
|| ॐ श्री भानुदासाय नमः ||
‘भाऊ आणि आठवणी’
साई बाबांच्या सांगण्या वरून भाऊंच्या गाणगापुरच्या वाऱ्या सुरू झाल्या. कठोर तप सुरू झालं. भस्माच्या डोंगरावर आजही बरेच भिक्षेकरी तिथे असतात. भाऊ सुद्धा त्यांच्या बरोबर भिक्षा मागायला बसत असत. कोणी ओळखू नये म्हणून ते डोक्यावर जूनं कांबळ घेऊन बसायचे. का ? तर कोणी आपल्याला ओळखू नये. मनात प्रश्न डोकावून जातो. कशासाठी ? याचं उत्तर आहे. ” अहंकार घालवण्यासाठी “. गाणगापूरला माधुकरी मागण्या मागे हेच प्रमुख कारण आहे. गाडगे बाबांची एक अशीच कथा आहे. एकदा एका घरात पुरणपोळ्या करत होतें. तेंव्हा बाबांना कोणी तस ओळखत नव्हत. बाबा घरा समोर भिक्षेला उभे राहिले आणि भिक्षा म्हणून पुरणपोळ्या मागितल्या. घरातील लोकांनी दुसरं काही देऊ केलं तर ते त्यांना नको होत. यावरून वाद सुरू झाला. घरातील इर्षेला पेटले, वाद घालू लागले पण बाबांना पोळ्याच हव्या होत्या. ते नम्रपणे पोळ्याच मागत होते. शेवटी घरातील माणसाने बाबांना बाभळीच्या काट्यांनी झोडलं. बाबांनी तोही मार निमूटपणे सहन केला, शरीर अक्षरशः रक्तबंबाळ झाल. एवढं कशासाठी? अहंकार घालवण्यासाठी. संतांच्या लीलाच काही वेगळ्या. असो…
अशाच एका मुक्कामात भाऊंची भेट एका सत्शील, निषकांचन ब्राम्हणाशी झाली. पुढे त्या ओळखीचं रूपांतर अभंग, निखळ मैत्रीत झालं. ती व्यक्ती होती आपले श्री. वामन भटजी. आपले गणागापुरातील उपाध्याय श्री. योगेश भटजी यांचें तीर्थरूप. हळू हळू वामन भटजींना ही भाऊंच्या असामान्यत्वाची कल्पना येऊ लागली. तसतशी त्यांची मैत्री अधिक दृढ होऊ लागली. भाऊंच या घराण्याशी संबंध येण्यामागे आणखी एक कारण होत. वामन भटजीन्चे मोठे बंधू, श्री. नारायण भटजी ( अण्णा).
अण्णा म्हणजे गणागापुरातील वेगळ प्रस्थ होत. फारशी उंची नव्हती पण चेहऱ्यावर साधनेचे तेज विलसत असायचं. चेहरा सदैव निर्विकार असायचा. श्रीगुरू चरित्रातील भास्कर ब्राम्हण सर्वाँना ज्ञात असेलच, ज्याने केलेल्या ३/४ माणसांच्या जेवणामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी ४००० लोकांना जेऊ घातलं होत. या भास्कर ब्राह्मणाला चार मुले झाली. याच चार मुलांची चार घराणी आज गाणगापूर मध्ये सालकरी म्हणून नांदत आहेत. या चारही घराण्यात अण्णान्ना वरचा मान होता. कोणी ही त्यांची आज्ञा टाळत नसे. पालखी समोर जे गायन होतें त्यामध्ये मध्यभागी अण्णा उभे राहत असत .अण्णांची पालखी सेवा शेवट पर्यंत कधीही चुकली नाही .वामन भटजीन्च्या जुन्या घरातील वरच्या मजल्यावर एक खोली होती. तिथे अण्णा रहायचे. दिवसभर नामस्मरणात असायचे . त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष दत्त महाराज बोलत असतं अशी वदंता होती. भाऊ अण्णांना भेटायला गेले की त्यांच्या परवानगी शिवाय कोणालाही त्या खोलीत यायची परवानगी नसे. त्यांच्यात काय बोलणं व्हायचं हे कोणालाही कधीही कळलं नाही आणि भाऊंनीही कधीही त्याबद्दल वाच्यता केली नाही .
वामन भटजींच्या माध्यमातून पुढे दिपक भटजींची ओळख झाली आणि जमिनीचा सौदा झाला. एकदा आपल्या मठाबाहेर भाऊ वामन भटजींशी बोलत उभे होत आणि अचानक वायु वेगाने एक व्यक्ती भाऊंच्या जवळ आली आणि त्यांनी भाऊंना कवेत घेतल. त्या व्यक्तीला पाहून वामन भटजींची पाचावर धारण बसली, गात्र न गात्र शिथिल झाली. तोंडावर कस्तुरीचा कोणी तरी भपका मारावा अस काहीस वाटल. ते दिव्य रूप त्यांच्या डोळ्याला सहन होत नव्हत . कारण. ते तेजस्वी रूप म्हणजे प्रत्यक्ष श्रीमन् नृसिंसरस्वती होते . स्वामी वामन दादांना म्हणाले. “हा आणि मी एकच आहोत”. ती भेट म्हणजे वामन दादान्साठी कल्पनातीत धक्का होती. या घटनेमुळे वामन दादांची भाऊंवरील श्रद्धा पराकोटीला पोहचली. अष्टतिर्थाच्या दिवशी आपल्या सर्व शिष्यपरीवाराच दुपारचं जेवण वामन दादांच्या घरी असायचं. ही प्रथा मठ पूर्ण झाल्यावरही कित्येक वर्ष चालू होती. १९९२ साली मठाच काम सुरू झालं. काम पूर्ण करण्यासाठीं आम्हा काही मुलांना ४ /५ महिने राहावं लागतं असे. कोणतीही अडचण आली की वामन दादा पाठी मागे भक्कम उभे राहायचे. अडचणी येत नव्हत्या अस नाही पण भाऊंनी अशी काही देव माणसं जोडली होती की अडचणी सहज दूर व्हायच्या.
भाऊ एकदा मला सहज म्हणाले होते. “बाळ, हे सर्व मी लॉजिक वर उभ केलं आहे” यामध्ये खरंच खूप अर्थ लपला आहे. भाऊंनी प्रत्येक गोष्ट व्यवहार चातुर्य, कार्यतत्परता ,अफाट मेहनत या गोष्टींवर घडवली होती आणि त्याचच शिक्षण त्यांनी शिष्यांना दिलं. जेणे करून त्यांच्या आधारावर पुढील पिढी हे सांभाळू शकेल..
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!
श्री. समीर एकनाथ चव्हाण
‘दत्तराज प्रियसूतम’
गोळवणात मलेरियाची साथ पसरल्याने भाऊंची त्यांच्या आजोळी रवानगी झाली आणि भाऊंच्या आजीने त्यांना श्री. मराठे गुरुजी यांच्या पदरात टाकल. भाऊंचे प्रथम आध्यात्मिक मंत्र गुरू. ज्यांनी भाऊंना वेदोक्त मंत्र शिकवले आणि भजनातून कृष्ण भक्तीची ओढ लावली. भाऊ भजनात रमु लागले. त्याच बरोबर गावात होणाऱ्या दशावतारी नाटकातही भाग घेत असत. पुढे शिक्षणा निमित्त मुंबईला आल्यावर एका शास्त्रीय गायन शिकणाऱ्या व्यक्ती कडे गायनाचे घडे घेण्यासाठी जाऊ लागले . सहा महिने ते गान शिक्षक भाऊंना सा रे गा म च शिकवत होते .भाऊंनी शेवटी कंटाळून विचारलं. गुरुजी तुम्ही पुढे का शिकवत नाही ? त्यांचं उत्तर फार विक्षिप्त होत. ते ऐकून भाऊंचा नीरस झाला आणि त्यांची गाण्याची इच्छा मनाच्या एका कोंदणात अहील्येच्या शिळेसारखी राहून गेली. पुढे शिक्षणामुळे म्हणा किंवा कामाच्या व्यापामुळे ती आवड जोपासता नाही आली. परंतु रागांचं आगाध ज्ञान भाऊंना होत, पण ते कसं ? हे मात्र सांगता येणार नाही. वेळात वेळ काढून ते नाट्य संगीताला जात असत. अनेक दिग्गज कलाकार भाऊंना ओळखत होते.
साई बाबांच्या सांगण्या प्रमाणे भाऊंच्या गाणागापुरच्या वाऱ्या सुरू झाल्या. कठोर तपश्चर्या सुरू झाली आणि एक दिवस, भाऊ संगमावर जात असताना, नाग नाल्या जवळ एक अत्यंत तेजस्वी व्यक्ती बसलेली दिसली. अंदाजे त्या व्यक्तीची उंची सात ते आठ फूट असावी. शरीरयष्टी वानर सदृश्य होती. ते रूप शब्दात मांडता येणार नाही असं काहीसं. त्या व्यक्तीने भाऊंना जवळ बोलावलं “इकडे ये”. आवाजात जरब आणि प्रेम याच विलक्षण मिश्रण होत. भाऊ नम्रपणे त्यांच्या जवळ गेले.
पुन्हा आज्ञा “तोंड उघडं ” भाऊंनी तोंड उघडलं ” जीभ बाहेर काढ ” भाऊ भारावल्या अवस्थेत होते. त्यांनी आज्ञे प्रमाणे केलं.त्या व्यक्तीने भाऊंच्या जिभेवर भस्म चोळल आणि शेवटची आज्ञा दिली “जा आता” .भाऊ त्यांना नमस्कार करून पुढे निघाले आणि क्षणात मागे वळून पाहिलं तर ती व्यक्ती अदृश्य झाली होती आणि त्या दिवसापासून भाऊंच्या मुखातून गंधर्विय गान प्रसवू लागल. हजारो भजनाच्या चाली भाऊंनी लावल्या. ओल्या भक्तीच दान आपल्या शिष्यांच्या पदरात टाकल. भजनात भाऊ इतके रंगून जायचे की एखाद भजन ते अर्धा पाऊण तास सहज आळवायचे. तो अनुभव स्वर्गीय आनंद देणारा असायचा. भाऊंनी बसवलेली गाणी हा एक चमत्कार आहे. त्यात देव वाणीचा सुर गुंफलेला आहे. गळयाच्या ठिकाणी, राधा कृष्णाच्या नाडी रूपात स्थित असलेल्या विशुद्ध चक्राची जागृती आहे.
भाऊंनी आपल्या साठी एक अमूल्य खजाना तयार करून ठेवला आहे. त्यांनी बसविलेल्या भजनात अशी काही जादू आहे की आपण सहज गुणगुणत जरी राहिलो तरी अनेक नाड्या जागृत होतील. एक शिष्याला नोकरी नव्हती भाऊंनी त्याला एक भजन शिकवल आणि देवा समोर म्हणायला लावलं, चाल फारशी गोड नव्हती पण चमत्कार घडवणारी होती.
पोटा पुरती देई मागणी | लई नाही लई नाही | देवा लई नाही लई नाही |
त्याची सेवा देवा चरणी रुजू झाली, त्याला सरकारी नोकरी लागली. भजनाच्या चाली लावताना भाऊ एका वेगळ्या अनामिक भाव समाधी अवस्थेत असायचे. आजुबाजूच भान त्यांना नसायचं. भाऊ नेहमी म्हणायचे. मी भजनाच्या चाली साधनेतून लावतो त्या चाली रेकॉर्ड करून ठेवा. पुन्हा त्या माझ्या मुखातून येतीलच असे नाही. त्यात देववाणीचा सुर आहे. तुम्ही भजनात रमलात तर तुमची अनेक दुख लीलया दूर होतील.
अस हे भाऊंच अवलियापण,
ज्यांनी पाहिलं, ज्यांनी अनुभवल
त्यांच्या हृदयात अखंड आंनादाचा
झरा होऊन राहील….
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!
श्री. समीर एकनाथ चव्हाण
‘भाऊंच्या मुखातून ऐकलेल्या काही गोष्टी.’
भाऊंनी १९८५ साली सदगुरु भालचंद्र महाराज सेवा संघाची स्थापना केली. त्यावेळी या कार्यासाठी अनेक सहकारी त्यांना लाभले कवठणकर, खोबरेकर, मुळे, देवगिरी, महात्मे, कवडे, मसुरकर , पेंडकलकर, सदरे, भाई गावडे, काकाश्री, तोरसकर बाबा इत्यादी…
तोरसकर बाबा हे हटयोगातील शिवस्वरोदय शास्त्राचे गाढे अभ्यासक व मोठे साधक होते. एका व्यक्तीला बर नसताना त्यांची पत्नी बाबांना एका हॉटेल मध्ये भेटण्यास गेली. कारण ती व्यक्ती खूपच आजारी होती. बाबांनी तिथेच एका ग्लासातील पाणी तिला पिण्यास सांगितले आणि तिकडे त्या व्यक्तीला बर वाटल. एवढी साधनेची ताकत. भालचंद्र महाराज मंदिरात आरती नंतर महात्मे (यांच्याच घरी काकाश्री यांना प्रथम भाऊ भेटले) आणि तोरसकर बाबा प्रवचन करत असतं. भाऊ तेंव्हा फार कमी बोलायचे. बाबा हे भाऊंचे चांगले मित्र होते आणि त्यांना भाऊंची साधनेतील उंची ठाऊक होती. भाऊ नेहमी बाबांना शिवस्वरोदय शास्त्रावर बोलण्यास सांगत असत.
भाऊ एकदा बाबांना म्हणाले. तुम्ही ज्या मंत्राचा जप करता तो आता बंद करून “श्री गुरुदेव दत्त ” या मंत्राचा जप सुरू करावा. परंतु बाबांना हे तितकसं पटल नाही. अस करता करता काही दिवस निघून गेले आणि दिवाळी आली, गाणगापूरला अष्ट तिर्थासाठी जाण्याचं योग आला. आणि तो अविस्मरणीय दिवस उजाडला.
सर्व जण अष्टतिर्थाला निघण्याच्या तयारीत होते .आज ही बऱ्याच अंशी पुरुष मंडळी हाफ पँट आणि टी शर्ट घालून अष्टतिर्थ करतात. तेंव्हा ही तीच परिस्थिती होती पण त्या दिवशी काकाश्री लुंगी नेसले होते. त्याबद्दल भाऊंनी विचारलं असता काकाश्री म्हणाले. “लुंगी काढून येतो पटकन ” पण भाऊ म्हणाले”अरे राहू दे आता पुढे ती उपयोगी पडेल.” आणि सर्व जण निघाले.
संगमावर फारस पाणी नव्हत. अंदाजे ३ फूट पाणी होत म्हणजे एकदा उंच माणूस बुडू शकत नाही. पण तोरसकर बाबा बुडाले बाबांची उंची चांगली होती .कोणाला काहीच कळेना कारण ही गोष्टच अशक्य होती त्यांच्या बरोबर असणारे पट्टीचे पोहणारे मित्र सुद्धा त्यांना न शोधता घाबरून बाहेर आले. सर्व जण भाऊंकडे आले. भाऊ मात्र शांत होते. इतक्यात तोरसकर बाबा पाण्यातून बाहेर आले आणि ते ही विवस्त्र अवस्थेत. खरां झटका तर पुढे होता. बाबा वेगळ्याच अवस्थेत होते. असंबद्ध बोलत होते , महाराजांच्या नावाने उद्घोष चालू होता , नाचत होते. कशाला कशाचा मेळ लागत नव्हता. काकाश्रीनी पटकन स्वत:च्या कमरेची लुंगी काढून बाबांच्या कमरेला बांधली. तेंव्हा त्यांना आठवलं, का भाऊंनी लुंगी काढून ठेवण्यास मनाई केली होती. खूप वेळाने बाबा स्थिरस्थावर झाले. मग त्यांनी नक्की काय घडलं ते सांगितलं. संगमावर पाण्यात उतरल्यावर ते अचानक पाण्यात बुडाले. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होत. इतक्यात तीन व्यक्ती पाण्यातून त्यांच्या समोर आल्या. त्यातील एका व्यक्तीने बाबांचे सर्व कपडे काढून घेतले . दुसरी व्यक्ती म्हणाली. “त्याने (भाऊंनी) सांगितलेला मंत्रच योग्य आहे, या पुढे त्याचाच जप करायचा”. अस म्हणून त्यांनी बाबांना पाण्याबाहेर फेकून दिलं. घडलेला सर्व प्रकार आता सर्वांच्या लक्षात आला. सर्वांचे डोळे विस्फारलेले होते. कारण त्या तीन व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष ” दत्त महाराज ” होते.
त्यांच्या दर्शनाने प्रभावित झाल्याने बाबा असंबद्ध बडबडत होते. भाविक हो एव्हाना या घटने वरून आपल्याला भाऊंची थोरवी लक्षात आली असेल.
असे महान सदगुरु आपल्याला लाभले, हे आपल्या कित्येक जन्माच्या पुण्याच फलित आहे.
सदगुरु वाचोनी सापडे न सोय ||
धरावे ते पाय आधी आधी ||
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!
श्री. समीर एकनाथ चव्हाण
‘भाऊ – चतुमिर्ती जग.’
श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्र ग्रंथ हा अक्षर सत्य मानला गेला आहे. त्या ग्रंथानुसार प्रभूंची विशेष कृपा तीन कुटुंबांना लाभली. त्यातील नरसिंह वर्मा हे क्षत्रिय कुटुंब, ज्यांना प्रभूंनी असा आशीर्वाद दिला की काही शतकांनंतर तुम्ही महाराष्ट्रात शिवाजी महाराज म्हणून जन्माला याल आणि हिंदू धर्म संस्थापणार्थ स्वराज्य निर्माण कराल. तुमच्या त्या रूपात माझा अंश कार्य करेल. असे छत्रपती शिवाजी महाराज भाऊंचे आदर्श नसतील तर नवलच..
मुळातच इतिहासाची प्रचंड आवड आणि त्यात आराध्य असलेल्या महापुरुषाचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी भाऊंनी अख्खा महाराष्ट्र पायी तुडवून काढला. त्या काळात वाहतुकीची साधन फारशी नव्हती. परेलच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात एका भल्या माणसाच्या ओळखीमुळे भाऊंना अभ्यास करण्याची मुभा मिळाली होती. त्यातील टिपण काढून भाऊंची स्वारी भटकंतीला निघायची. एक शबनम (झोळी) बरोबर असायची. त्यात पारलेची बिस्कीट, कॅमेरा आणि एक कपड्याचा जोड एवढच समान असायचं. बऱ्याचदा उपाशी प्रवास करावा लागायचा. पण ध्येयवेड्या माणसांच्या शब्दकोशात तहान भूक हे शब्द बहुदा नसावेत. कोणत्याही विभागात गेलं की एखाद्या गावात थांबायचं रात्र कशीबशी काढायची, सकाळी पुन्हा प्रवास सुरू. गावातील लोक महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करतोय म्हणून या तरुणाचा पाहुणचार करायचे. एखाद्या दिव्याची व्यवस्था करायचे, कारण त्या काळात लाईट नव्हती. दिवसभरातील अभ्यासाची टिपण भाऊ रात्री मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात काढत बसायचे. सत्यापर्यंत पोहचण्यासाठी भाऊंनी इंग्लिश ग्रंथही चाळले. तरीही बऱ्याचदा खरा इतिहास समोर येत नसे. पण हार मनातील तर ते भाऊ कसले. अशावेळी भाऊ एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करत असत, जो मार्ग आपल डोकं चक्रावून टाकणारा आहे.
आत्मे आहेत की नाही हा वादाचा विषय आहे परंतु आपल्या माहितीसाठी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. १८/२० वर्षापूर्वी डिस्कवरी चॅनलवर एक कार्यक्रम दाखवण्यात आला होता Ghost of Castles. या कार्यक्रमात ब्रिटन मधील एका किल्ल्यात काही लोकांच्या सांगण्यानुसार सैनिकांच्याच्या परेडचा आभास होत असे. सत्य शोधण्यासाठी डिस्कवरी टीमने स्पेशल कॅमेरे बसविले आणि त्यात त्यांना सैनिकांची परेड दिसली. पण जिथे मुळात रस्ता नव्हता तिथे परेड चालू होती. संशोधकांना काहीच लक्षात येत नव्हत. सरतेशेवटी काहीच पर्याय नाही म्हणून त्या ठिकाणी खोदकाम केल्यावर जुना पद्धतीचा रस्ता सापडला. असो…
सदगुरु भाऊ महाराजांकडे हजारो विषयाचं सखोल ज्ञान होत, प्रश्न असा उभा राहतो की एका आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती एवढं ज्ञान कस मिळवू शकते. काही प्रश्नांची उत्तरं तर्कावर न शोधता कायासावर, सिद्धांतावर शोधावी लागतात. हजारो जन्मांच ज्ञान संकलित झालं होत. ज्यावेळी अशा प्रशांनाची उत्तर त्यांना सापडत नसे तेंव्हा सूक्ष्म देहाने चतूर्मिती जगात जाऊन त्यांची उत्तरं शोधत असतं. सूक्ष्म देहाने चतुर्मिती मध्ये जाऊन ज्ञान संपादन करणे व ते ज्ञान आपल्या जड देहाला शिकविणे ही आध्यात्मातील उच्चकोटीची साधना मानली जाते. परंतु हा विषय साधनेशी संबंधित आहे. इतिहासा बाबतीत भाऊ थोडा वेगळा प्रयोग करीत असत. आजही शिवरायांच्या किल्ल्यांवर त्यांच्या काळातील मावळ्यांचे आत्मे आहेत आणि आजही ते किल्ल्याचं संरक्षण करीत आहेत. केवढी निष्ठा म्हणावी जी मरणानंतर ही जागृत आहे. ज्या ठिकाणी ऐतिहासिक घटना घडल्या आहेत त्या ठिकाणी भाऊ जात असत आणि त्या मावळ्यांच्या आत्म्यांना बोलवत असत त्यांच्याशी संवाद साधत असत, त्यांच्याकडून खरा इतिहास समजून घेत असत. आज जी पावनखिंडीत झालेली लढाईची जागा दाखवतात ती चुकीची असून खरी जागा भाऊंनी शोधून काढली होती. भाऊ शिवरायांचा जो इतिहास सांगत असत तो बऱ्याचदा अभ्यासकांना ही अवगत नसे. मात्र या घटनेवरून भाऊंचा आध्यात्मातील अधिकार लक्षत येतो.
इतिहास तज्ञ म्हणून अनेक ठिकाणी भाऊंची व्याख्याने आयोजित केली जात असतं. सात सात दिवस भाऊ शिवाजी महाराजांवर बोलत असत. दस्तुरखुद्द सेतू माधवराव पगडी भाऊंच्या व्याख्यानाला हजेरी लावत असत आणि भाऊ सुद्धा त्यांच्या व्याख्यानाला जात असत.
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!