गोकुळ
सर्वं विष्णुमयं जगत’ हे सर्व विश्व विष्णुमय आहे, कृष्णमय आहे. भगवान कृष्ण चराचरात भरलेला आहे. भगवान कृष्णाच्या चरित्राचा अभ्यास केल्यास एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की, त्याचे पूर्ण जीवन हे मानवी जीवनाच्या विविध छटांचे, घटनांचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. जीवनातील प्रत्येक भाग मार्गदर्शन करणारा आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कृष्णाने आपल्या अलौकिक जीवनाचा ठसा उमटविला आहे. गोकुळात रमणारा कृष्ण वेगळा, राधेच्या भक्तीत न्हाऊन गेलेला कृष्ण वेगळा, मथुरेतील लढवय्या कृष्ण वेगळा, महाभारताच्या युद्धप्रसंगी सत्यासाठी स्वत: दिलेले वचन मोडणारा कृष्ण वेगळा. परंतु या अलौकिक चरित्रातील गोकुळातील बालगोपाळांसोबत रमणारा ‘कान्हा’ मात्र मनाला भूरळ पाडतो. गोकुळवासियांना श्रीकृष्णाचे जे रूप पहायला मिळाले ते बहुधा नंतर कोणालाच मिळाले नसावे. गोकुळात जे काही घडले ते नंतर कधीच घडले नसावे. कृष्णाने गोकुळवासियांना आनंद सागरात बुडवून काढले. आनंदात रममाण केले. कृष्णसाधना समजून घ्यायची असल्यास गोकुळात जायला हवे. असच एक गोकुळ भाऊंनी आपल्या शिष्यांसाठी निर्माण केले होते. `पिंपळेश्वर दत्त मंदिर’ हे भाऊंनी आपल्या शिष्यांसाठी निर्माण केलेले गोकुळ होते आणि स्वत: भाऊ हे त्यातील कृष्णच होते.

भाऊंनी १९८५ साली “सद्गुरू भालचंद्र महाराज सेवा संघ” नावाची संस्था स्थापन करून आपल्या दत्तभक्तीच्या कार्यास सुरूवात केली. प्रथम भाऊंनी सामुदायिक आरतीची सुरूवात चिंचपोकळी येथील गणेश टॉकिजच्या मागे असणाऱ्या लालमैदान येथील भालचंद्र महाराज मंदिरात केली. ज्या मंदिरात भालचंद्र महाराजांनी देह ठेवला. अथर्वशीर्ष प्रशिक्षण सुरू केले. प्रशिक्षण घेतलेल्यांना गुरूवारच्या आरतीला बोलवल जाई. आरतीनंतर अर्धा तास भाऊ विविध विषयांवर बोलत असत. भाऊंची अमोघ वाणी अशी होती की जणू सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलत असावी. विज्ञाननिष्ठ अध्यात्माची ओळख, त्यातील विविध प्रयोग, मंत्रशास्त्र, ऐतिहासिक दाखले अशा विविध विषयांवर भाऊ बोलत असत. तरूणांसाठी जणू ज्ञानाच भंडार खुल झालं होतं. मंदिराची थोडी डागडुजीही भाऊंनी केली. याच मंदिरात प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी भाऊंना घोरात्कष्टोध्दरण ‘ स्तोत्र शिकवल व आपल्या कार्यास सुरूवात करण्यास सांगितले. त्यानंतर काही पारायणे आयोजित करण्यात आली. अस सर्व चालू असताना डॉकयार्ड येथे राहणारे श्री. मेघशाम सावंत एक दिवस भाऊंना भेटायला आले. डॉकयार्ड येथील रोझरी चर्चच्या मागे असलेल्या एका दत्त मंदिराचे ते विश्वस्त होते. या मंदिरात एक मोठा पिंपळ वृक्ष होता. त्या वृक्षाच्या कठडयावर एक दत्त मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. ही मूर्ती फार पूरातन असून एका व्यक्तीला समुद्रात सापडली असे सावंत सांगत असत. या वृक्षाखाली स्थापित केलेल्या दत्तमूर्ती वरून मंदिराचे नाव ठेवण्यात आले होते. मंदिराचं आवर मोठे होते पण मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते. आपल्याकडून देवाचे काम पूर्ण व्हावे या विचाराने सावंत चिंतेत असत. एके दिवशी दत्तमहाराजांनी स्वप्नात येऊन त्यांना भाऊंच रूप दाखवल व सांगितलं, `यांना इथे घेऊन ये, तो पुढील कार्य पूर्ण करेल. भाऊंना शोधत शोधत सावंत लालमैदानातील मंदिरात आले. त्यांनी भाऊंना आपला मनोदय सांगितला. आरतीला सर्वांसमोर त्यांनी आपला अनुभव कथन केला. भाऊंच्या श्रेष्ठतत्वाची साक्ष सर्वांना पटली. भाऊंनी मंदिरात येण्यासंबंधी त्यांना होकार कळविला. जणू त्यांनी विचार केला असावा की, गोकुळ उभे करण्याची वेळ आता आली आहे आणि भाऊ पिंपळेश्वर दत्त मंदिरात आले.
भाऊंनी आरतीच्या वेळी जाहिर केले की, पुढील गुरूवारची आरती ही पिंपळेश्वर मंदिर, डॉकयार्ड येथे होईल. डॉकयार्ड थोडे लांब असल्यामुळे लालबागकरांचे मन थोडे खट्टू झाले. परंतू आरतीच्या निमित्ताने ते दत्त मंदिर पाहिल्यावर सर्वांचे मन आनंदीत झाले. तेव्हा कोणालाच असे वाटले नव्हते की, आयुष्यभर आनंदाच्या आठवणी देणार गोकुळ इथेच उभे राहणार आहे. खऱ्या अर्थाने दत्तभक्तीला इथे सुरूवात होणार आहे. वर्ष होते १९९०. मंदिराचा परिसर बऱ्यापैकी मोठा होता. बांधकाम अर्धवट झालेले होते. पाठीमागे लांबच्या लांब बागेसारखा ओसाड पट्टा होता. तिथे पाच नारळाची झाडे होती. कंपाऊंड वॉल अस्तित्वातच नव्हती. मंदिराच्या मागेच्या बाजूला लागूनच रेल्वेचे बरेच ट्रक होते . सरकारी सामानाची ने-आण या ट्रकवरून होत असे. पुर्वेकडील मागील कोपऱ्याची बाजू ओसाड पडलेली होती. एक शौचालय व एक बाथरूम अस्तित्वात होते. पण अवस्था फारच बिकट होती. एक जमिनीलगत मोठी पाण्याची टाकी होती. एकंदरीत सर्व परिसर दुर्लक्षित होता. परंतु सकारात्मक ऊर्जा देणारा होता. परिसरात वेगळेच चैतन्य जाणवत असे. भाऊंचे सुरूवातीचे बरेच जुने शिष्य हे जयहिंद सिनेमाच्या मागे असलेल्या नेकजात मराठा सदन या चाळीत राहणारे होते. त्या कारणाने भाऊंची नेहमीच ये-जा या चाळीत होती. या चाळीत रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सर्व रहिवाश्यांना आनंदप्रित्यर्थ भरपेट मिसळपाव खाण्याचा कार्यक्रम होत असे. भाऊंच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या. बालगोपाळांना निष्काम सेवेची आवड लागावी म्हणून भाऊंनी एक नामी शक्कल लढवली. एके रविवारी सर्व बाळगोपाळांना मंदिरात सेवाकार्यासाठी बोलावले. त्याबदल्यात भरपेट मिसळपाव देण्याचे आश्वासन दिले. त्याकाळात मिसळपाव हि रोजच्या खाण्यातील गोष्ट नव्हती. मिसळपाव मिळणार या गोष्टीने सर्व बाळगोपाळ तयार झाले. ठरल्या रविवारी भाऊंनी मुलांकडून भरपूर स्वच्छतेची, साफसफाईची कामे करवून घेतली. मंदिराच्या मागील सर्व भाग स्वच्छ करण्यात आला. वीटा-दगड व इतर सर्व सामान जागेवर लावण्यात आले. नंतर भरपेट मिसळपाव मिळाल्यावर मुले कमालीची खूष झाली. अशा नवनविन युक्त्या करून भाऊंनी मुलांना निष्कामसेवेची आवड लावली. याच दरम्यान लालबग येथील पेरू कंपाऊंमधील गॅस कंपनी पाडण्यात आली होती. त्याच्या ट्रकभर वीटा रीतसर आणण्यात आल्या. या वीटांपासून मंदिराचे कंपाऊंड वॉल बांधण्यात आले. मंदिराचे अर्धवट राहिलेले बांधकाम भाऊंनी पूर्ण करण्यास सुरूवात केली. उर्वरीत भाग आर.सी.सी. बांधकाम करून पूर्ण करण्यात आला. भाऊंच्या कामाच्या पध्दतीने सावंत यांना कमालीचा जोष आला होता. मनातून ते निश्चिंत झाले होते. याची देही याची डोळा दत्तभूमी सर्वार्थाने उभी राहताना ते पाहत होते.
भाऊंचा जन्म कोकणातला असल्याने निसर्गाबद्दल त्यांना प्रचंड ओढ होती. विविध झाडे, फळे, फुले याबद्दल त्यांच ज्ञान अगाध होते. मंदिराच्या बाजूला ५/४० फुट असा जमिनीचा तुकडा होता. त्याच जमिनीत पाच माड होते. पण जमिन नीट राखली गेली नव्हती. या जमिनीत सुंदर बाग उठवायची, असं भाऊंनी ठरवलं. खरतर त्या चिंचोळया पट्टयात बाग उभी करायची असं कोणी मनातही आणलं नसतं. एक दिवस ते काम हाती घेतलं. सर्वानी मिळून कंबरभर जमीन खणून काढली. त्या जागी चांगली ट्रकभर खताची माती आणून टाकली आणि मग त्यात छान छान विविध फुलांची रोपटी लावली. पाण्याची कमतरता नव्हती. रोज झाडांना पाणी दिले जायचे. हळूहळू झाड मोठी होऊ लागली. बाग बहरू लागली. झाडांना पाणी कधी द्यायचे, मोठया झाडांच्या फांद्या कशा छाटायच्या, बागेची निगा कशी राखायची, अशी सर्व कामे भाऊंनी मुलांना शिकविली.
काही मुलांना भाऊंनी मंदिरातच राहायला सांगितले. भाऊंचा शब्द कुणीही कधीही मोडला नाही. एक एक करत १५ जण मंदिरात राहू लागले. भाऊंनी मंदिराचा प्रत्येक कोपरां-कोपरा सजवायला घेतला. छोटेसे स्वयंपाक घर बांधण्यात आले. बागेच्या ठिकाणी लांब पत्राशेड टाकण्यात आली. गाभाऱ्यासमोर एक छोटी खोली मुलांचे सामान ठेवण्यासाठी बांधण्यात आली. प्रत्येकाला लॉकर बनवून देण्यात आले. भाऊ एक गुरूकुलच उभे करत होते. काही मुले शिकत होती, तर काही मुले नोकरीला होती. काहीचे शिक्षण पूर्ण झाले होते. काही जण डिग्री, डिप्लोमा करीत होते. एक लहानगया मुलाने आपले दहावीचे शिक्षण व कॉलेज मंदिरात राहूनच पूर्ण केले. आपलं शिक्षण, कामधंदा करून मुलं मंदिरात सेवा करीत होती.
मंदिराच्या पुढिल भागात मोठा पिंपळवृक्ष होता. त्याला मोठा उंच कठडा बांधून त्यावर दत्तमूर्ती बसविली होती. भाऊंनी त्या झाडाला पॅगोडाचे रूप दिले. आतील मुर्तीसाठी काचेच कपाट बनविण्यात आले. पूर्ण मठाच रंगकाम करण्यात आलं. त्यासाठी कोणी बिगारी येत नसे. मुलचं सर्व काम करीत होती. ट्रकभर वाळू आली की शिडी लावून ती गच्चीवर चढविली जात असे. रंगकाम, सुतारकाम, गवंडीकाम, इलेक्टिक कनेक्शन इत्यादी कामे भाऊ मुलांकडून करवून घेत होते. त्यांना त्यातील सर्व बारकावे शिकवित होते. सुट्टीच्या दिवशी इतर मोठी मंडळीही मदतीला, सेवेला सहभागी होत असत. काही महिला शिष्यांना अन्नदानाचं काम हाती दिले होते. मुलांसाठी छान छान नाष्टा करण्याचे काम त्यांच्याकडे होते. प्रत्येक जण काहीना काही कामात गुंतलेला असायचा. येणाऱ्या उत्सवाचं, कार्यक्रमाचे औचित्य साधून, त्याप्रमाणे मंदिरातील कामाची आखणी होत असे. त्याबरहुकुम कामाच नियोजन असे.
मुलं मंदिरात रहायला लागल्यापासून भाऊंनी प्रथम दोन गोष्टी सुरू केल्या एक म्हणजे दररोज अतिथी भोजन व भजन. भजनाची सुरूवात भाऊंनी या मंदिरात आल्यावरच केली. सर्व शिष्यवर्ग संध्याकाळी भाऊंना भेटायला मंदिरात यायचा. कामावरून सुटल्यावर प्रत्येकाचे पाय आपोआपच मंदिराकडे वळायचे. रात्रौ ७.३० वा. आरती व्हायची मग एक तास भजन होत असे. रात्रौ ०९ वा. अतिथी भोजन सुरू व्हायचे. मंदिरात आलेले सर्वजण भोजन करूनच आपल्या घरी जायचे. बाहेरील बागेच्या बाजूला लांबच्यालांब टाकी बांधण्यात आली होती. त्यावर जेवणाची व्यवस्था केली जाई. प्रत्येक शिष्य गुरूसन्निध्यात राहण्यासाठी आसुसलेला असायचा. कामावरून सुटल्यावर कधी एकदा भाऊंना भेटतो असे प्रत्येकाला व्हायचे. दिवसभराचा कामाचा क्षीण हा संध्याकाळच्या भजनाने दूर व्हायचा. सुरूवातीला अतिथी भोजनाचे काम मुलेच पाहत असत. अतिथिभोजना साठी देणगी स्वीकारली जाई . त्यांची नावे भिंतिवर लिहिली असायची. भाजीपाला व इतर सामान आणण्यापासून ते तांदूळ निवडून जेवण बनविण्यापर्यंतची सर्व कामे मुलेच करत असत. कालांतराने काही महिला भगिनींना भाऊंनी वाराप्रमाणे भोजन करण्याची सेवा दिली. सर्व अतिथी जेवून झाल्यावर मुले जेवायला बसत. सर्व मुले जेवल्यावरच भाऊ घरी जात असत. दुसऱ्या दिवशी सकाळीच भाऊ मंदिरात हजर व्हायचे. नाष्टा नसल्यास पाव वगैरे मागवून त्यापासून विविध प्रकारचा नाष्टा भाऊ स्वत: बनवायचे. खुपशा नवनवीन झटपट डीश भाऊंनी मुलांना बनवायला शिकविले. खरच ते धन्य ज्यांनी भाऊंच्या हातचं अन्न खाल्लं. शनिवारी खास मैफिल असायची. काही इतर शिष्यही मंदिरात रहायला यायची. शनिवारी रात्री भाऊ साधनेचा काही भाग शिकवित असत. त्याकारणानेही काहीना भाऊ मंदिरात रहायला सांगत असत.
भजनानंतर भाऊंनी सर्व सामुदायिक पारायणे सुरू केली. साईसच्चरित्र पारायण हे श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या काळात होत असे. पारायण हा साधनेचा पाया असल्यामुळे सर्वजण पारायणला बसत असत. अभूतपूर्व सोहळा असायचा. सात दिवस उपवास असला तरी काही वाटायचे नाही. कारण उपवासाचे विविध पदार्थ भाऊ शिष्यांना करायला लावत असत. भोजनाच्या वेळी विविध पक्वाने बनविली जात असत. चहाची किटली नेहमी भरलेली असायची. खायला देण्यात भाऊंचा हात कोणीही धरू शकत नव्हता. ते स्वत: फक्त चव घ्यायचे पण शिष्यांना भरपेट खायला द्यायचे.
मे महिन्यात वाडीचा कार्यक्रम असायचा. सर्व शिष्यांना भाऊ दत्तांच्या राजधानी घेऊन जायचे. तेव्हा संस्थेची इमारत नव्हती. सर्वजण धर्मशाळेत उतरत असत. सर्वजन घरून स्वत:ची बॅग घेऊन येत असत. परंतू धर्मशाळेत लागणाऱ्या इतर वस्तूंचे नियोजन भाऊंनी पिंपळेश्वर मंदिरात करून ठेवले होते. जेवणाचे सामान, भांडी, वस्तू, ब्लँकेट, चादरी, रझया, ग्रंथ तसेच इतर साऱ्या बारीक सारीक वस्तूंचा संचय मंदिरात करून ठेवला होता. जाण्यापूर्वी सर्व सामानाची बांधाबांध मुलांकडून केली जायची. सर्व सामान ट्रेनने नेले जायच. तिथून धर्मशाळेत टेम्पोने आणलं जायचं. ही सर्व कामे मुलेच करीत असत. कार्यक्रम संपल्यावर सर्व सामानाची बांधणी करून पुन्हा मुंबईला आणून पुन्हा मंदिरात व्यवस्थित ठेवले जायचे. हाच प्रकार दिवाळीच्या कार्यक्रमा वेळीही होत असे. सर्व सामान ठेवण्यासाठी मंदिरात मोठ मोठी कपाट ठेवण्यात आली होती.
मंदिरात राहणाऱ्याला प्रत्येकाला भाऊंनी काही सेवा दिली होती. कोणाला झाडलोट, कुणाला देवपूजा, कोणी किचन व्यवस्था, कोणाकडे आतिथी भोजनाची कामगिरी, कोणी संध्याकाळच्या आरतीची व्यवस्था पहात असे. रात्रीच्या भांडी घासण्याचे वार ठरवून दिले होते. नित्य सेवा सोडता इतरही कामे चालू असायची. भाऊंनी तरूणांना सतत काहीना काही कामात व्यग्र ठेवले होते. प्रत्येक गोष्टीकडे ते जातीने लक्ष देत असत. दिवसभर सर्वजण कामात असायचे. परंतू कधीही कोणाला थकवा जाणवला नाही. यामागे भाऊंची किमया होती. काम चालू असताना त्यातील एकाला ते भजी, वडे किंवा एखादा छान पदार्थ बनवायला सांगत. तेही पोटभर. किंवा ते स्वत: येताना घेऊन येत. मध्येच येऊन सर्व काम बंद करायला सांगत व पोटभर खायला देत असत. खाणे झाल्यावर पुन्हा सर्व मुले कामाला लागत असत. काम करणाऱ्यांना ताजतवानं कसे ठेवायचे यचा तंत्र भाऊंना माहित होतं. प्रत्येक मुलांमध्ये भाऊंची शक्ती काम करत होती. एका वेगळया धूंदीत प्रत्येकजण रमून गेला होता. ऐन महाभारताच्या युध्दात श्रीकृष्ण रथाच्या घोडयांना बाजूला नेत असे व त्यांचा मसाज व स्वच्छता करीत असे. पुन्हा त्यांना ताजेतवाने करीत असे. हेच तंत्र भाऊंनी मुलांच्या बाबतीत वापरले होते.
विविध अंगानी भाऊ मुलांना घडवित होते. रूद्र मंत्राचं पहिले प्रशिक्षण भाऊंनी याच मंदिरात दिले. रूद्र पठण करणारा ब्रह्मवृंद तयार करण्यात आला. मंत्राच्या बाबतीत भाऊ खुप संवेदनशील होते. ते ज्याप्रमाणे शिकवत, त्याप्रमाणेच म्हणता आले पाहिजे यासाठी ते खूप आग्रही होते. स्वत: ते मंत्राचा सराव करवून घेत असत. हळूहळू सर्व मुले मंत्र म्हणण्यास तयार झाली. शिष्यांकरवी श्रावण सोमवारी रूद्राभिषेक करण्यात आला. ब्राह्मणेत्तर ब्रह्मवृंद भाऊंनी घडवला होता. रूद्रानंतर भाऊंनी शिष्यांना गायत्री मंत्राची दिक्षा दिली. जानवं प्रदान केलं. एका सर्वश्रेष्ठ जगवंद्य सद्गुरूंकडून शिष्यांना मंत्राची दिक्षा मिळाली होती. प्रत्येकजण गायत्री करू लागला. सर्वाथाने भाऊ शिष्यांना घडवित होते. एका एका दगडातून कोरून मूर्ती घडविण्याचे कार्य चालू होते. जसे सुचिर्भूत होऊन सोवळयात मंत्रपठण करायला भाऊंनी शिष्यांना शिकवले, त्याचप्रमाणे अस्वच्छ शौचालय साफ करण्यासही शिकविले. अहंकार होणार नाही याचीही काळजी घेतली.
गुरुवारची महाआरती
पिंपळेश्वर दत्त मंदिरातील गुरूवारची आरती म्हणजे एक सोहळा असायचा. गुरूवारी महाआरती असायची. सर्व शिष्यवर्ग दूरदूरहून भाऊंना भेटायला यायचा. सर्व मंदिर भरून जायचे. बाहेर सभागृहात महाआरती चालू असताना गाभाऱ्यात कोणीही एक शिष्य पादुकांवर रूद्राभिषेक करीत असायचा. प्रत्येक गुरूवारी वेगवेगळया शिष्याला संधी दिली जायची. मंदिरात आरतीच्यावेळी सर्व मुलांनी सफेद कपडे घालण्याचा दंडक भाऊंनी घालून दिला होता. सर्व मुले सफेद धोतर व सदरा घालून आरतीला बसत असत. एका रांगेत बसून, एका सुरात आरती म्हणण्याची पध्दत भाऊंनी सुरू करून दिली होती. महाआरती संपल्यावर अर्धा तास भाऊंचे प्रवचन असे. या काळात आध्यात्मनुरूप विविध विषयांवर भाऊ भाष्य करीत असत. त्यांच्या अमोघ वाणीला ऐकण्यासाठी प्रत्येक शिष्य आतुर झालेला असायचा. भाऊंच बोलण चालू असताना कोणालाही स्थळ, काळाचं भान राहायचं नाही. प्रत्यक्ष सरस्वती त्यांच्या मुखातून बोलत आहे असा भास सर्वांना व्हायचा. पूर्ण दिवस भाऊ विविध कामात मग्न असायचे. तरीही गुरूवारी त्यांच्या मुखातून हजारो विषयांचे ज्ञान पाझरत असे. या गोष्टीबद्दल प्रत्येकाला आश्चर्य वाटत असे. पुढील गुरूवारी भाऊ काय बोलणार याची ओढ प्रत्येकाला लागलेली असायची. खरच भाऊ शब्दप्रभूच होते. प्रवचन संपल्यावर भजन व्हायचे. भैरवी झाल्यावर सर्वांना भोजन प्रसाद दिला जायचा. गुरूवारी पुलावाचा बेत असायचा. प्रत्येकजण पोटभर जेवण करूनच घरी जात असे. पुलाव बनविण्याची तयारी दुपार पासून सुरू व्हायची. जणूकाही मंदिरात बाबांची द्वारकामाईच भाऊंनी वसवली होती. काही महिला शिष्य भाऊंसाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आणत असत. परंतू भाऊ त्याला फक्त हात लावून तो प्रसाद सर्वांना वाटायला सांगत असत. सर्व कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकजण भाऊंना नमस्कार करून आशीर्वाद घेऊनच घरी परतत असे. ईशकृपेने पिंपळेश्वर मंदिरात शिर्डीच अवतरली होती व भाऊ साईरूपात सर्वांचे कल्याण करण्यासाठीच अवतरीत झाले होते.
सौंदर्यदृष्टी
यशस्वी माणसं काही वेगळ करीत नसतात, ते प्रत्येक गोष्ट वेगळया तऱ्हेने करत असतात असं शिवखेरा याचं वाक्य आहे. हे वाक्य भाऊंच्या प्रत्येक कृतीतून प्रतित होत असे. पिंपळेश्वर मंदिराची सजावट करीत असताना भाऊंनी एक एक अफलातून गोष्टी केल्या. पूर्वी प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक छोटेसे पाण्याचे कुंड बांधलेले असायचे. मंदिरात येताना पाय धुवून प्रवेश करावा हा त्या मागचा उद्देश होता. आज ही प्रथा कालबाह्य झाली. पिंपळेश्वर मंदिराला दर्शनी भागात दोन दरवाजे होते. एक मोठा व एक छोटा दरवाजा. मोठा दरवाजा फक्त संध्याकाळी आरतीच्यावेळी उघडला जाई. सर्वांची ये-जा छोटया दरवाजानेच होई. या दरवाजाचं रूपांतर भाऊंनी प्राचीन मंदिराच्या अगम्य गुहेत प्रवेश करणाऱ्या नैसर्गिक प्रवेशद्वारात केलं. दरवाजाच्या वर राक्षसाचं तोंड उभे केले. त्याच्या मुखातून पाणी खाली पडत असे. खाली पडलेले पाणी दोन्ही बाजूला विभाजीत होऊन खाली येत असे. एका बाजूला नैसर्गिक वाटणारा कृत्रिम धबधबा बनवला गेला तर दुसऱ्या बाजूला डोहात पडणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचं रूप दिलं गेलं. आत प्रवेश केल्यावर एक छोटे तळे निर्माण केल होतं. उद्देश हाच की यात पाय धुवून आत यायचं. तळयातील पाणी पंपाने पुन्हा वर चढवल जाई. हा धबधबा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना झाला होता. हा धबधबा फक्त गुरूवारीच चालू करण्यात येत असे. हे डिझाईन भाऊंनी मुलांकडूनच करवून घेतलं होतं. मुलांच्या सुप्त गुणांना जागृत केलं होतं. तसेच मंदिराच्या मध्यभागी एक लोखंडी आय चॉनेल उभा करण्यात आला होता. इतर सजावटीला थोडीशी बाधा येत होती. भाऊंनी त्या खांब्याला चारही बाजूनी बॉक्स बनवून त्यावर वाद्य वाजविणाऱ्या स्त्रीयांच्या मूर्त्या बसविल्या. तो खांब प्राचीन मंदिराची आठवण करून देत असे. पिंपळाच्या वृक्षाला चोहोबाजूनी उतरत्या छताने आच्छादीत करून पॅगोडा बनविण्यात आला होता. कंपाऊंड वॉलच्या बाहेर जिथे भरपूर घाण होती, ती जागा स्वच्छ करून तिथे शोभेचे मोठे अळू लावण्यात आले. मंदिराच्या आतील रंगरंगोटी कल्पकतेने करण्यात आली. मंदिराचा दर्शनी भागाला ग्रील लावून मोकळा ठेवण्यात आला होता. त्यावर झडपासारखे पत्र्याचे आकर्षक पॅनल बसविण्यात आले होते. त्या पॅनलवर गुरूचरित्रातील चित्रे रंगविण्यात आली होती. वेळप्रसंगी ते पॅनल उघडता येऊ शकतील अशी सोय करण्यात आली होती. मंदिराचा कोपरां-कोपरा भाऊंनी कल्पकतेने सजविला होता. मंदिराचं अवलोकन केल्यावर भाऊंच्या अचाट कल्पनाशक्तीची जाणीव होत असे.
गुरूपौर्णिमा

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर: ।गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम:। अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून जे लोक भाऊंच्या जवळ आले होते, त्यांना ही आता भाऊंच्या संतत्वाची, गुरूतत्वाची ओळख झाली होती. प्रथम गुरूपौर्णिमा भाऊंच्या शिष्यांनी पिंपळेश्वर दत्त मंदिरात साजरी केली. सर्व बालगोपाळ या उत्सवासाठी कामाला लागले. गुरूपौर्णिमेच्या सात दिवस अगोदर श्रीगुरूचरित्र पारायण असे. पारायणाच्या निमित्ताने सर्वच शिष्य एकत्र आले होते. भाऊ महाराजांच व्यासपौर्णिमेच्या दिवशी पूजन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शिष्य उत्साहात बुडून गेला होता. मुलांनी सजावटीचे काम हाती घेतले. जे जे सामान होते, त्याचेच सुंदर डेकोरेशन तयार केले. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. मोठया मंडळींनी आर्थिक बाजू सांभाळली. महिला वर्गानी प्रसाद, भोजन व इतर कामाची जबाबदारी घेतली. भाऊ सर्व काही कुतुहलाने पहात होते. शिष्यांची लगबग पाहून त्यांचही मन भरून आल होत. शिष्यांना त्यांच्या मनासारखे करू दिलं. गुरूपौर्णिमेचा उत्सव मोठया थाटामाटात पार पडला गेला. उत्तरोत्तर हा सोहळा अधिकच भव्यदिव्य, सुंदर व नियोजनपूर्वक होऊ लागला. भाऊंनी प्रत्येक शिष्यावर पोटच्या मुलासारखे प्रेम केल होत. त्यांचा योगक्षेम वाहिला होता. कुटुंबाची काळजी घेतली होती. या प्रेमाची परत फेड करणे शक्य नाही. परंतु गुरूसेवेच्या अनुषंगाने प्रत्येक शिष्य भाऊंना आपल तन, मन, धन अर्पित करीत होता. आपली सेवा गुरूचरणी रूजू करीत होता.
भाऊ महाराज ज्या साधनेतून घडले ती साधना फार कठीण होती. सामान्य माणसाला पचनी पडणारी किंवा जमणारी नव्हती. शिष्यांच्या कल्याणाकरीता भगवान श्रीकृष्णाची सहजयोग साधना’ पुनर्जिवित केली. आपल्या जन्माबरोबर जे काही आले आहे, त्याला योग जोडून केली जाते ती सहजयोग साधना. या साधनेचा पाया होता, ‘पारायण पध्दती’. भाऊंनी सर्व शिष्यांकडून सर्व संतांची पारायणे करवून घेतली होती. रामनवमी व हनुमान जयंती या कालावधीत सात दिवस सामुदायिक श्रीसाईसच्चरित्र पारायण असे. गुरूपौर्णिमा व दत्तजयंती या उत्सवापूर्वी सात दिवस श्रीगुरूचरित्र पारायण असे. नवरात्रीमध्ये देवी महात्म्य या ग्रंथाचे पारायण असायचे. माघ पौर्णिमेचे अन्नदान सुरू करण्यापूर्वी मंदिरात एका दिवसाचे श्रीगुरूचरित्र पारायण आयोजित केले जायचे. ही सर्व सामुदायिक पारायणे होती. या शिवाय मंदिरात राहणाऱ्या प्रत्येक मुलाला आठवडयातील कमीत कमी दोन दिवस पारायण करण्याचा नियम लावून दिला होता. मंदिरात अखंड पारायणे चालू असायची. शिष्यांपैकी काही लोक आपली समस्या भाऊंकडे घेऊन येत असत. त्या समस्या भाऊ लिलया सोडवत असत. परंतु त्या शिष्याला मंदिरात काही पारायणे करायला लावीत असत. तसेच त्या बरोबर इतरही सेवा करायला सांगत असत. पारायणाचे नियम सर्वांसाठी सारखेच होते. प्रत्येकाच्या संचितातील वाईट कालखंड काढून टाकण्यासाठी, त्याच प्रारब्ध स्वच्छ करण्यासाठी भाऊ प्रत्येकाला काही ना काही सेवा, पारायण इ. करायला सांगत असत. त्यात टंगळमंगळ झालेली त्यांना आवडत नसे. ज्यांनी भाऊंचा शब्द तंतोतंत पाळला तो भवसागर पार करून गेला. आणि ज्यांनी दुर्लक्ष केले त्याला भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. पारायणातून भाऊंनी शिष्यांची आध्यात्माची बैठक मजबूत करून घेतली. साधना फलद्रूप होण्यासाठी संतांचे आशिर्वाद गरजेचे असतात. संतच भक्ताला सांभाळतात. पारायण काळात इतरही सेवा करवून घेत असत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तीमार्ग या तीन्ही मार्गातून योग्य प्रवास करण्यासाठी पारायणाची बैठक वेगळया तऱ्हेने भाऊंनी बसविली होती. सामुदायिक पारायण काळात मंदिरातील इतर कामे भाऊ काढीत असत. पारायण म्हणजे नुसती कवायत घडू नये म्हणून वाचन संपल्यावर इतर सेवेत सहभागी होण्याचा बेत असे. तसेच सायंकाळी भजन सेवेत सहभागी होणे महत्वाचे असे. पारायणातून ज्ञानमार्गाची ओळख व्हावी म्हणून, निष्काम सेवेतून कर्ममार्गाची ओळख व्हावी व भजनातून भक्तीमार्गाची ओळख व्हावी, अशी व्यवस्था भाऊंनी करून ठेवली होती. तिन्ही मार्गातून शिष्य तावून सुलाखून तयार व्हायला पाहिजे असे न कळत शिक्षण भाऊ देत होते. कोणीही नको त्या कामात आपला वेळ घालवू नये, त्याऐवजी त्याचा जास्तीत जास्त वेळ ईश सेवेत जावा याची काळजी सद्गुरू घेत होते.
दत्तजयंती
पिंपळेश्वर मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे दत्त जयंती. हा उत्सव फार मोठया थाटामाटात साजरा होत असे. त्या विभागातील एकमेव पुरातन मंदिर असल्यामुळे विभागातील सर्वच मंडळी दर्शनाला येत असत. या दिवशी महाराजांची पालखी निघते व पूर्ण माझगांव विभागात फिरवली जाते. भाऊंनी मंदिरात पाय ठेवल्यापासून हा उत्सव जंगी स्वरूपात होऊ लागला. कामाची सुरूवात एक महिनाभर अगोदर होत असे. पूर्ण मंदिर महिन्याभरात पुन: नव्याने रंगवले जाई. ही पूर्ण जबाबदारी मुलांवर असायची. झाडाभोवतालचा पॅगोडा पुन्हा नव्याने शाकारण्यात व रंगवण्यात येत असे. मंदिराचा गाभारा, दरवाजे, खिडक्या, ग्रील, भिंती, सिलींग, खांब सर्व काही रंगविले जाई. मंदिराचा आतील तसेच बाहेरील भाग उत्तम रंगसंगतीने रंगविले जाई. मंदिराच्या बाहेरील भिंतीला जोडून छोटी पण लांबचलांब बाग बनवून घेतली होती. त्यात विविध शोभेच्या झाडाची लागवड केली होती. त्यावर लाईटची तोरणे टाकण्यात येत असे. भाऊंना लाईटींगची फार आवड होती. मुख्य गाभारावर मोठा कळस होता जो कुठूनही दिसत असे. भाऊंनी त्याला सफेद व निळया रंगाची विशिष्ट पध्दतीने रंगकाम केले होते. खालून निळया लाईटचा झोत सोडला गेला होता. वर सफेद थर्माकोल लावण्यात आला होता. रात्रीच्या वेळी लाईट लावल्यावर कळस हिमशिखरासारखा दिसत असे. रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाहेर, हातात दिवा घेतलेल्या मूर्त्या उभ्या केल्या होत्या. लाईट लावल्यावर ते कृत्रिम दिवे पेटत असत. भाऊंनी मंदिराला अक्षरश: अवंतिका नगरीचं रूप दिलं होत. दत्तजयंतीला भाविकांची प्रचंड गर्दी होत असे. सर्वांसाठी प्रसाद भोजनाची व्यवस्था केलेली असे. हजारो भाविक प्रसाद घेऊन तृप्त होत असत. पंक्तीच्या पंक्ती उत्तररात्रौपर्यंत उठत असायच्या. सर्व शिष्यवर्ग सेवेत गुंग असायचा. भाऊंच्या कृपेमुळे कोणालाही थकवा जाणवत नसे.
एक अविस्मरणीय अनुभव
दत्तजयंतीचा उत्सव संपला होता. सर्व भाविक भोजन घेऊन परतले होते. शिष्यवर्ग उरलेली कामे करत होता. एक महिला शिष्य भांडी घासत होती. रेल्वेलाईनच्या बाजूला एक मोठे स्वयंपाक घर होते व त्याबाहेर भांडी घासायची व्यवस्था केली होती. रात्रीचे २.३० वाजले होते. अचानक तिचं लक्ष गेल की भाऊ भिंतीच्या पलीकडे बाहेर बघत उभे होते व हात वर करून कोणाला तरी हात दाखवत होते. अस बराच वेळ चाललं होतं. तिला आश्चर्य वाटले की इतक्या रात्री भाऊ कोणाला हात दाखवत आहेत. न राहून तीने बाहेर पाहिले तर बरीच माणसे चालली होती. पण ती माणसे भाऊंना नमस्कार करून पुढे जात होते. मध्ये रेल्वेट्रॅक व पलीकडे रस्ता होता. माझगाव डॉकची रात्र पाळीची माणसे सुटली की त्या रस्त्याने जात असत. तीला वाटले की माझगांव डॉकची लोक असावीत. तीने भाऊंना विचारले, ही एवढी लोक कोण आहेत? व ती तुम्हांला नमस्कार का करताहेत? भाऊ म्हणाले, उद्या सकाळी सर्व सांगतो. सकाळ झाल्यावर तीने पुन्हा विचारले. भाऊ म्हणाले, ती माणसे नव्हती, ते सर्व आत्मे होते. ते सर्व माझे शिष्य होते. दत्तजयंतीच्या निमित्ताने ते सर्व माझे दर्शन घ्यायला आले होते. त्यांना भेटण्यासाठी मी तेथे उभा होतो. हे ऐकल्यावर तीला चक्करच यायची बाकी होती. अशा तऱ्हेने भाऊंनी पिंपळेश्वर दत्तमंदिरात गोकुळ फुलविले होते.
कोडकौतुक
पिंपळेश्वर मंदिरात सजावटीच्या दृष्टीने किंवा पूर्णत्वाच्या दृष्टीने सतत काही ना काही काम चालू असायची. बहुतांशी कामे ही मुलांकडूनच केली जात असायची. काम पूर्ण झाल्यावर ज्यांनी उत्तम काम केले असेल त्याचे कोडकौतुक भाऊ आवर्जून करीत असत. याच काळात गाणगापुरच्या मठाचेही काम चालू झाले होते. काही मुलाना भाऊ सेवेसाठी तिथेही पाठवित असत. कोडकौतुक, सत्कार करवून घेण्याची मुलांना आवड नव्हती. पण उत्तम कामगिरीबद्दल भाऊंच्या हातून काही ना काही मिळणार, त्याबद्दल उत्सुकता असायची. मुलांना त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा. तसेच स्वत:मधील अंतरिक उर्जेची ओळख व्हावी म्हणून विविध कामे भाऊ मुलांच्या खांद्यावर टाकत असत. ते काम पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत असत. भाऊंच्या पसंतीस पडावे यासाठी मुले रात्रीचा दिवस करीत असत. आपल्या मधून उत्तमोत्तम देण्यासाठी धडपडत असत. कामातील तत्परता, इतिकर्तव्यता, समरसता पाहून उत्तम कामगिरी करणाऱ्याचे भाऊ सर्वांसमक्ष सत्कार करीत असत. ज्यांचे सत्कार करीत, ते का केले, त्याच कारणही सर्वांना सांगत असत. सोवळ, उपरण किंवा धोतर सदरा इ. परमार्थास उपयुक्त गोष्टी देत असत. परंतु जो खरा मानकरी असे त्याला ते स्वत: वापरलेले सोवळे, उपरणे, सदरा, धोतर देत असत. भाऊंच्या वस्तू मिळाव्यात यासाठी सर्वजण धडपडत असत. ज्यांच्याकडे भाऊंनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांच्या पादुका आहेत त्या प्रत्येकाने आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. पूजन केलेले आहेत. ते सर्व क्षण खरच स्वर्गसुखाची आठवण करून देणारे आहेत.
एकदा मंदिरात बांधकाम चालू होत व त्या अनुषंगाने इतरही काही साफ़सफाईची कामें होती. सर्व बालगोपाल कामात व्यग्र होते. एका बाजूला जुन्या वीटा साफ केल्या जात होत्या तर दुसरिकडे त्या रचल्या जात होत्या. एका लहान मुलाने भाऊंना कामासंबंधी काही तरी विचारल. त्यावर भाऊ म्हणाले, बाळ हे काम पूर्ण झालं की थांबायचं नाही आहे, पुढे पुढे जात अशी बरीच स्थानं निर्माण करायची आहेत. त्या लहान मुलाला तेंव्हा त्याचा अर्थ कळला नाही, काही वर्षानी कळला. भाऊंना आपल्या अनेक शिष्यांच्या नावा पैलतिरावर लावायच्या होत्या. त्यासाठी व प्रसारासाठी अनेक स्थानं निर्माण करायची होती. त्या विभूतिच्या कार्याचा ठसा अनेक ठिकाणी उमटणार होता. महाराजांच्या आज्ञेने ईप्सित कार्य पूर्ण झाले होते, एका दत्तभूमीचे!. आता वेळ आली होती पुढच्या प्रवासाची. भाऊंनी आपलं लक्ष पूर्णतः गाणगापूर मठाकडे वळवल. एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी।। भगवान कृष्ण जेव्हा सर्वांना सोडून निघून गेला. तेव्हा त्याच्या प्रियजणांच्या ह्दयातून एकच आर्त हाक येत होती, ‘परतूनी ये घनश्यामा’ असंच काहीसं भाऊंच्या मुलांच्या बाबतीत घडलं आहे. त्यांच्या आठवणीने आजही प्रत्येक शिष्याच्या डोळयातून आसवे झराझरा वाहू लागतात. ह्दयातून एकच आर्त हाक ऐकू येते..

परतूनी या भाऊनाथा । परतूनी या भाऊनाथा।। कंठ दाटूनी आला भाऊ। परत या तुम्ही आता ।। थकलो दमलो श्वास कोंडला । ह्दयी द्या विसावा । तुमच्या ह्दयी द्या विसावा।।