उत्तरार्ध…..!!!!!!!
अखंड घडो भाऊंचे गुणगान । हेचि आम्हा व्रत तप दान । आपुल्या समाधीचे दर्शन । हेचि तीर्थाटन आमुचे ।। ॐ श्री भानुदासाय नमः । हाची आम्हा मोक्ष मंत्र । तारणार्थ आहे समर्थ । भवसागरातुनी ।। भाऊची आमुचे श्रीपाद वल्लभ । भाऊची आमुचे बाप आई । समाधी त्यांची मशीद माई । येथेची आमुचे बाबा साई ।।
नृसिंहवाडी इथे २००४ चा कन्यागत महापर्वचा अभूतपूर्व सोहळा स्वतःच्या वास्तूत पार पडला. अजून एक उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. इमारत अजून पूर्णत्वास यायची होती. पण आता भाऊ आश्वस्त होते. त्यांना आपल्या शिष्यांवर विश्वास होता की माझे शिष्य हे काम लवकरच तडीस नेतील. सोहळा पूर्ण करून आनंदी मनाने भाऊ मुंबइला परतले. पण ह्यावेळेस त्यांच्या प्रकृतीने उचल खाल्ली होती. आधीचे बऱ्याच जणांचे आजार, व्याधी, संकटे माऊलीने आपल्यावर घेतली होती. आणि आपल्या शिष्याच्या झोळीत आनंदाचे दान सहज टाकले होते. त्याचे परिणाम आता शरीरावर दिसू लागले होते. पण माऊली सतत आनंदीच असायची. दुश्चिनाची कसलीही पर्वा न करता, भाऊंनि पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमासाठी तयारी सुरु केली. पुढचा येणारा मोठा कार्यक्रम होता गाणगापुरची दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या पालखीचे स्वागत.

भाऊ दिवाळीच्या कार्यक्रमासाठी गाणगापूरच्या मठात हजर झाले. शिष्य परिवार आदल्या दिवशी मठात येऊ लागला. भाऊ आजारपणातही त्याच आनंदाने, उल्लासाने आपल्या शिष्यांचे ढोल ताश्श्याच्या गजरात स्वागत करत होते. दिवाळी सणासाठी, माझी मुलं माझ्या घरी आली, माझ्या मुली माहेरी आल्या. त्यांना माहेरपणाचे सुख देण्यासाठी आजोबा आतुर होते. ती आतुरता त्यांच्या वागण्यातून सहज अनुभवता येत होती. सर्वार्थाने ते सर्वांचे वडील होते. माऊली खूप प्रसन्न होती. दरवर्षीप्रमाणे नृत्य स्पर्धा, गरबा डान्स झाला. बक्षीस वितरण समारंभाला भाऊ बोलू लागले. बाळांनो, मी लावलेलं हे रोपटं, आता मोठं झालं आहे. हे अजून खूप बहरेल, फोफावेल. ह्याचा वटवृक्ष होईल. माझ्याकडे बरीच कामे अजून करणे आहे. पण मी एका वेगाने पुढे जातो आहे. तुम्ही एकमेकांना प्रेम द्या. एकमेकांशी आपुलकीने वागा. आणि हे कार्य असेच अखंडित चालू ठेवा. ह्यातच तुमच्या जीवनाचे हित आहे. दरवर्षी प्रमाणे गाणगापुरातील दिवाळी कार्यक्रम पूर्ण झाला. आणि चाहूल लागली कार्तिक पौर्णिमेला येणाऱ्या दत्त महाराजांच्या पालखीच्या स्वागताची.

कार्तिक पोर्णिमे निमित्त, संगमावर जाण्यासाठी दत्तपालखी मठाच्या दारात आली. भाऊंनी स्वहस्ते महाराजाना दरवर्षी प्रमाणे महावस्त्र अर्पण केले. भक्तजनांची यथायोग्य सेवा केली. आणि ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी भाऊना सकाळी एका उलटीचे निमित झाले. उपचारासाठी गुलबर्ग्याला हॉस्पिटलला नेण्याचे ठरले. पण हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच मध्य रस्त्यात भाऊंनि आपली जीवनयात्रा, दत्तचरणी अर्पण केली होती. तो दिवस होता, कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया शके १९२६, सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २००४. हा दत्तमहाराजांचा आदेश त्यांना आधीच मिळाला होता.

देह विसर्जनासाठी । आजाराचे निमित्त करती । सत्पुरुष जगराहटी राखती । निसर्ग नियम पाळुनि ।। यांसी कैसे जन्ममरण । सारे आहे निमित्त कारण । स्वेच्छेने करिती देह धारण । तैसाचि त्यागही करती ।। प्राणिमात्रांचा करण्या उध्दार । ईश्वरची धरी मानव शरीर । भोग त्यासही न चुकणार । ऐसें गणित शिकवती ।।

होय! तो आदेशच होता. कारण काही दिवसांपूर्वीच भाऊ गाणगपुरातील आपल्या मठाचे पुरोहित श्री योगेश गुरुजींना बोलले होते, अरे योगेश, सुप्रिम कोर्टाकडून नोटीस आली आहे. योगेश भटजींनी विचारपूस केली, कसली नोटीस आहे. भाऊ म्हणाले, मला दत्त महाराजांनी बोलवले आहे. भटजींना विश्वास वाटेना. ते भाऊंना म्हणाले, अस काही बोलू नका. आम्हाला अजून आपले आशिर्वाद, प्रेम हवे आहे. भाऊ म्हणाले, त्यांची आज्ञा कुणी दत्तभक्त मोडू शकतो का?. योगेश गुरुजींनी स्वतः हे नंतर सर्व शिष्यगणास सांगितले.

पुढील कार्यासाठी भाऊंचा देह वाशिंदला आणण्यात आला. संपूर्ण शिष्य परिवार वाशिंदला आपल्या देवाचे अखेरच दर्शन घेण्यासाठी मठात जमा झाला होता. सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता. सारेच रडत होते. मी तुमचा बाप आहे हे शब्द सतत कानात घुमत होते. पोरकेपणाची जाणीव नेमकेपणाने होत होती. आठवणी उफाळून येत होत्या. श्रीकृष्णाने देह ठेवल्यानंतर त्यातील देवत्व प्रकर्षांने सर्वानाच जाणवल, पण वेळ हातून निघून गेली होती. तसाच, आमचा सावळा श्रीकृष्ण असाच अनंत आठवणी प्रत्येकाच्या हृदयात, मनात कोरून पुढील प्रवासासाठी निघाला होता. वेळ पुढे पुढे सरकत होता. आणि पुढील कार्य करणेही गरजेचे होते.
भाऊंच्या भावंडाना आणि नातेवाईकांना विचारण्यात आले. त्यांनी सांगितले, भाऊंचे व आमचे सख्खे नाते असले तरी तुम्ही त्यांचे शिष्य आहात. त्यामुळे तुमचा विचार आणि जबाबदारी जास्त महत्वाची आहे. काकांनी सर्वाना सांगितले की भाऊंनि त्यांची इच्छा आम्हा काही शिष्यांना मागे एकदा सांगितली होती कि, त्यांच्या देहाला अग्निसंस्कार न देता, भूमातेच्या कुशीत, श्रीकृष्ण मंदिरामागे समाधी मंदिर बांधून जतन करावा. त्याप्रमाणेच सर्व करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी श्री दिलीप गोडसे गुरुजीना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काकाश्रीनी सर्व संस्कार केले. भाऊंनी आधीच दर्शविलेल्या ठिकाणी जमीन खोदण्यात आली. त्यानंतर पुरुष सुक्ताच्या पठणाने खोदलेल्या जमिनीत सुवासिक फुलावर भाऊंचा देह भूमातेच्या उदरात ठेवण्यात आला. सर्वांनी जड अंतकरणाने भाऊंचे अंतिम दर्शन घेतले. समाधी पूजा करण्यात आली. बारा दिवसांनी यतीराधना हा विधी करण्यात आला. समाधीसमोर भजन, कीर्तन, अन्नदान करण्यात आले.
काय भाग्य, आमुची भाऊ माऊली । जेथे अखंड विसावली । ती दहागावची दगड माती । अष्टगंध जाहली ।।

नवे पर्व…..!!!!!!!
आता पुढील प्रवास काकाश्रीच्या मार्गदर्शनने पुढे सुरू झाला. कारण भाऊंनी आपला पारमार्थिक वारसदार म्हणून काकाश्रींची आधीच निवड करून ठेवली होती. आपल्या सर्व बाळांना काकाश्रींच्या झोळीत घालून, भाऊंनी आपल्या सुक्ष्म देहानी अनंत कामासाठी पुढील प्रवास आरंभला होता. आता काकाश्रींची जबाबदारी आधीपेक्षा कैकपटीने वाढली होती. काकाश्रींनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगितले, आपल्याला भाऊंच्या ह्या कार्याचा झेंडा सर्वदूर पसरविणे आहे. दत्तभक्तीचा प्रसार व प्रचार करणे हा मूळ हेतू सर्वांनी आपल्या मनाशी पक्का केला. आणि पुढील अंक सुरू झाला.

भाऊंच्या उपस्थितीत महादत्त याग करण्याचे योजले होते. तो कार्यक्रम ठरल्यावेळी घेण्याचे सूतोवाच काका आजोबांनी केले. आणि ठरल्याप्रमाणे १३ जानेवारी २००५ रोजी कामगार मैदान परेल येथे हा महादत्तयाग नृसिंहवाडीच्या ब्राम्हणच्या पौरोहित्याखाली संपन्न करण्यात आला. न भूतो असा हा सोहळा झाला. ह्याच वर्षी समाधीचे बांधकाम पूर्ण होऊन गुरुपौर्णिमेपासून भाऊंच्या समाधीची षोडशोपचार पूजा सुरू झाली.
शनी मंदिर आणि भस्म मंदिराचे नूतनीकरण
वाशिंद येथे मठ उभारल्यानंतर भाऊंच्या मनी एक कल्पना होती. ती म्हणजे शनी देवतेचे मंदिर बांधण्याची. कारण प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात साडेसातीच्या काळातून जावं लागत. त्यावेळी होणारे त्रास काही अंशी कमी व्हावेत म्हणून ‘शनी उपासना’ करणे आवश्यक असते. त्यामुळे भाऊ महाराजांनी शनैश्वर जयंती निमित्त शनी महाराजांची मूर्ती स्थापना केली. शनिमंदिरासाठी, भाऊंनी आपल्या गोपाळाना मंदिरासाठीचे डिझाइन सुचवण्यास सांगितले. काही शिष्यानि सुचवलेल्या कल्पकतेने भाऊंनी सध्याच्या खुल्या मंदिरची आकारणी करून घेतली. पण काही कारणाने ते काम थोडे अपूर्ण राहिले. त्यांचं ते स्वप्न काकाश्रींनी पूर्ण केले. दरवर्षी शनी जयंती निमित्त येथे शनी अभिषेक करण्यात येतो. तसेच, गाणगापुरातील भस्माच्या डोंगराची आठवण म्ह्णून आणि भस्माचे महत्व शिष्याना अधोरेखित करण्यासाठी भस्म मंदिराचीही स्थापना केली. याचेही काकश्रीनि खूप सुंदरतेने तुळशी वृंदावन आणि भस्म मंदिर असे एकत्रितपणे मंदिराचे नूतनीकरण करून घेतले.
काकाश्री पिटारोहण सोहळा
सर्व मठाची कार्ये काकाश्री हाताळत होते. भाऊंचे कार्य तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवले होते. पण त्यांचा विधीवत वारसाहक्क, ज्याला पिठारोहण अस म्हणतात, तो झाला नव्हता. सर्व शिष्यांच्या मतानुसार काकाश्रींचा पिठारोहण सोहळा करण्याचे ठरवण्यात आले. समाधी समोर पिठारोहण सोहळ्यास सुरवात झाली. अभिषेकासाठी विविध नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. तीर्थक्षेत्रातील पवित्र जलाने काकाश्रींवर जलाभिषेक करण्यात आला. नंतर दुग्धभिषेक झाला. नंतर गंगाजलने स्नान घालूंन पितांबर नेसवण्यात आले. सर्व शिष्यवर्गाने पुष्पवृष्टी करून, मंत्राच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीत काकाश्रीना, सदगुरू भाऊ महाराजांच्या गादीवर बसवण्यात आले. काकाश्री दत्तपरंपरेतील गुरुतत्वात रुजू झाले.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अपूर्ण राहिलेले काम सर्वांच्या सहकार्याने पुर्ण केले. आणि श्री भानुदास प्रतिष्ठान ही भव्य इमारत पूर्णत्वास नेली. तदनंतर गाणगापूरला मठांमध्ये ज्या ठिकाणी भाऊ राहत होते, ते स्थान ‘गुरुस्थान’ म्हणून नव्याने बांधून पूर्ण केले. नवनवीन याग जसे विष्णू याग, सुदर्शन याग, स्वामी पंचायतन याग, पवमान याग, गणेश याग असे अनेक याग काकाश्रींच्या मार्गदर्शनाने घेतले गेले.

भाऊ आजोबांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव जयंती सोहळा घेण्यात आला. ह्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेले श्री अवधुतानंद स्वामी म्हणजेच श्री जगन्नाथ कुंठे आणि जेष्ठ समाजसेवक श्री दादा गावकर यांची उपस्थिती होती. ह्या कार्यक्रमानिमित्त स्मृती तरंग हा अंक प्रकाशित करण्यात आला. तसेच, ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते, भानुदास चरित्रामृत ह्या भाऊंच्या ग्रंथाचे अनावरण. सदर ग्रंथ श्री. शेखर शिंदे यांनी भाऊंच्या आशीर्वादाने आणि काकाश्रींच्या मार्गदर्शनाखाली लिहीला आहे.
कुडाळ ग्रामी मठाची स्थापना

गाणगापूर संगमावरुन स्नान करून येताना एक वेडी बाई काकाश्रीना म्हणाली, तू कोकणात कीत्याक नाय जाणस, थय लक्ष घाल. काकांना हे अजब वाटलं, बाई कन्नड आणि मालवणी कशी बोलली?. त्याच रात्री भाऊंचही दर्शन होऊन त्या बाईच्या बोलण्याला पुष्टी मिळाली. हीच आज्ञा मानून, काकाश्रींनी कोकण परिसराला भेटी देण्यास सुरवात केली. एका ठिकाणची जागा काकांना आवडली आणि ती विकत घेण्यात आली. तेथे दत्तमंदिर उभारण्यात आले. सद्गुरु श्री भाऊ महाराज सेवाश्रम ट्रस्ट ही संस्था स्थापन झाली. तेथे दत्त पादुका स्थापन करून नित्योपचार सुरू झाले.
श्री भाऊ मेडिकल अँड एज्यूकेशनल ट्रस्टची स्थापना

भाऊंचे अजून एक अपूर्ण राहिलेले स्वप्न काकाश्रींनी पूर्ण करण्यासाठी सदर संस्थेची स्थापना केली. सदर संस्थेतर्फे आदिवासी पाड्यातील लोकांना मोफत वैद्यकीय मदत पुरवली जाते. तसेच शालेय गणवेश वाटप, शिक्षण साहित्य पुरवले जाते. गरोदर स्त्रियांना आणि बाळांना सकस आहाराचा पुरवठा केला जातो. भाऊंचे अजून एक स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली होती.
भाऊ महाराजांचे जन्मस्थान गोळवण ह्याचा जीर्णोद्धार
भाऊ महाराजांचे जन्मस्थान गोळवण येथील घर, बऱ्याच वर्षांपासून बंद राहिले होते. त्यावेळी हे घर पाडून तिथे भाऊ महाराजांची जन्मस्थान वास्तू उभारायचा निश्चय काकाश्रींनी केला. भूमिपूजन करून वास्तूचा जीर्णोद्धार केला गेला. नित्य भजन कीर्तन ह्या ठिकाणी होत असते.
गोळवणचा राणा पुस्तक प्रकाशन

भाऊ महाराजांच्या आठवणी, त्यांची कार्य, त्यांनी फुलवलेलेला भक्तीचा मळा, जमवलेला शिष्यपरिवार, ह्या सर्व गोष्टी नवीन येणाऱ्यांना सतत मार्गदर्शक व्हाव्यात ह्यासाठी काकाश्रींच्या मार्गदशनाने ‘गोळवणचा राणा’ ह्या विस्तृत चरित्र स्वरूपाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. सदर पुस्तकाचे लिखाण श्री रवींद्र गावडे (भाई मामा) ह्यांनी केले आहे. काकाश्री ज्या जोमात काम करतात, ते पाहून अचंबित व्हायला होते. काकाश्री एक एक कार्य हाती घेत त्याची पूर्तता करीत चालले आहेत. ही भाऊ महाराजांनीच लीला असावी. भाऊंचे कार्य भाऊच करुन घेतात हे प्रत्येकवेळी जाणवत. एखाद्यावेळी कुठल्याही कारणाने काही अडथळा आला आणि भाऊंना साद घातली की तो अडथळा सहज मार्गातून दूर होतो. आणि पुढील वाट उजळपने दिसू लागते. भाऊंचेच शब्द आहेत,

जरी मी झालो समाधिस्त । जाणा मज नित्य जागृत । तुमचेसाठी येईन धावत । हाक मज भावे मारिता ।।
जड देहाचा होता परिहार । सूक्ष्म देहाने करिन संचार । सर्वावरी माझी राहील नजर । ठेवा ध्यानी बोल हे ।।
स्थूल देहास आहे मर्यादा । म्हणूनि तोडीतो हे बंध आता । कार्य करणे आहे ज्यादा । शत-शत पटीने ।।
कार्यतत्पर असावे तुम्ही । देईन तुम्हा स्फूर्ती मग मी । तुमचेच हातुन कार्ये करेन ती । कळोंन येईल तुम्हास ।।
आणि आज त्याचा अनुभव प्रत्येकाला पावलागणिक येतो आहे. क्षणोक्षणी ते जणू हेच जाणवू देत असतात, “हम गया नही, जिंदा है।”
|| श्री गुरुदेव दत्त ||