‘आपलं वागण अस असाव कि दुसऱ्याना त्याच अनुकरण करावस वाटल पाहिजे” अस भाऊ नेहमी म्हणत. खरतर हे वाक्य बोलायला, सांगायला फार सोपे, पण आचरणात आणायला? भाऊ स्वतःच्या वागण्याबद्दल, स्वतःबद्दल फार कमी बोलत. पण त्यांच आचरण अस होत की, काही वाक्य त्यांच्याकडे पाहूनच लिहली गेली आहेत अस वाटत. आपण नेहमीच डाॅक्टर, इंजिनिअर अथवा एखाद्या मोठया व्यक्तीबद्दल बोलत असतो. त्याला तो रोग पटकन कळला, किंवा त्याने ते केल तर काय झाल, तो इंजिनिअर आहे! पण खरा अर्थ असा आहे की, त्यांना त्याच ज्ञान आहे म्हणून ते डाॅक्टर आहेत, इंजिनिअर आहे! संतविभूतींबद्दल असेच वाक्यप्रचार वापरले जातात, जे प्रत्यक्ष देवासारखे आहेत. पण काही वेळा श्रेष्ठ व्यक्तीचं आचरण, कर्तुत्व इतक महान असत की, देव ही स्वतःच देवपण विसरून त्या व्यक्तीमध्ये एकरूप होऊन जातो. भाऊ महाराजांची भगवान श्रीकृष्णा वर अपरंपार भक्ति आणि प्रेम. श्रीकृष्णाबद्दल ऐकाव तर भाऊंच्या मुखातून. जणू काही त्यांच्यासमोर कृष्ण लिला करतोय. आणि त्या पाहून भाऊ आम्हाला सर्वार्थाने सांगताहेत. पण भाऊ प्रत्यक्ष ‘श्रीकृष्ण’ जगले. या भवसागरातून पार होताना कित्येक दुःखितांचा भार आपल्या खांद्यावर घेतला. जर जगात कुठेही देव असेल तर तो आमच्या भाऊंपेक्षा वेगळा असू शकणार नाही. ज्यांच्याकडे वैराग्य आणि श्री (श्रीमंती) एकत्र नांदत होती. अशी बरीच उदाहरण इतिहासात पाहिली आहेत, उदा.शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, माणिकप्रभु. पण एक विभूती याची देही याची डोळा पाहिली ती म्हणजे ‘सद्गुरू भाऊ महाराज’.

अदभुत विभूती – जगात काही विभूती जणू यासाठीच जन्माला येतात की त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून परमेश्वरास भेटण्यासाठी, आपण यांचा आदर्श ठेवतो. अतिशय गरीबीत बालपण, तसेच तारूण्य गेलेलं असताना आपल्या हुषारीवर, कर्तृत्वावर, बुध्दिमत्तेवर मोठमोठया पदावर काम करताना, लक्ष्मी घरामध्ये पाणी भरेल इतकी लक्ष्मी घरात येत असताना, आपल्या तत्वांना मुरड न घालता, अळवाच्या पानाप्रमाणे भाऊ लक्ष्मीपासून दूर राहून निष्कांचन आयुष्य जगले. केवढा हा त्याग… अशा त्यागमूर्ती जन्माला येण्याची कारण इतिहासात कुठेतरी लपलेली असतात.

दुसऱ्या महायुध्दानंतर एकंदरीत सर्व जगामध्ये माणसांची मानसिकता बदलत गेली. अध्यात्मिक तत्वज्ञानाप्रमाणे शास्त्राबरोबर दया, करूणा, प्रेम, आपुलकी, माणुसकी इत्यादी गुणाची फारकत माणूस घेऊ लागला; व औद्योगिक क्रांती, अत्याधुनिक विज्ञान याचबरोबर अहंकार, मोह, दांभिकपणा या गुणांची वाढ होऊ लागली. याचा परिणाम सर्व ठिकाणी भ्रष्टाचार, अशांती याच स्तोम माजल. अस म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. भगवान श्रीकृष्णाने अस्त्र, शस्त्र, विद्या, त्यांचे जाणकार यांची होळी करविली. कारण पुन्हा मानवाचा घात करणारी ही भयानक अस्त्रे निर्माण होऊ नयेत. परंतु मानव पुन्हा विनाशाच्या वारूवर आरूढ झाला होता. विज्ञान जितक प्रगत होत जात तशा नवीन समस्याही उभ्या राहू लागतात. अशा वारूला लगाम घालण्यासाठी गरज होती, मानवाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी परमसाहिष्णु आध्यात्मिक तत्वाज्ञानाची. देवही योग्य वेळेची वाट पाहत असतो. वेळोवेळी या बिघडलेल्या समाजाला मार्गाला लावायला, या भूमीवर संतरूपात जन्म घेत असतो. सद्गुरू भाऊ महाराजांचा जन्म यासाठीच झाला आहे.

सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानाचा, पुराणांचा, वेदांचा सखोल बुध्दीने अभ्यास केला असता; अस लक्षात येते की ,आपले पूर्वज म्हणजे ऋषि-मुनि. ज्यांनी विविध विषयांवर अभ्यास करून अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्याकडे अफाट ज्ञान होत. परंतु त्या काळातील समाज हे ज्ञान समजून घेईल इतका हुशार नव्हता. ते ज्ञान जसच्यातस लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचत नसे. किंवा त्याचा विपर्यास झाला असता तर त्याचे भयंकर परिणाम झाले असते. याच विचाराने त्या काळातील शास्त्रकारांनी काही रूपककथा, पुराणकथा यांचे पुरावे देवून योग्य त्या आचारकर्माची बैठक घातली. मानव प्रेमापोटी म्हणा, भितीपोटी म्हणा त्या आचरणात वागू लागला. पण विसाव्या शतकात गरजेपोटी विज्ञानाने गरूडभरारी घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा कस लावणारी पिढी जन्माला आली. आध्यात्मिक विज्ञान व आधुनिक विज्ञान यात एक दरी निर्माण झाली. अशावेळी गरज होती एका फ्लायओव्हर ब्रिजची. जो या दोन्ही गोष्टीना एकत्र सांधु शकेल. अथवा ती पोकळी भरून काढू शकेल.

मुळातच आपल्या आध्यात्मिक शास्त्राची बैठक ही भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र या विषयावर आधारलेली आहे. परंतु पुरोगामी अध्यात्मिक विज्ञानाचा ज्ञान करावयाच असल्यास ईश्वरीय गुरूकृपा असावी लागते, म्हणजेच गुरूभक्ति आणि गुरूमार्ग हा त्या ओघाने आलाच. आधुनिक विज्ञानाचा अभ्यास करून हे जमणे नाही. या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याइतक कठीण. पण ते भाऊमहारांजानी उचललं.

महापुरुषाचा जन्म – भाऊ महाराजांचा जन्म कोकणातील गोळवण गावचा म्हणजे शंकराचार्यांच्या परंपरेतील श्रीपुर्णानंद स्वामींच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या भूमीचा. मात्र आजीच्या दूरदृष्टीमुळे पेंढूर गावातील मोगरणे वाडीत मराठे गुरूजींच्या अखत्यारीत भाऊंच बालपण फूलल. भानुदास वामन गावडे हे भाऊंच नाव, पण सर्वजण भाऊंना बाबी म्हणत. आजही जुनी माणस आपला प्रचंड बुध्दीमान सुपुत्र बाबीच्या आठवणी तोंड भरून सांगतात.

मोगरण्यातील मराठे गुरूजी म्हणजे त्या काळातील नाना शंकर शेठ स्कॉलरशिप मिळवलेले. अध्यात्मिक अधिकारी पुरुष. आजीने बाबीला मराठे गुरूजींच्या पदरात घातल आणि बाबीची साधना सुरू झाली. बालपणीचा तोतरेपणा (ॐ) ओंकारसाधनेने निघून गेला. प्रचंड बुध्दीमत्तेची ओळख झाली. एका अमोघ वाणीला सुरूवात झाली. माध्यमिक शिक्षण पुर्ण होता होता भाऊ मुंबईला आले. पुढे काॅलेज करता करता नोकरी करून सर्व कुटुंबियांचा भार सांभाळला. भावंडाची शिक्षण पूर्ण केली. बहिणींची लग्न केली. त्याचबरोबर समाजकार्यही चालू होते.

मोठमोठया पदवी परिक्षा देणही चालू होत. भाऊंकडे एकूण 17 पदव्या होत्या, त्यातील प्रामुख्याने IAS, IRAS, ICS, BA, LLB, BCom, BRU, इतिहास संशोधक, हिंदी पंडित, संस्कृत पंडित, भाषारत्न ह्या होत्या. याच काळात गावातील तरूण मुलांना एकत्र करून गावात शाळा, रस्ते, पूल, विहीरी इ. मूलभूत गरजांची कामे पुर्ण करवून घेतली. ह्याच बरोबर भाऊंना साईभक्तीची ओढ लागली होती.

आज आपण ज्या पायी पदयात्रा पाहतो. याची सुरूवात भाऊंनीच लालबाग मधील पाच-सहा तरूणांना घेऊन केली होती. भाऊ रेल्वेच्या परिक्षेला बसले व पासही झाले. रेल्वेत नोकरी लागली. तिथे त्यांची भेट झाली, मोक्षगुरू श्री. पी. अण्णा स्वामी यांच्याशी. पुढच्या काळात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या आपल्या शिष्याची ते वाटच पाहत होते. पहिल्याच भेटीत.. “तुला कुणीतरी वेदोक्त मंत्र शिकवले आहेत ना”? उत्तर..”हो”. “पुढच शिक्षण मी देईन.” प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी अनुग्रहीत केलेल्या सद्गुरूंची कृपा लाभली. पी. अण्णास्वामीच भाऊंवर खूप प्रेम होत. कारण ते नेहमी सत्य बोलतं. जे या जगात खूप महाग झालय. पी. अण्णास्वामींनी भाऊंना उच्चतम आणि परमकठीण अशा हंससाधनेच शिक्षण दिल. या साधनेच्या जोरावर IAS या परिक्षेत अव्वल मूल्यांकन मिळवल. अवांतर वाचनाची भाऊंना राक्षसी भूक होती. विविध विषयांवरील हजारो पुस्तके याचकाळात भाऊंनी वाचून काढली. पुढे कामाचा व्याप इतका वाढलेला असूनही वेळात वेळ काढून आपली आवड ते पूर्ण करत. रेल्वेमध्ये कडक शिस्तीचे, अत्यतं बुध्दीमान, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून भाऊंचा दरारा होता.

हृदय-स्पर्शी वक्तृत्व – इतिहास हा त्यांचा आवडता विषय. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे भाऊंचे आदर्श. कामानिमित्ताने अख्खा महाराष्ट्र पायी फिरून काढला व लोकांना माहित नसलेला, न पचणारा इतिहास शोधून काढला. “खरा संभाजी कसा होता” ? हे भाऊंनी प्रथम आपल्या अमोघ वक्तृत्वाने जगासमोर आणल. ते बोलत असत तेव्हा प्रत्यक्ष सरस्वती त्यांच्या जिभेवर नांदत असे. पुढच्या काळात सतत सात-सात दिवस व्याख्यान देवून शिवाजी महाराजांच वेगळ रूप मांडल. पुण्यात एकदा प्राचीन अध्यात्म व मंत्रशास्त्र या विषयावर वेदमहर्षी व इतर थोर अभ्यासकांसमोर व्याखान दिल होत. दुसऱ्या दिवशी ते पेपरमध्ये छापूनही आल होत. दुसऱ्या दिवशी वेदमहर्षीनी, भाऊंना बोलावुन घेतल आणि त्यांना लोटांगण घातल. कारण भाऊंनी आपल्या व्याख्यानात जी मत्रं विद्या पध्दती लोकांसमोर सांगितली, म्हणून दाखविली ते शिकवणारे कोणी मनुष्य नसून प्रत्यक्ष “तिन शिरे सहा हात” दत्त महाराज होते.

काही काळ भाऊंनी शिर्डी संस्थानाचे सल्लागार म्हणून काम केले. याच काळात त्यांनी शिर्डीत; लेंडीबागेत सामुदायिक श्रीसाईसच्चरित्र पारायण आयोजित केलं. समाधी स्थानात पुरुषसूक्त चालू केल. बऱ्याच लोकांनी पारायणाला बसलेले असताना, भाऊंना साईबाबांशी बोलताना पाहिल होत. हा कालखंड १९५४ सालच्या नंतरचा होता. रेल्वेत नोकरीला असताना साईभक्तिच्या ओढीमुळे परवानगी मिळो अगर ना मिळो त्याची फिकिर न करता शनिवारी रात्री शिर्डीत येवून एका दिवसात शक्य होईल तेवढी सेवा करून भाऊ पुन्हा मुंबईला परतत. इतर दिवसात 16 तास काम करून आपल्या जबाबदाऱ्या ते पूर्ण करत. ” ये दिया मैने वहासे; (गाणगापुर) लाया है। बेटा अब तुम वहा जाओ ” अस बाबांनी भाऊना सांगितल व गाणगापूर येथे पाठवल. सूर्याकडुन निघालेला एक प्रकाशझोत पुन्हा सुर्याकडे जाऊ लागला. भाऊंची दत्तभक्ती सुरू झाली, आणि ते सर्व शक्तीमान परमात्म्याशी एकरूप झाले. पी.अण्णास्वामींनी शिकवलेली साधना आता बहरू लागली. एवढं असूनही वास्तवाच भान ते कधी विसरले नाहीत. खरतर भाऊसुध्दा इतर काही सिध्दपुरुषांसारखे समाधी अवस्थेत अथवा मौनावस्थेत राहू शकले असते पण त्यांनी ते नाकारल आणि आपला आदर्श भगवान श्रीकृष्णासारखा, एखादया योध्यासारखा, जगत कल्याणाचे व्रत हाती घेतल. त्यांचे विचार क्रांतीकारी होते. महाभारताने श्रीकृष्णाला क्रांतीकारी ठरवल पण जगाने त्यालाच पुढे देव मानल. समाजकार्य, अध्यात्म, लोकहित या सर्व गोष्टींची सांगड त्यांनी लीलया आपल्या कार्यात घातली होती. जन्माला येणारी नवीन पिढी अशी घडवली पाहिजे की पुढे त्या पिढीने जगाच नेतृत्व केल पाहिजे. परंतु त्यांचा मूलभूत पाया हा अध्यात्मिक विचारसरणीचा असला पाहिजे अस त्यांच्या विचारातून दिसत असे. भाऊंनी पहिल क्रांतीकारक पाऊल टाकल म्हणजे विशिष्ठ वर्गाकडे असणारी मंत्राची मक्तेदारी सोडून वेदोक्त मंत्र अलम दुनियेला नियमानुसार शिकवण्यास प्रारंभ केला. तेही विनामुल्य. आपल्या विचारातून, प्रवचनातून, व्याख्यानातून, दिशाभूल झालेल्या तरूण पिढीला जवळ करत, त्यांच्यात नवीन विचारांची ज्योत पेटवली. अध्यात्माच शिक्षण दिल. आवड निर्माण केली. ज्या मुलांना आई-वडीलांकडून समाजाने वाळीत टाकल होत, ज्यांना कोणाचा आधार नव्हता, अशा मुलांना भाऊंनी जवळ केल व हिऱ्यासारख घडवल. त्याचबरोबर समाज घडवण्याच शिक्षण दिल. ज्ञानपूर्ण सुकर्मावर, कर्मयोगावर भाऊंचा अधिक भर होता. शिकवणारा शिक्षक आणि घडवणारा गुरू यामध्ये बराच फरक असतो. जन्माला येणारी मुल बुध्दीमान जन्माला यायला पाहिजे यासाठी गर्भसंस्काराच शिक्षण त्यांनी आपल्या शिष्याना दिल. आणि अतिबुध्दीमान मुल जन्माला घातली. विधायक कार्य करण्यासाठी लागणारी योग्य मानसिकता, बुध्दीमत्ता असण गरजेच असत. याची गरज ओळखून भाऊंनी तरूण पिढीला घडवल व त्यांच्याकडून मोठमोठी कार्य करववून घेतली.

एखाद काम करताना वास्तवता न विसरता बुध्दिमत्तेच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, हे भाऊंनी शिकवल. Be practical हे त्यांच तत्वज्ञान होत. भाऊ नेहमी म्हणत “तुम्ही जर 10% महत्वकांक्षा धरत असाल तर त्याच्या हजारपट त्याच्यावर काम करा, प्रयत्न करा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल!” भाऊंनी केलेलं कार्य हे फार मोठ आहे पण त्यामागील विचार हा त्यापेक्षाही कितीतरी मोठा आहे. गणितात सांगायच झाल तर १:१००० अस मांडता येईल. यातून हेच सिध्द होत की जर एखादया कृतिमागे खूप मोठा विचार असेल तरच त्या कृतीला अर्थ प्राप्त होतो. एखादी गोष्ट करायची असेल, मग ती कितीही लहान असो ती करताना त्यामागे कल्पकता, योग्य विचार, अधिकाधिक मेहनत असावी असा त्यांचा आग्रह असे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फल्लेशु कदाचन याचा खरा अर्थ असा आहे की कर्माला कर्तव्य समजणे. कर्तव्यातच खरा आनंद आहे. कर्माला योगाची जोड दिली असता, कोणत्याही कार्यात कौशल्य प्राप्त करता येत. भगवद्गीतेवर कधीच भाऊंनी तत्वज्ञानाचा उहापोह केला नाही. पण भगवदगीता आपल्या आचरणात आणून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने भगवद्गीतेला आपल्या जीवनात न्याय दिला. आयुष्यात कर्तव्यासाठी ज्याप्रमाणे तत्वांची जपणूक केली, त्याप्रमाणे कर्तव्यासाठी, सत्यासाठी तत्वांना मुरडही घातली. भगवान श्रीकृष्णाची भक्ति करायची असल्यास त्याच्या चरित्राचे पुर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्ञानाला श्रध्देची जोड मिळाली की भक्ति फुलू लागते.

दत्तपंथ – कित्येक हजारो वर्षांमध्ये आपल्या भारतात अनेक धर्म, पंथ, योगमार्ग जन्माला आले. काही वाईटसुध्दा होते. विविध देव देवतांच्या जन्मआख्यानापासून नवनवीन भक्तिमार्ग जन्माला आले. त्या त्या काळातील परिस्थितीप्रमाणे त्यात नियमही खूप होते. बरेचशे आध्यात्मिक मार्ग क्लिष्ट व कठीण आहेत. आताच्या काळात या मार्गाने साधना करणे फारच कठीण पण जर टिकून रहायच असेल तर भक्तिमार्गाशिवाय पर्याय नाही. पूर्ण भारतवर्षांचा अभ्यास केला तर अस लक्षात येते की, आपला देश विविध भाषा, संस्कृती, रितीरिवाज यांनी नटलेला आहे. त्यामुळे भक्तिमार्गाची रूप ही तितकीच भिन्न. सर्व नदया शेवटी सागरालाच येऊन मिळतात. पण जर नदयाच एकमेकांमध्ये भेदभाव करायला लागल्या तर? या एकाच कारणाने भारत कधीच एकत्र येऊ शकला नाही. परिणामी दोन हजार वर्षात बरीचशी परचक्र भारतावर येवून गेली. आपली संस्कृती रूजवून गेली. मूळ वैदिक भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होण्याची भीती निर्माण झाली. यावर एकच उपाय होता तो म्हणजे एकसंघ भक्तिमार्गाची स्थापना करणे. असा पंथ निर्माण होणे की ज्यात सर्व पंथ विलीन होतील आणि एका मार्गाने भक्तिमार्गाचा अवलंब करतील. दत्तपंथ हेच त्याचे उत्तर आहे. द्वापारे रामकृष्णौच। कलौ श्रीपादश्रीवल्लभः। कलियूगात दत्तभक्ति शिवाय तरणोपाय नाही. भाऊ महाराजांनी दत्तभक्तिचाच पुरस्कार केला व त्याला कृष्णभक्तिची जोड दिली. सहजयोग साधनेची जोड दिली. जी सहजयोग साधना भगवान कॄष्णाने जन्माला घातली होती. मध्यंतरीच्या काळात ही साधना लोप पावली होती व पुन्हा ज्ञानेश्वरांच्या काळात तिचा उदय झाला. सद्गुरूंच्या कृपेने ही साधना भाऊंकडे आली. यातील काही क्लिष्ट व कालबाहय भाग वगळून प्रत्येकास ती सहज करता यावी, त्यासाठीच तीच सहजरूप भाऊंनी निर्माण केल. अस म्हणतात की साधना करावी लागते. पण भाऊ म्हणत की साधना आपोआप झाली पाहिजे. मग या नियमानुसार भाऊंनी एक कार्य प्रणाली निर्माण केली. जन्माला घातली म्हणुनच भाऊ महाराजांना सहजयोग साधनेचा नायक म्हणतात. ही कार्य प्रणाली म्हणजे दत्तभक्तिचा अजस्त्र चक्र आहे. आपल काम एवढच आहे की यात काही बदल न करता त्याला तेलपाणी देवून ते चक्र तसच चालू ठेवायच. जर हे चक्र चालू राहील, तर भविष्यात एक दिवस संपूर्ण जग दत्तभक्तिमय होऊन जाईल; त्यात तिळमात्र शंका नाही. शिवाजी महाराजांनी असच एक अजस्त्र चक्र मराठेशाहीच निर्माण केल. पण ते पुढच्या पिढीला सांभाळता न आल्यामुळे मराठेशाहीचा अस्त झाला. या कार्य प्रणालीची, साधनेची एक गंमत आहे. ती अशी की आपण साधना करतो अस वाटतच नाही. पण ती होत असते व देव त्याची पावती देत असतो. ईश्वरीकृपेसाठी या चराचरातील प्रत्येक जीवावर प्रेम करणे ही साधनेची पहिली पायरी असू शकते.

वात्सल्य
भाऊ महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांवर पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केल. आईच वात्सल्य, वडिलांचे प्रेम, भावाचा अधिकार, बहिणीची करूणा, मित्राची मैत्री, शिक्षकाचा दरारा हे सर्व गुण जणू त्यांच्यात एकातच एकवटलेले होते. भाऊ शिस्तीचे फार कडक होते. पण सागरासारखे प्रेमळही होते. बाह्यत्कारी जरी देवाची पाषाणमुर्ती दिसत असली तरी आत प्रेमाचा अखंड झरा वाहत असे. जे या झऱ्याजवळ गेले, ते जन्माचे कृतार्थ झाले. त्या प्रेमाची गोडी काही वेगळीच होती. जस श्रीकृष्णाने आपल्या प्रेमाने गोकुळातील प्रत्येकाला मंत्रमुग्ध केल तसच भाऊंनी आपल्या शिष्याना प्रेमाने न्हाऊ घातल. त्यांची आणखी एक खासीयत अशी होती की, ते प्रत्येकाला एका वेगवेगळया नावाने हाक मारत. ती हाक ऐकली की शंभरवेळा जन्म झाल्याचा आनंद होत असे. भाऊंच्या आवाजात एक वेगळा गोडवा होता. ज्या शिष्याच्या पापाची होळी करावयाची असेल त्यासाठी तीच जीभ ज्वालामुखी होत असे. जे या दिव्य अग्निहोत्रातुन पार झाले ते मोक्षाला पोचले. क्षणात पराकोटीचा राग आणि क्षणात आनंद हे त्यांना कस काय जमत असे; हे एक कोडच आहे. काही गोष्टी मानवी बुद्धिच्या पलीकडे असतात. जे स्वतः दुःख भोगतात व दुसऱ्याला आनंद देतात; त्यांना अरिहंत म्हणतात. याच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाऊ महाराज. कित्येक शिष्यांचे, भक्तांचे आजार त्यांनी स्वत: घेतले व त्याना सुदृढ़ आरोग्य दिले. एकदा तर स्वत:ची बायपास करवून घेतली. धन्य ते जन, ज्यानी अशा विभूतिला पाहिले. भाऊंनी केलेल्या कित्येक गोष्टी आकलनच्या पलीकडे आहेत. त्या समजून घ्यायला किती जन्म घ्यावे लागतील कोण जाणे?

क्षितिजा कडे…
वाचकांना एक नम्रपणे एक सांगावस वाटत की पूर्ण लेखामध्ये “भाऊ महाराजांबद्दल” भाऊ अस नाम वापरल गेलं आहे. याच कारण अस की स्वामी ,साई या शब्दासाठी इतर विशेषणांची गरज कधीच लागली नाही. इतकं ते नाम परिपूर्ण आहे. तसच भाऊ हा शब्द इतर विशेषणांच्या पलीकडे आहे. अस म्हणतात की ज्याला गुण नाही तो “निर्गुण “ पण खरा अर्थ असा आहे की सर्व गुणांची निर्मिती होते त्याला गुण असेलच कसा ? म्हणून त्याला निर्गुण म्हटलं जातं. आमचे जन्मदाते जरी वेगळे असले, तरी खरे माता-पिता, सर्वेसर्वा भाऊच आहेत. आपल्या शिष्याना वेळोवेळी आपल्या बरोबरच जन्माला घालून, त्यांच्या या जन्मातील चूका टाळून, मागिल जन्मातील प्रारब्धभोग, संचित याच समीकरण व्यवस्थित सोडवून त्यांना मोक्षापर्यंत नेण्याचे कार्य सद्गुरू करत असतात. आणि त्यासाठी प्रत्येक वेळी शिष्यांबरोबर युगानुयुगे जन्म घेत असतात. प्रत्येक जन्मात शिष्याला त्याच्या कर्म मार्गावर स्थिर करेपर्यंत सोबत करून, आपल्या नवीन प्रवासाला निघत असतात. पूर्वी असच एकदा सर्वांवर भरभरून प्रेम करून भगवान श्रीकृष्ण सर्वाना सोडून निघून गेला. एका नव्या प्रवासाला. मात्र मागे राहिलेल्याना आपल्या चूका ध्यानात आल्यावर म्हणावं लागलं.. परतुनी ये घनश्यामा. महाभारत काळात जर कृष्णाला देव मानलं असत तर महायुद्ध टळलं असत. जगाची राहाटी अशीच आहे. परिस जेंव्हा हातात असतो तेंव्हा तो दगड भासतो. पण त्याची जेंव्हा खरी ओळख होते तेंव्हा तो नाहीसा झालेला असतो. आमचे भाऊ नेहमी म्हणायचे ,”सूर्य जेंव्हा माध्यान्हीला येतो तेंव्हाच रिटायर्ड होता आलं पाहिजे. “कारण नंतर संध्याकाळ होणारच आहे. एक सहस्त्रसुर्य असाच अचानक माध्यान्हीला रिटायर्ड झाला. शब्द खरा ठरला.

कित्येक वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या हाताला धरून ती दमदार पावलं अनंताच्या प्रवासाला निघाली होती. आजही प्रवास चालू आहे, पण…..आता मात्र त्या आनंताकडे गेलेल्या पाऊलखुणा दिसत आहेत. अश्याच पाऊलखुणा आमच्या हृतकमळावर निरंतर उमटत राहो, हीच दत्तचरणी प्रार्थना.
हृतकमळावर पाऊल तुमचे निरंतर उमटावे।
असाल जेथे तेथूनी आम्हा दर्शन ते द्यावे।।
श्री समीर एकनाथ चव्हाण
भाऊचरणामस्तू…!!!!!!!!!!!!!!!!!!!