
एकदा वाशिंदला असताना, श्री शेखर शिंदे, ह्यांनी भाऊंना त्यांच्या चरित्र ग्रंथ लेखनाची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भाऊंनी त्यांना योग्यवेळी तुझी इच्छा पूर्ण होईल, असे आश्वस्त केले. पुढे भाऊंच्या वियोगानंतर शेखर सरांच्या मनामध्ये हि आठवण उचंबळून येऊ लागली. आणि आपोआप कवण रुपी पदांची निर्मिति होऊ लागली. त्याचीच पुढे ओवीबद्ध स्वरूपात मांडणी करून श्री शेखर सरानी भानुदास चरित्रामृत ह्याची निर्मीती केली. पुढे, भाऊ आजोबांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त अमृत महोत्सव जयंती सोहळा घेण्यात आला. ह्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेले श्री अवधुतानंद स्वामी म्हणजेच श्री जगन्नाथ कुंठे आणि जेष्ठ समाजसेवक श्री दादा गावकर यांची उपस्थिती होती. ह्या कार्यक्रमा निमित्त भानुदास चरित्रामृत ह्या भाऊंच्या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. सदर ग्रंथ श्री. शेखर शिंदे यांनी भाऊंच्या आशीर्वादाने आणि काकाश्रींच्या मार्गदर्शनाखाली लिहिला आहे.
Bhanudas-Charitramrutसदगुरु भानुदास चरित्रामृतानंतर भाऊंच्या जीवनाविषयी विस्तृत स्वरूपात माहिती लिहिण्याची एक संकल्पना मांडण्यात आली. त्या अनुषंगाने काकाश्रींच्या मार्गदर्शनाखाली श्री रवींद्र गावडे (भाई मामा) यांनी ‘गोळवणचा राणा’ याचे विस्तृत स्वरूपात लिखाण केले..

|| श्री गुरुदेव दत्त || भाऊंचे चरित्र ||
त्वमेव माता, पिता त्वमेव। त्वमेव बंधू, सखा त्वमेव।
त्वमेव विद्या, द्रवीनं त्वमेव। त्वमेव सर्व मम देवदेव…

आरतीच्या शेवटी घालीन लोटांगण सुरू झाले, की प्रत्येकच्या मनातील हा भाव त्या स्थापन केलेल्या मूर्तीप्रति व्यक्त होतो. आरती मधून हे म्हणने सहज सोपे आहे. पण असा सहवास, असे निर्व्याज प्रेम खरेच देवाकडून भक्ताला आणि भक्तांकडून देवाला मिळते. हा प्रश्न नेहमीच साशंकीत राहतो. आणि हा फक्त एक उपचार बनतो. आम्ही मात्र सर्वांनी ह्याबाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. याची डोळा याची देही, आम्ही देवासोबत खेळलो, बागडलो, चिडलो, रडलो, मस्करी केली, आनंदीआनंद साजरा केला आहे. आमचा देव – भाऊ महाराज – दत्तराजप्रियसुतम. आईची काळजी, बापाची जबाबदारी, भावाची सोबत, बहिणीची माया, आणि मित्राची उनाड संगत, ह्यातील काहीच आमच्या वाटेला कधीच कमी पडले नाही. ही सर्व नाती त्यांनी एकट्याने सहज पार पाडली. आज मागे वळून पाहताना हे जाणवते की, खरच श्रीकृष्णच्या सहवासात असताना गोकुळात, साईबाबाच्या सहवासात असताना शिर्डीत, स्वामीच्या सहवासात अक्कलकोटात, गजानन महाराजच्या सहवासात शेगावात, जो आनंद त्यांच्या भक्ताने अनुभवला असेल, तोच आनंद आम्हाला आमच्या ह्या सावळ्या माउलींनी दिला.

भाऊंचे लाडके दैवत “श्रीकृष्ण”. श्रीकृष्णाने प्रत्येकाशी एक नाते बनवले, ते आपुलकीने, प्रेमाने दृढ केले. तो राधेचा प्रियकर झाला, गोपाळांचा सखा झाला, यशोदेचा कान्हा झाला, रुक्मिणीचा पती झाला, पांडवांचा मार्गदर्शक झाला. त्याप्रमाणेच भाऊ आपल्या प्रत्येक शिष्याशी एक नाते जगले. ती कृष्णभक्ती आम्हाला दिली. प्रत्येकाला भावलेले, ‘भाऊ’ वेगळे आहेत. प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात, त्यांनी दिलेली मायेची ऊब आजही तशीच आहे. त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आजही जिवंत आहेत. भाऊंनी छोट्या छोट्या अनुभवातून, प्रात्यक्षिकातुन खऱ्या आयुष्यची शिकवण दिली. प्रत्येकाच्या आयुष्यात दत्तभक्तीचे, कृष्णभक्तीचे बीज रुजवले, फुलवले आणि फळवले सुद्धा.

भाऊंचे चरित्र लिहणे ही सहज सोपी गोष्ट कधीच होऊ शकत नाही. आतापर्यंत ज्यांनी ते लिहले, तो प्रयत्न केला त्या सर्वांना साष्टांग दंडवत. कारण बहुरूपधर अश्या त्यांच्या रूपास पकडणे आणि शब्दबद्ध करणे म्हणजे एक खूप मोठी परीक्षा. भाऊ खूप प्रॅक्टिकल होते. गुरुपौर्णिमेच्या आधी भाऊ एक बोर्ड लिहून ठेवायला सांगत. कृपया शिष्यत्व घेण्यापूर्वी माझी पूर्ण चौकशी करावी. शिष्यत्व घेण्याची घाई करू नये. गुरुपौर्णिमा दरवर्षी येते. कारण ते सांगत, गुरुशिष्य हे नातं खूप गहन आहे. एकदा गाठ मारली की ते जनोजन्मीचे नाते बनते. आपल्या शिष्याची प्रत्येक जबाबदारी ही त्या गुरूंना घ्यावी लागते. आणि शिष्याला सुद्धा गुरुवाक्य पाळणे हे बंधन असते.

भाऊंनी कधीही दोन वेगळ्या गोष्टींची मिसळ केली नाही. अध्यात्म शिकवताना पण, नेहमीच्या गोष्टीतून तो सहज उलगडून दाखवला. विज्ञानाची कास धरली. अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची अचूक सांगड घातली. परमार्थाच्या प्रत्येक पायरीवर दत्तभक्तीची आणि मानवी जीवनात असलेली त्याची गरज पावलोपावली दाखवून दिली. सहजयोग साधनेची गुरुकिल्ली दिली. आपल्या शिष्याना अनुभवातून ज्ञान दिले.
सहज सांगायचे झाले तर, एकदा एक वयाने लहान असणाऱ्या शिष्याने भाऊंना निरागसतेणे विचारले, आजोबा सुरण झाडाला कसा येतो. त्यावेळी आजोबा हसले, आणि त्याला समजावले, बाळ सुरण हे मूळ आहे. ते झाडाला येत नाही. ते जमिनीत असते. तात्पुरती त्याची समजूत घातली. काही दिवसांनी भाऊंनी सुरणाचे झाड आणले. त्या शिष्याला ते दाखवले आणि त्याच्याकडूनच ते लावून घेतले. नंतर ३-४ महिन्याच्या कालावधीने त्याच्याकडून खणून ते काढायला सांगितले. त्याचे ज्ञान अनुभवातून पक्के झाले. असे असंख्य अनुभव आहेत. भक्तांचे अनुभव ह्या सदरामध्ये बरचसे आले आहेत. कृपया ते अवश्य वाचावेत. भाऊंचे ज्ञान अफाट होते. ज्ञानाचा महासागर होता. अशी एकही वस्तू नव्हती की ज्याबद्दल ते सांगू शकत नाहीत. पण ह्या संपूर्ण ज्ञानाचा वापर त्यांनी फक्त आपल्या शिष्याना घडवण्यासाठी केला. ज्याची जशी झोळी, त्याप्रमाणात त्याला ते ज्ञान देऊ केल. कोणाचीही झोळी कधीही रिकामी ठेवली नाही.

भाऊंचा शब्द वजर्लेख होता. निसर्गानेही त्यांचा शब्द कधीही खाली जाऊ दिला नाही. गाणगापूरत एक लिंबाचे झाड होते. पण त्याला बरेच प्रयोग करूनसुद्धा एकही लिंबू येत नव्हते. भाऊ स्वतः निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या सर्व मठात खूप वेगवेगळे प्रयोग करून, विविध जातीची फुलझाडे, फळझाडे लावली. गाणगापूर सारख्या उजाड जमिनीत नंदनवन फुलवले. तर भाऊ त्या झाडाजवळ गेले. आणि त्या झाडाला ओरडले, जर आता मला लिंबे मिळाली नाहीत तर तुला कापून टाकेन. सोबत विविध प्रयोग चालूच होते. आणि काही महिन्यातच त्या झाडाला लिंबू लागले. भाऊ सांगायचे, निसर्ग आपल्याशी बोलतो. आपण त्याच्या सहवासात जेवढे अधिक राहू, तेवढे जास्त ताजेतवाने, सुदृढ राहू शकू. निसर्गाच्या सहवासात मन अधिक प्रफुल्लित होते. मरगळ निघून जाते. त्याला ‘कसण विद्या’ हे नाव आहे. भाऊंनी आपल्या शिष्याना घडवताना कोणताही मापदंड ठेवला नाही. ज्याला जे जमेल ते नेमकेपणाने ओळखून त्याच्या कडून ती गोष्ट करून घेतली. त्याला त्यातूनच घडवले. त्याच्याही नकळत त्याच्या आयुष्यचे सोने केले. फक्त एकच शिकवण दिली, “प्रयत्नांती परमेश्वर. “

ह्या प्रवासात बरेच जण भाऊंच्या सहवासात आले. काहीजण मधूनच सोडून गेले, काहीनी शेवटपर्यंत साथ निभावली, आणि काहीतरी त्या उपरही त्यांच्या सेवेत आजतागायत आहेत. जे गेले त्याची भाऊंनी कधीही चिंता केली नाही. जे राहिले त्यांना घेऊन ते चालत राहिले. कारण त्यांचं एक तत्व होत, “आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय.” शेवटास हा एवढा मोठा प्रपंच मांडण्याचा हेतू केवळ एकच होता दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार. हे काम साक्षत दत्त महाराजांचा आदेश होता. आणि तो त्यांनी तंतोतंत पाळला. आपल्या सर्व शिष्यांमध्ये दत्तभक्तीची आवड निर्माण केली. स्वतःच्या सर्व ताकदीने हे शिवधनुष्य पेललं, आणि आपल्या शिष्यानाही त्या योग्य बनवलं. त्यांची मागील जन्मातील कर्म दत्तभक्ती करता करता हळूहळू कमी केली. निष्काम कर्माची ओळख करून दिली. आवड निर्माण केली. अन्नदानसारखी सर्वात मोठी सेवा करवून घेतली. म्हणूनच दत्त महाराजांनी स्वतः, मला फिरायला घेऊन चल, ही इच्छा प्रगट केली. त्यायोगे पालखी सोहळ्याची कल्पना मांडली गेली आणि पूर्णत्वास नेली. “जो वाहतो विश्वाची पालखी, त्याची पालखी आम्ही वाहतो” ह्या साठी सर्वाना योग्य बनवले. अजूनही हा प्रवास चालूच आहे.
|| श्री गुरुदेव दत्त ||