
भाऊंची ईच्छा….





श्रीक्षेत्र गाणगापूर येथील मठाच्या उभारणीनंतर भाऊंना सतत असे वाटू लागले की, गाणगापूर तसे मुंबईकरांना अमंळ लांबच. मुंबईच्या जवळ गाणगापूरसारख एखाद स्थान असावं. जेणेकरून मुंबईकर सहज देवाच्या दशर्नाला नित्यनेमाने येऊ शकतील. जणू प्रति गाणगापूरच. त्यांनी आपला मानस आपल्या शिष्यवगार्ला बोलूनही दाखवला. कोणत्या भागात मठ असावा, जागा कशी असावी याबद्दल सूचनाही दिल्या. या क्षेत्रातील माहितगार माणसे कामाला लागली. वेगवेगळया जागांबद्दल माहिती भाऊंना देण्यात आली.

आणि भाऊंना वाशिंदची जागा फार आवडली…

माऊली गडाच्या पायथ्याशी, निसर्गरम्य ठिकाण, मुंबईहून अवघ्या ७५ कि.मी. अंतरावर असलेले हे स्थान भाऊ स्वत: जाऊन पाहून आले व त्यांनी संमती दिली. मठाबरोबरच आपल्या शिष्यांचीही घरे जवळच असावी, असा भाऊंचा मानस होता. त्या नियोजनापर घरकूल योजना व मठ असा आराखडा तयार करण्यात आला. हा हा म्हणता जागा घेण्यासाठी सर्व शिष्य धावून आले. मनामध्ये एकच नाद घुमत होता. मुंबईच्या जवळ आपला आणखी एक मठ निर्माण होणार. प्रति गाणगापूर! कायदेशीर बाबी पूर्ण करून जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. गाणगापूर मठाचा विस्तार चालू असतानाच या नविन मठाचे काम भाऊंनी हाती घेतले. विविध कामांच्या जबाबदा-या अनेक तरूणांच्या खांद्यावर दिल्या व त्याबरोबर करवूनही घेतल्या. हळूहळू वाशिंद मठ उभा राहू लागला. एक नविन तीर्थक्षेत्र आकारास येऊ लागल. श्रीमंत बुटीसाहेबांनी शिर्डीत वाडा बांधायला घेतल्यावर जसे साईबाबा चावडीवरून येता जाता त्यांना मार्गदर्शन करत होते, तसेच भाऊ वाशिंद मठाची उभारणी स्वत:च्या कल्पनेतून करीत होते. तेव्हा कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती की हेच स्थान पुढे भाऊ महाराजांच समाधीस्थान असणार आहे.

शहापूरच्या वायव्येला असलेला `माहुली किल्ला’ मध्ययुगीन कालखंडात आजूबाजूच्या ब-याच ठिकाणाशी जोडला गेला होता. छत्रपती शिवरायांचे काही काळ वास्तव्य या किल्यावर झाले होते. कल्याण सुभ्याजवळील किल्ला म्हणून याला वेगळे महत्व होते. माऊली – जव्हारमार्गे नाशिक. तसेच माऊली किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट जुन्नर; अशा भौगोलिक रचनेमुळे माऊली गडाला वेगळच महत्व प्राप्त झाले होते. काही इतिहासकारांच्या मते शिवरायांचा जन्म माऊली गडावर होणार होता पण काही कारणास्तव हा बेत रद्द करून शहाजीराजेंनी जिजाबाईंना शिवनेरी पाठविले. माऊली गडाचे अध्यात्मिकदृष्टया आणखी एक महत्व आहे. या गडावर ब-याच नाथपंथीयांनी साधना केली आहे. काही नाथपंथी यांच्या समाध्याही या गडावर आहेत. जिजाबाईंच्या सासू दिपाबाई यांचे गुरू ‘गुंडामहाराज’ हे नाथपंथीय असून त्यांनी याच भागात तपश्चर्या केली होती. गुंडामहाराज यांचे गुरू ‘सत्यामलनाथ’ या योगीराजांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नामध्ये अनुग्रहीत केले होते. ज्ञानेश्वरांची नाथपंथीय साधना सत्यमलनाथ-गुंडामहाराज-दिपाबाई-जिजाबाईंकडे आली होती. या साधनेच्या जोरावर जिजाऊंनी या जगाला एकमेव असा छत्रपती शिवरायांसारखा पुत्र दिला. ज्या शिवरायांच्या कृपेमुळे आज हा एकसंघ महाराष्ट्र उभा आहे. त्याचे मूळ कुठेतरी या माहुली किल्ल्यावर लपलेले आहे. योगायोग असा की सद्गुरू भाऊ महाराजांना साधनेचा काही उच्चत्तम भाग पी. अण्णास्वामी यांनी दिला. पी. अण्णा स्वामीना प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी अनुग्रहीत केले होते. गोरक्षनाथांकडून ही नाथपंथीय साधना पी. अण्णास्वामी- भाऊमहाराज यांच्याकडे आली. म्हणूनच की काय या माऊली गडाकडे भाऊ आकृष्ट झाले आणि पुढे एक दत्तस्थान `श्रीक्षेत्र वाशिंद’ उदयास आले.

सुरूवातीला त्या जमिनीत विविध सुंदर झाडे असावीत या कल्पनेने भाऊ तरूण मुलांना विविध झाडं लावण्यासाठी पाठवत असत. निसर्गाबद्दलचे भाऊंचे प्रेम वादातीत होते. गाणगापूर मठाच्या उभारणी वेळीही मठाचे बांधकाम पूर्ण होण्याअगोदर त्याच जागेत विविध झाडांनी फुललेली बाग उभी राहीली होती. झाडा-फुलांबद्दल त्यांच ज्ञान अगाध होते. निसर्गाशी एकरूप होता आले की तो निसर्ग आपल्याला भरभरून देतो. मठाच्या कामासाठी लागणारे सामान एक खोली बांधण्यात आली. सेवेसाठी गेलेली तरूण मंडळी त्याच खोलीत रहात असत. नंतर इतर शिष्यांना रहाता यावं म्हणून ५ रूम बांधण्यात आल्या. हा कालखंड १९९८-९९ चा असावा.

गाणगापूरची धूरा काकाश्रींच्या खांद्यावर देऊन भाऊ पूर्ण वेळ वाशिंदच्या कामात लक्ष घालू लागले. भाऊंची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रथम बांधलेली सामानाची रूम (Storage Room) खाली करून भाऊंच्या निवासासाठी तयार करण्यात आली. माऊलीच मन एवढे मोठे की, त्याही छोटेखानी घरात ते शेवटपर्यंत आनंदाने राहिले. गाणगापूरातही भाऊंनी शिष्यांसाठी एवढा मोठा मठ बांधला पण स्वत:साठी फक्त १०×१० ची रूम करवून घेतली. भाऊंनी आपल्या कृत्यातून येणा-या नविन पिढीला जणू एक शिकवणच दिली होती. त्या घरातील सजावट अतिशय साधी होती. `साधी राहणी व उच्च विचारसरणी’ हे ब्रीद जणू ते कोळून प्यायले होते.

प्रति गाणगापूर निर्माण करण्याकरीता तिथे दत्तस्थान निर्माण करणे गरजेच होते. गणपती मंदिर, दत्तमंदिर, शिवमंदिर बांधकामाला सुरूवात झाली. मंदिरासमोर भला मोठा सभा मंडप, सभामंडपाच्या बाहेर दत्तमहाराजांसमोर गरूडाचं स्थान. गरूडाच्या मागे छोटी बाग व त्याप्रमाणे हनुमंताचे व भस्म मंदिराचे स्थान. या सभोवताली पालखी फिरण्यासाठी चांगली रूंद फरसबंदी. भाऊंच्या घराकडून खाली दत्तमंदिरात यायला सुंदर पाय-यांच कल्पक बांधकाम करण्यात आलं. दत्तमंदिरात खाली येण्यापूर्वी डाव्याबाजूला श्रीकृष्ण मंदिर, देवीमंदिर स्थान. या सर्व बांधकामाचे आरेखण भाऊंनी अगोदरच करून ठेवले होते. त्यावेळी ती जागा म्हणजे गावातून कालव्याकडे जाणा-या असलेल्या रस्त्याला असलेला उतरणीचा भाग होता. मठाची जागा जेथे संपत होती तेथून खाली सगळा परिसर समांतर, सपाट शेतीचा होता. आजही गावातील मंडळी तेथे शेती करतात किंबहूना शेतीसाठी तो सपाट करवून घेतला असावा. उतरणीचा मिळालेल्या जागेचा भाऊंनी कल्पकतेने वापर केला व मंदिराबरोबर बागही तयार केली. जेव्हा मठाच काम चालू होत, तेव्हा कोणालाही या सजावटीच लक्षात येत नव्हतं. मठाचं पूर्ण काम कंत्राट देऊन नाही करण्यात आले. जसे-जसे पैसे येतील त्याप्रमाणे काम पूर्णत्वाला जात होते. मठात यायला शेतातून एक पायवाट होती.

तिथे प्रवेशाजवळच भस्ममंदिराच्या पाठीमागे `यिन / यांग (म्हणजे शिव आणि शक्ति) आकाराचा छोटा कृत्रीम तलाव बांधण्यात आला. दत्तमंदिराच्या वरच्या बाजूने रस्त्यावरून कालव्याच झिरपलेले पाणी जात असे, छोटा झराच म्हणा ना! त्या झ-याच पाणी कल्पकतेने मठात फिरवून भूमिगत मार्गाने या तलावात येत असे. पाण्याच्या साठयाचा मोठा प्रश्न भाऊंनी लीलया सोडवला होता. तलावात कमळाची लागवड करण्यात आली. तलावात फुललेली कमळ फारच सुंदर दिसत. वरून येणा-या पाय-यांच्या दुतर्फा पामवृक्षांची लागवड केली गेली. हे पामवृक्ष मोठे झाल्यावर तो परिसर फार रमणीय दिसत असे. मठाचे प्रवेश द्वारही भाऊंनी मोठया कल्पकतेने सजवले होते. प्रवेशद्वाराच्या बाजूला स्वागत करणा-या फायबरच्या मूर्त्या उभ्या करण्यात आल्या होत्या. इथे मला एक प्रसिध्द वाक्य आठवले -`प्रत्येक यशस्वी माणूस काही वेगळे करत नसतो, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळया पध्दतीने करत असतो.’






आपण पाहिले असेलच की, ब-याच ठिकाणी लोक आवडीने, प्रेमाने किंवा अंतस्थ हेतून म्हणा देवालये उभी करीत असतात. मोठमोठी टोलेजंग देवालये बांधली जातात. ही सुंदर देवालये पहायला लोक जातात. मूळ प्रश्न असा की टोलेजंग, भव्यदिव्य बांधकामाचा देव भुकेला आहे की भक्तीचा? देवालयापेक्षा त्यातील देवाचं मोठेपण जाणवलं पाहिले. कारण आपण देवाला भेटायला देवळात जातो. वाशिंद किंवा गाणगापूर मठाचे बांधकाम पाहिल्यावर कोणालाही सहज लक्षात येईल की, ही कामे प्लान करून बांधकाम केलेली नाही आहेत. जसे पैसे येतील, भाविकांच्या गरजा पाहून बांधकाम करण्यात आले आहे. वाशिंद मठात झाडाफुलांची नैसर्गिक सजावट केलेली आहे. कारण देवाला निसर्ग प्रिय आहे.
पिंपळेश्वर दत्तमंदिरात असल्यापासून भाऊ नेहमी पालखीचा उच्चार करायचे. वाडीला व गाणगापूरला दररोज जी पालखी निघत असे ती गुरूवारी आपल्याकडे चालू करावी, अस भाऊ वेळोवेळी बोलून दाखवत असत. वाशिंद मठाचे काम भाऊंच्या कल्पनेने पूर्ण झाले होते. आता या निसर्गरम्य ठिकाणी देवाची खरी उपस्थिती असणे गरजेचे होते. देवळात मूर्ती बसवली म्हणजे देव उभा राहिला असं म्हणणं संयुक्तिक नाही. त्या मूर्ती मध्ये ख-या देवाचे प्रगटीकरण व्हावयास हवे.
आणि तो योग आला….

एकदा भाऊंना श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी दृष्टान्तामध्ये सांगितले की, `मला फिरायला घेऊन चल!’ भाऊंनी विचारले कुठे?’ स्वामी म्हणाले, `मला वाशिंदला फिरायला घेऊन चल!’ आता देवालाच आणायच तर पालखीतूनच आणावयास हवे. या संकल्पनेतून २००२ साली मार्च महिन्यात ‘गाणगापूर ते वाशिंद पायी पालखी परिक्रमा’ करण्याचं नियोजन भाऊंनी केलं.

मानवनिर्मित चांदीच्या पादुका गाणगापुरातील `निर्गुण पादुकांना’ स्पर्शित, अभिषिक्त करून २१ दिवस `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषात वाशिंद मठात पोहोचल्या. पालखी विशेषांकात याचा इति वृत्तांत आला आहे. गाणगापूरच श्रीदत्तात्रेयाच तत्व भाऊंनी वाशिंदला आणले. जस बाळ जन्माला आल्यावर त्याची काळजी घ्यायची असते, काही सोपस्कार करायचे असतात, त्याप्रमाणे या दत्त पादुकांवर काही उपचार होणे गरजेच होत. या संकल्पातून भाऊ महाराजांनी दत्त पादुकांवर `शिष्यांकरवी’ एक महिनाभर रूद्राभिषेक करून घेतला. नृसिंहवाडीला `मनोहर पादुकांवर’ विशिष्ट कालावधीत `पवमान सुक्त अभिषेक’ केला जातो. येणा-या भक्तांचे दु:ख देव आपल्याकडे घेत असतो. हा त्रास काही मंत्रोपचाराने कमी व्हावा या कारणाने अशा मंत्राभिषेकाची विधी करण्याची पध्दत आहे. त्यापासून एक नविन पध्दत भाऊंनी वाशिंदला चालू केली. प्रत्येक मे महिन्यात २१ दिवस अनुक्रमे, ‘७ दिवस अखंड नामघोष’, `७ दिवस अखंड विणावादन’ आणि `७ दिवस हरिभजन’ असा सेवेचा प्रकार सुरू केला. जो आजतागायत चालू आहे. या कार्यक्रर्माची आखणी अशी केली जाते की, प्रत्येक भाविक यात सहभागी होऊ शकतो. आपली सेवा देवा चरणी रूजू करू शकतो. सामुदायिक नामस्मरणावर भाऊंचा प्रचंड जोर होता.

गाणगापूरहून श्रीदत्त पादुका वाशिंद ग्रामी पोहोचल्यावर, दर गुरूवारी श्रीदत्त पादुका पालखी सेवा भाऊनी सुरू केली. ज्याप्रमाणे गाणगापुरात, नृसिंहवाडीला सायंकाळी श्रीदत्त पालखी निघते त्याचप्रमाणे वाशिंदला दर गुरूवारी मंत्रघोषात श्रीदत्त पादुका पालखीत ठेवल्या जातात. देवाला- पादुकांना पालखीत ठेवून मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा केल्या जातात. या प्रदक्षिणा दरम्यान ४ दिशेला पालखी थांबते. प्रत्येक ठिकाणी विविध पदे (टेंब्येस्वामी रचित करूणा त्रिपादीचा यात समावेश असतो.) म्हटली जातात व शेवटी भैरवीने पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पादुका पून्हा गाभा-यात ठेवल्या जातात. हा पूर्ण कार्यक्रम कडक सोवळयात पार पाडला जातो. यात एक महत्वाचा फरक असा की, पालखी वाहणारे भक्त सर्व वर्गातील असतात.
गुरूपौर्णिमा

वाशिंद मठात भाऊ रहायला लागल्यापासून गुरूपौर्णिमेचा उत्सव मठातच होऊ लागला. गुरूपौर्णिमा जवळ आली की एक महिना अगोदरच कामाची लगबग सुरू होते. या कालावधीत त्या विभागात प्रचंड पाऊस पडत असतो. पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय होऊ नये तसेच येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध कामे केली जातात. सर्व शिष्य या सेवेला हातभार लावतात. गुरूपौर्णिमेपूर्वी सात दिवस अगोदर `श्रीगुरूचरित्र पारायण’ आयोजित केले जाते. बरेच भक्त यात सहभागी होतात. भक्तांची सर्व व्यवस्था मठाद्वारे केली जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजन सोहळयाबरोबरच इतरही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. समस्त भाऊ महाराज शिष्यांद्वारे फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो.
नवचंडी होम :

पिंपळेश्वर दत्त मंदिरात भाऊंनी `नवरात्रीचा’ उत्सव सुरू केला होता. वाशिंद मठात श्रीकृष्णाच्या मंदिराच्या बाजूला देवीचे स्थान निर्माण करण्यात आले. नवरात्रीमध्ये येथे ‘घटस्थापना’ केली जाते. अष्टमीपर्यंत ‘श्रीदेवी महात्म्य‘ ग्रंथाचे पारायण आयोजित केले जाते. भाविक मंडळी मुंबईहून येथे येऊन हे पारायण करून आपली सेवा देवी चरणी रूजू करतात. अष्टमीला `चंडीहोमाचे’ आयोजन केले जाते. होमाच्या पूर्णाहूतीने कार्यक्रमाची सांगता केली जाते. ब्राह्मणांच्या व शिष्य परिवाराच्या मंत्र पठणात हा कार्यक्रम संपन्न होतो. पारायणासोबतच श्रीदेवी सहस्त्रनामावली, श्रीअर्गला स्तोत्र, श्रीकुंजिकास्तोत्रचे ही पठण केले जाते. चैत्रातील अष्टमीला वाशिंद मठात `नवचंडी होम’ आयोजित केला जातो. विधिवत ब्राह्मणांकडून हा होम मानवजातीच्या कल्याणाकरीता आयोजित केला जातो.
आदिमाया :

परंपरागत वैचारिक बैठक, पगडा, नितीमुल्य, आचारधर्म शिरोधार्य मानने हे आधुनिक पिढीला तितकसं पटणार नाही. किंबहुना प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीत घालून त्याचे मुल्यमापन करण्यात आजच्या युवा पिढीचा कल आहे. तो तितकासा योग्य आहे असे म्हणता येणार नाही. कारण भौतिकशास्राचे नियम आध्यात्मशास्राला लागू पडतीलच असे नाही. उदा. दुस-याच्या मनातील विचार मनसंक्रमाणाद्वारे आपल्याला ओळखता येऊ शकतात हे परामानसशास्राने सिध्दांताद्वारे सिध्द केले आहे. परंतु त्याचे पुरावे मिळू शकत नाही. अध्यात्मशास्राचे हेच आहे. त्याचे अनुभव येतात परंतु त्यांचे विश्लेषण वैज्ञानिक कसोटीवर होईलच असे नाही.


आदीशक्ती`आदीमाया’ या शब्दांमध्येच आदीअनादीत्व लपलेले आहे. आज ज्याला आपण शक्ती (power) हा शब्द वापरतो तो त्या काळानुसार ज्ञानचक्षूंना न समजणा-या परंतु प्रत्येक ठिकाणी त्या शक्तीचा अस्तित्वाचा स्पर्श होत असलेल्या अनुभवामध्ये आहे. आदीऋषींनी असा सिध्दांत मांडला की, `शिव’ हा या सृष्टीचा निर्माण करता असूनही तो या सृष्टीपासून अलिप्त आहे. त्याच्यायोगे निर्माण होणारया व विश्वाचे कार्यकारण ठरणारया उर्जाशक्ती प्रदर्शनाला `माया’ असे म्हटले जाते. `शिवलिंग’ हे त्याचे प्रतिक आहे. याच शक्तीला आपण देवी, आई, आदीशक्ती संबोधतो. वैज्ञानिक दृष्टीकोणातून जर याचा अर्थ लावला तर असं म्हणता येईल की, न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन (शिव) हा स्थिर असून इलेक्ट्रॉन (माया) ही त्याभोवती फिरत असते. जे चराचरात भरलेले आहे.

चराचरात अस्तित्वात असलेल्या या शक्तीला आपल्या पूर्वजांनी दैवीक स्वरूप दिले. त्या शक्तीच्या उपासनेचा आचारधर्म निर्माण केला जेणेकरून ही शक्ती मानवास सहाय्यभूत होईल व त्याचे कल्याण होईल. याच आदीमायेचे पृथ्वी हे तत्व असल्याने भारतात तिला सर्वदूर ब-याच नावाने पूजले जाते. जमिनीला आई म्हणून पूजतात. कारण सर्व सजिवांच्या पोषणासाठी तीच प्रथम कारणीभूत असते. या आदीमायेचे उपासना केल्याने अधिक धनधान्य पिकेल व अधिक सुख नांदेल ही भावना. देवीची उपासना केल्याने सुख-समृध्दी, ऐश्वर्य नांदेल हा आजतागायतचा अनुभव आहे. कर्णोपकर्णी गोष्टीवरून उपासना केल्यास त्यात यश येईलच असे नाही. योग्य गुरूंकडून मार्गदर्शन घेतले असता योग्य उपासना होऊ शकते. देवी उपासनामध्ये काही प्रमुख भाग आहेत. वर्षातील अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून दशमी (दसरा) पूर्व नऊ दिवस या उपासनेसाठी अधिक महत्वाचे आहेत. जिच्यापासून या सृष्टीची पूर्नउत्पत्ती होते त्या जननीचे प्रतिक म्हणून प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. या दिवसापासून नऊ दिवस संस्कृत सप्तशती, दुर्गासप्तशती, देवीसप्तशती इ. ग्रंथाचे पारायण करण्याची पध्दत आहे. बसता-उठता एक पारायण, नऊ पारायणे करता येतात. या प्रत्येक दिवशी देवीसहस्रानामावलीचे पठण अथवा श्रीयंत्रावर, देवीमूर्तीवर पठणासहीत कुंकुमार्चन करण्याची उपासना आहे. नऊ दिवसात उपवासालाही तितकेच महत्व आहे. शक्य असल्यास, शरीर साथ देत असल्यास दिवसात एकच फळ खाऊन उपवास करण्याची पध्दत आहे. तसेच एकान्न (एकाच प्रकारचे अन्न) खाऊन उपवास सोडण्याची पध्दत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाबरोबरच उपासना करणे अधिक फलदायी आहे. अष्टमीच्या दिवशी नवचंडी होम, चंडीहोम, शतचंडी होम करावा, त्याचे अनंत फल आहे. होम चालू असताना कुंजिकास्तोत्र पठण करावे. रामायणातील युध्दकाळात श्रीरामाने या नऊ दिवसात देवी उपासना केल्याने प्रत्यक्ष आदीमायेने तेथे प्रकट होऊन श्रीरामाला वरदान दिले होते. भाविकांनी जसे जमेल तसे उपासना करून आदीमातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा व आपले जीवन समृध्द करावे.
दत्तजयंती :

दत्तजन्माचे महत्वच आगळे-वेगळे आणि स्फूर्तिदायक आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यातील दत्तभक्त आपोआपच दत्तस्थानाकडे ओढला जातो. वाशिंदलाही दत्तजन्म सोहळा फार सुंदर रित्या पार पडतो. श्रीदत्त जन्मापूर्वी सात दिवस अगोदर `श्रीगुरूचरित्र’ पारायण सप्ताह आयोजित केला जाते. गुरूचरित्र पारायण कडक सोवळयात कराव लागत असल्याने मुंबईमध्ये करणे शक्य होत नाही. दत्तजन्माचे औचित्य साधून भाऊ महाराज शिष्यपरिवारातील बरेच शिष्य वाशिंदला जाऊन हे पारायण करतात.

दत्तजयंतीच्या कार्यक्रमाची सुरूवात एक महिना अगोदर सुरू होते. भाऊ महाराजांनी आपल्या शिष्यांवर एक महत्वाचा संस्कार केला तो म्हणजे `निष्काम सेवा’! भाऊ नेहमी म्हणत, `तरूणांनी सतत कामात व्यग्र रहावे.’ कामात बदल म्हणजे विश्रांती हा भाऊंनी दिलेला महत्वाचा मंत्र. आपलं बिघडलेल प्रारब्ध स्वच्छ करण्याचा मार्ग म्हणजे निष्काम सेवा. पिंपळेश्वर दत्त मंदिर, गाणगापूर आणि वाशिंद मठ या तिन्ही ठिकाणी शिष्यांकरवी प्रचंड कामे करवून घेतली. मठांची डागडूजी, छोटीमोठी बांधकामे, सुतारकाम, रंगकाम, सजावट, बागकाम इ. सर्व कामे भाऊ स्वत: उभे राहून करवून घेत. या सर्व कामातील पूर्ण ज्ञान भाऊंना होते. कामातील बारकावे ते प्रत्येकाला नीट समजावून सांगत. अशा तऱ्हेने शिष्यवर्गामध्ये सेवेची आवड निर्माण केली. त्याच्यात सेवेच बीज रोवल. आजही सुट्टीच्या दिवशी मठातील कामे, साफसफाईसाठी शिष्यवर्ग जात असतो. अलम दुनिया सुट्टीच्या दिवशी मज्जा करायला विविध ठिकाणी जात असते, तर भाऊ महाराज शिष्य परिवार निष्काम सेवेसाठी आपली सुट्टी घालवत असतो. हेच भाऊ महाराज यांच्या शिकवणीचे यश आहे.

या नियमानुसार मठातील साफसफाई, इतर सजावटीकरीता, भक्तांच्या सोईसाठी काही कामांच नियोजन केल जातं. दत्त जन्माच्या निमित्ताने अख्खा मठ फुलांच्या माळांनी सजवला जातो. विद्युत रोषणाईही केली जाते. भाऊंना विद्युत रोषणाईच्या तोरणांची विशेष आवड होती. विविध प्रकारच्या लाईटींग करण्याचा त्यांचा आग्रह असे. शिष्यांनी भाऊंची आवड अजूनही जोपासली आहे. मुंबईवरून सजावटीचे लागणारे तसेच इतर सामान टेम्पोने मठात आणले जाते. भक्तांच्या प्रसादाची तयारी केली जाते. त्यादिवशी होणारा प्रसाद हा भाऊ महाराजशिष्यांपैकी काही मंडळी आवडीने आपला वेळ देऊन बनवतात. या काळात मठात विविध कामाची लगबग चालू असते. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतो. प्रत्येकाच्या मनात एकच विचार तरळत असतो की, ‘आपल्याकडून जास्तीत जास्त देवाची सेवा झाली पाहिजे.’ रात्रीचा दिवस करून प्रत्येकजण हा सोहळा कसा उत्तमरितीने पार पडेल यासाठी झटत असतो. तरूण वयात मुले वाया जाऊ नये, वाम मार्गाला लागू नये, तसेच त्यांच्याकडून अधिकाधिक देवाची सेवा व्हावी, जेणेकरून त्यांचे जीवन कृतकृत्य होईल असा भाऊंचा मानस होता. देवच आपल्या भक्तांकडून सेवा करवून घेत असतो.
सद्गुरू भाऊ महाराज समाधी मंदिर
प्रतिगाणगापूर मुंबईनजीक असावे या संकल्पनेतून भाऊंनी वाशिंद मठाची स्थापना केली हे जरी कारण असलं तरी त्या स्थानाची निवड करण्यात भाऊंचा आणखी एक हेतु होता. संतकथांचा अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे एखाद स्थान ते स्वत: निवडतात व तेथेच वास्तव्य करतात, त्या भूमीचा उद्धार करतात. कालांतराने त्या संतांचा देहही तेथेच विसावतो. जसे शिर्डीत श्रीसाईबाबा, शेगांवी श्रीगजानन, अक्कलकोटात श्रीस्वामी समर्थ यांची समाधी स्थान आहेत. त्याचप्रमाणे भाऊंनीही आपल्या समाधीसाठी वाशिंद मठाची जागा निवडली होती. भाऊ महाराज नाथपंथीय होते. माहुली गडाच्या पायथ्याशी, गडाच्या परिसरात कित्येक नाथांच्या समाध्या आहेत. काही माहिती आहेत, काही अजूनही लोकांच्या दृष्टीआड आहेत. या भागात बऱ्याच नाथपंथीयांचा वावर होता असं भाऊ वारंवार बोलत असत. काही गोष्टी मानवी बुध्दीच्या पलीकडे असतात हेच खरे. संतपुरूषांना, सिद्धपुरूषांना किंवा संतांना त्यांच्या देहाला इतर मानवाप्रमाणे अग्नी दिला जात नाही असा वैदिक धर्माचा दंडक आहे. याच कारण असं की, सामान्य मानवाला अग्नी दिला की त्याचा देह नष्ट होतो व त्यातील आत्मा १३ दिवसानंतर त्याच्या पुढील प्रवासाला निघतो. १३ दिवस तो आत्मा त्याच घरात कंपायमान अवस्थेत असतो. बाराव व तेराव श्राध्द विधी केल्यानंतर त्याला पुढील गती प्राप्त होते. वर्षश्राध्द घातल्यावर त्या आत्म्याला त्यापुढील गती प्राप्त होते. परंतु सिद्धपुरूषांचा वा संतांच तसं नसत. त्यांचा आत्मा हा आत्मरामाशी एकरूप झालेला असतो. संतपुरूषाच्या ठायी देवाची शक्ती वास करीत असते. त्यांच्या दृष्टीने देहाला फार महत्व नसतं. संतांच्या ठायी नांदत असलेली शक्ती त्यांच्या इच्छेने काम करीत असते. हि शक्ती चिरंजीव असते. दत्तस्वरूप, गुरूस्वरूप असते. शरीर सोडल्यानंतरही हे तत्व अखंड काम करीत असते. असा आजतागायतचा अनुभव आहे.

भाऊंनी आपल्या एका शिष्याला समाधी कोठे असावी ते स्थान दाखविले होते. दत्तमंदिरासमोर डाव्या बाजूला कृष्णमंदिराच्या पाठीमागे भाऊ महाराजांचं समाधी स्थान आहे. आज जिथे कृष्णमंदिर आहे तेथे भाऊंनी तीन घुमटया बांधून घेतल्या होत्या. एका घुमटीत देवीची प्रतिष्ठापना, दुसऱ्या घुमटीत कृष्णाची व तिसरी घुमटी रिकामी ठेवली होती. एकदा त्या रिकाम्या घुमटीबद्दल बोलता बोलता भाऊ सहज बोलू गेले, ही घुमटी मी रिकामी का ठेवली आहे हे तुम्हाला कालांतराने कळेल. ‘पुढे भाऊंनी देह ठेवल्यावर याच घुमटीत त्यांची छोटीशी पण सुबक अशी मूर्ती प्रतिष्ठापीत केली गेली. या जागेच दुसरे एक महत्व असं की, भाऊ जेव्हा वाशिंद या ठिकाणी प्रथम आले होते, तेव्हा गुंडामहाराज यांची आणि भाऊंची भेट याच ठिकाणी झाली होती. या भेटीची आठवण म्हणून भाऊंनी श्रीकृष्णाचं मंदिर याठिकाणी उभारलं. आजही श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा या मंदिरात मोठया थाटामाटात साजरा केला जातो. गुंडामहाराज आणि भाऊ महाराज याचं काय नातं होतं? हे मात्र अजूनही न सुटलेल कोडं आहे. गुंडामहाराजांच्या साधनेमुळे जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराजांसारखा महापुरूष जन्माला आला. भाऊंचा आदर्श शिवाजी महाराज होते. शिवरायांच्या खऱ्या इतिहासासाठी भाऊ अख्खा महाराष्ट्र पायी फिरले होते. नक्कीच या मध्ये काहीतरी धागा असावा जो त्यांच्या पुर्नजन्माशी निगडीत असावा. ।। कालाय तस्मै नम:।।
अशा या पावन भूमीत भाऊ महाराजांचा देह विसावला. आज या समाधीला `संजिवन समाधी’ म्हटले जाते. कित्येक भक्तांना आजही या समाधीतून भाऊंचा अनूभव येत असतो. क्षणोक्षणी ते जणू हेच जाणवू देत असतात, “हम गया नही, जिंदा है।”





























|| श्री गुरुदेव दत्त ||