दत्तयाग

याग म्हणजेच यज्ञ. पुरातन काळामध्ये ऋषि मुनी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध यज्ञ करत असत. अग्निदेवतेला आवाहन करून ईष्टप्राप्तीसाठी, देवतांची कृपा होण्यासाठी, ततसंबंधी देवतेला मंत्राची आहुती देऊन प्रसन्न केले जात होते. कालांतराने हळुहळु ती संस्कृती लोप पावत गेली. कारण या प्रकारामध्ये कर्मकांड वाढत जाऊ लागले. परिणामी त्यामागील ज्ञान उदासीन होऊ लागलं. मुळ हेतूला फारकत घेणाऱ्या काही प्रथा अंतर्भूत होऊ लागल्या. या विचारांना फाटा देणारे ज्ञानमार्गाचे उपासक वेगळे झाले. यातूनच काही वेगळे पंथ जन्माला आले. जैन धर्म, बौद्ध धर्माचा उदय यातूनच झाला. कालांतराने यज्ञविधी मागे पडू लागले. काही घरण्याध्ये अग्निहोत्र करण्याचा प्रघात होता. आजही काही लोक अग्निहोत्र करतात. लग्न विधी होमाशिवाय पार पाडत नाही. आजही बऱ्याच देवस्थानामध्ये ही प्रथा चालू आहे. ज्या देवतेची कृपा दृष्टी हवी असेल, त्या देवतेच्या संकल्पनेने त्याचे आवाहन केले जाते. समिधा हवन केले जाते. त्या देवतेच्या सहस्त्र नामावलीने काळे/सफेद तीळ, तूप अर्पण करून तिची प्रार्थना केली जाते.

भाऊ महाराजांनी दत्तमहाराजांच्या कृपा आशीर्वादसाठी दत्तयागाची आपल्या मठात सुरवात केली. नृसिंहवाडीला दत्त याग करण्याची प्रथा कैक वर्षांपासून चालू आहे. दरवर्षी पौष शुक्ल पक्ष द्वितीया श्रीमन्न नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त वाशिंद मठात, तसेच मे महिन्यात नृसिंहवाडीच्या कार्यक्रमात वाडीच्या मठात दत्तयागाचे आयोजन केले जाते. हा दत्तयाग करण्यसाठी नृसिंहवाडीच्या ब्राह्मणांना बोलवले जाते. दत्तयागाची पद्धत खालीलप्रमाणे असते.

१. श्री दत्तयागाची सुरवात पुण्याहवाचनाने केली जाते. यामध्ये वरूण देवतेची आराधना करून श्री गणेशाची अथर्वशीर्ष या मंत्राने प्रतिष्ठापना केली जाते.
२. यानंतर मुख्यदेवता स्थापना हा विधी असतो. दत्त महाराजांना विधिपूर्वक आव्हान करून त्यांची स्थापना केली जाते.
३. प्रधान संकल्प, उपसंकल्प, प्रायश्चित्त संकल्प असे तीन संकल्प केले जातात.
४.आचार्यवरण झाल्यावर स्थलशुद्धी केली जाते.
५. दत्तमहाराजना स्थानापन्न केल्यावर यज्ञकुंडामध्ये अग्नीची निर्मिती केली जाते. याकरिता नृसिंहवाडी येथील ब्राम्हण काडीपेटी पेटवत नाहीत. तर अरणीवर जोरदार घर्षण करून नैसर्गिकरित्या अग्नी निर्माण केला जातो. हे ह्या यागचे मुख्या वैशिष्ट असते. त्यावर ठिणगीने निर्माण झालेला अग्नी नारळाच्या कीशीने गोळा करून यज्ञकुंडात ठेवला जातो. आणि मोठा केला जातो.

६.सर्व यजमानाच्या आणि वैश्विक शांततेसाठी, व्याधी दोष निवारण्यासाठी नवग्रह आव्हान केले जाते.
७. होमकुंडामध्ये अग्नी प्रजावलीत ठेवण्यासाठी बिज मंत्र म्हणून दत्तमाला केली जाते. ह्यामध्ये दत्तमाला मंत्राने हवन होत असते.
८. दत्तमाला हवन झाले की प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रचित सहस्त्र “द ‘कार माला पठाणाबरोबर काळया तिळाचे व तुपाचे होमकुंडात हवन केले जाते. ह्या दत्तसहस्त्र नामावलीचे वैशिष्ट्य हे आहे की सदर नामावली ही श्री टेंबे स्वामिनी लिहीली असून ह्यामध्ये दत्त महाराजांची “द” ह्या अक्षराने सुरवात झालेली १००० नावे आहेत.

येथे दत्त यागाचे उपचार पूर्ण होतात. तदनंतर बळी देणे हा एक विधी केला जातो. ह्या मध्ये भात, विड्याची पाने, केळी, बुक्का, हळद कुंकू, फळे इ वस्तू घेऊन उपस्थित दत्तभक्तांवरून ओवाळून वेशीबाहेर टाकले जाते. ह्यानंतर यज्ञकुंडामध्ये तुपाची धार धरून पूर्णाहुतीचे मंत्र पठण करून क्षमायाचना केली जाते. यजमानवरती मंत्रजल प्रोक्षण करून ब्रम्हवृंद यजमानाना आशीर्वाद देतात. दत्तमहाराजांच्या महाप्रसादाने यागाची सांगता केली जाते. सदर यागामुळे मनोइच्छित फळ प्राप्त होण्यास मदत होते. यागाला बसणाऱ्या यजमानावरील संकट निवारण होते. दोष निवारण होते, आणि ते दत्तकृपेस पात्र होतात.

श्री गुरुचरित्रात कर्मसिध्दांत मांडला आहे. जसे चांगले कर्म केल्यावर पुण्य लाभते त्याच प्रमाणे दुःकर्माचे ही फळ भोगावे लागते. जाणते अजाणतेपणी झालेले पापकर्म मनात खोचले तर त्याची तीव्रता कमी होते. तसेच ग्रंथामध्ये प्रायश्चित्त घेण्याचे काही प्रकार सांगितले आहेत. गायत्रीकृच्छ,अतिकृच्छ, प्रजापत्यकृच्छ, पर्णकृच्छ, तसेच चान्द्रायण सांगितले आहे. पवमान सूक्त, हविश्यान्त, इंदुमित्र, शुन:शेप या मंत्राचे पाठ करवयास सूचवीले आहे. श्री दत्तयाग हा त्यातीलच एक भाग आहे. दत्तयागात सहभागी झाल्यास अनेक दोषापसुन मुक्ति मिळते. दत्तयागात सहभागी झाल्यास खाली दिलेल्या दोषापसुन मुक्ति मिळते.

१. मातृ पितृ वचन उल्लंघन
२. चोरी
३. स्त्री क्रय विक्रय
४. सुरापान
५. गुरुदोष
६. अभक्ष्य भक्षण
७. ब्रम्हहत्या
८. बालहनन
९. भूमितस्करी
१०. संवत्सर पाप नाशनार्थ
११. अकृत अध्ययन

भाऊ महाराजांनी दत्त यागाची नविन प्रथा आपल्या परिवारात सुरू केली. काळाचौकी येथे पहिला दत्तयाग कामगार मैदान परेल, या ठिकाणी १३ जानेवारी २००५ रोजी आयोजित केला गेला. वरुण राजानेही आपली उपस्थिती दाखविली. या यागमध्ये ६६ यजमान हवनासाठी सहभागी झाले होते. पुढे अनेक ठिकाणी दत्तयाग आयोजित करण्यात आले. याशिवाय इतरही बरेच याग भाऊ महाराज स्थापित मठांमध्ये सतत आयोजित केले जातात. गणेश याग, सुदर्शन याग, पवमान याग, स्वामी समर्थ याग, साईदत्त याग.इ. याग संस्थेतर्फे आयोजित केले गेले आहेत.

वाशिंद दत्तयाग

|| श्री गुरुदेव दत्त ||