
नावाप्रमाणेच जंगलाने वेढलेल कोकणातील निसर्गाने उधळण केलेल एक गाव. मालवण पासून काही अंतरावर असलेल. जवळच शंकाराचार्य पीठाचे पूर्णानंद स्वामी व त्यांच्या चार शिष्यांचे समाधिस्थान. वर्ष १९३३ चालू झाले होते. भारत अजूनही पारतंत्र्यात होता. त्याकाळी कोणालाही सांगीतल असत तर खर वाटल नसत की या गावाच्या कुशीत एक असामान्य विभूती जन्माला येणार आहे. श्री. वामन तुकाराम गावडे यांच्या पत्नीला प्रसूति वेदना होत होत्या. बाळंतपणाची पहिलीच वेळ. दिवस होता ३१ जानेवारी १९३३ म्हणजेच माघ शुद्ध षष्ठी, शके १९५४. शुक्ल पक्ष, रेवती नक्षत्र. दत्तभक्तिचा वारसा असलेल्या घरात दत्तराजप्रियसुतम या बिरुदावलिने विभूषित होणाऱ्या एका महान पुत्राचा जन्म होणार होता. आणि ती वेळ आली. वामन गावड़े यांच्या पत्नीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. पुढे जाऊन हजारो शिष्यांचा भार वहाणाऱ्या माऊलीचा जन्म झाला. मुलाच नामकरण करण्यात आल भानुदास. दत्तभक्त असलेल्या आजोबांच नाव ठेवण्यात आल. नाव खरेच सार्थ ठरणार होत. सर्वांना अध्यात्माचा, दत्तभक्तीचा ज्ञानरूपी प्रकाश देणारा भानुदास. सावळया रूपाच्या भानुदासला सर्व बाबी म्हणत असत. बाबी मोठा होऊ लागला. अचानक गावात प्लेगची साथ आली. सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झाल. लहानग्या भानुदासची रवानगी मोगरणे म्हणजे आजोळी करण्यात आली. कृष्ण जसा गोकुळात वाढला तसेच भाऊंच पुढील बालपण प्रेमळ मामा, मामी व आजीच्या संगोपनात गेलं.
जन्म स्थानाशी असलेली आपली नाळ कधीचं तुटत नाही. शंकराचार्यांच्या स्थानात त्यांच्या शिष्यांचे येण होत असे. त्यावेळी भाऊंची त्यांच्याशी भेट होत असे. एका विशिष्ठ ठिकाणी त्यांची भेट होत असे. भाऊ एकदा बोलता बोलता सहज या बद्दल बोलून गेले होते. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी भाऊंना मिळाल्या होत्या. एखाद्या सत्पुरुषांची जडणघडण होण्यासाठी नियतीच साऱ्या गोष्टी घडवून आणत असते. हे एक कारण असाव भाऊंचा जन्म गोळवणात होण्याच. भाऊंना पुढील काळातही अशा अनेक सत्पुरुषांचा सहवास लाभला होता. गोळवण गावात असलेल्या शाळेला भाऊंच्या वडिलांनी म्हणजे तात्यांनी जमीन दान दिली होती. भाऊंच्या आजोळी, मोगरण्यात असलेल्या शाळेला भाऊंच्या आजोबांनी जमीन दिली होती व शाळा बांधूनही दिली होती. समाज कार्याचे गुण वारसाहक्काने भाऊंमध्ये आले होते. भाऊना त्यांच्या आजोबांचं नाव ठेवण्यात आलं होतं ते ही दत्तभक्त होते. आजोबांनी रचलेल्या दत्तभक्तीच्या पायावर भाऊंनी दत्त कार्याच मंदिर उभं केलं होतं.

शिक्षणामुळे व इतर समाजकार्यामुळे भाऊंच गावी जाणं कमी होत. वेळ मिळेल तेंव्हा ते आजोळी व गावी जात असत. पूर्वी गोळवणात भाऊंच्या पूर्ण कुटुंबाचं एकच मोठं घर होत. भाऊ व त्यांची सर्व भावंडे शिक्षणानिमित्त तसेच कामानिमित्त मुंबईतच स्थिरस्थावर झाली. वर्षातून एकदाच पूजेच्या वेळी येण होत असे. जेथे भाऊंचा जन्म झाला तो घराचा भाग तसाच राहिला होता. भाऊ महाराजांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी श्री. काकाश्री यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. गावातील जुन्या मंडळींना विश्वासात घेतले. जन्मस्थानी भाऊंच छोटेखानी मंदिर व्हावं ही काकाश्री यांची ईच्छा होती. भाऊंचे भाऊ, बहिणी इतर आप्त सर्वांची मान्यता मिळाली, सहकार्य मिळालं. काकाश्रीनी या कामासाठी कंबर कसली. सर्व शिष्यांचाही हातभार लागला. भाऊंच्या कृपेने सर्व व्यवस्थित जुळून आल. सर्वांच्या प्रयत्नाने जन्मस्थळी सुंदर अस सुबक मंदिर उभं राहिलं.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती