अज्ञात भाऊ महाराज

भूतकाळात खूप काही लपलेलं असत जे खरंतर बऱ्याचदा वर्तमानात पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देणार असत. काही गोष्टींचे अर्थ, भूतकाळातील सोनेरी पानात लिहीलेले असतात जे पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे असतात. “जुने जाऊ दे मारणा लागूनी” असे एका कवीचे शब्द आहेत. भूतकाळच नसता तर वर्तमान घडलाच नसता. आपला मेंदु हा नेहमी कोणतीही गोष्ट पूर्वीच्या अनुभवावरून ताडत असतो. यालाही इतिहासच म्हणू शकतो. शिवरायांच्या गनिमिकाव्याचा अभ्यास करून व्हिएतनाम सारख्या इवल्याश्या देशाने अमेरिकेस जेरीस आणले. शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यासक्रम आज कित्येक देशातील  मुलांना शिकवला जात आहे. हा इतिहासाचा विजय म्हणावा लागेल. संतचरित्र ही याला अपवाद नाही. संतांच्या लीला भक्ताला मार्गदर्शक ठरतात म्हणूनच त्यांच्या लीला ग्रंथरूपाने आजही अस्तित्वाची साक्ष देत आहेत. लीला गायल्या जात आहेत. काळ खूप जुना आहे नक्की कोणता ते सांगता येणार नाही. कणकवली येथे खूप वर्षांपुर्वी एक अवलिया उन्मनी अवस्थेत लोकांना दिसत असे. स्वतःच भान त्यांना राहिलेलं नव्हतं. केस वाढलेले, अंगावर धड कपडा नाही, कोणाशीही काही बोलणं नाही, कोणाकडे काही मागण नाही. लोकांना त्या व्यक्तीबदल काही माहीत नव्हते. त्या अवलीयाचा जगाशी संबंध नव्हता. हळूहळू लोकांकडून त्रास वाढू लागला. लोकांच्या टवाळीचा विषय झाला होता. मात्र एक तरुण तिथे जात असे. नेहमी एक प्लेट भजी घ्यायची, अर्धी त्यांना द्यायची, अर्धी आपण खायची हा नेहमीचा नित्यक्रम. दोघांमध्ये काहीही बोलण होत नसे. सगळं काही नजरेतच सामावलेलं होत. कासवी जशी आपल्या पिलांना नजरेनेच  पैलतीरावर पोहचवते हीच किमया सद्गुरू आपल्या काही शिष्यांच्या  बाबतीत करीत असतात. लोक काय म्हणतायत याचा त्या तरुणाशी काही संबंध नव्हता. या नात्यामध्ये नक्कीच काहितरी लपलेलं होत, जे त्या दोघांनाही माहीत होतं पण जगाला दाखवायचं नव्हत. बराच काळ असाच लोटून गेला. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. आता वेळ आली होती प्रकट होण्याची. लोकांचा त्रास जेंव्हा पराकोटीला पोहचला. तेंव्हा त्या अवलीयाच्या सद्गुरूंचे हृदय कळवळून आले. शिष्याला घडवण्यासाठी सद्गुरूंच तशी व्यवस्था करीत असतात. साधनेचा काळ पूर्ण झाला होता, आता लोकाभिमुख होण्याची वेळ आली होती.

सद्गुरू साटम महाराज कणकवलीला हजर झाले व त्यांनी त्या अवलीयाची सर्वाना ओळख करून दिली. ते अवलिया म्हणजे सद्गुरू भालचंद्र महाराज. लोकांना प्रचंड पश्चताप झाला. पण नकळत चूक घडून गेली होती. लोकांना आता भालचंद्र महाराजांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येऊ लागली. भक्तांचा ओघ वाढू लागला. भालचंद्र महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. त्या अवलीयाला म्हणजेच भालचंद्र महाराजाना भजी देणारा तरुण म्हणजे आपले भाऊ महाराज होते. संतांच्या लीला संतच जाणती. बराच काळ मध्ये निघून गेला. एकदा भालचंद्र महाराज टिटवाळा येथे आले होते. दर्शनासाठी खूप लोक लोटली होती. भाऊ पण दर्शनासाठी गेले होते. भालचंद्र महाराजानी भाऊंना पाहिलं आणि त्यांना जवळ येण्यास सांगितलं. भालचंद्र महाराज बोलत नसत. खुणेने सांगत असत. सर्वाना बाहेर जाण्यास सांगितले. दोन्ही व्यक्ती काही काळ एकांतात भेटले. या भेटीत काय घडलं ते सांगता नाही येणार. पण भाऊ त्याबदल अस सांगत असत की, ” मला भालचंद्र महाराजानी प्रसाद दिला आहे”. इतिउपर  त्यांनी त्या भेटीबद्दल अधिक काही कधीच सांगितलं नाही. काही काळानंतर १९७६ साली १६ डिसेंबर रोजी लालबाग येथील लालामैदानात भालचंद्र महाराजांनी देह ठेवला. त्या मंदिराला त्यांचच नाव देण्यात आल आहे.

भाऊनी याच मंदिरात १९८५ साली आपल्या दत्तभक्ती प्रसाराच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेचं नाव ठेवलं . सद्गुरू भालचंद्र महाराज सेवा संघ. जिथे जिथे भाऊंनी कार्य केल, तिथे त्यांनी प्रथम भालचंद्र महाराज यांचा फोटो पूजेला ठेवला. गाणगापूर मठाच नामकरण भाऊंनी  सद्गुरू भालचंद्र महाराज उपासना मठ अस केलं. प्रवेश द्वाराजवळ प्रथम दर्शनी त्यांची मुर्ती दृष्टीस पडते. भालचंद्र महाराजांची आठवण प्रत्येक ठिकाणी जपून ही त्याबद्दल भाऊ काहीच बोलत नसत. दत्त भक्तीमध्ये गुरुस्मरण श्रेष्ठ मानले गेले आहे. असाच काहीसा भाग त्यात असावा. आपणा पामराना बुद्धी पलीकडच्या गोष्टी काय कळणार. भाऊंचे मंत्रगुरु मराठे गुरुजी (मोगरणे) हे होते. पुढील आयुष्यात पी.अण्णा स्वामींनी त्यांच्याकडून काही साधना पूर्ण करवून घेतली. साधनेचे काही भाग प्रत्यक्ष दत्त महाराजांनी भाऊना शिकवले होते. तत्संबंधी एक घटना आहे.

एके दिवशी पुण्यामध्ये मंत्रशास्त्र यावर विचार मंथन ठेवल गेलं होतं. मोठे मोठे विचारवंत या सभेत आपले विचार मांडणार होते. भाऊंचा या विषयावर गाढा अभ्यास असल्याने शेवटची काही मिनिट त्यांना बोलण्यासाठी ठेवली होती. पुणेकरी चिकित्सक असल्याने उपस्थिती प्रचंड होती. वेदमहर्षी सातावळेकर ही आले होते. सर्वांची व्याख्यान झाल्यावर भाऊ उभे राहिले. भाऊंच पहिलं वाक्य अस होत, आता पर्यंत तुम्ही जे ऐकलात ते साफ चुकीचं आहे. सर्व सभा क्षणभर स्तब्ध झाली. पुढच्या मिनिटाला भाऊंनी सभेवर आपल्या वक्तृत्वाची जादू पसरली. जणू सरस्वती बोलत आहे, असा भास व्हावा. मंत्र रचना कशी असते? किती पद्धती मंत्र म्हणण्याच्या आहेत? उच्चार शास्त्र म्हणजे काय? मंत्र लहरी कशा काम करतात? किती Frequency तयार होतात?; हे विविध माध्यमातून सांगितले. आराखडे काढून दाखविले. मंत्राच्या विविध पद्ध्ती बोलून दाखविल्या. एक तास भाऊ  अखंड बोलत होते. सभा मंत्रमुग्ध झाली होती. वेळेचं भानच कोणाला राहील नव्हतं. सभा संपल्यावर वे. म. सातावळेकारांनी दुसऱ्या दिवशी बंगल्यावर येण्यास सांगितले. भाऊ भेटावयास गेले. त्यांनी एकच प्रश्न विचारला. बाळ तू काल ज्या मंत्राच्या पद्धती म्हणून दाखविल्यास त्या जाणणारे एक तर हिमालयात आहेत किंवा दुसरे म्हणजे दत्तमहाराज . मग तुला कोणी शिकवलं? भाऊ म्हणाले,”मी काही हिमालयात गेलो नाही. मला दत्त महाराजांनी शिकवलं” हे उत्तर ऐकताच सातावळेकरानी भाऊंना साष्टांग दंडवत घातला. आणि म्हणाले, बाळ तू खूप श्रेष्ठ आहेस”. अनेक संतांचा सहवास भाऊना लाभला होता. त्यांची जडणघडण अनेक संत, विभूती, सिद्ध, आणि प्रत्यक्ष  दत्तमहाराज यांच्या कडून झाली होती.

    ।। सद्गुरुअर्पणमस्तू ।।