नृसिंहवाडी मठ

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी. श्री गुरू आरोग्य वैजनाथ येथे काही काळ तप केल्यानंतर मार्गस्थ झाले. काही ठिकाणी वास्तव्य करून मजल दरमजल करीत श्री गुरू चातुर्मास करण्यासाठी औदुंबर या ठिकाणी आले. चातुर्मास संपल्यावर पुन्हा मार्गस्थ होऊन श्रीगुरु कृष्णा पंचगंगा संगम स्थानावर आले. त्या काळी हा भाग निर्मनुष्य होता. तेथे आताचे गाव नव्हते. कुरुंदवाड येथे गाव वस्ती होती. समोर अमरापूर, औरवाड वैगेरे गावे आहेत. जंगल वाढलेलं होत. पलीकडे अमरेश्वर देवस्थान आहे. तेथेच चौसष्ट योगिनींच स्थान आहे.बरोबर त्याच्या समोर अलीकडे श्री गुरूंनी बारा वर्षे तपश्चर्या केली. इ. स.१४२२ ते इ. स.१४३४ या कालावधीत श्री गुरुंचे या ठिकाणी वास्तव्य होते. श्री गुरू तेथे यावे म्हणून रामचंद्र स्वामींनी बेचाळीस वर्षे तपश्चर्या केली होती. तसेच नारायण स्वामीनीही तेथे तप केले होते. एखाद्या ठिकाणी जगदवंद्य महापुरुषाचे अवतरण होण्यासाठी ती भूमी तितकीच सिद्ध, पवित्र असावी लागते त्याचीच योजना होती ती. श्री गुरूंच्या पवित्र पद स्पर्शाने ही भूमी पावन झाली. भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंनी स्वतः च्या ‘मनोहर पादुका’ त्या ठिकाणी ठेवल्या. ज्या पादुकां भोवती आजचे मंदिर उभे आहे.

इंदुकोटी स्तोत्रात नरहरी विप्राने कृष्णा तिरिचे वर्णन केले आहे कृष्णावेणि तीर वास पंचनदी संगमम् । कष्टदैन्यदुरी भक्ततुष्ठकाम्यदायकम ll जो कृष्णा वेणि आणि पाच नद्यांच्या संगमावर राहतो, जो भक्तांचे कष्ट आणि दैन्य दूर करतो, सेवेने संतुष्ट होत भक्तांना अभिष्ट देतो. अशा श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांना मी नमस्कार करत आहे.

परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे दत्त संप्रदायातील एक थोर विभूती. यांना नृसिंहवाडीत ‘थोरले महाराज’ म्हणून संबोधले जाते. यांनी स्वतः नृसिंह वाडीचा पूजेचा दिनक्रम ठरवला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच काकड आरतीपासून ते रात्री शेजारती पर्यंतचे सर्व उपचार येथे आजवर केले जातात.  ते स्वतः नृसिंहवाडीला ‘दत्ताची राजधानी’ म्हणून संबोधतात.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त ...

गुरूवर कृष्णातीरी | राहिला यतीवर कृष्णातीरी || कीर्ती करी क्षितीवरी | राहिला यतीवर कृष्णातीरी || काषायांबर भस्म विराजे | दंड कमंडलू करी।। राहिला यतीवर कृष्णातीरी ||

हे ठिकाण सांगली पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा पंचगंगेच्या तीरावर हे स्थान वसलेले आहे. जिथे स्वतः दत्त महाराजांना तप करण्याची ईच्छा झाली, त्या स्थानाबदल काय बोलावे. हे स्थान खूप विलोभनीय आहे. कृष्णेचा काठ खूप सुंदर आहे. कृष्णा पंचगंगा संगम हा प्रयाग समान आहे. या कृष्णातटाकात अनेक तीर्थे आहेत. कृष्णा नदी पश्चिम मुखा असून उत्तरेला शुक्लतीर्थ आहे. औदुंबराच्या समोर धनुषी तीर्थ आहे. पापविनाशी काम्य तीर्थ व तीसरे वरद तीर्थ अमरेश्वराच्या जवळ आहेत. संगमाच्या ठिकाणी अनुक्रमे शक्ति तीर्थ, अमरतीर्थ, कोटितीर्थ आहेत. एकूण अष्टतीर्थे या ठिकाणी आहेत. म्हणूनच श्री गुरुनी या स्थानी वास केला.

रामचंद्र स्वामी तसेच नारायण स्वामी यांनी दत्त महाराज येथे यावेत म्हणून तपश्चर्या केली होती. त्याचे फळ म्हणून महाराज ह्या स्थानी आले. आणि या ठिकाणी वास्तव्य केले. त्यामुळे नारायण स्वामीं व रामचंन्द्र स्वामींचे  स्थानही मंदिरा शेजारी आहे.  श्रीनृसिंहसरस्वती यांच्या पावन वास्तव्यानी ह्या भूमिस नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी असे नाव पडले. मंदिर परिसरात श्री टेम्ब्ये स्वामी महाराजांचे सुद्धा मंदिर आहे.

“मनोहर पादुका”

दत्तमहाराजच्या या पादुका अतिशय मनोहर असल्याने  त्यांना  “मनोहर पादुका” म्हटले जाते. मंदीराच्या समोरील तीरावर असलेल्या चौसष्ट  योगिनीं दररोज महाराजांचे पूजन करण्यासाठी पलीकडे येतात व कृष्णेमध्ये वेगळ्या मितीत असलेल्या देवनगरीत घेऊन जातात. अशी गुरुचरित्रात कथा आहे.  महाराजांच्या आदेशाने येथे येणाऱ्या व तप करणाऱ्या  दत्त भक्ताची मनोकामना त्या पूर्ण करतात. महाराजांनी अन्नपूर्णेची स्थापना केली आहे.

इथे दररोज संध्याकाळी उत्सवमूर्ती पालखीत बसवून पालखी सेवा केली जाते. पालखी सोहळा अवर्णनीय असतो. कृष्णा पंचगंगा नदीचे पात्र संध्याकाळी पालखी नंतर इतके शांत आणि मोहक दिसत असते की असं वाटतं ती ‘कृष्णामाई’ शांतपणे तिच्या मंजूळ सुरात त्या महाराजांना आळवत आहे. सर्वार्थाने वाडी ‘श्रीमंत’ आहे. हे अनुभवण्या साठी एकदा वाडीत येणे खूप गरजेचे आहे. कारण काही गोष्टीचे सौंदर्य शब्दात बांधता येणे शक्य नसते.

मंदिराचा इतिहास सुद्धा रंजक आहे.

बिदर च्या बादशहाने आपल्या अंध मुलीला दृष्टी मिळाली म्हणून हे मंदिर बांधलेले आहे. त्यामुळे हे बांधकाम मुसलमानी धाटणीचे आहे. आणि मुख्य म्हणजे मंदिरास कळस नाही आहे. भाऊ महाराज आपल्या शिष्यासाहित दरवर्षी मे महिन्याच्या काळात वाडीला येत असत. आणि महादबा पाटील ह्या धर्मशाळेत उतरत असत. मे महिन्यात वाडीचा उपक्रम सुरू करण्यामागे भाऊंचा उद्देश हा होता की मठातील बरीचशी कुटुंब अशी होती, ज्यांना स्वताच अस हक्काच गाव नव्हत. मे महिन्यात गावी राहण्याचा आणि सुट्टीचा आनंद घेता यावा, तसेच दत्तचरणा जवळ सेवेत घालवता यावा, ह्यासाठी भाऊंनी त्यांच्या लेकरांसाठी हा कार्यक्रम सुरू केला. या साप्ताहिक कार्यक्रमात गुरूंचरित्र, साईचरित्र पारायण, दत्त याग, व सात दिवस मंदिरात दक्षिण द्वारासमोर भजन सेवा, अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आपल्या शिष्याना जीवनात सर्व आनंद घेत असताना ‘दत्तभक्ती’ कशी करावी हे शिकवलं. ‘हासता खेळता हरी बोला’ हा त्यांच्या विचारांचा मूळ ‘पाया’ होता. हसत खेळत त्या भगवंताशी एकरुप होता आलं पाहिजे, अस ते सांगत. त्यासाठी भजन सेवा सुरू झाली. आजही  दत्त मंदिराच्या दक्षिण द्वारी भाऊंचे शिष्य आपली भजन सेवा दरवर्षी श्रीदत्तचरणी रुजु करतात.

पुढे हळूहळू या कार्यक्रमात नवनवीन उपक्रम राबविण्यात आले त्यापैकी एक म्हणजे दीपराधना

Aarathi,Deepa Aaradhanai | Any Pooja concludes with lighting… | Flickr

दिपराधना म्हणजे कृष्णा माईच्या तटावर एकाच वेळी असंख्य दीप लावणे. आणि कृष्णा माईचा घाट पणत्यांची पाजळून काढणे. या उपक्रमात सर्व जण सामील होतात. पण हवेमुळे बरेच वेळा दिवे लावता लावता विझून जातात. पण तरीही सर्व हिरेरीने तेवढयाच जोमात पुन्हा पुन्हा दिवे लावतात. पुन्हा वारा येतो पुन्हा तेच. हे करता करता शेवटी एक वेळ अशी येते की तो वाराही त्या महाराजांच्या भक्तांसमोर हार मानतो. आणि मग एका क्षणाला तो किनारा त्या दिव्यानी असा काही उजळुन निघतो की जसे आकाशातले काही तारे त्या कृष्णामाईच्या लाघवी रुपात भर घालण्यासाठी आले आहेत. असंही तिचा तो किनारा महाराजच्या उपस्थितीने नेहमीच भारावलेला असतो. त्यात ह्याची भर पडते. त्या असंख्य दिव्यांसोबत आम्ही देखील कित्येक वेळा त्या स्वर्गसुखाचा अनुभव घेतला आहे.

नृसिंहवाडीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे कन्यागत महापर्वकाळ.

गुरूचा कन्या राशीत प्रवेश होत असताना जो योग येतो त्याला ‘कन्यागत महापर्व’ असे म्हणतात. हा योग कृष्णा तीरावर वर्षभर असतो. पण सर्वत महत्त्वाचे म्हणजे हा काळ येण्यास बारा वर्ष अवधी लागतो. ह्यावेळी गंगा आपली बहीण कृष्णेच्या भेटीला येते. आणि वर्षभर इथे राहते. या दत्तराजधानीत आपली जागा असावी असा मानस बऱ्याच दिवसा पासून भाऊ आजोबांचा होता. आपली वास्तू वाडीमध्ये उभी करण्याचा संकल्प भाऊ आजोबांनी आपल्या शिष्यवर्गापुढे मांडला. आणि सर्व शिष्यानी तो उचलून धरला. ०८ मार्च २००३ या दिवशी भूमीपूजन करून बांधकामस सुरवात झाली. आणि कन्येगत कृष्णाच्या उत्सवापूर्वी काही दिवस आधी, काही खोल्या आणि हॉल बांधून तयार झाला. वास्तूचे नामकरण झाले “भानुदास प्रतिष्ठान”.

भाऊ आपल्या शिष्यासोबत आपल्या ह्या नवीन वास्तूत आले. आणि उत्सवाच्या दिवसाची वाट पाहू लागले. तो दिवस उजाडला २७ ऑगस्ट २००४. दत्त महाराजांची पालखी शुक्ल तीर्थावर जाण्यासाठी सज्ज झाली. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रोषणाई करण्यात आली होती. पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. कारण आज महाराजांची स्वारी प्रत्येक घरासमोरुन जाणार होती. हा योग बारा वर्षानी येतो. घरातल्या प्रत्येकाला प्रत्यक्षपणे त्या करुणा सागराला ओवळण्याची संधी मिळणार होती. सगळीकडे आनंदीआनंद भरला होता. सर्वाना कृपाशीर्वाद देत देत महाराजांची स्वारी शुक्ल तिर्थकडे निघाली. मनोहर पादुका मंदिरापासून शुक्ल तीर्थवर पोहचण्यासाठी, २ ०तास लागले. सकाळी महाराजांची पालखी शुक्ल तिर्थवार पोचली आणि एकच जल्लोष झाला.. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.

महापर्वचा योग सुरू झाला होता. गंगामाई आपली सखी बहीण कृष्णा हिला कडकडून भेटत होती. आनंदाश्रू वाहत होते. आता त्या आसुसलेल्या होत्या दत्त महाराजांना स्नान घालण्यासाठी. महाराजांची स्वारी तीरावर आली, आणि आपल्या पावन पवित्र जलाने दोन्ही बहिणीने महाराजांना न्हाऊ घातले. इकडे समोरच्या तीरावर भाऊ महाराज आपल्या शिष्याना घेऊन आंघोळीसाठी तयार होते. स्वारीच्या स्नानाने पवित्र झालेल्या पाण्यामध्ये भाऊ महाराज आणि त्यांच्या शिष्यांनी व इतर दत्तभक्तांनी स्नानास सुरवात केली. ते तीर्थ मठात आणण्यात आले. सर्वांवर्ती त्याचे प्रोक्षण झाले. सोहळा संपन्न झाला होता.

थोरले महाराजांनी जिचे वर्णन केले ” मच्चीता तू चित्तीं साची वाडी नरसोबाची।।” ह्या पुण्यभूमीचे, दत्तभक्तीचे अजून एक दार भाऊंनी आपल्या शिष्यांसाठी उघडले होते.

चित्र में ये शामिल हो सकता है: वह टेक्स्ट जिसमें 'श्री क्षेत्र नसिंहवाडी १९६५' लिखा है

|| श्री गुरुदेव दत्त ||