
नथवाली आजींनी दिलेला मंत्र, माणसाने नेहमी कामात दंग असावे. त्याचाच उत्तरार्ध मराठे गुरुजींनी पूर्ण केला, त्यांनी भाऊंना शिकवले, माणसाने नेहमी कामात आणि नामात दंग असावे. भाऊंच्या बालमनावर संस्कार कोरले गेले होते. त्यानंतरच संपुर्ण आयुष्य त्यांनी हेच तत्व प्रामाणिकपणे जोपासलं. खालील येणाऱ्या विविध मथळ्यावरून हे सहज लक्षात येत, भाऊ किती कार्यप्रविण असतील. शून्यातुन विश्व निर्माण करणे, म्हणजे काय? हे त्यांच्या शिष्यानी, ह्याची देही ह्याची डोळा, प्रत्यक्षपणे अनुभवलं.

भालचंद्र महाराज सेवा संघाची गुढी उभारल्यानंतर भाऊंनी मागे वळून पाहिलेच नाही. पिंपळेश्वर दत्त मंदिर, गाणगापूर, वाशिंद, नृसिंहवाडी, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. वास्तविक पाहता, भाउंची शैक्षणिक उंची, राजकारणातील वावर, विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठांची ओळख, वरील गोष्टी निर्माण करने त्यांना सहज शक्य होत. पण भाऊंना आपल्या शिष्यांसमोर आदर्श निर्माण करणं होत. त्यांना निष्काम सेवेची ओळख करून देणे होत. आणि हे करता करता, मागील जन्मातील संचित पुसून टाकणं होत. दत्तभक्तीची पुंजी पुढील कित्येक पिढ्यासाठी तयार करणं होत. म्हणूनच भाऊंनी हळूहळू घामातुन येणाऱ्या पैशानीच ही कामे हाती घेतली, आणि पूर्णत्वास नेली. कितीतरी अडचणी आल्या. त्या सर्वांवर मात करून, जेवढ्या सहजतेने त्यांनी सर्व उभारले. तेवढ्याच सहजतेने आपल्या प्रत्येक शिष्यालाही घडवले. अनुभवसंपन्न केले.
परिसाच्या संगे लोह बिघडले । लोह बि, घडले सुवर्णची झाले ।। सद्गुरू संगे शिष्य बिघडले । शिष्य बि, घडले सद्गुरू रूप झाले ।।