सदगुरु भाऊ महाराजांच्या कृपेने घडलेला अभ्यास
विषय १ – Time Travel
आपण नेहमीच एक गोष्ट अनुभवत असतो. बुद्धिवादी समजणाऱ्या मंडळीना पुराणातील कथा कलोकल्पित वाटतात. बऱ्याचदा रूपक कथा अस त्यावर लेबल लावलं जात. या विषयी एक चिकित्सक म्हणून त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करावयास हवा. पूर्वीच्या काळात, आतासारखे छापखाने नसल्याने त्या काळात लिहिलेले ग्रंथ पुन्हा लिहिले जात. आपण ज्याला प्रत म्हणतो त्या अशा पद्धतीने बनविल्या जात होत्या. लेखन होत असताना लिहिणारा जर विद्वान असेल तर तो त्याच मत त्या ग्रंथात मांडत असावा, असा एक कयास आपण करू शकतो. काही ग्रंथांवर टीका लिहिण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. मूळ ग्रंथातील गुढार्थ आपल्या भाषेत वाच्यार्थ स्वरूपात मांडला जात असे. हे होत असताना मूळ ग्रंथ कालबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अथवा ग्रंथ खराब होणार नाहीत, याची दक्षता न घेतल्याने ते काळाच्या ओघात नष्ट झाले असतील. अशावेळी टीका ग्रंथ उपलब्ध असल्यास त्यावर नवीन लिखाण केले जात असू शकते. आणखी एक भाग त्याकाळी चालत असे. बऱ्याच कथा मौखिक स्वरूपात जनसामान्यात रूढ झाल्या होत्या. त्यातही कालांतराने बदल होत गेले असावे. भारुड, जानपद गीते ही त्यावर रचली गेली होती. मुद्दा असा आहे की त्याकाळातील घटना या घडल्याचं नसाव्यात असे गृहीत धरणे संयुक्तिक ठरणार नाही. असा ही एक कयास आहे की तीन ते चार हजार वर्षापूर्वी भारतीय संस्कृती ही काही विषयांमध्ये आताच्या काळापेक्षा अतिप्रगत असावी. परंतु तत्कालीन पुरावे नसल्याने या भाकड कथा मानल्या गेल्या किंवा आपण त्याचा अर्थ काढू शकलो नाही.
ब्रम्हदेवाचा एक दिवस म्हणजे आपली १०० वर्षे असा कयास मांडला जातो. यात काही अर्थ असेल का? हे टाईम ट्रॅव्हल चे उदाहरण असावे. आपण ज्या जगात रहातो, वावरतो त्यालाच आपण जग असे म्हणतो. परंतु याच ठिकाणी एखादे वेगळे जग अस्तित्वात असेल तर? ज्याची आपल्याला कल्पना नसेल. जस की आपण ज्या घरात रहातो त्याला आपण आपले घर मानतो. परंतु आपल्या घरात राहणारे कीटक, सूक्ष्म जंतू ही त्याला आपले घर मानत असतात. आपण हेच दुसऱ्या अर्थाने समजून घेऊ. आपल्या जगताला ‘त्रिमिती जग’ म्हटले जाते. पण आपल्याला माहित नसलेले ‘चतुर्मिती जग’ अस्तित्वात असेल तर. जगामध्ये काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत की, एखादा माणूस अचानक वेगळ्या मितीत गेला व एक दिवस परत आला. तेव्हा इकडची ५०/६० वर्षे निघून गेली होती. आईन्स्टाईनच्या भाषेत सांगायचे तर विश्वात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घड्याळ लावली आहेत. मुंबईतील वेळ आणि दिल्लीतील वेळेत फरक असतो. म्हणजेच काळ = अवकाश. देवांच्या कथा जरी जादुई वाटल्या तरी त्याची उत्तरे अजूनही अज्ञात आहेत. त्यांचे जग, मिती हे वेगळेच आहे. त्यातून ते या जगात सहज येऊ शकतात व परतही जाऊ शकतात. परंतु आपण त्या जगात जाऊ नाही शकत. अनेक इंग्लिश पुस्तकात अशा सत्य घटना लिहिल्या गेल्या आहेत. साईसत्तचरित्रात साईबाबा म्हणतात, मला माझ्या गुरूंनी एका विहीरीत उलटे टांगून ठेवले होतें. पण तोंडात पाणी जाणार नाही याची काळजी घेतली होती. तिथे मी परमानंदाचा आस्वाद घेत होतो. हेच ते वेगळे डायमेंशन, वेगळी मिती. आपण जे जग पहातो ते खरे जग नसून जे दिसत नाही, अज्ञात आहे ते जग खरे आहे. त्या जगाचा आनंद काही वेगळाच आहे, असं बाबा म्हणतात.
श्री गुरुचरित्र ग्रंथात ३५ व्या अध्यायात स्कंद पुराणातील कथा दिलेली आहे. चित्रांगद व सीमंतिनी याची कथा. ही Time Travel ची कथा आहे. चित्रांगदाचे लग्न सीमंतिनिशी झाले होते. चौदाव्या वर्षी वैधव्य सांगितले असल्याने सीमंतिनी मैत्रायणीला शरण जाते. मैत्रायणी तिला शिवपूजन करावयास सांगते. लग्न झाल्यावर सासरी आलेला चित्रांगद यमुनेत जलक्रीडेसाठी गेला असता बुडतो. सेवकांना शोधूनही तो सापडत नाही. पाताळातील वासुकी नगरातील काही सर्पकन्याना चित्रांगद दिसतो. त्या त्याला वासुकी नगरात घेऊन जातात. अमृत शिंपण करून त्याला जिवंत करतात. सर्पराज वासुकी त्याची विचारपूस करून त्याच्या बरोबर आपल्या पुत्राला पाठवितो. मनोवेगे धावणाऱ्या अश्वावरून ते दोघे जिथे चित्रांगद बुडाला होता तिथे यमुनातीरी बाहेर पडतात. दिवस सोमवार असतो. सीमंतिनी शिवपूजन करण्यासाठी आलेली असते. दोघांची भेट होते परंतु मध्ये तीन वर्षांचा कालखंड निघून गेलेला असतो. ही गोष्ट चक्रावणारी आहे. गोष्टीनुसार थोडाच वेळ थांबलेला चित्रांगद परत आल्यावर तीन वर्षांचा कालखंड कसा काय जाऊ शकतो? याचा एक अर्थ निघतो की त्या काळातील लोकांना Time Travell माहीत असावे किंवा ते त्याला वेगळ्या अर्थाने संबोधित असावे. पाताळ नगरी ही वेगळी मिती असावी, जीच काळाशी काही तरी गणित असावं. जे आपल्याला माहीत नाही. पाताळ नगरीचे भुताल, तल, तलातल, समतल असे आठ प्रकार सांगितले आहेत. हे आठ प्रकार अष्टमिती असाव्यात, असाही एक कयास निघतो. गायत्री मंत्रामध्ये सुरवातीला ॐ भू: ॐ भुवः ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम: ॐ भूर्भव स्व: हे सुद्धा आठ शब्द आहेत. जे या अष्टमिती किंवा अष्ट दिशा याकडे निर्देश करतात. श्रीक्षेत्र गाणगापुर येथे श्रीगुरु यानी सांगीतल्या प्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अष्टतीर्थात स्नान केले जाते. या अष्टतीर्थांचा या मितींशी काही संबध तर नसेल? पण या मितींचा काळाशी नक्कीच संबध आहे.
श्री गुरुचरित्रातील एका अध्यायात असे दिले आहे की, कृष्णेच्या पाण्याचे दोन भाग होत असत. त्यातून ६४ कलांच्या अधिपती असलेल्या ६४ योगिनी महाराजांना त्या मार्गाने आत एका अभिनव नगरीत नेत असत. ती नगरी म्हणजे जणु इंद्र नगरी. त्या नगरीतील एका तेजोमय सुवर्ण सिंहासनावर महाराजांना बसवून त्यांची त्या पूजा करीत असत. हा रोजचा समारंभ चालत असे. एक दिवस गंगानुज नावाच्या शेत राखणाऱ्या व्यक्तिने ते पाहिले व तो ही त्या नगरीत गेला. श्री गुरूनी त्यावर कृपा केली. श्री गुरुंचे खरे रूप कळल्याने तो त्यांचा निस्सीम भक्त झाला. एक दिवस श्रीगुरु त्याला क्षणमात्रे काशी, प्रयाग, गया येथे नेऊन यात्रा करवून आणली. हे खरच घडू शकत का? १९४२ साली महायुद्धाचा एक भाग, एक नवीन शोध या निमित्ताने मॅनहटन येथे ‘फिलाडेल्फिया’ प्रयोग केला गेला. या प्रयोगात एका जहाजावर शक्तिशाली विद्युत जनित्राद्वारे प्रचंड प्रमाणात चुंबकीय शक्ति निर्माण करण्यात आली. त्यावेळी जहाजावर अनेक कर्मचारी हजर होते. परिणाम असा झाला की या चुंबकीय क्षेत्रात असलेली प्रत्येक गोष्ट काही वेळाने अदृश्य झाली. व त्या जहाजाने काही क्षणात ४० की. मि. अंतर कापले. समुद्रातील पाण्यावर उमटणाऱ्या पाण्याच्या तरंगामुळे ते जहाज प्रवास करते आहे हे लक्षात आले. काही कालाने चुंबकीय शक्ति नियंत्रणात आल्यावर पुन्हा जहाज व माणसे दिसू लागले. जहाजावर असलेल्या लोकांवर त्या प्रयोगाचे भयानक परिणाम झाले. ही लोक कुठेही कधीही गायब होऊ लागली. अपघाताने ही सर्व माणसे मरण पावली. महायुद्धाच्या काळात नवीन गोंधळ उडु नये म्हणून हा प्रयोग लपविण्यात आला. प्रगत शास्त्राच्या विज्ञानामध्ये फसलेला प्रयोग. आजही त्याबद्दल तर्क वितर्क चालू आहेत. यातून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की चुंबकीय क्षेत्रामुळे काही गोष्टी अदृश्य होऊ शकतात.
क्षणमात्रे, विश्वामध्ये कोठेही प्रवास करण्याचे आधात्मिक शास्त्र, आजच्या विज्ञानाच्या किती तरी पुढे आहे. पृथ्वीतत्वात असलेला जडदेह आकाशतत्त्वात रूपांतरित करणे हे आजच्या विज्ञानाला शक्य नाही आहे. जुन्या काळातील या कथा जरी जादुई, चमत्कारिक वाटल्या तरी खऱ्या असाव्यात. हे सुद्धा खरे आहे की त्यातील काही भाग कालौघाताने अतिरंजित झाला असावा. आधुनिक विज्ञान व ततकालिन विज्ञान यामध्ये दोन्ही शास्त्राचे ठोकताळे, कसोट्या, निष्कर्ष वेगळे आहेत. त्यांची गल्लत करणे योग्य नाही. पुढील उदाहरण म्हणजे गुरुचरित्रात असलेली तंतुकाची कथा. तंतुकाची भक्ती पाहून श्रीगुरु त्याला क्षणात गाणगापूर येथून श्री शैल्य येथे घेऊन गेले. दर्शनाच्या वेळी त्याला गावातील माणसे भेटली. श्रीगुरु पुन्हा त्याला गाणगापुरात घेऊन आले. बिदरच्या बादशहाने श्रीगुरूंची मिरवणूक काढली असता, ऐन मिरावणुकीतून श्रीगुरू आपल्या शिष्यांसाहित अदृश्य झाले. हा काळ फारसा जुना नाही. किंबहुना या काळातील पुरावे इतिहासात नमूद आहेत. अशा प्रकारच्या घटना अनेक सिद्ध पुरुषांकडून घडवल्या गेल्या आहेत. आपल्या शरीरातील जड तत्वातील अणु रेणूंचे एकामेकातील बंध तोडून त्याना आकाशतत्त्वात किंवा वायुरूपातील अणुमध्ये रूपांतरित करणे हा त्याचा साधा सोपा अर्थ निघु शकतो. फिलाडेल्फियाच्या प्रयोगावरुन, चुंबकीय शक्ति मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये निर्माण करता आली तर हे शक्य आहे असा निष्कर्ष निघतो. या अवस्थेत आपण कमीत कमी काळात कितीही दूर प्रवास करू शकतो. ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसहित चांगदेवाला भेटायला भिंतीवरून गेले हा याच प्रयोगाचा भाग असू शकतो. मात्र ही चुंबकीय शक्ती निर्माण करण्याचा साधना मार्ग, हा अध्यात्मिक साधनेतून जातो. आज अनेक लोक या गोष्टी खोट्या मानत असतील. परंतु त्या काळातील विचार करता ज्ञानेश्वरांच्या श्रेष्ठत्वाला विरोध करणारा मोठा वर्ग होता. तो वर्ग ही घटना सहज खोडून काढू शकला असता. याचा अर्थ ही घटना सर्वमान्य असावी, किंवा त्याचे प्रत्यक्षदर्शी असावेत. पूर्वीच्या काळी अशा घटना अनेक संत पुरुष, योगी, सिद्ध यांच्याकडून घडविल्या गेल्या आहेत. ही कोणतीही तांत्रिक विद्या नसून हा साधनेचा आविष्कार आहे. या घटनांचा अर्थ लावण्यासाठी काही गोष्टींचा मागोवा घेणे गरजेचं आहे. या गोष्टी अशक्यप्राय असल्या तरी त्या घडणारच नाही असं म्हणता येणार नाही.
मानवाला अदृश्य होण्याबाबत नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. चाणक्याने आपल्या ‘कौटिल्य शास्त्र’ या ग्रंथातील १४ व्या अध्यायात अदृश्य होण्यासंबंधित काही प्रयोग दिलेले आहेत. त्यातील कूट भाषा आपल्याला अजून ही उलगडू न शकल्याने आपण ते सिद्ध करू शकत नाही. काही बाबतीत आज संशोधकांना यश मिळाले आहे अजूनही संशोधन चालू आहे. आजच्या काळातील उदाहरण द्यावयाचे झाल्यास जगभरात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या उडत्या तबकड्या म्हणजेच UFO. आज जरी नासा, अमेरिका, लंडन, रशिया हे अतिप्रगत देश या घटनांवर पडदा टाकत असल्या तरी या घटना अनुभवणारे कित्येक आहेत. तत्संबंधी घटनांचे प्रक्षेपण डिस्कव्हरी या चॅनलवर दाखविण्यात आले आहे. पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवात एकच साधर्म्य आढळते. तबकडी दिसली आणि क्षणार्धात दिसेनाशी झाली. परंतु ती नाहीशी झाली असे कोणी म्हणत नाही. ती अतिवेगाने निघून गेली. त्याची गती इतकी प्रचंड होती की त्याचे उत्तर आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर देऊ शकत नाही. पण त्या घटना अशक्य आहेत असं म्हणता येणार नाही. हे रहस्यविज्ञान आपल्यापासून अज्ञात आहे. आजची प्रकाशवर्षाची गती पकडली तरी एखाद्या दूरवरच्या ताऱ्यावर पोहचण्यासाठी आपल्याला हजार ते लाख वर्ष लागु शकतात. आज तरी अस कोणतं इंधन उपलब्ध नाही ज्यायोगे या गतिने आपण प्रवास करू शकतो. संस्कृत रामायणात विमानशास्त्र सांगितले आहे. रावणाच, इंद्राच विमान केवढं होत यावर उहापोह केलेला आहे. या विमानामध्ये इंधन म्हणून पारा वापरला असेही नमूद केले आहे. या विषयावर संशोधन होणं गरजेचं आहे. आपल्या कित्येक ग्रंथातील अशा प्रयोगाचा अभ्यास करूनच अनेक पाश्चात्य शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले आहेत. आज उपलब्ध असलेल्या कोणत्याही इंधनाने आज तरी ही गती गाठु शकत नाही. पृथ्वीजवळ असलेल्या एखाद्या ताऱ्यावर किंवा आकाशगंगेवर जायचे म्हटले तरी किती वर्षे लागतील याचे गणित बुद्धिपलीकडे आहे. दूसरा विषय असा की एखाद इंधन सापडलच तरी त्या गतिला मानवेल किंवा त्या भयंकर गतिमुळे वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे निर्माण होणारी ऊर्जा सहन करणारा धातु आज तरी आपल्याकडे नाही. येनकेन प्रकाराने या सर्व विषयांचा अभ्यास केला तरी आजपावेतो कोणतेही संशोधन, इंधन, धातु किंवा तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही, कि ज्यामुळे आपण एवढा प्रवास करू शकतो. UFO हा विषय बुचकळयात टाकणारा आहे. परग्रहवासी आपल्या पेक्षा कितीतरी पटीने तंत्रज्ञान, बुद्धिमता यामध्ये पुढे असावेत. पुरावासदृष्य अनुभव समोर असल्याने हा विषय नाकारता येत नाही. अध्यात्माच असच काहीस आहे. या क्षेत्रातील सिद्धपुरुषांनी केलेल्या चमत्काराच्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या इतक्या पलीकडे आहेत की त्यावर निष्कर्ष काढण्याचाही तर्कविलास आपल्याकडे नाही.
उडत्या तबकड्या यांच्या अनामिक गतीबद्दल आणखी एक कयास मांडला गेला आहे. आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने याबाबतीत एक मत मांडले आहे . हे पूर्ण विश्व एका वेगळ्या स्थितीत वाकले (bend) जाऊ शकते. एका डायमेंशन मधून दुसऱ्या डायमेंशन मध्ये जाण्याच्या आधारे आपण लाखो किलोमीटर दूर सहज आणि कमी वेळात जाऊ शकतो. हा विषय पुन्हा मितींच्या अभ्यासाकडे जातो. आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ ज्याला हे विश्व देवाच्या या संकल्पनेतून निर्माण झालं आहे हे मान्य नाही. परंतु डायमेंशनच्या बाबतीत एखाद मत मांडताना त्याविषयक नक्कीच काही अभ्यासा शिवाय, सिद्धांताशिवाय मांडणार नाही. प्रचंड गती ही डायमेंशनच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो असा याचा निष्कर्ष निघतो. या बाबतीत आता काही संशोधकांच्या अभ्यासातून एक नवीन कयास पुढे आला आहे. मानव आता परग्रहावर वस्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता जरी ही गोष्ट अशक्यप्राय वाटली तरी काही वर्षांनी नक्किच सत्यात उतरेल. दीडशे वर्षापूर्वी जर आपण कोणाला सांगितलं असत की काही वर्षांनी माणूस विमानातुन आकाशातुन विहार करेल तर हे कोणाला खर वाटलं नसत. असच काहीसं परग्रहावर वस्ती करण्याबाबत घडेल. आज अनेक कंपन्याही या स्पर्धेत उतरल्या आहेत. ज्यांनी स्वतः संशोधन सुरू केलं आहे. आपण अस समजू की पाचशे हजार वर्षात माणूस परग्रहावर वस्ती करेल अधिक प्रगतशील होईल. आणि आपल्या मूळ भूमीला विसरूनही जाईल. काही हजार वर्षांनी तेथील मानव आपल्या जन्मभूमीला भेटण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येतील. परंतु त्यांचं माध्यम हे गतीच नसून काळाच असू शकत. म्हणजेच मानवाला भूतकाळात जाण्याचं माध्यम सापडलं तर तो त्यांच्या भूतकाळातील पृथ्वीवर येऊ शकतो. आईन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार विश्वात अनेक ठिकाणी वेगवेगळा काळ चालू असतो. म्हणजेच आपण आता पृथ्वीवर ज्या काळात जगत आहोत, त्याचप्रमाणे इतर ग्रहावरील मानव हजारो वर्षापुढील काळ जगत असेल. आणि तो अतिप्रगत असेल तर UFO च्या माध्यमातून तो मानव आपल्या भूतकाळात येत असेल? किंबहुना पृथ्वीवरील मानवच एखाद्या ग्रहावर गेला असेल, तिथे अतिप्रगत झाला असेल आणि आता तो आपल्या वर्तमानात म्हणजे त्याच्या भूतकाळात येत असावा हा सिद्धांत नाकारू शकत नाही. परग्रहवासी हा आपलाच भविष्यकाळ आहे अस म्हणता येईल.
हा मुद्दा आपण एका वेगळ्या अंगाने पाहू शकतो. भारतात अनेक सिद्ध पुरुष आहेत जे कोणाचाही भविष्यकाळ पाहू शकतात. आज ही अशा अनेक घटना घडताना आपण पहातो की एखादा सिद्धपुरुष एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्यातील व भुकाळातील घटना तंतोतंत सांगते. काही वेळा ध्यानाच्या माध्यमातून काही लोकांना पुढील घटनाही दिसतात. आणि कालांतराने तसच घडत. हे सिद्ध पुरुष साधनेच्या माध्यमातून भविष्यात किंवा भुतकाळात जात असतील का? अनुभवावरून हे शक्य आहे असे वाटते. अध्यात्मात काही साधना अशा आहेत की त्या साधकाला अनेक अनुभव देतात. आपल्या शरीरात असलेला सूक्ष्म देह प्रवास करू लागतो. हा साधनेचा प्रवास साधकाला जाणिवेच्या पलीकडे घेऊन जातो. सूक्ष्म देहाने आपण या विश्वात कुठेही संचार करू शकतो. या बाबतीत पुरावा उपलब्ध आहे. डॉ. प. वि. वर्तक यांना आधुनिक संत मानतात. सूक्ष्म देहधारणेने त्यांनी अनेक ग्रहांवर प्रवास केला आहे. तत्सम पुरावे त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी केलेल वर्णन खर ठरलं आहे. एका ग्रहावर ते पोहचले असता तेथील परग्रहवासी, या बद्दलचेही वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलेलं आहे. सूक्ष्म देह धारणा ही मितीशी संबंधित आहे आणि मिती ही काळाशी संबंधित आहे. काळ हा थांबत नाही असं म्हटलं जातं. परंतु एका मोठ्या ताऱ्याच रूपांतर जेंव्हा कृष्णविवरात होत तेंव्हा तिथे काळ ही गोठतो. कारण कालाय तस्मै नमः