तसेच कोणत्या भक्ताला देव कसा पावला इ. ज्ञानाशिवाय कर्म अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. त्यासाठी एक उदा. नेहमी दिले जाते. प्रकाशामुळे दोरखंडाच्या पडलेल्या सावलीला सर्प मानून मनामध्ये भय निर्माण होण्याचं. एखादया ठिकाणी मला पोहचायचं असेल तरी आपण त्या ठिकाणाचा पत्ता घेतो, रस्ते विचारतो, काही माहीती गोळा करतो, मगच मार्गक्रमणा करतो. आताच्या काळात जीपीएस चा वापर करतो. नेव्हगेशन आपल्याला बरोबर त्या (अनोळखी) ठिकाणी घेऊन जाते. सद्गुरू नेमके हेच कार्य करीत असतात. या दत्तभक्तीमध्ये साध्य’ आहेत ते दत्तमहाराज’. त्या साध्यापर्यंत पोहचण्यासाठी लागणाऱ्या साधना म्हणजेच ‘दत्तभक्ती’.

आता ही दत्तभक्ती कशी करावी? त्यातील मार्ग कोणते?

या मार्गात अति महत्वाच काय करू नये? याचं ज्ञान असणं आवश्यक असते. कारण सी.एस.टी. ला जाण्यासाठी मी कल्याणला गाडी पकडली तर मध्ये बरीच स्टेशन लागणार, भुलवणार. दादरची चौपाटी, भायखळयाची राणीबाग. पण जर मी भुललो आणि मध्येच उतरलो तर आनंद मिळेल, पण सी.एस्.टी. ला पोहोचता येणार नाही. नाहीतर पुन्हा भवति-भवती करावी लागणार अंतिम स्थानात पोहचता येणार नाही.

शिष्याची काळजी सद्गुरू घेतच असतात, पण त्यासाठी शिष्याचाही गुरूंवर दृढ विश्वास असणे महत्वाचे आहे. मूळ विषय ज्ञान विषयक आहे. मानव इंद्रिय गोचर आहे. इतर प्राण्यांप्रमाणे तहान, भूक, भय, निद्रा, मैथून इ. विषय मानवातही आहे. जर या विषयात नियंत्रण ठेवले तर आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरू शकतो, अन्यथा नाही. इंद्रिय दमन करणे गरजेचे नाही; किंवा संयुक्तिक नाही. ज्याप्रमाणे षडरिपूंवर विजय मिळवणे कठीण आहे. पण विजय मिळविण्यापेक्षा त्याची जागा बदलणे अति योग्य आहे. जसं की मोह हरिनामाचा धरावा, लोभ गुरूभक्तीचा असावा, मत्सर अनितीचा करावा, क्रोध चुकीच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अन्यायाचा करावा, असं साईबाबा म्हणतात. या सर्वांमध्ये काम या षडरिपूची जागा वेगळी आहे. हा काम उफाळून आल्यावर भलेभले शिकार झाल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. यावर एकच उपाय आहे सद्गुरू स्मरण‘!

श्रीगुरूस्मरणाने कामाची तीव्रता नाश पावते. सद्गुरू आपल्या वर्तनातून, शिकवणीतून, लीलांमधून शिष्याला ज्ञान देत असतात. कारण सर्व साधनेचा पाया ‘ज्ञान’ हाच आहे. आणि कळसही ज्ञानच आहे. परमेश्वराचे ज्ञान झाल्यावरच भक्त देवाशी एकरूप होऊन जातो. श्रीसाईसत्च्चरीत्रात साईबाबांनी ज्ञान’ या शब्दावर शिष्यांना केलेले प्रबोधन सर्वांसाठी प्रकाशाचा मार्ग आहे. शिष्याची साधनेची बैठक निट होण्यासाठी ज्ञानाचा पाया भक्कम होणे गरजेचे आहे. नामदार गोखलेंनी गांधीजीना राजकारणात उतण्यापूर्वी पूर्ण भारत बघून यावयास सांगितले. कारण हेच की भारताची भौगोलिक परिस्थिती, जनमानस, विविधता, आचारधर्म कळल्याशिवाय देशभक्तीचा झेंडा कसा पुढे न्यायचा हे कसे कळणार?

भाऊ महाराजांनी आपल्या शिष्यांकडून सर्व संतांची पारायणे करवून घेतली. जे संत अलीकडच्या काळात होऊन गेले, ज्यांच्याबद्दल इतिहासात नोंद आहे उदा. साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोमाजी महाराज इ. दत्तभक्तीमध्ये ज्ञानचा पाया भक्कम असणे जसे गरजेचे आहे, तसेच संतांचे आशीर्वाद त्याहूनही अधिक कल्याणकारक असतात. संतच आपल्याला सांभाळतात, योग्य मार्गावर नेऊन ठेवतात. सर्व संतांमध्ये एकच गुरूतत्व नांदत असते. ज्ञान कमी असेल तरी चालेल पण संतांचे आशीर्वाद फार महत्वाचे आहे. कारण याच आशीर्वादावर आपण तरून जाऊ.

एखादा उत्तम दाखला द्यायचं झालं तर एकदा एके ठिकाणी किर्तन चालल होते. किर्तनकार हा रक्कम घेऊन किर्तन करणार होता. किर्तनात त्याने संत चरित्राचे पारायण करण्यास सांगितले. खूप लोकांनी ते ऐकलं पण श्रोत्यांमधील एका आजीने ते आचरणात आणलं. संतचरित्र आणवून घेतली आणि आजी ते चरित्र पठण करू लागली. तीला खूप आवड निर्माण झाली. जोडीला नामस्मरणाची गोडी लागली. उठता-बसता तीला संतांच्या लीला दिसू लागल्या. तिच्या ज्ञानात भर पडली. आचरणात फरक पडला. कालांतराने संतांच दर्शन होऊ लागलं. जळी-स्थळी परमेश्वराचे रूप दिसू लागले. अशातऱ्हेने आजीबाई परमेश्वरूप होऊन गेल्या. सांगणारा नामानिराळा राहिला पण कृतीत आणणारा तरून गेला. ज्ञानाचा अर्थ एखाद्या गोष्टी विषयक तंतोतंत माहिती असणे किंवा संतचरित्रातील प्रत्येक अध्याय मुखोद्गत असणे असा अभिप्रेत नाही आहे.

ज्ञानगर्भ समजणे, उमजणे आणि कृतीत उतरणे अभिप्रेत आहे. गुरूचरित्र पारायण करण्यासाठी सोवळ पाळलं जातं. सोवळयात पारायण करावं असा नियम आहे. या सोवळयाच पालन करतान आपल्या मनात सुप्त अहंकाराच बीज निर्माण होतं. सोवळ नसून आपण शिवू नका शिवू नका असे म्हणून सर्वांपासून दूर पळत असतो व नकळतच इतर सर्वांना तुच्छ मानू लागतो. अशा भावनेने केलेले पारायण देवापर्यंत पोहोचणे कठीण आहे. श्रीगुरूचरित्र हा ग्रंथ अति पवित्र आहे. श्रीनृसिंहसरस्वतींनी आजन्म संन्यासधर्माचे पालन केले. जसे देवाचे रूप आहे तसेच त्याप्रमाणे, नियमाने त्याची भक्ती करावी. सोवळ पाळण हा त्यातील भाग आहे. मात्र पारायणासाठी सोवळं परिधान केल्यावर आपण शूचिर्भूत आहोत, पवित्र आहोत, निर्मळ – स्वच्छ आहोत अशी भावना मनात निर्माण होणे अभिप्रेत आहे. याच गोष्टीला आपण ‘ज्ञानगर्भ’ असे म्हणू शकतो.

।। श्रीगुरूदेव दत्त।।

श्री. समीर ए. चव्हाण.