
|| ॐ श्री भानुदासाय नमः ||
‘भाऊस्पर्श’
कधी कधी काही नावातच इतकी जादू असते इतकी ताकत असते. की त्याच्या नुसत्या उच्चाराने ही एक वेगळी उमेद मिळते जीवनाला. जस “साई, स्वामी” त्या नावा पैकीच एक नाव म्हणजे ‘भाऊ’ ते माझ्यासाठी एक प्रेमळ आई, खुप काळजी घेणारे वडील ,माझ्या आयुष्यातील सर्व सिकरेट्स माहिती असणारा माझा मित्र, आणि तेवढेच वेळ पडली तर काठी न उचलता नुसत्या नजरेने अगदी झालं तर शब्दानी आमच्या मनाला चांगले वळणं लावणारे कडक शिक्षक,तेच सर्व काही. देवाला मी पाहिलं नाही पण मला त्याच्यात नेहमी एका देवाची छबी दिसायची, त्यांच कृष्णावर विशेष प्रेम. ते असं म्हणायचे की ‘कृष्ण हृदयात उतरवता आला पाहिजे, मग आयुष्य बघा कसं कृष्णमय होऊन जाईल जिथे तिथे तुम्हाला कृष्ण दिसू लागेल. हो हे त्यांचं वाक्य खरं ठरलं. माझ्या आयुष्यात भाऊ, भाऊ करता करता मी कधी भाऊमय झाली ते माझं मलाच कळलं नाही. माझ्यासाठी माझा ‘सखा पाठीराखा कृष्ण’ म्हणजे माझी ती भाऊ माऊली, भाऊ हे नुसत नाव नाही तर एक आधार आहे. मला खूप वेळा हा प्रश्न पडायचा की ह्यांना सर्वांच्या मनातल सर्व कसं काय ऐकायला येते.बरीच लोक त्यांच्याकडे आपल्या काही समस्या घेऊन यायचे भाऊंना ते त्याच्या समस्या सांगण्याआधीच भाऊ त्याच्या प्रवचनातुन त्यांची उत्तर त्याना द्यायचे.
त्या वेळी नुकतीच वशिंद ला दर गुरुवारी पालखी चालू झाली होती.पालखी चालू होण्याआधी ते दुपारी तीन- चारच्या दरम्यान, आलेल्या लोकांशी गप्पा मारायचे खरं सांगायचं तर माझ्यासाठी पालखी फक्त निमित्त असायचं खरंतर मी फक्त आणि फक्त त्याना बघायला जायची. त्याच्याकडे बघण्यात रंगुन गेलेली असायची. त्याच चालणं त्यांच बोलणं, बोलताना गालावर दोन बोट ठेवण्याची त्यांची पद्धत त्यांचं ते खुर्चीत बसून सतत स्वताच्या पायावरून हात फिरवण, एखादा गंभीर विषय बोलतानाही मध्येच एखादा विनोद करून वातावरण बदलुन टाकण ,इतके सूंदर हसायचे ना भाऊ की त्यांचं ते हसणं म्हणजे भर उन्हात चांदण शिंपल्याचा अनुभव. मन कसं आल्हाददायक होऊन जायचं.बरेच जण भाऊंसाठी काही ना काही खाऊ घेऊन यायचे, भाऊंना नवनवीन पदार्थ चाखायची फार आवड ते आवडीने सर्व पदार्थ थोडे थोडे खायचे,त्यांना ते पदार्थ खाताना बघून त्या पदार्थांची चव काय असेल ते भाव त्यांच्या चेहऱ्यावरून दिसायचे. मला तर तेव्हा सतत अस वाटायचं, पटकन भाऊंनी एखादा घास मलाही दिला तर आणि ते भाबडे द्यायचे ही. कारण शेवटी आईच ती आपल्या मुलांच्या मनातील भाव ती तर ओळखणारच, त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एक विशेषता होती. त्या प्रत्येक घटनेतून मला झालेली त्यांची ओळख मला प्रत्येक वेळी नव्याने त्यांच्या प्रेमात पाडायची.
पालखी चालू होण्याच्या काही वेळ आधी ते पालखी मार्गावर प्रदक्षिणा घालायचे. एकदा असेच ते प्रदक्षिणा घालत असताना सोवळ्यात होते. त्यावेळी मी आणि माझा भाचा आर्यन मठात आलो; आर्यन जेमतेम एक दिड वर्षांचा असेल भाऊंना पाहिलं की त्याला काय व्हायचे माहीत नाही.तो जो माझा हात सोडून पळत सुटला तो थेट भाऊंच्या दिशेने ते हि मोठी हाक मारत ‘भा……ऊ बाबा, त्या वेळी भाऊंच्या आजूबाजूला बरीच मंडळी होती.आर्यन ला त्यांच्या दिशेने धावत येताना बघून सर्वांना कळून चुकलं की हा आता भाऊंना येऊन हात लावणार म्हणजे शिवणार, कारण भाऊं सोवळ्यात होते. म्हणून सर्व मंडळी त्याला रोखण्यासाठी पुढे सरसावली, एका क्षणाचाही विलंब न लावता भाऊ ओरडले थांबा! येऊ द्या त्याला माझ्याकडे. मला पाहिलं की त्याला गहिवरुन येते. म्हणून तो धावत येतो माझ्याकडे वाट सोडा त्याची येऊ दे त्याला, आणि भाऊ तसेच त्याच जागी गुढग्यावर खाली बसले आणि आवेगात आलेल्या त्या आर्यनला त्यानी घट्ट आपल्या मिठीत घेतले ती भेट, तो क्षण, ती वेळ, मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. किती ते प्रेम किती ती माया, ‘ही आहे माझी भाऊ माऊली’ कसल्याही सोवळं-ओवळ्या चा विचार न करता भाऊंनी त्याला मिठीत घेतले. त्या क्षणाला किंचीतसा मनात विचार आला कदाचित मी ही आता आर्यन इतकी लहान असती तर, त्यावेळी जरी मी लहान नसली तरी तो अनुभव तो स्पर्श अजूनही डोळे बंद केले तरी जाणवतो.
भाऊ हे नुसते मनात नाही तर अंतरंगात उतरले आहेत सर्वांच्याच आणि ते सतत आपल्या सोबतच असतात. जस ‘हवा’अस्तित्वात असते पण दिसत नाही फक्त जाणवते.पण तिच्या असण्याने आपले अस्तित्व आहे. तसेच भाऊ आज देखील अस्तित्वात आहेत आणि कायम राहतील.
ll श्री गुरुदेव दत्त ll
सौ.जान्हवी समीर चव्हाण
‘भाऊंचा सहवास.’
ऐसे सदगुरु मज लाभले ! माझे पुण्य फळा आले !!
भाऊ महाराजांबद्दल लिहावं अस खूप दिवस मनात होत. पण कुठून सुरुवात करावी, हेच समजत नव्हतं. कारण भाऊ महाराजांनी आमच्या कुटुंबाला खूप काही दिल आहे. आमचं नशीब आणि आई वडिलांची पुण्याई, म्हणून भाऊंचा सहवास मला लहानपणापासूनच लाभला. नेमक कधी हे सांगणं खूप कठीण आहे. पण जेव्हापासुन समजायला लागलं, तेव्हापासून भाऊ आमचे गुरु, सदगुरु, देव, मित्र, सर्व काही आहेत.
त्यावेळी मी पहिल्यांदा PDM (पिंपळेश्वर दत्त मंदिर) याठिकाणी बाबांबरोबर गुरुवारच्या आरतीला आले. त्यावेळी भाऊंची ओळख झाली. हळूहळू भाऊंनी, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यासारख्या अनेक संतांबद्दल माहिती दिली. पारायण पद्धत समजावली आणि विविध पारायणे करून घेतली. मंत्र साधना शिकवली. त्यांच्यामुळेच या सर्व संतांचे आशिर्वाद मिळाले.
भाऊ महाराज काळाचौकीला ११ नंबर बिल्डिंगमध्ये राहत होतेे तेव्हा मी आणि शिल्पा चव्हाण आम्ही दोघी भाऊंसोबत राहत होतो. मी तिथूनच कॉलेजला जायचे. आम्हा दोघांनाही एवढं काही चांगलं जेवण बनवता येत नव्हतं. पण जे काही भाऊंसाठी म्हणून जेवण करायचो ते चांगलच व्हायचं. आणि जर कधी एखादा पदार्थ बिघडला, तर तो आम्ही बाजूला ठेवायचो. आमचा हाच प्रयत्न असायचा की भाऊंना बिघडलेला पदार्थ द्यायचा नाही. पण भाऊ बिघडलेलाच पदार्थ मागून घ्यायचे. आणि तो पदार्थ आवडीने खायचे. नंतर पूर्ण जेवणाचे भरभरून कौतुक करायचे. भाऊ स्वतः एक उत्तम आचारी होते. त्यांनी आम्हाला स्वयंपाकाचे बरेच बारकावे सांगितले. भाऊंनी स्व हस्ताने बरेच पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घातले आहेत. पावाची भाजी, भरलेली केळी, कोटेट टोस्ट, रशियन सँडविच हे काही पदार्थ भाऊंनी आम्हाला बनवायला शिकवले.
भाऊ महाराज जिथे राहतात तिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते. याचा आम्हाला खूप वेळा अनुभव आला आहे. मी, शिल्पा, भाऊ आणि 2 ते 3 माणस जेवतील, एवढच जेवण आम्ही रोज बनवायचो. भाऊंना भेटायला नेहमी बरेचजण यायचे. भाऊ त्याना जेवणाचा आग्रह करत. त्यावेळी आम्हांला खूप टेन्शन यायच. आता जेवण कस पुरणार? पण कितीही जण जेवायला थांबली, तरीसुद्धा जेवण कधीच कमी पडलं नाही. जेवढं असेल तेवढ्यात बरोबर सर्वांच जेवण होऊन उरायच. आम्ही सर्व मुलं मुली संध्याकाळी भाऊंकडे जमायचो. त्यावेळी खाण्याची रेलचेल असायची. एक वेगळाच उत्साह असायचा. सर्वांना पोटभर पुरेल एवढं भाऊ मागवायचे आणि खायला लावायचे. त्यांच्य सोबत सतत अन्नपूर्णा आहे, अस मला जाणवायचं.
असेच काही अनुभव माझ्या कुटुंबासोबतचे आहेत. माझ्या बाबांना, वडिलांचं छत्र लहानपणापासूनच मिळालं नव्हतं. त्यांना आपल्या पाठीशी कोणीतरी उभे राहावे, मदतीचा हात द्यावा, अस सतत वाटायचं. त्याना जेव्हा जेव्हा गरज होती, तेव्हा तेव्हा भाऊ महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून बाबा, भाऊ महाराजांना आपले वडीलच मानायचे. मला आठवत की आम्ही लहान असताना, बाबांना डायबिटीसचा अटॅक आला होता. त्यांचं तोंड वाकडं झाल होत. आम्ही खूप घाबरलेलो. आई लगेच त्याना डॉक्टरकडे घेऊन गेली. घरी आम्ही दोघीच बहिणी होतो आणि अचानक भाऊ आमच्या घरी आले. बाबांची चौकशी करू लागले. आम्हाला धीर दिला. तेव्हा आम्ही विचार करू लागलो की, भाऊंना हे कस समजलं. त्याना हे समजलं कारण त्याचं आमच्या घरावर लक्ष आहे. आमच्या सर्वावर प्रेम आहे. बाबा बरे होईपर्यंत दरोरोज ते चौकशी करायचे. भेटायला यायचे. माझी आईपण कायम आजारी असायची. पण भाऊ महाराज भेटल्यानंतर तीच आजारपण खूप कमी झाल. अशा बऱ्याच घटना आहेत, ‘त्या’ प्रत्येक वेळी भाऊ जवळ असायचेचं.
अजून एक अनुभव आठवतो. आम्ही लहान होतो तेव्हा आमचं घर नावावर करण्यासाठी खूप मोठी रक्कम बाबांना जमा करायची होती. तेव्हा आता सारखं लगेच कर्ज मिळत नसे. त्यामुळे बाबांना खूप टेन्शन आलं होतं. एक दिवस ते P D M मध्ये गेले असता भाऊंनी बाबांना विचारलं की दाजी तुला काही पैशाची अडचण आहे का ?, पैसे पाहिजेत, मी देऊ का? हे ऐकल्यावर बाबांच्या डोळ्यात पाणीच आलं. कारण आजकाल कोण; कोणाची एवढी काळजी करतो, जिथे सख्खे ही साथ देत नाही तिथे आमची भाऊ माऊली, किती त्यांना काळजी. हा प्रसंग आठवला की आताही बाबांच्या डोळ्यात पाणी येत.
काही कालावधीने, भाऊ महाराजांनी कायम स्वरुपी वाशिंदला राहायचं ठरवलं. त्यावेळी त्यांच्या काळाचौकीच्या घरातील सर्व सामान वाशिंदला नेण्यात आलं. त्यात एक खुर्ची होती, जी भाऊ महाराज नेहमी बसायला वापरत असत. त्यांनी ती खुर्ची मला आठवण म्हणून दिली. आणि ती घरी न्यायला सांगितली. ती खुर्ची आजही माझ्या बाबांच्या घरी आहे. तीच रोज पूजन केलं जात. ते आमच्या घरातील भाऊ महाराजांचे स्थान आहे.
अशी ही माझी भाऊ माऊली खूप कृपाळू, कणवाळू, मायाळू आहे. ती अंतर्ज्ञानी आहे. त्यांच्या प्रत्येक शिष्यावर त्यांचं बारीक लक्ष आहे. आपलं बिघडलेलं कर्म सुधारण्यासाठी, आपल्याला फक्त त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे.
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!
सौ. वैष्णवी विशाल पाटील (पिंकी)
‘गुरु सान्नीध्य’


भाऊंनी साजरा केलेला सर्वात मोठा आयुष्यातला पहिला अणि शेवटचा वाढदिवस (गाणगापूर)
मंत्रांमध्ये इतके सामर्थ्य आहे की त्यांच्या लहरींनी आपण आपली संकटे दूर करू शकतो हे ज्यांनी अनुभवातून दाखवून दिले… आजच्या धकाधकीच्या जगात आपल्या परिवाराला चांगल्या गोष्टी, चांगले विचार देण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामुळे मला लाभले… त्या माऊलीची, माझ्या सद्गुरू श्री भाऊ महाराजांची ही गोष्ट आहे. त्यांच्या सोबत घालवलेल्या काही क्षणांची, आठवणी माझ्या शब्दात मांडण्याचा इथे प्रयत्न करते..
आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ. वडिलांच्या निधनानंतर माझी आई भाऊंच्या प्रवचानाना जात असे. सोबत आम्हालाही घेऊन जाऊ लागली. आमची परिस्थिती खूप बेताची होती. म्हणून एक दिवस भाऊंनी माझ्या आईला विचारले ,” रेखा तू गाणगापूरला राहशील का? ” त्यावेळेस गाणगापूर मठाचे बांधकाम चालू होते. पण आम्ही सर्व लहान असल्यामुळे तिने नाही असे सांगितले. मग भाऊंनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळविला. त्यांनी मला विचारले, “शिल्पा तू गाणगापूरला राहशील का? बाळ, तुमच्या घरी खूप अडचणी आहेत. तू राहिलीस तर आईवरचा भार थोडा कमी होईल. मीही हो म्हणाले. गाणगापूर मध्ये माझ्यासारखी बरीच मुलं राहायला होती. खरं तर, अविश्वासाचे रिकामे भांडे घेऊन मी गाणगापूरला गेले. पण त्या दीड दोन वर्षात आपल्या विश्वासाने, अनुभूतीने आणि प्रेमाने त्यांनी इतके काठोकाठ भरून टाकले की ते आता कधीच रिकामे होणार नाही.
मुंबईला घरामध्ये जिचा दिवस बारा वाजता सुरू होणारी मी, गाणगापूरात पहाटे ५ वाजता उठायची. भाऊंना चहा द्यायची. भाऊंना व तिथे राहणाऱ्या मुलांसाठी नाष्टा व जेवण बनवायची. जेवणातले काहीही येत नसताना, मी हे सगळे गाणगापूरला आवशी आणि भाऊंकडून शिकले. मी केलेले कच्चे-पक्के अळणी पदार्थ भाऊ आवडीने खात. माझे कौतुक करत. मला ते खूप आवडायचे. ते पदार्थ अजून चांगले करण्यासाठी मार्गदर्शन करत. भाऊ उत्कृष्ठ स्वयंपाकी होते. हे मला त्यावेळी उमजले. गाणगापूर, वाशिंदमध्ये बरेच वेगवेगळे पदार्थ भाऊनी स्व हस्ताने मुलांना बनवून खाऊ घातले आहेत.
मी भाऊंना गुरु समजण्याच्या भानगडीत कधी पडलेच नाही. माझ्यासाठी ते माझे वडीलच होते. मुलींसाठी आईचे घर म्हणजे तिचं माहेर असतं. पण माझं माहेर गाणगापूर. आई-वडिलांनी जीवन दिले, पण ते कसे जगायचे हे भाऊंनी शिकवले. आई-वडिलांनी संस्कार दिले, पण त्याचा उपयोग कधी, कसा, कुठे करायचा हे भाऊंनी शिकवले. आयुष्यात कितीही संकटे आली तरी Give up नाही करायचे हे भाऊंनी Directly आणि Indirectly शिकवले.
एके दिवशी भाऊंनी माझे बारसे केले. त्यांनी माझे नाव ठेवले च्यानु. ते मला च्यानु म्हणायला लागले. मासिक धर्म असला की आम्ही एम सी रूममध्ये राहायचं तरी ते सकाळी पाच वाजता बाहेरच्या गेटवर येऊन मला हाक मारायचे. च्यानु, च्यानु.. मी त्या प्रेमळ हाकेसाठी उठायचे दरवाजा उघडायचे आणि ओ द्यायचे. मग ते परत मठात जायचे, पण मला कळत नव्हते की त्यांनी हे माझ नाव च्यानू का ठेवले? एके दिवशी रात्री आम्ही सगळेजण त्यांच्या पायाचे मालिश करत असताना ते बोलले की तिचं नाव मी च्यानू का ठेवलं आहे तुम्हाला माहित आहे का? ती मला चहा विचारताना कशी बोलते बघा.. भाऊ चानू म्हणजे भाऊ चहा आणू का आणि आम्ही सगळे हसायला लागलो.
गाणगापूरमध्ये खूप कडाक्याची थंडी पडते. म्हणून मी कृष्णा कोळीचे स्वेटर घातले होते. कारण माझ्याकडे स्वेटर नव्हते. खूप थंडी होती. सकाळी भाऊंना चहा देण्यासाठी उठले. तेव्हा त्यांनी मला विचारले, तू स्वेटर कोणाचे घातलेस. मी बोलले कृष्णाचे. चहा झाल्यावर, ते त्यांच्या खोलीमध्ये गेले व स्वतःचा स्वेटर घेऊन आले व माझ्या हातात दिला व म्हणाले हे घे तुला. अश्या खूप छोट्या छोट्या गोष्टींनी ते आमची काळजी घेत असत. अशा गोष्टींची काळजी करणारी भाऊ माऊली कुठे भेटेल का? अशा बऱ्याच आठवणी आहेत ज्या लिहिणे शक्य नाही.
आणखी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगाविशी वाटते. एक दिवस सकाळी भाऊ मला बागेत फिरायला घेऊन गेले तेथे जाताच एक अतिशय सुंदर सुगंध आला. मी दीर्घ श्वास घेऊन तो घेतला. पण तो बागेतल्या कोणत्याही फुलाचा नव्हता. इतक्यात भाऊ म्हणाले, च्यानू तुला सुगंध जाणवला. मी हो म्हटले. पण हा कोणत्याही फुलाचा नाही असे बोलले. भाऊ म्हणाले, आपल्याबरोबर कोणी तरी फिरत आहे, त्याचा हा सुगंध. मी मनात घाबरले आणि पटकन भाऊंना विचारले कोण आपल्याबरोबर फिरत आहे आणि हा कसला सुगंध आहे. भाऊ म्हणाले, “बाळ दत्त महाराज आपल्या मठात येऊन जातात. त्याचाच हा सुगंध आहे. त्याला कस्तुरी सुगंध म्हणतात. हा सुगंध आपल्याला जाणवू लागला की समजावे दत्तप्रभुंची स्वारी येऊन गेली. मला खूप आनंद झाला की स्वतः दत्तगुरु आमच्या सोबत बागेत फिरत होते. आत्ता त्याची जाणीव होते की भाऊसोबत दत्तगुरु असायचे.
गाणगापूरला राहिल्यामुळे खूप काही शिकायला मिळते. अगदी संडास साफ करण्यापासून ते लाद्या उचलणे. भिंतीना कलर करणे. बागेला पाणी घालने इत्यादि.. कधी कधी भाऊ म्हणायचे हे ट्रेनिंग स्कूल आहे. इथे शिकलेला जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो. कामे कशी आणि कोणत्या पद्धतीने केली पाहिजे ते समजते. अर्थातच सर्वात मोठे ट्रेनर म्हणजे भाऊ. आमची साता जन्माची पुण्याई म्हणून सद्गुरु भाऊ महाराजांसोबत गाणगापूरसारख्या सिद्ध भूमीत राहायचे भाग्य माझ्या पदरात पडले.
असाच अजून एक छोटासा अनुभव सांगते. भाऊ, भाऊबीजेला प्रत्येकाला ओवळणीमध्ये एक विशिष्ट घडी करून फुंकर मारून पैसे द्यायचे. त्यातले आता थोडेसेच माझ्याकडे आहेत. थोडे परिस्थितीनुरुप खर्च झाले. कारण बऱ्याचदा ओढ असली तरी त्यांच्याकडे जाण्यासाठीही आमच्याकडे पैसे नसायचे. त्यावेळी हे आपसूक खर्च व्हायचे. असंच एकदा गाणगापूरवरून निघताना मी त्यांना दक्षिणा द्यायला गेले तेव्हा ते म्हणाले , “अग शिल्पा दक्षिणा का देतेस. मी म्हणाले, मम्मीने दिलेत, तुम्ही घ्या. त्यांनी ते घेतले, आणि खिशातून पन्नास रुपये काढले आणि आपल्या नेहमीच्या शैलीत फुंकर मारून त्याची घडी करायला लागले. आणि बोलले बाळ, हे पैसे नीट सांभाळून ठेव. अगदी अडचण आली तरी तुझ्याजवळ ठेव. त्यानंतर मला बस म्हणाले मी तुला गोष्ट सांगतो. पिंपळेश्वरला आपल्याकडे माया डोळसचा भाऊ यायचा. त्याला मी असेच पैसे दिले होते सांभाळून ठेवायला. एक दिवस त्यांचे पैसे हरवले आणि त्याचा अपघात झाला. मी काय समजायचं ते समजले. अजूनही ते पैसे माझ्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाल अशा पैशाने कोणाचा जीव वाचतो का.. तर सकारात्मक ऊर्जा संचय करण्याची ही एक पद्धत आहे. ती सकारात्मक ऊर्जा पैशामार्फत ट्रान्सफर केली जाते. जे हे शास्त्र जाणतात त्यांना हे माहित आहे. मला हे माझ्या भाऊमूळे माहीत झालं. अशा अनेक गोष्टी भाऊंच्या सहवासात आम्हाला भाऊंनी सहजरीत्या समजावल्या.
आजच्या विज्ञानाच्या युगात विज्ञानाची कास धरून अध्यात्माची गोडी निर्माण करणारी सद्गुरु भाऊ माऊली मला मिळाली आणि जन्माचे सार्थक झाले.
ll श्री गुरुदेव दत्त ll
!! सदगुरु श्री भाऊ महाराज की जय !!
सौ.जानवी जयवंत जाधव ( च्यानु )
‘सुवर्ण काळ’
गाणगापूरला निर्गुण पादुकांचे जेव्हा तुम्ही दर्शन घेता, त्यावेळी गाणगापूरला तुम्ही परत कधी येणार याची तारीख स्वतः दत्त महाराज ठरवतात. ते आपल्या हातात नसते म्हणून गाणगापूरला येणे आणि त्याहीपेक्षा तिथे राहून सेवा करणे हे आपले परम भाग्य आणि हे भाग्य मला माझ्या सद्गुरूंमुळे लाभले. सुवर्ण काळ म्हणजे सोनेरी दिवस, खरंच माझ्या आयुष्यातील ते सोनेरी दिवस होते जे मी माझ्या सद्गुरू बरोबर गाणगापूरला घालवले. भाऊ महाराज हे फक्त माझे सद्गुरुच नव्हते तर माझे आई वडील मित्र आणि सर्वस्व होते अर्थात आहेत.
मी आठवीत असताना भाऊंकडे आलो, व त्यांच्या सहवासात रमलो. शाळेत मे महिन्याची, दिवाळीची सुट्टी पडल्यानंतर भाऊ मला गाणगापूरला घेऊन जायचे. गाणगापुरात संगम रोडला ‘भालचंद्र महाराज उपासना मठ” नावाचा भाऊंनी मठ उभारला. कामं सुरूच होती. सुरुवातीला भाऊ स्वतःबरोबर मला गाणगापूरला घेऊन गेले. आम्ही मठात पोहोचलो. प्रथम भाऊंनी स्वतःबरोबर तेथे राहणाऱ्या मुलांसाठी खूप खाऊ आणला होता. ते नेहमी आणत. भाऊंसोबत राहणे म्हणजे खाण्याची धम्माल. तो खाऊ त्यांनी किचनमध्ये दिला व मला पूर्ण मठ स्वतः फिरवून दाखवला व त्यांनी स्वतःसुद्धा निरीक्षण केले. नंतर भाऊंनी कपडे बदलले. अगदी साधी राहणी फक्त सफेद हाल्फ पॅन्ट. मी आपला फुल्ल पॅन्ट घालूनच उभा होतो. भाऊंनी सांगितले बाळं हाल्फ पॅन्ट घाल, आणि तो फावडा व घमेला घेऊन मागच्या बागेत ये. मी पोहोचलो. पूर्ण बागेत ढोपराएवढे गवत वाढले होते. मला व माझा मित्र आशिष मयेकर याला भाऊंनी काम दिले, हे गवत पूर्ण खापरून काढा. जास्त मोठे काम नव्हते. फक्त १० दिवस लागले. १० दिवसांनी त्या कर्नाटकातील उन्हात आम्ही सुद्धा गवताप्रमाणे करपून निघालो. पण काम पूर्ण झाले. भाऊंनी कॊतुक केले . दिवाळीच्या सुट्टीत मठात मज्जाच मज्जा अष्टतीर्थ, नुर्त्यस्पर्धा, गुरुचरित्र पारायण सप्ताह, रांगोळी स्पर्धा, कार्तिक पौर्णिमा, वनभोजन, संगमावरती महाराज्यांसमोर गरबा नृत्य ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी रमून गेलो. भाऊ प्रत्येकातील सुप्त गुण अचूक हेरायचे. तसेच माझ्या मधील व माझा मित्र नितीन दुपटे यांच्यामधील नाशिक बाजा, ढोल ताशा वाजवण्याचा गुण त्यांनी अचूक हेरला व त्यांनी आम्हाला देवळात, संगमावरती व मठात नाशिकबाजा वाजवायला सांगत गेले. हळूहळू हा बाजा पूर्ण गाणगापुरात प्रसिद्ध झाला. केवढे मोठे भाग्यं हे ! देवासमोर वादन सादर करणे. आनंद हि व सेवा हि…
गाणगापुरात येणे जाणे चालूच राहिले. काही वर्षांनी, मी मुंबईत होतो. भाऊ मला बोलले, तू गाणगापूरला ये. मी गेलो नाही. पुन्हा दीड महिन्यांनी भाऊ मला बोलले, विकास तू गाणगापूरला ये नाहीतर भोसडीच्या तुला मुळव्याध होईल. मी ऐकले नाही. मी आपला मुंबईतच काम करत होतो. नंतर पंधरा दिवसांनी मला मुळव्याध झाला. रक्त पडू लागले. मी भाऊंना म्हटले, मी गाणगापूरला येतो. भाऊ म्हणाले झाला ना मुळव्याध. चल आता. गाणगापूरला पोहचलो. नंतर त्यांनी मला स्वतः वापरलेले धोतर दिले व सांगितले हे घाल. आजार बरा होईल. दोन दिवसातच माझा बराच त्रास कमी झाला. पुन्हा मी गाणगापूर सेवेत रमलो. मी एक महिना राहून निघणार होतो, पण यावेळी भाऊंना मला जास्त काळ थांबवायचे होते. त्यांनी मला अनेक्स बिल्डिंग मधील पाच रूमच्या जुन्या लाद्या काढून नवीन लाद्या लावण्याचे काम दिले. मीही ते स्वीकारले. मला वाटले मी वीस पंचविस दिवसात हे काम संपवून मुंबईला जाईन. दोन महिने झाले, मी लाद्याच लावत होतो. भाऊ पुन्हा गाणगापूरला आले. फक्त दोन रूम पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर भाऊंनी काम बघितले. शाब्बासकी दिली व सर्व मुलांना मदतीस पाठवले . कृष्णा कोळी, मछिंद्र कोळी (बारक्या), नितीन, विनायक मेस्त्री, पोशिराम कोळी सर्व मुलं मदतीला आली व दहा दिवसात काम पूर्ण झाले. भाऊंनी निर्गुण मठातील हॉलमधल्या लाद्या लावण्याचे काम हि आमच्या कडून करून घेतले.
लादी लावण्याचा अजून एक किस्सा…. मागील बागेतील एका पट्ट्यात लाद्या लावायच्या होत्या. भाऊंनी मला व कृष्णा कोळीला बोलावले व विचारले ह्या पट्ट्यात मला लाद्या लावायच्या आहेत. किती वेळात लावून होतील. मी सांगितले भाऊ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होतील. भाऊ म्हणाले नाही होणार. मी पण भाऊंना बोललो लावा पैज.. भाऊ पण एकदम खेळकर वृत्तीचे, लगेच पैज लावली. लाद्या जर ४ वाजेपर्यंत पूर्ण झ्याल्या तर मी तुम्हाला बक्षीस देईन. सकाळचे ११ वाजले होते. आम्ही जोशाने कामाला लागलो. नारायण कोळी सुद्धा आमच्या मदतीला आला. दुपारचे २ वाजले. अजून अर्ध्या लाद्या पण पूर्ण झाल्या नव्हत्या. आम्ही जेवलो नाही. काम करत राहिलो. दुपारचे ३ १/२ वाजले. अजून २५ टक्के काम बाकी होते. मी कृष्णाला म्हणालो, मी मठातील सर्व घड्याळे १ तास मागे करतो. मी निघालो, सर्व घड्याळे मागे केली, आणि शेवटी भाऊ ज्या ठिकाणी बसतात ते घड्याळ मागे करण्यास गेलो. मला वाटले भाऊ झोपले असतील. पण आमचे बापाचं ते. ते घड्याळाच्या खाली खुर्ची टाकून बसले होते. मला बोलले विकास अजून १५ मिनिटे बाकी आहेत. माझे लक्ष्य आहे. नंतर बरोबर ४ वाजता भाऊ बागेत आले. त्यांनी काम बघीतले १० टक्के काम बाकी होते. पण त्यांनी आम्हाला शाब्बासकी दिली व म्हटले माझी मुले जेवली पण नाहीत आणि त्यांनी इतके काम पूर्ण केले. त्यांना मी बक्षीस देणार. नंतर त्यांनी आम्हाला स्वतः वापरले वस्त्र देऊन आमचा सत्कार केला. असे होते भाऊ खूपच दयाळू व खेळकरसुध्दा. भगवान कृष्णासारखे समोरचांच्या वयाप्रमाणे ते समरस होऊन समोरच्याचे मन चोरायचे.
बारावी नंतर माझे वडील वारले. भाऊ मला भेटायला आले. त्यांचे वाक्य अजून हि मला माझ्या वडिलांची कमी भासू देत नाही. ते वाक्य म्हणजे ” विकास तू घाबरलास, घाबरू नकोस, तुझ्या बापाचा बाप इथे बसला आहे, घाबरू नकोस सर्व ठीक होईल, मी घेतो तुझी जबाबदारी. ” ह्या एका वाक्याने मी माझ्या वडिलांचे दुःख विसरून गेलो. नंतर त्यांनी मला त्यांचे पाय चोळायला सांगितले. त्यावेळी माझ्या फक्त मनात विचार आला कि आज वडील जाऊन ३ दिवस झाले, मला सुतक आहे. आणि भाऊ लगेच मला बोलले ” मी सुतक वगैरे काही मानत नाही, ये पाय चोळ ” मी माझे सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण केले.” वयाच्या ज्या वळणावरती मुले वाया जातात त्यांना मार्गदर्शनाची गरज असते, त्या वेळी भाऊंनी मला गाणगापूरला सतत ३ ते ४ वर्ष ठेवून सेवा करून घेतली. मी हि रमत गेलो. कधी रंगकाम, कधी डेकोरेशन, कधी कारंजा बनवणे अश्या विविध कामात व रुद्र पठण, गुरुचरित्र पारायण, माधुकरी वाढणे, आरती, नामघोष, भजन विविध कामात मी व्यस्त झालो. अहो झालो कसला, भाऊंनी ते एख्याद्या जादूगाराप्रमाणे माझ्याकडून करून घेतले.
भाऊ सांगायचे ”विकर्म कर्म कर्मज्ञाम”, मी चांगली कर्म तुमच्या काढून करून घेऊन तुमची वाईट कर्म त्यातून वजा करून घेतो व तुमचे जनमोंजन्म सुधारतो ते हि अगदी सहज हीच ती सहजयोग साधना. भाऊंची सेवा करताना दिवस जात होते. सेवा नाही म्हणता येत, कारण सेवा म्हटली कि बंधने येतात. पण भाऊंवरील प्रेम हे सगळे करवून घेत होते. ते वय आध्यात्म समजण्याचे नव्हते. पण काही गोष्टी ते नकळत शिकवत होते. त्यांचे उत्तर काही वर्ष्यानी, आता काही गोष्टी घडतात तेव्हा समजतात.
एकदा एका मठातील झाडाच्या फांद्या तोडायच्या होत्या. भाऊंनी मला बोलावले व सांगितले विकास ह्या झाडाच्या जेवढे टोकावर जाता येईल, तेवढे जा, व स्वतः काठी घेऊन झाडाखाली उभे राहिले. मी झाडावर चढलो. मला म्हटले अजून वरती जा. अजून.. अजून.. मी वरती वरती चढत होतो. खालून कृष्णा कोळी भाऊंना म्हणाला, भाऊ पडेल तो… तेव्हा भाऊ गालात हसले व म्हणाले ”अरे मी असताना कसा पडेल तो”, आजही भाऊंचे ते वाक्य मी कोणत्याही संकटात असलो, आणि त्या वाक्याचे स्मरण झाले कि एक वेगळाच आत्मविश्वास येतो आणि ते हि खरेच आहे भाऊ असताना मी कसा पडेन.
एक वेगळाच अनुभव. मठात राहत असताना सकाळी उठल्यानंतर भाऊ मला मठापासून संगमाकडे जाताना उजव्या बाजूला एक तेल्लुर गावाकडे रोड जातो, त्या ठिकाणी एक नाला आहे. त्या ठिकाणी भाऊ हाल्फ सफेद पॅन्ट घालून बसलेत. मी त्यांच्याजवळ जातोय, व भाऊ स्वतःच्या जिभेवरती भस्म चोळतायत, असे मला रोज दिसत होते. त्यावेळी भाऊ मुंबईला होते. नंतर मला ते दृश्य सारखे दिसू लागले. दिवसातून चार पाच वेळा.. वाटले भाऊंना फोन करून सांगूया म्हटले; पण हिम्मत नाही झाली. नंतर सात आठ दिवसांनी भाऊ गाणगापूरला आले. मी ठरवले आता भाऊंना विचारायचे. पण दिवस कामात गेला. रोज रात्री जेवून झ्याल्यावरती भाऊचे पाय चोळताना वेगवेगळे विषय सांगायचे. त्यावेळी थोडे वेगळे विषय झ्याल्यानंतर भाऊंनी माझ्याकडे बघितले व म्हटले संगम रोडकडे जाणारा जो नाला आहे, माझे कान टवकारले. त्या नाल्यावरती दत्त महाराजानि स्वतः माझ्या जिभेवरती भस्म चोळले. मी थक्क झालो. भाऊंना काही न विचारता त्यांनी माझे उत्तर देऊन टाकले. असे खूप जणांच्या प्रश्नांची उत्तरे भाऊ प्रवचनातूनच देऊन टाकत.
असो, असे बरेच सोनेरी दिवस भाऊंबरोबर घालवले आहेत. त्यातील अगदी अल्प असे किस्से मी मांडले आहेत. स्वतः सर्व श्रेष्ठ असून, आमच्या सर्व चुका पोटात घालून, आमची लायकी नसतानाही त्यांनी आम्हांला निर्मळपणे घडवण्याचा प्रयत्न केला. माणसांची मने बदलणे हे सर्वात मोठे कठीण काम, आणि भाऊंनी तर आमची मने परिवर्तित केली. म्हणून आजही त्यांनी शिकवलेली कामे, सेवा अजूनही सुरु आहे. त्यात त्यांची न दिसणारी मेहनत व कष्ट आहेत. पण त्यांनी कधी चेहऱ्यावरती व वागण्यातून ती जाणवू दिली नाहीत.
भाऊ हे गहन आहेत. आपण जस जसा त्यांचा अभ्यास करू लागतो; तेव्हा ते आपल्याला थोडे थोडेसे उलगडू लागतात. जसे भगवान कृष्ण पूर्ण स्वरूपात कोणालाच पकडता आले नाहीत. त्याचप्रमाणे भाऊ हे अथांग सागर आहेत. त्यांच्या पोटात बरीच गुपितं लपलेली आहेत. आपण थोडं थोडं त्यांचा अभ्यास करू व त्यांना समजण्याचा प्रयत्न करू.
ll श्री गुरुदेव दत्त ll
श्री. विकास धोंडू टाकेकर