
एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात.
महाभारतातील एक उदाहरण फारच बोलके आहे. युद्ध काळात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत होता. जेव्हा कर्णाने अर्जुनावर वासुकी अस्त्राचा प्रयोग केला, तेव्हा कृष्णाने अंतर्मनाद्वारे घोड्याना खाली बसविले. एका क्षणात सर्व घोडे खाली बसले. रथ काहीसा खाली दाबला गेला व अर्जुनाच्या कंठाचा वेध घेणारा बाण त्याच्या मुकुटाला लागला. त्या दिवसाच युद्ध संपल्यावर नेहमीप्रमाणे कृष्ण रथाखाली उतरला. मग त्याने अर्जुनाला उतरविले. थोडे अंतर पुढे गेल्यावर अर्जुनाच्या रथाने धडाधड पेट घेतला. आश्चर्य वाटून अर्जुनाने त्याच कारण केशवाला विचारले. श्रीकृष्ण म्हणाला, मी तूझ्यासोबत होतो म्हणून तुझ्यावर सोडलेली सर्व अस्त्र, शस्त्रे रथाभोवती फिरत होती. माझ्यामुळे ती तुला स्पर्श करू शकली नाही. आपण उतरताच त्यांच्या प्रभावाने रथ जळुन गेला. सद्गुरु सतत आपल्या कृपेने शिष्याच रक्षण करीत असतात. जर ते आपल्या सोबत नसले तर आपली अवस्था त्या रथासारखी होऊ शकते. निसर्गत: प्रत्येक जीवाला एका संरक्षणाची गरज असते. त्याची व्यवस्थाही काही प्रमाणात निसर्गाने जन्मतः केलेली असते. तरी काही प्रसंग असे असतात, की ते संरक्षक कवच नाकाम होत. आणि आपण एका अनामिक भीतीखाली वावरू लागतो. माणसाच्या आयुष्यात येणारे काही प्रसंग जसे, आजारपण, संतती, अपघात, दुर्धर व्याधी या अश्या अनेकविध प्रसंगांना तोंड देताना नाकीनऊ येते. यावेळेस त्याला एक आश्वासक मदतीचा हात हवा असतो. कोणीतरी अनुभवाने, जबाबदारीने मार्गदर्शन करणारा,अखंड पाठीशी उभा रहाणारा, संकटकाळी मार्ग दाखवीणारा दीपस्तंभ हवा असतो. अशीच एक वल्ली म्हणजे आमचे सदगुरु भाऊ महाराज . ज्यानी आपल्या मायेच्या पदराखाली घेऊन आपल्या सर्व शिष्याना या येणाऱ्या संकट काळात तारून नेले.

सदगुरु नेहमीच अशा लीला करीत असतात. ज्या पुढील पिढीस मार्गदर्शक ठरतात. या लीला ग्रंथित व्हाव्या, हा सुद्धा त्यांच्याच संकल्प असतो. श्रीपाद वल्लभ चरित्रात अनेक घटना त्यानी शंकरभटा समोर घडविल्या, ऐकविल्या. जेणेकरून त्या पुढे त्याच्या करवी त्या लिहिल्या जाव्यात. सदगुरु भाऊ महाराजांच्या शिष्यपरिवारतील अशी असंख्य उदाहरणे देता येतील. कितीतरी शिष्य अपघातातून चमत्कारिकरित्या वाचले आहेत. कितीतरी गर्भधारणा न होणाऱ्या स्त्रियांना संतती प्राप्त झाली आहे. कितीतरी दुर्धर अश्या व्याधीतून सुखरूप बाहेर आले आहेत. कितीतरी जणांची व्यसनाधीनता जाऊन त्यांचे संसार सुखाचे झाले आहेत. या सदराखाली भाऊंच्या आठवणी, भेट, एखादा आयुष्यात घडलेला अविस्मरणिय प्रसंग, समाधी अनुभव, शिष्य परिवारातर्फे झालेली मदत इ. अनुभव शब्दबद्ध करण्याचा मानस आहे. जेणेकरून नवनवीन भाऊंच्या लीला आपल्या वाचनात येतील. आपले जीवन भाऊमय राहण्यास मदत होईल.
आपण लिहलेला लेख हा फक्त भाऊ महाराजांवर किंवा त्यांच्या सहवासातील अनुभवावर असणे गरजेचे आहे. भाऊंव्यतिरिक्त लिहलेले लिखाण ग्राह्य धरले जाणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. तसेच, सदर वेब साईटचे प्रकाशक त्याचा अभ्यास करून, तुमचा लेख योग्य बदल करून वेबसाइटवर प्रकाशीत करतील. तरी आपण आपले अनुभव योग्य शब्दात लिहून खालील इमेल वर पाठवावेत.
Email – SadguruBhau.Maharaj @gmail.com
विशेष सूचना – प्रकाशनाचे सर्व अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.