नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व
रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे.या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे.

इतिहास
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली !
स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे. तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.
ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. या २१ किलोमीटर प्रदक्षिणेची साद्यंत माहिती प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेल्या ’उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा” या पुस्तकात मिळते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर…नर्मदे हर… असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते. प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या पुस्तकात भौगोलिक माहितीचीही जोड देण्यात आली आहे. नर्मदा नदीची कहाणी, इतिहास, उत्तरावाहिनी परिक्रमा म्हणजे नेमके काय, उत्तर आणि दक्षिण तटावरील वाटचाल, दत्त संप्रदाय आणि नर्मदा परिक्रमा, परिक्रमेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे, जवळील तीर्थक्षेत्रे आदी विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकात मिळते.
या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील श्रीवासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन, नारेश्वर येथील श्रीरंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन, अनसूया येथील दत्तप्रभूंच्या आईचे स्थान, कर्नाळी-कुबरे भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो.
उत्तरवाहिनी परिक्रमेवर ही दोन पुस्तके आहेत :
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक ऋषिकेश ओझा
- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : लेखक प्रा. क्षितिज पाटुकले
नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम
रिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक, नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते.[६] परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते..
रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
नर्मदा-परिक्रमेचं एक अपूर्व वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा-परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक नि सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावरसुद्धा समान पातळीवरची मानली जाते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. नर्मदा-परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीनं ती कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्तरावर असो. तिनं अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढंच धन वा साधन-सामुग्री परिक्रमेदरम्यान सोबत बाळगावी. अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे.
आपला वेगळेपणा मोठेपणा लोकांच्या ध्यानात येईल असे वर्तन नर्मदा-परिक्रमेत अभिप्रेत नाही. आपल्याकडे पंढरीच्या वारीत उच्च-निच, लहान-थोर, गरीब-श्रीमंत भेदाभेद नाहीत हे तर आपण नित्य अनुभवतो. नर्मदा-परिक्रमेत ‘समभावाचं’ हेच तत्त्व स्वत: आचरणात आणायचं आहे. थोडक्यात नर्मदा-परिक्रमेची वाट माणसातलं अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारी अभिनव वाट आहे.

नर्मदा परिक्रमा एक दिव्य अनुभूती
नर्मदा परिक्रमा: नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.
हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.
या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या – मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य – जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते कि प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीनीं अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात कि श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती कि त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढ़े, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलया पर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते.
नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहे. या परीक्रमे नंतर प्रत्येक परिक्रमावासी चे आयुष्य बदलल्या शिवाय रहात नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परीक्रमेचे एकूण अंतर ३,५०० किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्या नुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे , तसेच हि परिक्रमा 108 दिवसांत देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपआपल्या शक्ती नुसार शक्य तेवढ्या दिवसांत परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसांत पूर्ण केली या पेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परीक्रमेस निघतात आणि निरंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात.
नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.
नर्मदा परिक्रमा या विषयी माहिती मिळवण्यासाठी मराठी तसेच इतर भाषेत देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठी मध्ये ‘श्री जगन्नाथ कुंटेजी’ यांचे ‘नर्मदे हर हर ’ हे पुस्तक खुपच प्रसिद्ध आहे. तसेच ‘भारती ठाकुरजी’ यांचे ‘नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा’ हे पुस्तक देखिल खुप माहितीपूर्ण आहे. ‘दा.वि.जोगळेकर’ यांचे ‘नर्मदा परीकम्मा’ हे पुस्तक देखील छान आहे. अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
नर्मदे हर ! नर्मदे हर हर ! नर्मदे हर हर हर !