अन्नछत्र

अन्नदान हे श्रेष्ठ दान. उष्ट्या पत्रावळी मधील अन्न खाताना बंकटलाल याने एका तेजस्वी पुरुषाला पाहिले. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरील तेज पाहुन बंकटलाल स्तंभित झाला. ते गजानन महाराज होते . शेगावी गजानन महाराजानी अन्नाचं महत्व लोकांना पटाव म्हणूनच अशा कृतीतून प्रथम दर्शन दिले असावे. साईबाबा स्वतः भक्तांसाठी हंडीमध्ये भोजन तयार करीत असत. भिक्षा मागून आणलेलं अन्न एका हंडीत ठेवत. भिकारी, कुत्री, कावळे, गुर त्यातील अन्न काढून खात असत. कोणाला मनाई नसे. किंबहूना त्यांच्यासाठीच ते मागून आणत असावे. कारण बाबा कधी एकदा भिक्षा मागत. कधी दहा दहा वेळा मागत असत. प्रथम पोटाला भाकरी खावी मग परमार्थ करावा. उपाशी पोटी परमार्थ होत नसतो. अस तत्वज्ञान बाबांचं होत. प्रत्येक संतांनी अन्नदानाचा पुरस्कार केला. परंतु कोणाला अन्नदान कराव, याचंही महत्व सांगितलेलं आहे. आपल्याकडे लक्ष्मी आल्यास, मंगल प्रसंगी आप्तजनांना अन्नदान करावे. उपाशी असलेल्याला आपल्याला कडील अर्धी भाकरी प्रथम द्यावी, मग आपण खावे. हाच खरा परमार्थ आहे. साई सतचरित्रात एक कथा आहे. एकदा बाबा लक्ष्मी ला सांगतात, “मला खूप भूक लागली आहे. भाकरी बनवून आण.” लक्ष्मी तशीच धावत घरी गेली व गरम गरम भाजी आणि भाकरी घेऊन आली. बाबानी ती भाकरी उचलली व समोर असलेल्या भुकेलेल्या कुत्र्याला घातली. लक्ष्मीला खूप वाईट वाटले. बाबा तिला म्हणाले,”लक्ष्मी वाईट वाटून घेऊ नको. अग, त्या कुत्र्याला भूक लागलेली पण तो कसा सांगणार. आपण सांगू शकतो, पण तो नाही सांगू शकत. त्याने खाल्ली की माझं पोट भरलं अस समज. अशी सर्वसमावेशकता हृदयात यायला हवी, म्हणजे तो हरी प्रसन्न होईल. हाच संदेश जणू बाबांनी आपल्या कृत्यातून दिला आहे.

आजकाल मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी भंडारे घातले जातात. खरच ते गरजेचे आहेत का? आपले बरेच देशबांधव ऊपाशी झोपत असताना, घरात भरपेट नाश्ता केलेल्या लोकांसाठी अन्नदान करणं योग्य नाही. अपात्री दान करू नये. जेथे खरी गरज आहे तिथे पोहचले पाहिजे. श्रीनृसिंहसरस्वती यांनी गाणगापूर येथे माधुकरी वाढण्याची प्रथा सुरू केली. प्रत्येक दिवशीं घरातून दुपारच्या वेळी माधुकरी वाढली जाते. तिथे कोणीही उपाशी राहू शकत नाही. किती सुंदर पद्धत आहे पहा. सद्गुरू भाऊ महाराजानी हीच प्रेरणा घेऊन गाणगापूर येथे माघी अन्नदान सुरू केलं. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून तसेच महाराष्ट्रातील अनेक गावागावातून भाविक आपल्या कुटुंबासमवेत माघ पौर्णिमेला गाणगापूर येथे श्रींच्या दर्शनाला येतात. रस्त्याच्या कडेला तंबु ठोकून राहतात. किती निष्ठा असेल? प्रवासापुरते पैसे गाठीला घेऊन ही मंडळी येत असतात. हे सर्व पाहिल्यावर भाऊंनी माघी अन्नदान सुरू केलं. हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. किमान एक वेळ तरी त्यांना पोटभर चांगलं अन्न मिळावं ही अपेक्षा. भाऊंनी सर्व शिष्याना या कार्यात सहभागी करून घेतलं. हळूहळू आज या अन्नदानाच स्वरूप खूप मोठं झालं आहे. हजारो भाविक रोज प्रसाद घेऊन जातात.

दुर्गम भागातील देशबांधवांची सेवा घडावी या हेतूने भाऊंनी वाशिंद सारख्या भागात मठ बांधावयास घेतला. आपोआपच सेवाही देता येईल व एखाद क्षेत्र उदयास आल्यावर त्या भागात छोटे मोठे काम धंदे सुरू होतात, हातात काही काम मिळत. हाताला काम ही मिळेल व कोणीं उपाशी राहणार नाही, असे प्रयत्न भाऊंनी सुरू केले. माऊली गडाच्या पायथ्याशी अनेक आदीवासी पाडे आहेत. प्रचंड गरिबी आहे. सरकारी योजना पोहचत नाहीत. या भागातील लहान मूल उपाशी राहू नये, म्हणून भाऊंनी १०-१२ दुर्गम  पाड्यात अन्नछत्र सुरू केलं. प्रत्येक मठात माधुकरी वाढण्याची पद्धत सुरू केली. आपल्या कार्यातुन आपल्या शिष्याना भाऊंनी जणू समाजसेवेची दिक्षाच दिली होती.

माघी अन्नदान

अक्षय माधुकरी योजना (गाणगापूर)