विसाव्या शतकाच्या उंबरठयावर असताना जगामध्ये प्रचंड औद्योगिक क्रांती व्हावयास सुरूवात झाली. १९ व्या शतकात जितके शोध लागले, तितके शोध हजार वर्षात लागले नसतील; हेही तितकेच खरे आहे. जितके शोध लागले, त्यांच्या पूर्णत्वाकडे जाण्यासाठी लागणारी सुरूवातीची शोध श्रृंखला गेल्या दोन हजार वर्षात घडत होती.

आज तयार झालेला अणुबॉम्ब हा हजार वर्षापूर्वी चिन देशात लागलेल्या दारूच्या शोधाचा परिपाक होता. परंतु १०० वर्षात अतिगतीने झालेली औद्योगिक क्रांती मानवाला विनाशाकडे नेत होती. आधुनिक विज्ञान नैतिकतेवर उभारले नसल्यामुळे त्याच्या कार्यसुत्रतेत कोणतेच मापदंड ठरविण्यात येऊ शकत नाही. उदा. अणूच्या श्रृंखला अभिक्रियेचा शोध लागल्यावर त्यामध्ये असलेल्या अनामिक शक्तीचा शोध शास्त्रज्ञानांना लागला. परंतु हे शास्त्र उद्या अणुविस्फोटाकडे जाणार हेही त्यांना माहीत होते. नागासाकी, हिरोशिमा ही त्याचीच उदाहरणे आहेत. जितके शोध या शतकात लागले तितकेच महान तत्ववेत्तेही जन्माला आले.

अनेक संतांचाही जन्म याच शतकात झाला. जग नेहमीच सम-विषमतेच्या परिणामांवर चालते. अनेक संतांनी समाज सुधारणेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. विविध चुकीच्या, विचारांचा पगडा संतांनीच दूर केला. ज्या दगडाला देव मानून लोक त्याला शेंदूर फासत होते. त्यावर शौच करून हे किती खूळचट आहे हे स्वामीनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. “जो आंघोळ करू शकत नाही, कपडे घालू शकत नाही, जो स्वत:चे रक्षण करू शकत नाही, तो तुमचे काय रक्षण करणार? असे प्रबोधन आपल्या किर्तनात करून गाडगेबाबांनी अध्यात्मच्या चुकीच्या प्रथांवर, त्याच्या बाजारावर आसुड ओढले. एकाच वेळी दांभिकांना अध्यात्माकडे वळविण्याचा व त्याचवेळी अध्यात्मातील चुकीच्या प्रथा, भ्रामिक कल्पना दूर करण्याचे दुहेरी काम संत करीत होते आणि आजही करीत आहेत.

भगवंताकडे नेण्याच्या विविध उपासना मार्गांमध्ये दत्तभक्तिचा मार्ग हा अतिशुध्द मार्ग मानला जातो. सर्व संतांनी दत्तभक्तीचा प्रसार केला. कर्मठ व कठिण समजली जाणारी दत्त भक्ती संतांनी सुलभ सोपी केली. श्रीगुरूचरित्र, साईसत्च्चरित्र, स्वामी चरित्र, गजानन विजय या ग्रंथांमधील कथांमधील सार काढल्यावर असं लक्षात येते की, सर्व संतांनी गुरूभक्तीला प्राधान्य दिले आहे. किंबहुना दत्तभक्तीच आपल्याला भवसागरातून पार करू शकते. ही विचारधारा भक्तांपर्यंत पोहचविली.
ब्रिटीशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. यामध्ये ब्रिटीशांची राज्यलालसा, संधीसाधूपणा, गुलामीची ईर्षा जरी असली तरी त्यांची मेहनत, समयसुचकता, नियोजन, शिस्त, देशाभिमान, काटेकोरपणा, घरापासून दूर राहण्याची वृत्ती हे गुणही कारणीभूत आहेत. भारतात औद्योगिक क्रांती ब्रिटीशांनीच आणली. झपाटयासारखे औद्योगिक क्रांती करणारे त्यांच्या देवाला विसरले नव्हते. भारतात आज असलेले हजारो चर्च ही त्यांचीच साक्ष आहे. ख्रिश्चन लोक आपल्या धर्माच्या बाबतीत खूप सनातनी आहेत. हे कित्येकांना माहित ही नसावे. कितीही काम असले तरी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी सर्व जण हजर असतात. देव आणि आपले काम यामध्ये त्यांनी कधीही सरमिसळ केली नाही. दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर टिकवून ठेवल्या. सरळ भाषेत सांगायचे झाले तर क्रिकेटचे नियम फूटबॉलला लावायची गल्लत नाही केली. नेमका हाच गोंधळ आपल्या हिंदू धर्मात झाला आहे. हिंदू धर्मातील काही खूळचट कल्पना, चालीरीती त्याला कारणीभूत आहेत. या सर्वांचा परिणाम असा झाला की, विज्ञाननिष्ट असलेली आताची पिढी आध्यात्मापासून फारकत घेऊ लागली आहे. जे ब्रिटीशांना, ख्रिस्तधर्मीयांना जमले ते आपल्याला जमले नाही. ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात सर्व भाविक एकाच मोठया प्रार्थना स्थळी एकत्र येऊन प्रार्थना करतात. रस्त्यारस्त्यावर देवाच्या घुमटया दिसत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या त्या धर्मात त्यांचा एकच धर्म ग्रंथ आहे. तसे हिंदू धर्मात नाही. शिख धर्मात फक्त एकाच ग्रंथसाहेब ग्रंथाचे पठण केले जाते. वैदिक धर्मात विविध पंथ असल्याने प्रत्येक पंथाची वेगळी शिकवण आहे. वेगळे उपासना मार्ग आहेत. या गोष्टीमुळे सर्वांना एकत्र आणणारा, एका धाग्यात बांधणारा, सर्वसमावेशक असा उपासना मार्ग असणे आवश्यक होते. श्रीदत्त संप्रदायाचा उदय याच अनुषंगाने झाला.

जगात काही लोक प्रवाहाबरोबर वहात जातात. काही बघ्याची भूमिका घेतात आणि काहीच लोक प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करतात. सदगुरु भाऊ महाराजानी या विनाशाकडे तरुण पिढी जाऊ नये, म्हणून दत्त भक्तीची धुरा हाती घेतली आणि एका नव्या पर्वास सुरवात झाली.
वर्ष १९८५….!!!!

श्रीदत्तात्रेयांच्या कृपेमुळे सद्गुरू श्रीभाऊ महाराजांनी दत्तभक्तीच्या प्रसाराचं कार्य आपल्या हाती घेतले. विज्ञाननिष्ठ अध्यात्म तरूणपिढीला शिकविण्यासाठी प्रथम कामगार वर्गातील मुलांना, तरूणांना अथर्वशीर्ष, श्रीगुरूगीता या मंत्राचे विनामूल्य प्रशिक्षण सुरू केले. आपल्या धर्मात कुठेही सामुदायिक आरतीचा प्रघात नव्हता. भाऊंनी शास्त्रशुध्द, स्तोत्रयुक्त सामुदायिक आरतीच आयोजन सुरू केले. मंत्रशिक्षण घेतलेली मंडळी सामुदायिक आरतीला येऊ लागली. एकाच मोठया मंदिरात घडयाळयाच्या काटयावर आरती सुरू होत असे. एका रांगेत, एका सुरात, खाली बसून आरती करण्याची पद्धत सुरू केली. वक्तशिरपणाची सवय लावली. परमार्थात शिस्त फार महत्वाची. आरतीनंतर आपल्या अमोघ वक्तृत्वाने अध्यात्मातील विविध विषय, विज्ञानाची मदत घेऊन भाविकांना प्रबोधन करण्याचे कार्य भाऊंनी सुरू केले. काही लोक आपल्या अडचणी भाऊंकडे घेऊन येत असत. विज्ञानाशी कुठेही फारकत ने घेता आध्यात्मिक मार्गाने आपणच आपल्या अडचणी कशा सोडवायच्या, याचे शिक्षण भाविकांना दिले. भाऊ आपल्या प्रवचनात विज्ञाननिष्ठ आध्यात्म मांडत असत. एका अर्थाने समुपदेशनाचा, आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य भाऊंनी केले. तरूण पिढीला जवळ घेतले. त्यांचे विचार समजून घेतले. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाची दु:ख विविध मार्गानी दूर केली. दत्तभक्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून यात्रेचे आयोजन केले. प्रवचनातून अध्यात्मिक ज्ञानाचा पाया भक्कम केला.
वर्ष १९८८….!!!!

सहलीचे आकर्षण माणसाला नेहमीच असतं. भले देव दर्शनासाठी जायचं म्हटलं तरी उत्साह शिगेला पोहचतो. भाऊंनी ही नस ओळखली व सुरूवातीला काही तीर्थयात्रांचे आयोजन केले. बरोबर असलेल्या तरूणवर्गाला यात्रेच्या नियोजनाचं तंत्र शिकवलं. लहान-सहान गोष्टींची काळजी कशी घ्यावी हे भाऊंकडूनच शिकावे. आणि एका नव्या पर्वाची सुरूवात झाली…
दिपावलीच्या सणाचं औचित्य साधून गाणगापूरतिर्थी यात्रेचं नियोजन केले. दिवाळीचा सण सोडून मुंबईकर मुंबईबाहेर जाणे अशक्यच. पण ते भाऊंनी लीलया करून दाखवलं. भाविकांची अख्खी मोठी बस भरून, भाऊ गाणगापुरी घेऊन गेले. तुळजापूरी देवीचं दर्शन घेऊन, स्वामी दर्शन – दोन दिवस अक्कलकोट यात्रा, पारायण, गुरूगीता पठण, तिसऱ्या दिवशी गाणगापुरी प्रस्थान. अष्टतीर्थ यात्रा, गुरूचरित्र पारायण, भाऊबीज, माधुकरी मागणे-वाढणे सर्व काही योग्य त-हेने, नियोजनानुसार करवून घेतल. गाणगापुरातील दिपावली भाविकांना भलतीच आवडली. भाऊ आपल्या शिष्यांना दत्तमहाराजांच्या मुख्य दरबारात घेऊन गेले व त्यांची सेवा रूजू करवून घेतली. पुढच्या वर्षापासून भजनसेवा सुरू केली. भक्त दत्तभक्तीत रममाण झाले. वर्षभर पुरेल इतका आनंद या यात्रेतून मिळत असे.
वर्ष १९८९….!!!!

नरसोबावाडी म्हणजे दत्ताची राजधानी. श्रीगुरूंनी १२ वर्षे वास्तव्य केले, तप केले ते ठिकाण. कृष्णेकाठचा हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला. स्वर्गीचे सौंदर्य भूतलावर अवतरल्याचा भास व्हावा इतक मनाला भूरळ पाडणारं ठिकाण. सोन्याने मढवलेल्या मुकुटात कोहिनूर हिरा बसवावा असे हे महाराजांच स्थान. मे महिन्यात आपल्या सहकार्याना घेऊन वाडीला जाण्याचा बेत नक्की झाला. शिष्यांसाठी एक नविन दालन उघडले गेले. सोन्याच्या थाळीमध्ये ५२ भोग देवाला दाखविण्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असावी तस कार्यक्रमाचे नियोजन भाऊंनी केले. गुरूचरित्र, साईसत्च्चरित्र पारायण, सातही दिवस भजन, पालखीसेवा, महापूजा, पवमानसुक्त प्रदक्षिणा इत्यादी सेवा सात दिवसात करवून घेतल्या. मुंबईला निघाल्यावर आजची तारीख, दिवस, वार सर्व काही भाविक विसरले. जसे; गौळणी गोरस विसरल्या गं। वाडीच्या भक्तीयात्रेचे पडसाद सर्वदूर घुमू लागले.
वर्ष १९९०….!!!!

याच दरम्यान श्री. सावंत यांच्या आग्रहाखातर भाऊ माझगांव येथील पिंपळेश्वर मंदिरात आले. भाऊंना नविन कार्यक्षेत्र सापडलं. मंदिरातील कार्यासाठी तरूण मुलांना जमवून सेवेची आवड निर्माण केली. अर्धवट राहिलेले मंदिराचे काम पूर्णत्वास नेले. काही तरूण शिष्यवर्ग मंदिरात राहू लागला. भाऊंनी मंदिरात गुरूकुलच सुरू केलं, अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या काळात भाऊंनी शिष्यांना दगडाला छिन्नी-हातोडीचे घण सोसून मूर्ती घडवावी तसं घडवलं. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग, योगमार्ग या सर्वच भागाच शिक्षण सुरू केले. झाडू मारण्यापासून ते भाष्य करण्यापर्यंत, भजन करण्यापासून ते मंत्र म्हणण्यापर्यंत सर्व विषयांत शिष्यांना पारंगत केलं. तावून, सुलाखून एक एक मूर्ती घडविण्यास भाऊंनी सुरूवात केली. दत्तभक्ती प्रसाराचं कार्य ज्या खांद्यांवर द्यायचे ते खांदेही तितकेच मजबूत असायला हवेत. हिरा कितीही लपवला तरी त्याचे तेज लपत नाही, असंच काहीसं झाले. हळूहळू भाऊंची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. गर्दी वाढू लागली.
वर्ष १९९४….!!!!

आपल्या सर्व शिष्यवर्गाला योग्य प्रकारे साधनेच शिक्षण देता याव, साधना करता यावी पुण्यभूमीत आपलं स्वत:च स्थान असावं, या इच्छेने भाऊंना गाणगापूरचे वेध लागले. दत्तकृपेने भाऊंना हवीतशी जमीन मिळाली. मठाच बांधकाम सुरू झाले. अनेक तरूण शिष्यांनी आपला अमूल्य वेळ मठाच्या बांधकामासाठी दिला. यामागे एकच कारण होतं ते म्हणजे भाऊंच स्वप्न साकार व्हावं, ही प्रत्येक शिष्याची इच्छा होती. कोणी श्रमदानाने, कोणी अर्थदानाने आपापली सेवा गुरूचरणी अर्पण केली. मोठया दिमाखात भाऊ महाराजांचा मठ गाणगापुरात उभा राहिला. दत्तभक्तीचा प्रसार व्हावा, दत्तभक्तांची सेवा करता यावी यासाठीच हा `कर्मयज्ञ’. मठाचं अनावरण झाल्यावर अनेक सेवा भाऊंनी सुरू केल्या. नित्य माधुकरी, भजन, आरती, अभिषेक, नामघोष इत्यादी. मठाच्या मागील बाजूस पाऊल वाटेने जाणा-या वाटसरूंसाठी पाणपोई बांधली. दर बुधवार व शनिवार पूर्ण संगमरस्ता झाडून साफ करण्याचे सेवाकार्य भाऊंनी सुरू केले. भाऊंनी सुरू केलेल्या सेवा आजतागायत गाणगापूरात त्याच पद्धतीने सुरू आहेत.
वर्ष १९९५….!!!!

सेवाकार्यामध्ये मैलाचा दगड ठरेल असे माघी अन्नदान भाऊंनी सुरू केले. माघ पौर्णिमेला श्रीगुरू निजानंदी गेले त्याप्रित्यर्थ गाणगापुरात मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून, खेडयापाडयातून भाविक मंडळी आपल्या बालबच्च्याना घेऊन गाणगापुरात येतात व सात दिवस राहतात. रस्त्यावर, शेतात राहतात. नदीवर आंघोळ करतात, माधुकरी मागून खातात. अशा भाविकांना पोटभर एकवेळ जेवण तरी मिळावे म्हणून भाऊंनी माघी अन्नदान सुरू केले. टोपातून खिचडी वाढायच अन्नदान आता वाढत जाऊन मोठया स्वरूपात होऊ लागले आहे. अन्नदानाच स्वरूप भाऊ हळूहळू वाढवत गेले. आज प्रतिदिन हजारो भाविक अन्नदानाचा लाभ घेतात. शिष्यवर्गातील प्रत्येकजण आपली सेवा या कार्यात रूजू करतात. सेवेचा आनंद घेतात.
वर्ष १९९८….!!!!

गाणगापुर सारखाच मठ मुंबईजवळ असावा, प्रतिगाणगापुर मुंबईजवळ वसवावे या विचारांनी शहापूर तालुक्यात वाशिंदग्रामी श्रीदत्तमंदिर व मठाची उभारणी केली. मुंबईपासून गाणगापूर लांब असल्याने, नेहमी जाणे अशक्य. सहज पोहचता यावे व नेहमी दत्तसेवेत राहण्यासाठी भाऊंनी वाशिंद मठाची निर्मिती केली. वाशिंद ठिकाणाची निवड करण्यामागे आणखी एक उद्दिष्ट भाऊंचे होते. माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावाजवळच्या परिसरात बरेच आदिवासी पाडे आहेत. दत्तभक्ती करता करता दुर्गम भागातील देशबांधवांची व त्यांच्या मुलांची सेवा करता यावी, या करीता वाशिंदची निवड करण्यात आली.

मठामध्ये दत्तस्थान निर्माण करण्यात आले. दत्तभक्तीच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन भाऊंनी केले. हे करीत असतानाच आजुबाजूच्या १०-१२ पाडयातील दीनअवस्था पाहून तेथील लहान मुलांना एकवेळ तरी पोटभर अन्न मिळावं या विचारानी त्या पाडयांमध्ये अन्नछत्र भाऊंनी सुरू केलं. कित्येक शिष्यांनी तो भार आपल्या खांद्यावर घेतला. या विभागात आपल्या शिष्यांना सर्वदूर फिरवून तेथील समाजकार्याची जाणीव करून दिली. लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू केले. आजुबाजूच्या पाडयातील लोकांसाठी मेडीकल कॅम्पचे आयोजन केले. दत्तभक्तीबरोबरच समाज कार्याची आवड शिष्यांमध्ये निर्माण केली.
वर्ष २००२….!!!!
दत्तमहाराजांच्या आज्ञेनुसार गाणगापूर ते वाशिंद पायी पालखीचे परिक्रमेचे आयोजन भाऊंनी केले. अंदाजे ६०० कि.मी. अंतरावरून श्रीदत्तपादुका चालत वाशिंद ठिकाणी आणण्याच इप्सित दत्तभक्ती प्रसारामध्ये दडलेले होते. ज्या ज्या गावांतून दत्तपादुका पालखी प्रवास करत होती त्या त्या ठिकाणी दत्तभक्ती रूजावी ही मूळ संकल्पना होती. पालखीमुळे ४२ गावातील भाविक मंडळी भाऊ महाराजांशी, अनायसे दत्तभक्तीमध्ये जोडली गेली. विविध ठिकाणी अचंबित करणारे अनुभव भाविकांना आले. महाराजांनी आपलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केल. भाऊंनी शिष्यांकरवी दत्तभक्तीपर प्रकाशित केलेली पुस्तके या ठिकाणी वाटली गेली. पालखीमुळे कित्येक भाविक दत्तभक्तीच्या सागरात न्हाऊन निघाले. आजही ज्या ठिकाणी पालखी थांबते, तेथील भाविक मंडळी पालखीची वाट आतुरतेने पहात असतात. महाराजांच्या सेवेसाठी कार्यतत्पर असतात. आज ज्या गावात पालखी उतरते तेथील गावकरी पालखी पुढच्या गावात पोहचविण्यासाठी पालखीत सामिल होतात.
वर्ष २००४….!!!!

कन्येगत महापर्वाचे औचित्य साधावे व दत्ताच्या राजधानीत आपल्या शिष्यांसाठी साधनेकरीता आपली वास्तू असावी या विचाराने श्रीनृसिंहवाडी येथे मठाच्या उभारणीचे कार्य भाऊ महाराजांनी हाती घेतले. दर मे महिन्यात शिष्य परिवारातर्फे आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होतच होते. परंतु वास्तू झाल्यास अधिक सेवा या दत्तस्थानात करता येईल या विचाराने या वास्तूची पायाभरणी झाली. दत्तभक्तीत अंतर्भूत असलेल्या सेवा करता याव्यात यासाठी मठाचा प्रपंच. मठामध्ये मे महिन्याचा कार्यक्रम सोडता इतर दिवसात लग्नासाठी, मुंजीसाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी रूम व हॉल भाडयाने दिले जातात. दर्शनासाठी येणा-या भाविकांना रूम भाडयाने दिले जातात. या अनुषंगाने येणा-या भाविकांना दत्तभक्तीची माहीती, भाऊंनी शिकविलेल्या उपासनेची माहीती भाविकांना दिली जाते. सहज दर्शन घेण्यासाठी आलेली भाविक मंडळी आज दत्तभक्तीत रममाण झाले आहेत.

आपल्या शिष्यांकरवी दत्तभक्ती प्रसाराच्या उद्देशाने विविध दत्तभक्तीपर पुस्तकांचे प्रकाशन भाऊंनी करवून घेतले. जेणेकरून पुस्तकाच्या माध्यमातून दत्तभक्ती घराघरात पोहचेल. दिवाळी अंकाचे प्रकाशन केले गेले. हा दिवाळी अंक दत्तभक्ती, संतांची वाङमय, अनुभव यांनी ओतप्रोत भरलेला असतो. गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबावाडी येथे दरवर्षी देवासमोर भजन सेवा सादर केली जाते. या भजनातील काही सुंदर भजनाच्या कँसेट निर्माण करण्यात आल्या. या कँसेट शिष्यांमार्फत लोकांपर्यंत, भाविकांपर्यंत पोहचविण्यात आल्या. भाविकांमध्ये दत्तमहाराजांच्या भजनाचा गोडवा निर्माण व्हावा हा हेतू. दत्तभक्तीच्या प्रचारार्थ जे जे करता येईल ते ते भाऊंनी केले व आपल्या शिष्यांकरवी करवून घेतलं. आजही हे कार्य अखंडित चालू आहे.

।। श्री गुरूदेव दत्त।।