
ज्ञानाच्या पूर्णत्वाने योग्य कर्माचरणाची दिशा ठरते व योग्य कर्माने दृढ भक्तीचा उदय होतो. हे तिन्ही मार्ग एकमेकांस पूरक आहेत. यातील एकही भाग कमी पडल्यास अथवा त्रुटी राहिल्यास पुढचाभाग पूर्ण होणार नाही. जणूकाही दत्तात्रेयांची तीन मुखे या तीन मार्गांची द्योतक असावीत. भक्तिकांड हे तिसरे व शेवटचे आहे. योग्य भक्ती हेच खरे इस्पित आहे. भक्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कोरडी भक्ती व दुसरी म्हणजे ओली भक्ती. मंत्राचरण, कर्मकांड, व्रत, अनुष्ठान हे सर्व कोरडया भक्तीत येतात. व भजन, पूजन, ध्यायन-धारणा हे सर्व ओल्या भक्तीत येतात. संतांनी ओल्या भक्तीची कास धरली. जी भक्ती सर्व सामान्यांना सहज, सुलभ करता येऊ शकते. मंत्रोच्चारण, कर्मकांड यामध्ये भाव उतरणे कठीण जाते, पण भजनामध्ये देवाला आळवताना देव खूपच जवळचा (सखा) वाटतो. संतांनी अभंगांमध्ये परमेश्वरा, कृष्णाला पकडले. देवाच्या लीला विविध रंगात रंगवल्या. वेगवेगळया रूपात देवाला उभं केलं. कधी तो खोडकर असतो, कधी तो शिक्षक, तत्वज्ञानी असतो, तर कधी मातेच्या कुशीत पहुडलेले निर्व्याज बाळ असतो. जळी-स्थळी, काष्टी-पाषाणी देवाला संतांनी पाहिलं. सर्व चराचरात तोच भरून उरला आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न असावा. मीरेला भावलेला व राधेला भावलेला कृष्ण भक्तीच्या विविध रंगांनी भरलेला आहे.

श्रीकृष्ण चरित्रात राधेला अनन्यसाधारण महत्व आहे. भागवताप्रमाणे इंद्राच्या पत्नी शचिने भगवंताची भक्ति करण्यासाठी राधेचा जन्म घेतला. `राधा’ हे नाम `ह्द’ याच प्रतिरूप आहे. ह्द म्हणजे भक्ती. राधा ही भक्ती रूप होती. देव हा भक्तिचा भुकेला आहे. राधाही निर्मळ, उत्कट, प्रेमळ, पवित्र भक्तिच शुद्ध रूप असल्याने श्रीकृष्ण भक्तिचा (राधेचा) वेडा झाला होता. आपण मात्र त्यांना प्रेमवीर ठरवून मोकळे झालो. राधा चैतन्यस्वरूप भगवंताच्या भक्तित न्हाऊन गेली होती. राधेला जो श्रीकृष्ण कळला तो बहुधा कोणालाच कळला नसावा. म्हणूनच काय भगवंताने त्याचे नाव कृष्ण राधा न म्हणता `राधेकृष्ण’ असे म्हणावयास सांगितले. भक्तिशिवाय देव ही अपूर्णआहे. हिच भक्ति पुढे मीरेमध्ये पहावयास मिळते. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी मीरेला कृष्णच दिसत असे. ही भक्ती इतकी उत्कट होती की, दिलेल्या विषाच्या पेल्यातही तिला कृष्णच दिसू लागला. राधा आणि मीरा ही जणू भगवंताची एव्हरेष्ट शिखर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

श्रीगुरूचरित्रात या विभागात भक्ति म्हणजे श्रीगुरूंवर असलेला दृढविश्वास, असे ठायीठायी प्रत्ययास येते. सद्गुरूंवर असलेला दृढ विश्वास आपल्याला या भवसागरातून सहज तारून नेऊ शकतो. विश्वासाचा दुसरा अर्थ आपल्या गुरूंवर असलेले आत्यंतिक प्रेम, श्रद्धा. भक्ति म्हणजेच प्रेम. सर्व संतांनी देवावर कल्पनातीत उत्सफूर्त प्रेम केले. देव या भक्तीप्रेमाचा भूकेला आहे. देवाच्या दर्शनासाठी उर भरून आला पाहिजे, वेड लागलं पाहिजे. देवाच्या दर्शनाची उत्कंठा मरणोत्क्रमण करणाऱ्या माणसाला जगण्याची इच्छा व्हावी इतकी अतिव असावी. तेव्हाच देव प्रकट होतो. श्रीगुरूचरित्रात श्रीगुरू एका कोड असलेल्या ब्राह्मणाला जाळण्यासाठी वापरणाऱ्या लाकडाची फांदी नदीतीरी रोवून पाणी घालावयास सांगतात व म्हणतात, `याला जेव्हा पालवी फुटेल तेव्हा तुझे कोड निघून जाईल’. `।। गुरू वाक्य मज कामधेनू।।’ या वचनानुसार तो ब्राह्मण सात दिवस उपाशी राहून त्या ओंडक्याची सेवा करतो. जेव्हा सर्व लोक त्याचा उपहास करतात तेव्हा श्रीगुरू त्याची भक्ती पाहून त्या ओंडक्यावर आपल्या कमंडलूतील गंगाजळ घालतात. तत्क्षणी त्या ओंडक्याला पालवी फुटते व तो ब्राह्मण श्वेतकुष्ठ मुक्त होतो. गुरूंवर असलेला, त्यांच्याबद्दल असलेला विश्वास आपल्या उत्कट भक्तीने त्या ब्राह्मणाने उच्च स्तरावर पोहचविला. ही उत्कट भक्ती देवाला अभिप्रेत आहे. आपण जे काही भक्तीच्या नावाखाली करतो, ते बऱ्याचदा वरवरचं पाणी असते. या भक्तीच्या डोहात खोल बुडता आले पाहीजे.

एकदा विवेकानंदानी रामकृष्णांना विचारले, `भक्ती कशी असावी?’ ठाकूर म्हणाले, `जेव्हा एखादा मनुष्य पाण्यात बुडत असतो तेव्हा जगण्याच्या उमेदीने तो जे काही प्रयत्न करतो, देवाचा धावा करतो, इतकी उत्कट भक्ती उपजल्याशिवाय देव दिसणार नाही.’ असे अनुभव आपल्यासारख्या भक्तांना मार्गदर्शक ठरतात. या मार्गात बरेच मैलाचे दगड आहेत. ते पार करत करत उद्दिष्टापर्यंत पोहचायचे असते. सद्गुरू आपला हात हातात धरून या मार्गात चालत असतात. कितीही संकट अडचणी आल्या तरी आपला दृढ विश्वास डळमळीत होता कामा नये. सायंदेवाचा ४१वा अध्याय विश्वासाचं वेगळं रूप आपल्यासमोर ठेवतो. गुरू आपल्या काळजीपोटी बरेच काही करत असतात. बऱ्याचदा ते आपल्या बुद्धीच्या पलीकडे असते. सायंदेवांना श्रीगुरूंनी सांगितलं उभयपार्श्व (दोन्ही बाजूला) पाहू नकोस. सायंदेव जणू हे प्रत्येक भक्ताच्या मनात नांदणारे एक रूप आहे. मनात अनाठायी निर्माण होणार कुतुहल भक्ताला कमकुवत बनवत. गुरूवाक्य विसरायला लावत. सायंदेवाचं तेच झालं. दोन्ही बाजूला पाच फडाचे नाग पाहून भितीने त्याची गाळणच उडाली व तो वाट फुटेल तसा धावू लागला. श्रीगुरूंजवळ पोहोचल्यावर त्यांनी सांगितले की, तुझ्या रक्षणासाठीच मी हे दोन नाग पाठविले होते, भीतीचं कारणच काय?

साईबाबांनी यालाच श्रद्धा आणि सबुरी ही दोन नावे दिली. पुढे ४७ व्या अध्यायात एका शेतकऱ्याची कथा दिलेली आहे. एक साधा शेतकरी माणूस पण गुरूवाक्यावर अढळ विश्वास ठेवणारा. श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार त्यांनी दुपारपर्यंत सर्व शेत कापून टाकले. इथे एक विषय समजून घेण्यासारखा आहे, तो शेतकरी दररोज श्रीगुरू संगमावर जाताना वा येताना नित्यदर्शन घ्यायचा. इतरही बरीच शेतकरी होती, आजही आहेत, पण हातातली कामे टाकणारा तो एकटाच होता. शेत कापायला सांगून त्याच्यासाठी वळीवाचा पाऊस पाडला असं म्हणण संयुक्तिक ठरणार नाही. वळीवाचा पाऊस पडणारच होता पण त्यातूनही आपल्या भक्ताला त्यांनी वाचवले. शेत कापण्यापूर्वी त्याला श्रीगुरूंनी विचारले, `का नित्य आड येतोस? काय इच्छा आहे?’ शेतकरी म्हणाला, `शेतीवर कृपा असू दे, तुझ्या धर्मे जेवू.’ जर त्याने दुसरे काही मागितले असते तर श्रीगुरूंनी तेही त्याला दिले असते. आपल्या भक्ताला संकटातून देवाने वाचवले. या गोष्टीतून एक लक्षात येते की, जस जात्यामध्ये पडलेले दाणे भरडले जाणार आहेत, पण जे दाणे जात्याच्या खुंटयापाशी असतात ते भरडले जाणार नाहीत. हा खुंटा म्हणजेच `श्रीदत्त’. या भवसागरातून पार व्हायचं असेल तर `दत्तभक्ति’ शिवाय तरणोपाय नाही. भक्ती ही भितीपोटी अथवा आपल्या संरक्षण व्हावं किंवा आपलं काही वाईट होऊ नये म्हणून करू नये. भक्ति ही प्रेमापोटी व्हायला हवी. देव हा भावाचा, प्रेमाचा भुकेला आहे.

भक्ताने भक्तिकडून अनन्यभक्तिकडे प्रवास करायला हवा. अनन्यभक्ति म्हणजे देवाशिवाय अन्य काही नाही. श्रीगुरूगीतेत म्हटलं आहे, `अनन्यच्चित्यंतो मां सुलभं परमं पदं’ हे वाक्य स्वामी नेहमी म्हणत असत. गुरूला, देवाला अनन्यभावे शरण जावयास हवे. या भक्तिकांडात तंतुकाची कथा दिलेली आहे. तो सर्व देव श्रीगुरूंमध्ये पाहात असे. श्रीशैल्याला निघालेल्या गावातील लोकांना त्याने निक्षून सांगितले, `श्रीगुरू प्रत्यक्ष मल्लिकार्जून असताना तुम्ही पाषाणाचे दर्शन घ्यायला कशाला जाता?’ याच विश्वासापोटी श्रीगुरू तंतुकाला सुक्ष्मदेहाने श्रीशैल्यास घेऊन गेले व स्थान महिमेचा उपदेश केला. देवाची कृपा सर्वांवरच सारखी असते. या अनुभवातून श्रीगुरूंनी सर्वच शिष्यांना व भक्तांना जणू एक शिकवणच दिली. गुरूंजवळ सतत राहणे म्हणजे सर्व काही नसून मनातून गुरूमय होणे, हे मन सर्वस्वी गुरूला अर्पण करणे म्हणजे गुरूभक्ती होय. भक्तांच्या तीन अवस्था आहेत. एक मांजरीसारखं म्हणजेच काही शिष्य असे असतात की, जशी मांजर आपल्या पिल्लाला स्वत: उचलून सर्व ठिकाणी नेत असते. त्याप्रमाणे काही शिष्य स्वत: काही करत नसतात. गुरूच त्यांना आपल्याबरोबर नेत असतात. दुसरा शिष्य हा माकडीणीच्या पिल्लासारखा असतो. माकडीणीचे पिल्लू हे सतत मातेला चिकटलेले असत. जिथे माकडीण जाईल तिथे ते तिच्याबरोबर जात असत. काही शिष्य असेच गुरूंना बिलगुन असतात. त्यांच्या चरणांपासून दूर होत नसतात. तिसरा उदाहरण म्हणजे कासवीच्या पिल्लासारखं. कासवीच्या पिल्लासारखे काही शिष्य श्रीगुरूंपासून दूर असतात. परंतू ते फक्त नजरेनेच पैलतीरावर पोहचवत असतात.
ध्यानंमूलं गुरूमुर्ती: पुजामुलं गुरू पदम्। मंत्र मुलं गुर्रोवाक्यं मोक्ष मुलं गुरू कृपा:।।

श्रीगुरू भक्ति कशी करावी? गुरू म्हणजे काय? गुरूच स्वरूप कसं असतं? या पार्वतीच्या प्रश्नावर प्रत्यक्ष महादेवांनी दिलेल उत्तर म्हणजे `श्रीगुरूगीता’ होय. वर दिलेल्या मंत्रांमध्ये गुरूभक्ति, भक्तिमार्गाच सार दिलेल आहे. गुरूकृपेशिवाय भक्तिमार्ग पूर्ण होऊ शकत नाही. गुरूभक्ति हेच साधनेच मर्म आहे. ४९व्या अध्यायात ही गुरूगीता अवतरलेली आहे. जणू काही सर्व अध्यायांचे सार या अध्यायात सरस्वती गंगाधरांकडून श्रीगुरूचरित्रात मांडल आहे. श्रीकृष्ण नवनीत चोरायचा. ताकाची घुसळण केल्यावर जो बाहेर येतो तो नवनीत. मनाची घुसळण झाल्याशिवाय मन गुरूमय, भक्तिमय होणार नाही. हीच घुसळण नानाप्रकारे, नानमार्गाने गुरू करवून घेत असतात. नामदेवाला देव दिसायचा, परंतु तो कृष्णमय होऊ शकत नव्हता. देव दिसणे आणि देवमय होणे या दोन्ही वेगवेगळया गोष्टी आहेत. यासाठी पांडुरंगाने नामदेवाला गुरू करावयास सांगितले. श्रीगुरूचरित्रात २ ऱ्या अध्यायात संदिपकूची कथा सांगितली आहे. दिपकाची भक्ती पाहून महादेव, विष्णू प्रसन्न होतात व वर माग म्हणून सांगतात पण दिपक त्याचा अव्हेर करतो. उलटपक्षी प्रश्न करतो, मी तुम्हाला भजत नाही, मग तुम्ही माझ्यावर प्रसन्न का? शेवटी त्याने विष्णूंकडे मज कडून गुरूंची अधिकाधिक भक्ति व्हावी, असा आशिर्वाद मागितला. तात्पर्य गुरूकृपा असेल तर देवही अधिन होऊ शकतात. या भक्तिकांडातून हाच उपदेश प्रत्येक गुरूभक्तांपर्यंत पोहचविण्याचा प्रयास असावा असं वाटतं. सर्व गुरूचरित्रात गुरूमहिमा वर्णिलेली आहे. गुरूंची केलेली सेवा एका धोब्याला श्रीपादकृपेने पुढील जन्मी बिदरच्या बादशहाच्या पोटी जन्माला घालते हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल.

।। सदगुरुअर्पणमस्तू।।